परसा भागवताची नामदेवाची स्तुति

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


१.
कीर्तनाच्या वेळे अति सप्रेमेसी । प्रत्यक्ष ह्रषिकेशी अवतरले ॥१॥
धन्य तुझें जीणें धन्य मातापिता । धन्य ते सरिता सागरेसी ॥२॥
तुम्ही जातीचे ब्राम्हण मी आहें शिंपी । मज काय देतोसी उपमा येवढी ॥३॥
चरणींचा रज सेवकही संतांचा । विशेषही तुमचा आज्ञाधार ॥४॥
नाठविसी लटिकें देसी थोरपण । तुम्ही अहां ब्राम्हाण आम्ही शिंपी ॥५॥
शास्त्रें पुराणें असती तुमचीये घरीं । होती निरंतरीं अध्ययनें ॥६॥
पढतमूर्ख आम्हां न कळेचि भेद । मज तो गोविंद वश्य कैंचा ॥७॥
मी तुमचा सेवकू अंगलाग पाईकू । मज आहे उपदेशू तुमचाच कीं ॥८॥
धोतरें प्रक्षाळणें लाविणें पत्नावळी । तुमची उष्टावळी प्रसाद मज ॥९॥
थोरत्वातें मानोनी थोरपणें गेलों । जीवनें सांडिलों मच्छ जैसा ॥१०॥
करी तळमळ मज आतां सांभाळीं । भेटी करीं विठ्ठलीं नाम्या मज ॥११॥
रखुमाईचा वर आहे तुम्हापाशीं । जाईजे तियेसी पुसावया ॥१२॥
जें सांगेल तूतें दावील केशवातें । भक्तवत्सल जेथें तेथें असे ॥१३॥
रखुमाईनें मज सांगितली मात । तुझीया खांद्या हात श्रीहरिचा ॥१४॥
तो दाखवील तूतें सांगेल केशवातें । माझी आण त्यातें घालोनियां ॥१५॥
पूर्वी प्रसन्न मज नागनाथीं झाला । मस्तकीं ठेविला हात तेणें ॥१६॥
तेंचि रूप पाहीं धरोनियां रहीं । शंका न धरीं कांहीं आण माझी ॥१७॥
मागें एक नाम बोलिलों उत्तर । तेणें तुझें जिव्हार दुखविलें ॥१८॥
पूर्वज पायातळीं बोलिलों ब्रीदावळी । एकाएकी आकळी बुद्धि ठेली ॥१९॥
रामचरणीं शिळा उद्धरिली पहातां । ते नेली तत्काळतां परलोकासी ॥२०॥
तैसा मी पाषाण नुद्धरशील जाण । खंती करसी तरी आण विठोबाची ॥२१॥
भुजंग चाल तो नाम्यानें दाविला । तंव येरू गेला धरावया ॥२२॥
परसा पळे कैसा लागला पाठीं । परतोनी पाहे द्दष्टीं तो अद्दश्य झाला ॥२३॥
ज्ञानी ज्ञानदेव ध्यानीं नामदेव । भक्ति चांगदेव पुढारले ॥२४॥
या तिन्ही मूर्ती एकचि पैं असती । यांची कांहीं भ्रांति न धरावी ॥२५॥
परसा म्हणे जैसी सरिता सागरीं । तैसे ते श्रीहरि मिळोनी गेले ॥२६॥
२.
परसा म्हणे नाम्या मी तुज देखिलें । प्रत्यक्ष विठ्ठलें ऐसें जाण ॥१॥
तुंच तूं विठ्ठल तूंच तूं विठ्ठल । हाचि सत्य बोल जाण आम्हा ॥२॥
तुवां पदें केलीं राउळें सांगितलीं । येरीं कवित्व केलीं आपुल्या मतें ॥३॥
तूं शिंपी नामा आम्ही उत्तम याती । वांयां अहंमती  पडलों देखा ॥४॥
आम्ही एक आपुले द्दष्टीनें देखीलें । देवभक्त झाले दोन्ही एक रूप ॥५॥
तुझें नाम जपतां महा पातकें जाती । तेणें होय मुक्ति म्हणे परसा ॥६॥
३.
कवित्वापरीस कवित्व आगळें पैं आहे । परि ते न कळे सोय नामयाची ॥१॥
नाम बरवें नामदेव बरवा । एकत्व बरबा परमात्मा ॥२॥
दुधावरली साय तें मी वाणूं काय । तैसें गाणें गाय नामदेवा ॥३॥
नामा तोची कुडी केशव तोची देव । तेथील अनुभव परास म्हणे ॥४॥
४.
कविरस वाटोनी क्षीरीस हिंगाची फोडणी । भक्तीवीण आळवणी तैसी केंवी रूचें ॥१॥
तैसें रसाळ अमृत नामयाचें गीत । अनुभवी जाणत तेथींची गोडी ॥२॥
दुधा तुपाची वाटी लावोनियां होतीं । कांजी तयापोटीं केंवि रुचे ॥३॥
धायवरी जेवीजे तुपेसी क्षीरीं । त्यावरी भाकरी नाचण्याची ॥४॥
तैसें केशवाचें प्रेम नामदेव जाणे । तेथील अनुभव परसा म्हणे ॥५॥
५.
