( श्लोक १ ते २६ पर्यंत शिखरिणीवृत्त )
तुझे जे श्रीगंगे ! जरि दिसति सामान्य, तरि ते
रिते कल्पांतींही न पडति, मुखीं नामधरिते.
कवींचे, प्रेमानें स्तवन करितां, दाटति गळे.
गळे ज्यांचें, तोयीं तव, शव, महादेव सगळे. ॥१॥
न कंठीं घालाया यम चुकुनिही पाश उकली;
कलि स्पर्शेना त्या, कुगति तरि त्याचीच चुकली;
पडे ज्याचें, नीरीं तव, भसित देसी सुपद या;
दयाळे ! पावे त्या सुकृतिहृदयीं बोध उदया. ॥२॥
त्वदंभोबिंदूशीं नुरवि करितां वाद पगडी
रस स्वर्गींचा, या समुचित कसा पादप गडी ?
तुवां मोक्ष प्राण्या, सहज घडतां सेवन, दिला
भजे श्रीशाला जें सुयश, तुज तें देवनदिला. ॥३॥
पराघाही प्राणी द्युनदि ! घडतां मज्जन हरी
तयातें श्रीशंबु प्रभुचि न म्हणे मज्जन हरी.
‘ करीत प्रेमानें श्रवण मम पाथोरव रहा ’
असें गंगे ! मातें म्हणसि जरि तूं, थोर वर हा. ॥४॥
तुझा जो संसारीं अजितचि, जसा तो सुत रणीं.
दृढा तूं, श्रीगंगे ! सति ! भवसमुद्रीं सुतरणी.
‘ तुवां केले प्राणी हरिहर, ’ असें आइकविते
न मच्चित्ता वेडें करितिल कसे आइ ! कवि ते ? ॥५॥
सम श्रीशाचा कीं तव सुमहिमा, यासि कलिनें
न मागें सारावें अतिशुचिस अत्यंतमलिनें.
‘ जयी व्हावा विप्रा सुरनदि ! न सोनार दमुनीं, ’
जगीं मिथ्याभाषी भगवति ! नसो नारदमुनी. ॥६॥
वदे ज्ञाता, ‘ मुक्त त्वरित तुज गंगा करिल गा ! ’
मला नाहीं संताहुनि इतर या भूवरि लगा.
तुला आलों आहें जननि ! कर जोडूनि शरण;
स्वतीरीं त्वां द्यावें द्रवुनि मज काशींत मरण. ॥७॥
महोदारे ! गंगे ! अगणित महादोष हरिला;
दिला दीनोद्धारें बहुतचि तुवां तोष हरिला.
न कोणीही पापी जन म्हणुनि जागा ढकलिला;
सदा बाधे त्रास भ्रमकर तुझा गाढ कलिला. ॥८॥
गळावा त्वत्तीरीं, भगवति ! न हा देह सदनीं.
पडो गंगे ! तूझें, मरणसमयीं, तोय वदनीं.
विवेकीं यावें, जें धवळपण हेरंबरदनीं.
भवीं हो त्वन्नेत्र, प्रभुनयन तें जेंवि मदनीं. ॥९॥
पहातां दीनातें, सकरुण खरा तो कळकळे.
द्रवेना तत्प्रेमा भगवति ! मना पोकळ कळे.
तव स्नेहा नाहीं जननि ! उपमा; तापलि कडे
मुला घे जी साची, ढकलि उपमात पलिकडे. ॥१०॥
समर्था तूं, चित्तीं भवभय धरूं कां पतित मीं ?
रवीच्या पार्श्वींचे, न, पडुनि कधीं, कांपति, तमीं.
जगन्माते ! गंगे ! अभयवर तो दे, वसविता
त्वदंकीं, हृत्पद्माप्रति सुखद तो देव सविता. ॥११॥
जगन्माते ! गंगे ! प्रवर वर दे; पाव; नत मीं
निवासार्थी आहें, चिर तव तटीं पावनतमीं.
न देणें भारी हें, वर बहुत देतीसचि, वसे
वक, व्याळ, व्याघ्र, प्रिय करुनि घेती, सचिवसे. ॥१२॥
सदाही संसारीं विषयरत जो मानव ढिला,
तया देसी, द्यावा बहुतचि जसा मान वढिला.
असें केलें गंगे ! चिर हरिपणें कीं हरपणें
विराजावें जीवें, कृपणपण जेणें हरपणें. ॥१३॥
सदा देवू गंगे ! सदमृत तुझें शुद्धरुचितें,
नुपेक्षू; पापी मीं जरि, तरि मला उद्धरुचि तें.
नकोचि स्वर्गींचें, सुवुरुवचनें; ज्या सपकसें
कळे, तो त्यासाठीं करिल गुणवेत्ता तप कसें ? ॥१४॥
न कंटाळावें त्वां, सुरतटिनि ! हें होय रुचिर
स्वयें दीनोद्धारव्रत वरुनि पाळूनि सुचिर.
जितें श्रीवाल्मीकिप्रमुख कवि गाती, तिस तरी
स्तवूं, कीं तूं माते ! खळभवनदीं होतिस तरी. ॥१५॥
तुवां मत्पत्राला जननि ! दिधला मान, कळलें;
तुझें, कारुण्यार्द्रे !, मन मजकडे स्पष्ट वळलें.
सुखें येणें झालें, सकळहि पथीं विघ्न टळलें.
प्रसू प्रक्षाळील त्वरीत न कसी बाल मळलें ? ॥१६॥
करी सुग्रीवार्थ प्रभुवर जसा वाळिशमना,
तसें दे, आधीतें मथुनि, सुख या बाळिशमना.
तुझ्या पायां झाला द्युनदि ! जरि हा पाप नत गे !
समर्थातें जातां शरण, पळही ताप न तगे. ॥१७॥
न थोराहीं कोण्ही स्वपदनत मोहा निरविला;
सदा योग्या होय द्युनदि ! न तमोहानि रविला ?
सुखें न्हाल्या - प्याल्यावरिहि तुझिया भव्य सलिला,
जनें भावें, विष्णुप्रभुपदसुते ! काय कलिला ? ॥१८॥
सुखी केले रामें, मुनिसमचि, भागीरथि ! कपी.
यशा या जो तो हे, तव अमृत जैसें, पथिक पी.
तुझी ही श्रीगंगे ! नुरवि जनमोहाहिम, हिमा
सुकीर्ति; ज्ञात्यांला म्हणविच ‘ नमो ’ हाहि महिमा. ॥१९॥
यदुत्पन्ना तूं, त्या नच कृपणवाणी परिसवे.
सवेग श्रीभर्ता सुखवि करिपा यापरि सवे.
तसीच श्रीगंगे ! प्रकृति तव कीं नित्य रसदा.
सदा देवर्षींच्या निवविसि, यशें शोभसि सदा. ॥२०॥
नको दुग्धाब्धीचें, जरि महित आहे, सुतट तें.
तुझें दे, याणेंचि द्रुत उर अरींचें उतटतें.
तया स्वीकारीना, त्यजुनि बरवें हा जवळिल;
स्वयें या बाळाच्या विधिहि न मना आज वळिल. ॥२१॥
न यावा श्रीगंगे ! तव सुवदना बोल ‘ चिप ’ हा.
रहाया त्वत्तीरीं जन सकळही लोलचि पहा.
म्हणावें त्वां क्षिप्र, ‘ त्यजुनि, धरिला आळस, मज
प्रियें अर्थें, घेसी जरि बहु शिशो ! आळ, समज. ’ ॥२२॥
तुझ्या तीरीं नीरें हृदय रमतें, दु:ख शमतें;
यशोगानें पानें कुमत गळतें, विघ्न टळतें.
कळी भंगे गंगे !, षडरि झुरती, दोष नुरती;
दिली नामें, रामें तसिच जगतीला निजगती. ॥२३॥
द्रवावें त्वां गंगे ! द्रवुनि भगवत्कीर्ति वळली.
कृपा केली जी, ती बहु म्हणुनि सर्वत्र कळली.
म्हण प्रेमें, ‘ सेवीं, प्रमुदित रहा, ’ मीं नर मला
न कां द्यावें ? ओघीं तव मकर हा मीन रमला. ॥२४॥
यमाच्या, दृष्टीतें न हरिहरहे दे, वहिवर.
तपस्वी देतात, स्तवन करितां, देवहि वर.
न या ठावें, जाणे परम पटु जो तो कवि, हित.
स्वयें माता पाहे, किमपि नुपजे तोक, विहित. ॥२५॥
नसे लोकीं अन्या अगति गति धन्या तुजविना.
स्वजन्म त्वद्रोधीं कवण कृतबोधीं उजविना ?
कृपा गंगे ! तोकीं कर, पसरितों कीं पदर हा.
मयूरा या दीना, सकळबळहीना, वद ‘ रहा. ’ ॥२६॥
( वृत्त - पृथ्वी )
अनेक शत पाळिसी अकृप जंतु जे घातकी.
समुद्धरिसि जाह्नवि ! त्रिपथगे ! महापातकी.
नसे जड मयूर हा, द्रवुनि यासि दे आसरा.
करील सुरभी सुखी, जवळ आलिया, वासरा. ॥२७॥
फ़िरे वृक, दशास्यही, द्युनदि ! ऐकिली मात ती.
पयें अहि जसे, तसे कुमति ते वरें, मातती.
शिरींहि परमेश्वरें चढविलीस तूं, तो भली
तुलाचि म्हणतो, तुझी बहु सुकीर्ति हे शोभली. ॥२८॥
( वृत्त - शार्दूलविक्रीडित )
श्रीभागीरथि ! सेवटीं निजतटीं दे वास या, हा किती ?
