“मरणानें कवटाळलेलें आयुष्य; श्वासाची लीला दाखविणार्या (म्ह० श्वासाइतक्या क्षणभर टिकणार्या) संपत्ति; व विजेच्या चमकेप्रमाणें क्षणमात्र रम्य वाटणार्या सुंदर स्त्रिया, हीं तीन मनुष्यांचीं शल्यें आहेत.”
ह्या ठिकाणीं आयुष्य वगैरे पदार्थ, स्वभावत: रमणीय आहेत; त्यामुळें त्यांना काढून टाकणें शक्य नाहीं; पण त्यांना दिलेल्या विशेषणांच्या प्रभावानें ते अरमणीय आणि म्हणूनच दु:ख देणारे आहेत. आणि त्यामुळेंच ते शल्यासारखें वाटतात.
‘रमणीयारमणीय’ ह्या, तिसर्या प्रकाराला योजलेल्या शब्दांत, कर्मधारय समास करावा, द्वंद्व करूं नये, नाहींतर द्वंद्वांच्या जोडींतील दोन पदार्थ एकमेकांशीं विरुद्ध असें एकत्र आल्यानें होणारा जो सहचार भिन्नत्वाचा दोष तो येथें होण्याचा प्रसंग येईल.
त्याचप्रमाणें, अरमणीय व रमणीय असे एकच कार्य उत्पन्न करण्याकरता, एकत्र आले असतां, त्यांचाही समुच्चय अलंकार संभवतो.
उदाहरण :--- “शरीर, ज्ञान करून देणारें (म्हणून); कार्य रोग, विष्णूची आठवण करून देणारा (म्हणून); व संकट, वैराग्य उत्पन्न करणारें (म्हणून); हीं तिन्ही सज्जनांना सुखकाराक वाटतात.”
शरीर, रोग वगैरे मूळचे खराबच (अरमणीय), पण त्यांना दिलेल्या विशेषणाच्या प्रभांवामुळें ते चांगले (रमणीय) वाटतात. या समुच्चयांच्या बाबतींत कुणी असा आक्षेप घेतात कीं, “रमणीय पदार्थांचा एक समुच्चय व अरमणीय पदार्थांचा एक समुच्चय असें हे समुच्चय अलंकाराचे दोन प्रकार, क्रमानें सम व विषम या अलंकारांशीं मिश्रित होत असल्यानें, हे दोन्ही समुच्चयाचे प्रकार मानणें योग्य नाहीं. एकदां त्यांचें मिश्रण मानलें कीं, मग तें मिश्रण त्यांना कोणत्याही दुसर्या अलंकाराचें प्रकार होऊ देत नाहीं. आणि संकर (मिश्रण) होत असूनही त्याला दुसरा एखाद्या अलंकाराचा प्रकार मानायला लागलें कीं, प्रत्येक मिश्रण (संकर), एक नव्या अलंकाराचा प्रकार, असें करतां करतां सगळ्या अलंकारांचें अनंत प्रकार मानायची पाळी येईल.”