‘तर्जनीपृष्ठसंस्पर्शोंऽगुष्ठेनांगुष्ठमुद्रिका ।
तर्जन्यादिपुरोभागेष्वामूलाग्रं स्पृशिक्रिया ॥
अंगुष्ठाग्रेण विज्ञेयास्तर्जन्यादिचतुष्टये । करयोस्तलपृष्ठाभ्यां व्यत्यासेन परस्परम् ॥
संस्पर्शाद्भवतो मुद्रे करयोस्तलपृष्ठयो: ॥’ इति च ।
अर्थ :--- त्या त्या मंत्रांतील वर्ण अथवा पद जें विहित असेल तें उच्चारून उक्तविधीनें हस्ताचे अंगुलींचे ठिकाणीं स्पर्श करणेंहा करन्यास होय. अंगुष्ठादि अंगुलि दोन दोन असल्यानें त्यांचा चतुर्थी विभक्तींत द्विवचनान्त नमोन्त असा उच्चार करावा. अंगुष्ठाभ्यां नम: इत्यादि । मुद्राप्रकार असा : मंत्रस्थ पद वा वर्ण प्रथम उच्चारून ‘अंगुष्ठाभ्यां नम:’ असें म्हणून अंगुष्ठानें तर्जनीपृष्ठभागाला स्पर्श करणें ही अंगुष्ठमुद्रा, मंत्रस्थ पदादि उच्चारून ‘तर्जनीभ्यां नम: म्हणून अंगुष्ठाग्रानें तर्जनीच्या मूलापासून अग्रांपर्यंत स्पर्श करणें ही तर्जनीमुद्रा, मध्यमाभ्यां नम:’म्हणून मध्यमेच्या मूलापासून अग्रापर्यंत अंगुष्ठाग्रानें स्पर्श करणें ही मध्यमामुद्रा, याप्रमणेंच ‘अनामिकाभ्यां नम:’, ‘कनिष्ठिकाभ्यां नम:’ असें पूर्ववत् उच्चारून अंगुष्ठाग्रानें अनामिका व कनिष्ठिका यांना स्पर्श करणें ही क्रमानें अनामिकामुद्रा व कनिष्ठिकामुद्रा होय. करतल व करपृष्ट यांना व्यात्यासानें परस्पर स्पर्श करणें ही करतलकरपृष्ठमुद्रा होय. इति करन्यास: ॥