केशव परीसता नामा परिसविता । तयाचिया चित्ता एक आला ॥१॥
कायसी आम्हीं केलीं बापुडीं । नामयाची घडी ऐक नये ॥२॥
धिग्‌ धिग्‌ जीवित्व वांयां गेलें । नामया फावलें परसा म्हणे ॥३॥
६.
गंगातीरीं तप तुवां काय केलें । योगिया सरीसें फळ लाधलें ॥१॥
नामयारे तुवां कोणें योगें साधिलें । निजरूप ठाकलें परब्रम्हा ॥२॥
अधल्या जन्मीं दशमी दिंडी आणि जागरण । तेणें प्रेमें लाधले चरण केशवाचे ॥३॥
मज पाहतां स्वामीकाजीं वेंचलासी । करवतीं धारातीर्थें नाहलासी ॥४॥
जती पद देवोनी द्रवपण पण पावलें । केशवराजें मज कांहीं नाहीं वंचिलें ॥५॥
नामा आणि केशव एकची जाणावे । परसा भागवत बोलिला स्वभावें ॥६॥
७.
तुम्ही गावें तेंचि आम्ही अंतरीं ध्यावें । म्हणोनी स्वभावें भावाभाव नाहीं येथें ॥१॥
आम्ही तुम्ही कांहीं नाहीं बा वेगळे । ऐसा खेळे मेळे दिवस चारी ॥२॥
जाणे तें न चुके अपकीर्ति कायसी । नामा परसोबासी विनवीतसे ॥३॥
८.
वैष्णवांचा थाट पताकांचे भार । करिती जयजयकार नामघोष ॥१॥
पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी । नामघोष सृष्टि न समाये ॥२॥
ऋषिगण गंधर्व इंद्र प्रजापती । धन्य धन्य म्हणती नामयासी ॥३॥
देव वेळाईत केलासे बा ऋणें । अनन्य अनन्य भक्ति याची ॥४॥
अलंकापूर ज्ञानिया इंद्रनीळ सोपान । निवृत्तीसी जाण त्रिंबकेश्वरीं ॥५॥
नाम अमहाद्वारीं श्रेष्ठ हे पंढरी । प्रत्यक्ष भूमीवरी वैकुंठ हें ॥६॥
देवें नामयासी पोटासीं धरिलें । नेत्रोदकें क्षाळिलें सर्वांग हें ॥७॥
जन्मोनि सार्थ्क तुवां बरवें केलें । वनीं मोकलीलें मजलागीं ॥८॥
तंव राःईरुक्माई सत्यभामादि प्रवृत्ती । नामा आलिंगिती प्रेमें करून ॥९॥
धन्य दिन सुखाचा वेदघोष विप्रांचा । वैष्णवीं नामाचा घोष केला ॥१०॥
तेथें पूजा नमस्कारे परसा यानें केली । ह्रदयीं धरिलीं चरणकमळें ॥११॥
९.
टाळ मांडळीं नाहीं चाडा । नाम गोड विठोबाचें ॥१॥
वाहो टाळिया नाचों बागडें । गावों नामें गोड विठोबाचीं ॥२॥
परसा म्हणे येर अवघी उपाधी । नाम गातां सिद्धि होईल रोकडी ॥३॥
१०.
पैल मेळारे कवणाचा । नामा येतो केशवाचा ॥१॥
ब्रीद दिसतें अंबरीं । गरुड टके याच्या परी ॥२॥
परसा येतो लोटांगणीं । नामा लागला त्याचे चरणीं ॥३॥
११.
कृतायुगीं नामा प्रर्‍हाद पैं झाला । स्तंभीं अवतरला नारायण ॥१॥
त्रेतायुगीं नामा अंगद कपि असे । रामचंद्रें त्यासी आलिगिला ॥२॥
धन्य तो नामा धन्य तो नामा । पढिये पुरुषोतमा जीवाहुनी ॥३॥
द्वापारीं नाम औद्धव गहन । नारायण क्षण न विसंबे ॥४॥
कलियुगीं नामा संत साकार । न कळे तो पार ब्रम्हादिकां ॥५॥
चहूं युगीं नामा वेगळा नाहीं झाला । म्हणवुनी पुरला नारायण ॥६॥
विष्णुदास नामा केशवीं रंगला । देव आत्मा झाला म्हणे परसा ॥७॥
१२.
अणुमाजीं राम रेणुमाजीं राम । तृणकाष्ठीं राम वर्ततसे ॥१॥
बाहेरी भीतरीं राम चराचरीं विश्वीं विश्वाकारीं वर्ततसे ॥२॥
रामेंविण स्थळ रितेंचि पैं नाहीं । वर्ते सर्वांठायीं रामींराम ॥३॥
परसा भागवत कायावाचामनें । श्रीरामावाचून अन्य नेणें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP