अंक चवथा - प्रवेश १ ला

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


रस्ता.
[ दुर्गाचा पहिला नवरा चंद्रराव व त्याचा मित्र सोमाजीराव ]
चंद्रराव - दिवस कितीही मोठा झाला, आणखी सूर्याचा ताप कितीही प्रखर असला, तरी शेवटीं आनंददायक सायंकाळ हा व्हायचाच - तसा आमचा प्रकार झाला. आज सुमारें सात वर्षे आपण कैदेंत कष्ट भोगले, पण अखेरीस भोकतृत्व संपतांच अशा बिकट ठिकाणांतून देखील आपली अकस्मात सुटका होऊन आपण पुन: घरीं आलों कीं नाहीं ?
सोमाजी० - ज्या दिवशीं आम्ही त्या शिपायाला ठार करुन तटाची भिंत चढून खालीं मैदानांत आलों, त्याच दिवशीं आपण घर गांठलें. बरें , हाच गणेशपेठेचा रस्ता नव्हे का ? मी जातों तर आतां . त्या वाड्याच्या पलीकडचा आमचा वाडा , पण तुम्ही कोठें जाणार ! वडिलांकडेच ना ?
चंद्रराव - छे : ! आधींच माझ्यावर त्यांचा राग , त्यांतून तुळाजीरावांची पत्रें तुम्हीं वाचीतच होतां. तेव्हां तिकडे जाण्यातं कांही अर्थ नाहीं. पण काहों सोमाजीराव , इतक्यात या माझ्या बैराग्याच्या वेषावरुन मला पाहिल्याबरोबर कुणी ओळखील का !
सोमाजी० - मला तर वाट्तें कीं , साधारणपणें कांही कुणाला ओळखतां यायचे नाहीं. अगदीं संघटणांतीलच कुणी मनुष्य असेल तर सांगवत नाहीं. खरेंच बैरागी पण हुबेहुब बैरागी दिसतां !
चंद्रराव - तुम्ही चला आतां. माझ्या नवीन बिर्‍हाडाचा पत्ता म्हणजे मुरलीधराच्या मंदिराजवळ - म्हणजे उजव्या बाजूस कोपर्‍यावरचा दुमजली वाडा -
सोमाजी० - आला लक्षांत ! सकाळीं येतों मी तुमच्याकडे. ( सोमाजीराव जातो. चंद्रराव कांहीं वेळ फिरुन आपल्या वाड्यानजीक येतो.)
चंद्रराव - हा दिवस कधीं येइल असें झालें होतें तो एकदां आलां आतां माझ्या मनात आहे त्याचप्रमाणेंच जर इथली सर्व व्यवस्था ठीक असली, तर माझ्या आनंदाला पारावारच नाहीं मग इतके दिवस भोगलेली दु:खें एका क्षणांत विसरुन जाऊन मोठ्या सुखात राहीन. ( दरवाज्याजवळ येऊन दरवाजा खडखडावतो, व ’ कोण आहे ? कडी काढा’ असें ओरड्तो. कोणी आलें आहे असें पाहून काळ्या उठून पाहण्याकरितां येतो. )
काळ्या - आं ! कोन् है त्ये !
चंद्रराव - दरवाजा तर उघड आधीं, मग सांगतो.
काळ्या - ( दरवाजा उघडून बाहेर येत येत ) इचिभन ? चाकरी न्हव कार है ह्यो ! वाइचसा कुट डोळा लागतोया त्यो ’ दार उघड’ है काय ह्ये ? ( चंद्ररावास ) कोन् हैस तू ?
चंद्रराव - तुझ्या धनिणीला झोप लागली का ?
काळ्या - ( नीट न्याहाळून पाहून ) अर ह्यो कोन् गोसावडा है ? कारं ! इतक्या राच्च का आलाच भिक मागायला ?
चंद्रराव - (आपल्याशीं ) हा कुणी नवाच चाकर ठेवल्यासारखा दिसतो. ( उघड ) अरे बाबा, मी गोसावी दिसतों , पण खरा गोसावी नव्हे; माझें एवढें काम कर म्हणजे वास्तविक प्रकार तुला आपोआप कळेल.
