‘प्रतिपक्षाशीं (शत्रूशीं) संबंध ठेवणारांचा तिरस्कार करणें हा प्रत्यनीक.’
‘प्रत्यनीकम्’ हा (अव्ययीभाव समास असून, तो) समास, ‘अनीकेन सद्दशं प्रत्यनीकम’ असा सोडवायचा. ‘साद्दश्य’ या अर्थी अव्ययीभाव होतो, असें (अव्ययीभावाचें विधान करणारे प्रसिद्ध पाणिनिसूत्र जे ‘अव्ययं विभक्तिसमीप०’ इ०, त्यांतील साद्दश्य अर्थाचा वाचक यथा या पदानें,) सांगितलें असतांही, पुन्हां त्याच सूत्रांत, “सद्दश्य” या अर्थी, असें शब्दानें सांगितलें, याचें कारण हें कीं, साद्दश्य हें ज्या ठिकाणीं गौण असतें, अशा ‘सद्दश’ या अर्थाच्या स्थळीं सुद्धां, अव्ययीभाव करावा, [असें (भगवान पाणिनींना) सुचित करावयाचें होतें.]
[ हें मूळ पाणिनिसूत्र असें :--- अव्ययं विभक्तिसमीपसमृद्धिव्यृद्धयर्थाभावात्ययासंप्रतिशब्दप्रादुर्भावपश्चाद्यथाऽऽनुपूर्व्ययौगपद्यसाद्दश्यसंपत्तिसाकल्यान्तवचनेषु । (पा. अष्टा, २।१।६) यांतील ‘यथा’ या पदानें साद्दश्य हा अर्थ येत असतांही, पुनां सूत्रांत साद्दश्य हा शब्द कां घातला, यांतील मर्म हें कीं मुख्य “साद्दश्य” या अर्थी अव्ययीभाव करणें हे तर भगवान् पाणिनीना इष्ट आहेच, पण साद्दश्य जेथें गौण असतें अशा स्थळीं म्ह० ‘सद्दश’ या अर्थीही, त्यांना अव्ययीभाव इष्ट आहे. उदा० :--- सख्या सद्दश: ससखि (सखीसारखा). (त्या सूत्राचा हा अभिप्राय ध्यानांत घेऊनच ससखि (सखीसारखा). (त्या सूत्राचा हा अभिप्राय ध्यानांत घेऊनच प्रत्यनीकम या अव्ययीभावाचा ‘अनीकेन सद्दश:’ असा विग्रह केला आहे.)]
व्यवहारांत, शत्रूचा (म्ह० शत्रूराजाचा) पराभव करण्याकरतां त्याच्या सैन्यावर (अनीक = सैन्य) हल्ला करतात. पण एखाद्याला त्या सैन्यावर हल्ला करण्याचें सामर्थ्य नसलें तर त्या सैन्याचा संबंधी (प्रति = प्रतिनिधि, संबंधी) कुणीतरी (उदा० :--- सैन्याबरोबर असलेला बाजारबुणगा) पाहून त्यावर हल्ला करतात. तशा तर्हेचा (प्रतिपक्षाच्या संबंधीचा) तिरस्कार (म्ह पीडा) ज्या अलंकारांत वर्णन केला जातो, त्याला प्रत्यनीक अलंकार म्हणतात.
ह्या अलंकारांत, प्रतिपक्षाचें सामर्थ्य व हल्ला करणाराचा स्वत:चा दुबळेपणा सूचित केला जातो. आतां येथील प्रतिपक्षाचा संबंधी, अनेक प्रकारचा असू शकेल, म्हणजे त्या संबंधींचा प्रतिपक्षाशीं असलेला संबंध, उपजीव्य उपजीवक हा असेल किंवा परस्परमित्रसंबंध असेल किंवा इतर कसलाही.
उदाहरण :---- “हें मना ! मदनाचा निग्रह करणार्या (शंकरा) च्या चरणकमलांचें सतत ध्यान करणार्या मला संसाराच्या खड्डयाम्त कां बरें पाडतोस ? असें केल्यानें तुझा पुत्रशोक कांहीं नाहींसा होणार नाहीं ?”
(दुसरें) उदाहरण :---- “मोत्यांची शोभा ज्यांनीं जिंकली आहे (हरण केली आहे) अशा तुझ्या दातांच्या सहवासांत अत्यंत आनंदानें राहणार्या तुझ्या नाकाला, हे साहसी मोती, द्वेषानें, खालीं पाडीत आहे.
पहिल्या उदाहरणांत, उपजीव्याचा (कवीशीं) तिरस्कार आहे; दुसर्या उदाहरणांत उपजीवकाचा (नाकाचा) तिरस्कार आहे; हा दोहोंत फरक; पहिल्या उदाहरणांतील वैर आर्थ (कारण शंकराशीं मनाचें वैर स्पष्ट शब्दानें सांगितलें नाहीं) व दुसर्या उदाहरणांतील मोत्याचे दातांशीं वैरे (स्पष्ट शब्दानें सांगितल्यामुळें) शाब्द; असा ह्या दोन उदाहरणांत फरक आहे.
ह्या ठिकाणीं असा विचार मनांत येतो कीं :--- हेतूत्प्रेक्षेनें ह्या प्रत्यनीकाचें काम भागत असल्यानें, ह्याला निराळा अलंकार म्हणतां येत नाहीं, वरील दोन उदाहरणांपैकी दुसर्यांत, ‘विरसात’ (द्वेषामुळें) हा हेतु, शब्दानें सांगितलेला आहे; पण द्वेषामुळेंच कीं काय हा ‘इव’ या शब्दानें वाच्या होणारा उत्प्रेक्षेचा भाग, आर्थ आहे; आतां पहिल्या उदाहरणांत हेतु हा अंश व उत्प्रेक्षा हा अंश :--- असे दोहीही आर्थ आहेत; कारण स्वत:च्या पुत्राला (म्ह० मदनाला) मारणाराची कवि सेवा करीत असल्यानें, त्याच्या विषयीं (म्ह० कवीविषयीं) वाटणारें वैर हें कारण, व कवीला (संसाराच्या) खड्डयांत पाडणें हें त्या वैराचें कार्य, या दोहोंवरून वैरूपी हेतूचें व उत्प्रेक्षेचेंही येथें सूचन स्पष्टपणें झालें आहे. (म्हणून येथें हेतु व उत्प्रेक्षा दोन्हीही आर्थ आहेत.) कुणी म्हणतील, “या अलंकाराम्त तिरस्काररूपी कार्याचा हेतु निश्चित असल्यामुळें व हेतूत्प्रेक्षेंतील हेतु संभाव्य असल्यामुळें प्रत्यनीक व हेतूत्प्रेक्षा या दोहोंत फरक आहे” पण तें बरोबर नाहीं, कारण, हेतु निश्चित स्वरूपाचा असेल तर हेतूत्प्रेक्षा होत नाहीं असें मानलें तर, प्रतीयमान हेतूत्प्रेक्षेला ‘ही उत्प्रेक्षा नाहीं’ असें म्हणण्याची पाळी येईल. प्रतीयमान हेतूत्प्रेक्षेंत ‘इव’ इत्याद उत्प्रेक्षावाचक शब्द नसल्यानें, त्यांत हेतु निश्चित स्वरूपाचा आहे असें म्हणतां येणें शक्य आहे.