कोणीही शरणागता, सदय जे ज्ञाते, न ते हाकिती.
माता, धांवुनि आलिया स्वनिकट, ग्रीष्मातपीं तापल्या
आधीं कीं कुरवाळिती, निवविती, स्नेहें, मुला आपल्या. ॥२९॥
( वृत्त - स्रग्धरा )
देवूनि क्षिप्र आधीं अभयवर, भवत्रस्त हें, तोक पाळीं
राहेना त्वन्मृदंकीं, विधिलिखित असे भोग जो तो, कपाळीं.
लाजाया, भक्तभाळा भगवति ! तुझिया, जिष्णुचें भाळ, लागे,
माते ! माथांचि वाहे तुज, तरिच महादेवही भाळला गे. ॥३०॥
( वृत्त - सवाई )
मज्जननक्षयदु:ख हरो तव मज्जन सन्ननसंमतसंगे !
कीं तुझिया चरणस्मरणें कळिकाळ महादुरिताचळ भंगे;
कोण असा जन ? यन्मन न त्वदुदार यशींच निरंतर रंगे;
दीन मयूर गळां पडला शरणागत, हा अभयोचित गंगे ! ॥३१॥
( वृत्त - घनाक्षरी )
तारिले त्वां बहु जंतु, । त्यांचे न गणुनि मंतु.
तुझ्या स्नाना सप्ततंतु । मोटे मोटे लाजती;
अंतीं होतां स्मृती मात्र, । प्राणी तव दयापात्र,
हरिहरतुल्यगात्र । होवुनीयां, साजती;
असीं तुझीं यशें फ़ार । त्रिभुवनीं वारंवार
गंगे ! माते ! अत्युदार । भावें नित्य गाजती;
पाव नता, पावनांत । ख्याता, दया जी मनांत
भक्ता मयूरा जनांत । धन्य करो आज ती. ॥३२॥
( वृत्त - अश्वधाटी )
सारी महापाप, वारी तपस्ताप, हारी तुझें आप सर्वा जना;
रंगे यशीं सर्व, भंगे द्विषद्रर्व, गंगे ! गमे खर्व मेरू मना;
माते ! तुझे पाय दाते, दुजे काय या ते नको, हाय देती धना;
गावें सदा तीर भावें, सुखें नीर प्यावें, म्हणे धीरगी ते ‘ न ’ ना. ॥३३॥
आगा विलोकुनि, न रागासि येसि, अनुरागा त्यजूनि, सदये !
‘ यागादि सर्व फ़ळ मागा ’ असें म्हणसि, भागासि भव्य पद ये;
कागाहि विष्णुपदि ! जागा मिळे, भजक जागा स्वयेंचि करिसी;
नागास्यसेचि तुजला गात ते, दुरित आगामि तेंहि हरिशी. ॥३४॥
( वृत्त - दंडक )
भजति पशुहि जे तुतें, होति नाकीं सदा शक्रसे,
संपदा - सेविते, हृष्टधी देवि ! ते;
पुरमुरहरमूर्तकीर्ते ! प्रसिद्धे ! तुझ्या कीर्तिसत्रीं
सुखें जेविते, सृष्टिचे जे विते;
अमरतटिनि ! सांग तूंचि स्वयें काय तान्हेलिया
द्यावया आसरा, वीट यावा सरा ?
भगवति ! म्हण आपुल्या सद्यशा, नित्य लाजावया
शंबुचा सासरा ‘ चीट ’ या वासरा. ॥३५॥
( वृत्त - चामर )
सर्व जीवसृष्टिच्ये अनंत भव्य संपदे !
देवि ! जाह्नवि ! स्वभक्तदुष्कृताद्रिकंपदे !
आपल्या तटीं वसीव हा मयूर सेवटीं
ब्राह्मणप्रियार्थ विष्णु बाळसा वसे वटीं. ॥३६॥
( वृत्त - पंचचामर )
नको करूं विचार फ़ार, सार कीर्ति आयती,
मिळे सुदीन - रक्षणें तुला, न योग्य काय ती ?
अजामिळादिरक्षणें यश प्रभूत साधुनीं,
प्रभु प्रसिद्ध वर्णिला प्रसन्नबुद्धि साधुनीं. ॥३७॥
( संस्कृत - आर्या )
शिवविष्णुभक्तया sलंभूतदयाधर्मसक्तया देवि !
वत्सस्त्वा जनन्या सह संयोज्योsवने भ्रान्त:.
( संस्कृत - गीति )
भागीरथ्यास्तीरे बालकमिव देवि ! मातुरङके माम्
स्थापय माsपयशोsस्तु स्वर्धुन्या मम तवाप्युदाराया:.
( प्राकृत - गीति )
श्रीकाशींत रहावें हें चित्तीं, परि नसेचि धन कांहीं
कनकांहीं तर्पावे प्रभुनीं सद्गुणचि जेंवि जनकांहीं.