काळ्या - ( डौलानें ) अर चला ! मोठा ल्योक आलाया काम सांगायला ! अमिराचा नातू ! सकाळच्या पारीं ये, मंजी वंजळभर आटा घालीन जा ह्येचा ल्येका तुज काम, आन् दुसरा कंच असतया. जा, पड धरमसाळत जाऊन ! ( असें म्हणून दार लावूं लागतो. )
चंद्रराव - अरे, तुला एक रुपया देतों हा घे. आणि तुझ्या बाईसाहेबांना जाऊन माझा निरोप कळीव . त्यांस म्हणावें , कांहीं जरुरीच्या कामाकरीतां तुम्हाला कुणी भेटायला आला आहे. ( रुपया काढून देतो. )
काळ्या - ( रुपया फेंकून देऊन ) कार ये गोसावड्या ! मला का कुत्र्यावानी समजलास व्हय् ? योक भाकरीचा तुकडा फ्येकला मंजी त्यो गप बसतुया . मी तसा न्हव . जा गुमान आपला वाट्न् इतक्या राच्च आमच्या बाईसाहेब कुनाची गांठ घेत न्हाइत. चाल - ढूवांग लावलया हत. ( त्याच्या हाताला धरुन दूर घालविणार इतक्यांत कोंडाऊ येते. )
कोंडाऊ - हं ! कुणाशीं हुजत घालीत बसला आहेस तो ? थोडके बोलून काम होत नाहीं वाट्तें ? तुला किनई, ज्याच्या त्याच्याशी वटवट करायची फार सवय लागली आहे. कोण आले आहे तें ? ( चंद्ररावांकडे न्याहाळून पाहून ) कां बुवा, इतक्या रात्रीचे कुणाकडे आलांत ? काय काम आहे ? कुणाशीं बोलायचे आहे ?
चंद्रराव - बाई , तूं केलेंस तर तुझ्याकडेच आहे. मला तुझ्या बाईसाहेबांची गांठ घ्यायची आहे.
कोंडाऊ - पहातें बरें त्यांना विचारुन ; पण बाईसाहेबांची गांठ घेतलीच पाहिजे का ? काय काम आहे तें माझ्या हातून नाहीं का होण्यासारखें ?
चंद्रराव - ( हिरमुसलें तोंड करुन ) होईल पण मला हवें तसें नाही व्हायचें. बरें , ही आंगठी नेऊन दाखीव म्हणजे काय काम आहे, त्यांन समजेल. ( आंगठी काढूं लागतो. )
कोंडाऊ - ( आपल्याशीं ) हा कुणी गोसावी दिसतो आहे; पण बोलण्यावरुन कांही गोसाव्यासारख्या वाट्त नाहीं. मग काय असेल तें ईश्वराला ठाऊक ! ( आंगठी घेऊन ) मेली ही आंगठी मारली बिरलेली तर नसेलना ?
नाही तर काय म्हणतात कीं नाहीं त्यांतली गत. करायला जावें एक आणि व्हायचें भलतेंच. ( चंद्ररावास ) या आंगठीवर कांही भलतेंसलतें नाहींना लिहिलेलें ? तुझ्या तोंडावरुन कांही तसें दिसत नाहीं म्हणा , पण आपलें विचारलें ! थांब थोडासा . मी ही त्यांना दाखवून आणतें.
काळ्या - ( चंद्ररावांकडे साशंक पाहून मोठ्यानें ) अग, या गोसावड्याचा कावा काइ न्याराच दिसतोया बर का ! काय अधिक उन झालं तर मला दकल न्है बग. हां ! राच्चा वकोत हाय, ती आंगठी दावाय न्हेउ नगस. ह्योर म्या सांगितल न्है ह्ननशील !
कोंडाऊ - बरें, सांगितलें होतेंस म्हणेन , झालें ! ( निघून जाते. काळ्या चंद्ररावाकडे टवकारुन पहात दरवाज्यांत उभा राहतो. )
चंद्रराव - ( आपल्याशीं ) ही आमची म्हातारी कुळंबीण ! इनें कांहीं मला ओळखलें नाहीं. हा गडी तर नवाच आहे म्हणा. या दोघांची ही सावधगिरी पाहून मनाला आनंद होतो. असो; थोडा अडाणीपणाच करतात, पण तो देखील मी एक चांगलाच म्हणतो.( इतक्यात कोंडाऊ येते. तिला पाहून ) कां ? कसें काय झालें ?
कोंडाऊ - मीं ती आंगठे दिली त्यांच्यापाशीं . काहीं वाईट वर्तमान आणलें नाहीस एवढे एक बरें केलेस.
चंद्रराव - वाईट तर नाहींच नाहीं. ती आंगठी पाहून त्यांना फार आनंद झाला असेल.
कोंडाऊ - हो, झाल्यासारखा दिसला खरा . पण आंगठी पाहताच बाईसाहेब एकदम चपापल्या. मग काय असेल तें असो. बरें आत ये अगोदर, मी दरवाजा लावतें. किती झालें तरी मी कुळंबीण पडलें , म्हणून म्हणतें , कुणी पाहिलें तर उगीच भलतीच शंका घ्यायचे. मी पुन: त्यांच्याकडे जाऊन त्या काय म्हणतात तें तुला कळवितें. तोंपर्यंत तूं सदरेवर बैस म्हणजे झालें.
चंद्रराव - तरी चालेल. ( ती जाते. ) देवा ! केव्हां एकदां जाऊन कडकडून आलिंगन देईन असें झालें आहे. आणखी दहापाचं पळांनी मी आनंदाच्या कळसावर जाऊन बसेन नाहीं ! परमेश्वरा , धन्य आहे तुझी ! माझें मन आणि शरीर जशीं काय सज्जच होऊन बसलीं आहेत. ( जातो. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP