गवळण - ११ ते १५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
११.
ध्यानीं ध्यातां मनीं हाचि येउनी बैसे । गीतीं गातां वसे ह्रदयकमळीं ॥१॥
बाहेरी भीतरीं वेधिलें वो येणें । रुक्मिणीरमणें पांडुरंगें ॥२॥
याविण दुसरें मज कांहींच नाठवे । लागलीसे सवे गोपाळाची ॥३॥
भाग्यें जात जीवा कांहींच नावडे । वाचोनी पवाडे गोपाळाचे ॥४॥
निद्रां आणी जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्तीं । देखें कृष्णमूर्ति सर्वगत ॥५॥
ऐसा अखंड विदेही लौकिकाविरहित । नामा जिवन्मुक्त होउनी ठेला ॥६॥
१२.
रात्री काळी घागर काळी । यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥
बंथ काळी बिलवार काळी । गळां मोतीं एकावळी काळी वो माय ॥२॥
मी काळी कांचोळी काळी । कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥
एकली पाणीया नवजाय साजणी । सवें पाठवा मूर्ती सांवळी वो माय ॥४॥
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी । कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥
१३.
यशोदेचा बाळ अलगट । रूपें राजस बरवा बरवंट ॥१॥
वेधीं लावूनि वेधिलें येणें मानस । आड घालूनि आपुला प्रकाश ॥२॥
आपणासींच खेळे विनोदें । विश्व निववी तेणें सुखे निज बोधें ॥३॥
द्दष्टी याची पावे देखाणीया । आड रिघोनि तेज सांवळें भरिलें डोलियां ॥४॥
मन मारोनि आर्त पुरविले । रूप दावूनि चित्त माझें भुलविलें ॥५॥
नामया स्वामी आसनीं शयनीं । दुरी नवजे डोळ्य़ांपासोनी ॥६॥
१४.
दु:खाची निवृत्ति सुखाचें तें सुखा । पाहतां श्रीमुळ योविंदाचें ॥१॥
रंगणीं रांगत गुलगूल बोलत । असुर रुळत चरणातळीम ॥२॥
नामा हणे हातीं लोगियाचा उंडा । गौळणी त्या भुलला ॥३॥
१५.
चंद्रबिंबासरी देखों जरी मुखा । कोटी चंद्रप्रभा देखा कृष्णमूर्ति ॥१॥
धवळलें चांदिणें रांगतां रांगणें । धन्यवो गौळणी सुखी तुम्ही ॥२॥
कानींचीं कुंडलें गुरूशुक्र बिंबले । शिरीं तें शोभलें पिंपळपान ॥३॥
कटीं वाघनखें साजिरी ते सरी । कडदोरा वरी राजसासी ॥४॥
सकुमार दोंदिलें किंकिणी कटींतटीं । चरणीं नाद उठी नेपुरांचा ॥५॥
श्रुति समागमें नाद ऐके कानीं । संतोषोनी मनीं डुल्ले हरी ॥६॥
देखोनियां माते होय समाधान । उतरी निंबलोण मुखावरूनी ॥७॥
सच्चिदानंदघन ताम्हुलें आपण । विष्णुदास नामयानें वोवाळिलें ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2015
TOP