अंक तिसरा - प्रवेश ४ था

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


दुर्गाच्या वाड्यांतील एक खोली
[ काळ्या भडक पोशाख केलेला व कोंडाऊ ]
काळ्या- ह्यो मातुर आमास्नी लई नामी धनी घावला बग ! ह्योरल्या म्हैन्याला साच बारा रुपाइ व्हनार अस माझ्या होर्‍यामंदी आलया, योकच दिस झाला. पण दिल आक्शी नामी दिसतुया. ह्ये मला लग्नाच मुंडास बांधल, ह्ये धोतराच पान आपल्या हातानं माज्या अंगावर घातलं. आमी चाकरमानूस , पण आमासंगबी गुळावानी गुळमट बोलनं . बाइसायबांच्या मातर नूर वाइस न्यारा दिसतोया. परक्यावानी परक्यावानी करत्याती. त्येंचं जर का मन खुस झालं तर आह्मावानी खुसमौज आमची बग.
कोंडाऊ - त्या हंसा खेळायला लागल्यावर रावसाहेबांस आणखी काय पाहिजे !
काळ्या - दोन रोज वाइस बिचकल्यावानी करत्याल, ह्योर आपसुक वळणावर येत्याल बग.
कोंडाऊ- बरें, कांरे जिवाजीरावांनी तुला वाड्यांतुन हांकलून दिलें तेव्हां तूं म्हणत होतास कीं, त्यांनी माझा गळा कापल्यासारखें केलें .तर ते पुन: तुला चाकरीला ठेवतात, जातोस का ? येथल्यापेक्षा जास्त पगार मिळेल बघ !
काळ्या - नगर दादा ! उपाशी म्येलो तरी बी फिकीर न्है , पन् तत जान नग आतां . तवादरन म्या न्योमच करुन टाकलाय. घरी बाइल आल्याबिगर आगी लंड पिची लंड अशा सडकसीतारामाजवळ परान् गेला तरी बी चाकरी र्‍हायचा नाहीं !
कोंडाऊ - तें कांरे ?
काळ्या - तशा मानसास्नी कदी चैनच न्है बग. जवातवा पिसाळल्या कुत्र्यावानी अंगावर खिसाकत्यात. इळभर गडीमानसाची आइमाई काडत्यात. कामाचीबी लई घासागीस. ह्येच यकादी चटकदार बायकु असली मंजी सारा येळ खुसमौजमंदी असत्यात. त्यो म्हातारा मला कस म्हंतो ( जिवाजीरावाप्रमाणें बोलून व मुद्रा हातवारे करुन ) ’जा तिकडेच. पुना ह्यो उंबरा चढलास तर पाय मोडीन, असल्या म्हन मघरुन चाकराची मला जरुर न्है !’ बग कीं आं ? मग असल्या पिसाट धन्याची हत कुना ल्योकाला अगत है . रागारागान माज कांबळ फ्येकुन दिल, आन् मला रट्याला धरुन  वाड्याभाइर घलिवल . का कसा है म्हातारा ? ह्योच जर का तरना असता तर मला जिवबी मारल असत !
कोंडाऊ - तरी म्हातारा बरें ! म्हणूनच सांगतात ना कीं तरण्याताठ्या पुरुषांनी बायका करुन असावें . तींच लग्नें झालीं नसलीं कीं इकडे धांव तिकडे धांव , इथें हुंग, तिथे हुंग असें करायला लागतात. खरेंच काळ्या अजुन तूं कांरे बायको केली नाहींस ?
काळ्या - हूं ! बायकु करतो ! बायकु झाडाला चिकटलिया जणु ! का शेनामातीची करुं ? बायकुला रुपई लागत्यात गाडगभर. त्यापाइ कुट दरुडा घालू व्है ? आन् न्है ह्येबी बेस है तिचीभन . न्है तर मी घ्यायचाबी हतच र्‍हानार , आन् राच्चाबी हतच र्‍हानार. आन् ती र्‍हानार थत. कस जुळतया ? तिनं तडक रंग मारावा; आन् म्या हकड - ( कोणी आलेंसें पाहून ) अग, रावसाब येत्याती, घाई दिसतीया. बाइसायबाकड जात्याती जनु . अपुनबी कामाला लागूं . ( जातात. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP