अंक पाचवा - प्रवेश ५ वा

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


देवघर
दुर्गा - देवा ! धडधडीत नवर्‍याचा प्राण घ्यायला धांवलेन् , कोण तरी मेली राक्षसीण मी ! आतां कांही म्हणून प्राण ठेवायाची सोय उरली नाहीं . छे ! मनांत सुध्दां नको आणायला. न जाणो , पुन: भ्रमाच्या लहरीत काहीं तरी भलतेंच करुन बसेन, एकदां मन दगडासारखे केले पाहिजे खरे. मग कां ? ( असे म्हणून लपविलेला खंजिर हातांत घेऊन त्यास उद्देशून म्हणते. ) बाबा ! माझ्या शरीरात  पाहिजे तेथे घुसून प्राण घेण्याची शक्ती तुझ्या अंगी आहे. पण तसे करु नकोस हो. ही पहा, माझ्या उरांत तुला पाहिजे तितकी जागा आहे. काय पराक्रम दाखवायचा असेल तो येथे दाखीव. ( असे म्हणून उरात खंजीर खुपसणार तों आनंदराव येतो, व तिच्या हातातून खंजीर काढून घेत घेत म्हणतो. )
आनंद० - हां हां हां ! ! काय करतेंस हें ? विनाकारण त्या बिचार्‍या प्राणावर कां उदार झालीस ? असा त्यांने तुझा अपराध तरी काय केला आहे ?
दुर्गा - ( आवेशानें ) माझ्या हातून कांही अपराध घड्ला नाहीं अशी शपथ वहा , तर तुमचे म्हणणें मी मानीन. पण माझ्याशी तुम्हाला काय करावयाचें आहे ? कृपा करुन सोडा मला . ( जरा मागें सरुन ब हा आनंदराव असें ओळखून त्यास म्हणते ) आपण का हे ! तुमच्याच पायी इतका अनर्थ बरें ! मी तुमच्याशी लग्न लावलें हें माझ्या मनांत भरवून द्यायचा आपला बेत होता; पण मी कांही अगदी बोळ्यानें नाहीं दूध पीत समजलात ?
आनंद० - तूं आधीं मला ओळखलेंस का पण ? मी तुझा प्रियकर पति आनंदराव .
दुर्गा - मला आतां पति नाहीं, कोणी नाही. माझे पति होते ते बाळापुराच्या लढाईत पडले. कां पडलें कीं नाहीं ?
आनंद० - हो, पड्ले खरे.
दुर्गा - पण शपथ घ्या पड्ले म्हणून . हं घ्या लवकर, किती उशीर ! ( रक्तानें भरलेला चंद्रराव तलवारीवर भार ठेवून हळूहळू येतो त्याकडे पाहून ) हे रक्तानें माखलेले गृहस्थ माझ्यापुढें येऊन उभे रहायच्यापुर्वी घ्या शपथ , कीं ते लढाईत पडले म्हणून . ( चंद्ररावाला ओळ्खून मूर्च्छा येऊन पडते. )
आनंद० - ( तिला सावरण्याकरितां पुढें सरुन ) अहो , धावां लवकर ! पडली - पडली ! ( चंद्रराव ओळखून ) काय ! चंद्रराव जिवंत !
चंद्रराव - मेलोच होतों . पण प्रारब्ध खोटें म्हणून हे सोहाळे भोगायला जिवंत राहिलों .
आनंद० - चंद्रराव किंवा आनंदराव या दोघांपैकीं एक मेला पाहिजे हें ठरलेंच आतां .
चंद्रराव - ( एकीकडे ) तुम्ही मारेकर्‍यांच्या होतून माझा प्राण वांचविला तो वांचवायचा नव्हता. कारण , मी प्राणाला अगदीं कंटाळून गेलों होतो; त्यांतून तुम्ही वांचविलात हें तर फारच वाईट झालें . लाडकें , तुझ्यापुढें माझा अंत व्हावा म्हणून मी इथे आलों . हे तुझे आनंदराव जर माझ्या दृष्टीस पडले नसते , तर मी सुखानें मेलों असतो ; पण मरतांनाही मला दु:खच व्हायचें ! असो , नशीब माझें ! बरें , शेवटीं तरी एकदां आलिंगन -
आनंद० - हां , पुन: ती गोष्ट मात्र नाहीं .
चंद्रराव - ( कपाळावर हात मारुन ) नशीब ! ( एकीकडे ) आतां या दु:खांत कुचंबत पडण्यापेक्षा दैवालाच सहाय्य करुन मोकळें व्हावें हें ठीक ! ( असें म्हणून हळूच कमरेचा जंबिया काढतो व पोटांत खुपसण्यापुर्वी म्हणतो) बरें , आनंदराव , हें एवढे पत्र कृपा करुन आमच्या बाबांच्या हातीं द्या ( पत्र देतो.) ; आणि माझा कांही आतां नेम नाहीं म्हणून मुलांचे आपल्या मुलाप्रमाणें संरक्षण करा. ( जंबिया उरांत खूपसुन घेतो व मरतो. )
आनंद० - ( घाबर्‍या घाबर्‍या ) अरे अरे !  धावा कुणी तरी , काय कोणीच येत नाहीं ? हीही बेशुध्द पडली आहे ; अरे कोण आहेरे ? ( असें म्हणून बाहेर जातो. )
दुर्गा - ( शुध्दीवर येऊन ) अग बाई ! कुठें पडलें आहे मी ? हं . समजलें. मी अगदीं मरणाच्या दारात येऊन उभी राहिलें आहे. केव्हाच आतं जायची , पण मेला जीव मागें गुंतला आहे म्हणून नाइलाज झाला. ( हूंदका काढून ) जिवंत राहून सोय नाहीं , आणि प्राण तर काहीं जात नाही. असा मेला दोहोंकडून वणवा पेटल्यावर करावें तरी काय ? ( इतक्यांत चंद्ररावाच्या शवावर दृष्टि जाऊन मोठ्याने हंबरडा फोडीत ) अरे चांडाळा प्रारब्धा ! घात केलासरे मेल्या ! माझा प्राण काढून मेलास ! माझें सर्वस्व लुटलेंस ! आतां काय करु ? अहो, इथें कुणी आहे का हो ? आतां लवकरच या प्रेताचें, आणि ( आपल्या उरावर हात बडवून )  या प्रेताचें एकदमच दहन करुन टाका. उचला हो लवकर कुणी तरी. ( आनंदराव चाकरांसह येतो. )
आनंद० - अरे, ही या प्रेतावर अंग टाकून पडली आहे. हिला अगोदर बाजूला काढली पाहिजे. ( तो व चाकर तिला उचलूं लागतात. )
दुर्गा - ( संतापानें ) खबरदार मेल्यांनो माझ्या अंगाला हात लावाल तर ! माझा प्राण गेला तरी मी यांना सोडायची नाहीं आतां ( प्रेतास जोरानें मिठी मारुन ) अरे देवा ! हा जंबिया उरातच आहे अजून ! कोण्या चांडाळाचा हात जळला हा ? ( आनंदरावास ) तुम्हीच हो तुम्हीच ही कसाबाची करणी केलीत. माझ्या लोभाने तुम्हीच याचा खून केलात.
आनंदराव० - न्या तुम्ही तिला आंत उचलून - हळूच-
दुर्गा - अरे , नको रे मला ओढूं . ( हलकेच चंद्ररावांच्या उरातींल जंबिया काढून घेऊन लपवून ठेवते. ) नकोरे. तुमच्या पायां पडतें . मी तुमची धर्माची मुलगी रे ! ( चाकर जोराने ओरडातात. ) अरे मेल्यानो ! माझे हात तरी तोडून टाका , म्हणजे या प्रेताबरोबर जळतील्ज. आतां काय करु रे देवा ! हे कसाब नाही ऐकत माझें ! या प्रेताचे ते आतां हालहाल करतील ग बाई ! अरे मांगांनों ! याचा तुम्हाला यमाच्या घरी झाडा द्यावा लागेल बरें ! ( तिला नेताना. )
आनंद० - बरें , आतां पुढें तजवीज ? ( इतक्यात जिवाजीराव , तुळाजीराव , सोमाजीराव , काळ्या , व आणखी कांही चाकर इतके येतात. )
जिवाजी० - ( डोळे पुसून ) शिव ! शिव ! वृध्दापकाळीं माझ्यावर काय , प्रसंग आला हा ! कुठे आहे हो ! त्यांचे प्रेत ? माझ्या दृष्टीस पाडा लवकर !
तुळाजी० - हे माझे दादासाहेब इथे पड्ले आहेत ? ( बापलेक त्या प्रेताजवळ बसतात . )
आनंद० - त्यांचे प्राणावसान होऊन बराच वेळ झाला . आज एकादशीचें मरण आलें , तेव्हा खरोखर ते वैकुंठास गेले ! फारच सज्जन !
तुळाजी० - माझ्या दादासाहेबांना वैकुंठ मिळणार यांत शंकाच नाहीं. पण तुम्ही हे जे घोर कर्म केले त्याबद्दल तुम्हाला मात्र नरकाशिवाय दुसरें ठिकाण नाहीं.
आनंद० - ( साश्चर्य) तुम्ही असे बोलता याचे मला फारसें आश्चर्य वाटत नाही . कारण , प्रत्यक्ष तुमचे वडील बंधूच एकाएकीं वारले, तेव्हा तुम्हाला दु:ख होणें हें स्वाभाविकच आहे .
तुळाजी० - मग तुमचे म्हणणे काय ?
आनंद० - म्हणणे एवढेच की, हे कृत्य मी केले असे मात्र म्हणूं नका.
तुळाजी० - कां बरें म्हणूं नका ? तर तुमच्याशिवाय दुसरा कोण करणार ? तुम्ही आतां कबूल करणार नाहीं हें आम्हाला ठाऊक आहे. तुम्हीच आमच्या दादासाहेबांचा खून केलात. जाऊं द्या , सरकार तरी काही अंधळे नाही. या खुनाची नीट चवकशी होऊन अपराध्याला योग्य दंड होईपर्यंत नुसत्या बोलण्यात काय अर्थ आहे ?
सोमाजी० - ( तुळाजीस ) रावसाहेब , मला वाटतें , अगोदर हे प्रेत बाजूस उचलून ठेवावें .( प्रेत बाजूला ठेवतात. )
जिवाजी० - ( आनंदरावास ) तुम्हीं माझ्या मुलाचा खून करण्यासारखा त्यानें तुमचा इतका घोर अपराध तरी कोणता केला होता हो ?
आनंद० - मीं त्यांचा खून केला नसून तुम्ही असें विचारतां तिथे इलाज नाही. मी तर उलटा त्यांचा प्राण वांचविण्याकरितां धांवून आलो. खोटे असेल तर माझ्या नोकरांना विचारा .
सोमाजी० - खरेच, हांक मारा त्यांना . ते काय सांगतात तें तरी ऐकूं .
तुळाजी० - ते काय सांगणार हो ? सांगून सवरुन त्यांचे नोकर ते. शिवाय या कृत्यात त्याचेही अंग असलेच पाहिजे . आतां तुम्हीच असे पहा कीं, ज्यांनी आपल्या धन्यासाठी दादासाहेबांचा खून केला, तें खोटे बोलायला मागे पुढे पाहतील का ? छे ! त्यांना विचारण्यात काही अर्थ नाही. ( आनंदरावास ) तूं यांचा प्राण वाचवण्यासाठी धावून आलास काय ? तर मग त्यांचे शत्रु कोण रे ? कुणाचे त्यांनी नुकसान केले होते? कुणाचे घर बुडविले होते? विनाकारण कोण त्यांच्याशी दुस्मानपणा करणार ? तुझ्या शिवाय कोण त्यांच्या वांकड्यावर असणार रे ? आणखी म्हणतोस , मीं त्याचा प्राण वाचविला !अरे चोरा ! मला चांगला संभावित गृहस्थ दिसत होतास कीं ! तें काहीं नाही. दादासाहेबांचे येणे तुझ्या पथ्यावर पडलें नाही. तुला वाटेल कीं , आपल्या सुखात आतां व्यत्यय येणार . म्हणून तूं आणि त्या अवदसेनें मिळून त्यांना वाटेआड करण्याची ही युक्ति काढलीत. दुसरा कसला संभवच नाही.
सोमाजी० - असें असेल तर -
तुळाजी० - अहो असेल तर कां ? असलेंच पाहिजे.
जिवाजी० - तें काहीं नाही. याची नीट चवकशी झाली पाहिजे . चला, कुणी तरी जाऊन कोतवालास घेऊन या.
तुळाजी० - दुसरा कशाला ! मीच जाऊन घेऊन येतो. ( जातो )
आनंद० - हा तुम्ही माझ्यावर गहजबच उडविला म्हणायचा ! असो, खर्‍याचा पक्षपाती परमेश्वर आहे. ( आपल्या नोकरांस ) अरे त्या मघाशी पकडलेल्या इसमाला घेऊन या. ( नोकर जाऊन सटव्यास घेऊन येतात. )
आनंद० - ( त्याच्याकडे बोट दाखवून ) चंद्ररावाच्या अंगावर तुटून पडलेल्या मारेकर्‍यापैकीं हा एक आहे. आम्हीं चंद्ररावास सोडविलें त्या वेळी हा आमच्या हातीं लागला. तेव्हापासून घरांत एकसारखा गोंधळच चालला असल्यामुळे त्याची चौकशी करायला मला झालेंच नाही. आतां आपल्या समक्षच त्याला विचारतों म्हणजे झालें . कायरे, बोल . यासंबंधाने तुला काय माहीत आहे तें सर्व सांग .
सट्व्या - ( घाबरुन ) सम्द - सम्द सांगतों मायबाप , पन् घरीं चार पोरसोर हैती त्येंच्याकडं बगुनशेनी माझा परान वाचवा.
आनंद० - तूं आणि तुझे साथीदार मिळून चंद्ररावाला ठार मारायचा बेत केला होता कीं नाही ? बोल .
सटव्या - व्हयं ; क्येला व्हता मायबाप.
जिवाजी० - ( त्याच्या अंगावर धावून ) कांरे ! कारें ! त्यानें तुझे काय केले होतें ? बोल .
सटव्या - ( घाबरुन) काय बी नव्हत महाराज !
आनंद० - ( जिवाजीरावास थांबवून ) तर मग दुसर्‍याच्या सांगण्यावरुन हे कृत्य करणार होतां कीं काय ?
सटव्या - व्हय महाराज पोटापायी करणार व्हतों .
आनंद० - बरें , माझ्यासंबंधाने तुला काही माहिती आहे ?
सट्व्या - काई न्है महाराज ! आमी त्येच्या अंगावर हात टाकला, इतक्यामंदी आपुन येऊनशेनी त्येचा परान राकला, आन् मला पकडून ठ्येवला .
आनंद० - ( सर्वास ) ऐकलेंत ? तुम्ही काहीं विचारा हवें तर.
सोमाजी० - कायरे, हें कृत्य करायला तुम्हाला कोणी सांगितलें ? ( सटव्या घुटमळतो. )
जिवाजी० - बोल , कोणीं सांगितलें तें , का उड्वूं कोरडे ?
सट्व्या - मला गरिबाला कशाला व्होवती कोरडे. सम्द सांगतो महाराज.
जिवाजी० - बोल तर, कुणीं सांगितलें ?
सटव्या - ( भीत भीत ) आपल्याच तुळाजीरावांनी सांगितलें महाराज.
जिवाजी० - ( सक्रोधाश्चर्युक्त ) काय काय ! कुणी सांगितलें ? माझ्या कारट्याने ? छे ! असें कधी व्हायचे नाही. खोटॆं बोलतोस तूं .
सट्व्या - आतां आपल्या म्होर कशापायीं खोटें बोलूं ? माज मनच मला खातया; ह्ये पो्ट बगा लई वंगाळ है .
जिवाजी० - त्याने काय सांगितलें तुला ?
सट्व्या - त्ये म्हनल, तुमी चंदररावाला ठार करा,  मंजी दर असामीला येकेक मुंडास अन् पचीस पचीस रुपये मिलत्याल ; आमी सरकारा मागितला तवा त्येन ह्ये धा रुपई काढून माज्या हातावर ठ्येवल. ( असें म्हणून धोतराच्या पदरांत रुपये बांधले होते ते दाखवितो. )
जिवाजी० - ( संतापानें ) अरे बेरडा ! तुळ्या !
सोमाजी० - काय ? त्यांनी प्रत्यक्ष आपल्या वडील भावाचा खून करायला तुम्हाला सांगितलें !
सट्व्या - व्हय महाराज . आन् आमी त्येच्या अंगावर धावून ग्येलो तवा ते ततच व्हत.
जिवाजी० - हें - हें जर सर्व खरें असेल तर देवा ! मला तूं चांगले शासन केलेंस . चंद्रराव ! माझ्या पायीं तुझी ही अशी दशा झाली बरें !
सोमाजी० - बरें , या चोराचें काय करायचें आतां !
जिवाजी० - चला घेऊन त्याला. त्याला माहीत होतें तितकें त्यानें सांगितलें . ( सट्व्याला बाजूस नेतात. )
आनंद० - खरेंच , या धांदलींत मी विसरलोंच . जिवाजीराव, चंद्ररावांनी अगदीं अंतकाळीं हे पत्र आपल्याला देण्यासाठीं माझ्यापाशीं दिलें तें घ्या हें . ( पत्र देतो. )
जिवाजी० - अहो, तुम्ही चंद्ररावाचे मित्र , तेव्हां त्यांचे अक्षर तुमच्या ओळखीचे असेलच ?
सोमाजी० - हो . चांगलें ओळखीचें आहे.
जिवाजी० - तर मग वाचा पाहूं . माझे डोळे पाण्याने भरल्यामुळें मला कांहीं दिसत नाहीं .
सोमाजी० - बरें वाचतों . ( पत्र उघडून वाचूं लागतो. ) "चंद्रराव त्यांचा दंडवत साष्टांग नमस्कार. विनंति विशेष . आपल्या व्दारीं येऊन माझा प्राणांत व्हावा असें झालें . मी लवकरच हें जग सोडून जाणार परंतू बाळापुराहून मी तुळाजीरावास बरीच पत्रें पाठवून कुशल कळविलें असता आपण माझ्या स्त्रीस आनंदरावाशीं लग्न करुं दिलें, हें फार अनुचित केलें . असो . ईश्वर पाहातच आहे . "
आनंद० - काय ? ते जिवंत असल्याबद्दल तुम्हास ठाऊक होतें ?
जिवाजी० - छे हो ! एक अक्षरसुध्दां नाहीं ! ( इतक्यांत कोतवाल व तुळाजीराव शिपायांसह येतात. ) तुळजीराव , आलास ? हें पत्र पहा. चंद्रराव आपल्या मरणाचें अपेश तुझ्या आणि माझ्या माथ्यावर ठेवतो. तेव्हां तुझें काहीं त्यांत अंग होतें का ?
तुळाजी० - (आश्चर्य दाखवून ) आं ! कुणाचें ? माझें ?माझे अंग ? दादासाहेबांना मारण्यात ? शिव शिव ! !
जिवाजी० - तो त्यांत लिहीतो की, मीं बाळपुराहून बरीच पत्रे पाठविली; आणि मला तर त्यांतलें एकदेखील पोहोंचले नाही. हें कसें ? बरे पण, तो जिवंत होता हें तुला ठाऊक होतें का ?
तुळाजी० - दादासाहेब जिंवत ? ईश्वराला ठाऊक असेल, मला काहीं नव्हतें .
जिवाजी० - बरें सांग . त्याचें पत्र किंवा निरोप तुला कधी आला होता का ?
तुळाजी० - छे छे छे ! शपथेला सुध्दा नाही.
सोंमाजी० - हें तर मोठे आश्चर्य आहे. ( जिवाजीरावास ) कारण तें आणि मी बाळापुरात एकाच ठिकाणी होतों . तुम्हाला त्यांनी पुष्कळ वेळां पत्रे लिहीलेली मी पाहिली आहेत . त्यांत आपलें हाल चालले आहेत , अशाविषयी ते नेहमी मजकूर लिहीत असत. शिवाय त्या पत्रांची आलेली उत्तरेंही मला दाखवित असत, आणि तीं तुळाजीरावांकडून आलीं म्हणून मला सांगत. तुम्हीच त्यांचे बंधु तुळाजीराव ना ?
तुळाजी० - मी त्यांचा भाऊ खरा. पण मीं कधी त्यांना उत्तर धाडलें नाही.
सोमाजी० - बरें , उत्तरें धाडली नाहीत, पण त्यांची पत्रें तर येत होती ?
तुळाजी० - व : ! असें मला शब्दांत पकडतां वाटतें ?
सोमाजी० - शब्दात नाहीं पकडींत बरें ! तीं पत्रें अद्यापि त्यांच्याजवळ सांपडतील - ( आठवलेंसें करुन खिशातूंन पत्रें काढतो. )
जिवाजी० - पण त्यांतला साधारण मतलब सांगा पाहूं .
सोमाजी० - किरकोळ गोष्टी काहीं सगळ्या ध्यानात नाहीत . पण ठोकळ मजकूर म्हणजे इतकाच कीं , तुमच्या मनातूंन त्यांची मुळीच दाद घ्यायची नव्हती. ते मेले तरी बेहत्तर ?
जिवाजी० - अरे अरे ! असें ऐकणें आज माझ्या कपाळी आलेना ?अरे नीचा तुळाजी ! तो तुझा सख्खा भाऊ कींरे !
तुळाजी० - आपल्या पायांशपथ हें माझ्यावर नुसतें कुभांड रचले आहे. तो कैदेंत होता , कीं त्याचे होत होते , कीं तो जिवंत होता, यांतले मला एक अक्षसुध्दा माहीत नव्हतें . काय तें आतां मी त्यांचे प्रेत पाहिले एवढेच !
जिवाजी० - समजलों . अरे , त्या मारेकर्‍याला आणा पुढे. ( लोक सटव्याला पुढे आणतात . )
तुळाजी० - ( त्याला पाहताच दचकून मनाशीं ) अरे हा सटव्या ! आतां मात्र सांपडलों खास . बाबासाहेब ! आपणही माझ्या उलट जातां ! हे त्या आनंदरावाचें व सोमाजीचें -
कोतवाल० - का, त्याला पाहण्याबरोबर दचकलां ?
तुळाजी० - दचकतों का ? कायरे सटव्या -
सोमाजी० - रावसाहेब , याचें नांव आपल्याला कसें कळलें ? त्याला कशाला विचारता ? त्याने सर्व आधीच कबूल केले आहे. ( इतक्यात पाहिजे होते तें पत्र सापडतें.) हें पहा. हें पहा तुमचे पत्र ! नाहीं म्हणत होतो पण सांपडलें . माझ्याच खिशात होते.
जिवाजी० - आणि हें यानेच पाठविलेंना ? काय काय आहे त्यांत ? वाचा पाहूं .
सोमाजी० - मीं आतां सांगितला तोच मजकूर. याच्या हाताचे पत्र सांपडले, आतां हरकत नाही बोलायला. कां तुळाजीराव , तुम्हीच लिहिलेंत का हें पत्र .
तुळाजी० - ( कावर्‍याबावर्‍या मुद्रेनें इकडे तिकडे पाहात मान हालवितो. )
जिवाजी० - तुळ्या ! अरे हें मांगाचें कसब कुठे शिकलास ? यापेक्षां माझाच का नाहीं गळा कापलास आधीं , म्हणजे हा प्रसंग पहायला तरी वांचलो नसतो. असा कां भामटयासारखा पहातोस ? लहानपणींच तुझीं चिन्हें दिसत होती. पण सापाच्या पोराला वाढविल्यासारखा तुला वाढवून हा अनर्थ माझ्या मूर्खपणानें मींच घडवून आणला.
तुळाजी०- बोला काय पाहिजे तें बोला. सांपडलों खरा तुमच्या तावडींत . खोटीं पत्रें आणा, लटकाच साक्षीदार पुढें करा, त्यांच्या कडून तुम्हाला हवे तें बोलवा -
जिवाजी० - अरे मांगा ! तुझ्या बापाला हें शब्द ! हा तुझा काका सटव्या तुझ्यापुढें उभा आहे पहा ! ज्याला तूं इशारा म्हणून दहा रुपये दिलेस तोच हा. ( कोतवाल आपल्या शिपायांस हूषार राहण्याविषयीं इषारत करतो. )
तुळाजी० - ( मनाशीं ) कबूल झालो तरी प्राण वाचत नाहीं आतां आणि नाकबूल झालो तरी वाचत नाहीं . मग डर तरी कशाला ! केलें तें बेधडक सांगून टाकावें .सध्या मला इतकेंच वाईट वाटतें कीं मारेकरी घालण्याच्या कामांत किचिंत अविचार झाला त्यानें मीही ठार झालों , आणि माझे सर्व बेतही फसले.
जिवाजी० - ( रागानें ) कारें बेरडा ! तोंड का बंद झालें ? तूं आपल्या सख्ख्या भावावर मारेकरी घातलेस कीं नाही ? बोल.
तुळाजी० - हो घातले. हा सट्व्या त्यापैकींच एक आहे.
कोतवाल - ( शिपायांस ) पकड्णारे तर याला . आतां याला शिक्षा म्हणजे हत्तीच्या पायांशी बांधायचे किंवा तोफेच्या तोंडीं द्यायचें .
जिवाजी० - ( संतापानें ) आणि कडकडीत तेलांत तळून कां काढाना या मांगाला ! पण चांडाळा , हे घोर कृत्य तूं कोणत्या उद्देशानें केलेस ?
तुळाजी - दुसरा कोणता ? जगातल्या पुष्कळ लोकांचा असतो तोच माझा. म्हणजे द्रव्य ; आणि तेंच माझ्या नाशाला कारण झाले. तुम्ही त्याच्यावरच पूर्वी फार लोभ करीत होता, म्हणून मला वाटले की तो जर जिवंत राहील तर पुन: तुमची माझ्यावरची मर्जी उडेल, आणि मरेपर्यत मला तुमच्यापासून एक फुटकी कवडीही मिळायची नाही. उलट द्याल ते अन्नवस्त्र घेऊन आणि सांगाल तें काम करुन रहावे लागेल; ते मला प्रशस्त वाटेना, म्हणून मी अशी तोड काढली. तुम्हीच जर आम्हा दोघांना पहिल्यापासून सारख्या ममतेंने वागविलें असतें , तर हा आजचा प्रसंग आला नसता. माझे काही जरी झाले तरी या अनर्थाचे खरें मुळ आपण .
जिवाजी० - ( डोळे पुशीत ) खरें बाबा ! म्हातारपणी माझ्या नशिबीं पुत्रशोक लिहीला होता म्हणून मला तशी बुध्दि झाली. कुटुंबातल्या माणसात किंवा पोटच्या पुत्रांत आवडनावड केली म्हणजे असा काहीं तरी भयंकर परिणाम होतो. देवा, मला वेळीच कां बरें नाहीं शिकवलेस! असो तुझी इच्छा !
आनंद० - बरें तुळाजीराव, चंद्रराव जिवंत आहेत असें तुम्हाला माहीत असून त्यांच्या स्त्रीबरोबर लग्न करण्याची मला कां बरें भर घातलीत ?
तुळाजी० - बस्स ; तशीच काही कारणे होती म्हणून .
आनंद ० - म्हणजे मला सांगत होतां तीच ना कारणें ?
तुळाजी० - ती नव्हेत. ती फक्त तुम्हाला सांगण्यापुरतीच ! खरे कारण म्हणजे असें कीं , चंद्ररावांची आपल्या बायकोवर अतोनात प्रीति होती हें मला ठाऊक होतें . तेव्हा तो कदाचित तो जरी कैदेंतून सुटून घरीं परत आला , तरी बायकोची अशी व्यवस्था झालेली पाहून तो फार दिवस जगायचा नाही असा माझा तर्क होता.
कोतवाल- असा जर तुझा तर्क होता तर मग तूं त्याला ठार कां मारविलेंस ?
तुळाजी० - नुसत्या तर्कावर भरवसा ठेवणे बरें वाटले नाहीं म्हणून .
जिवाजी० - बरें माझ्या नातवाबद्द्ल लोकांत कुजबूज आहे म्हणून सांगत होतास तें कशासाठी ?
तुळाजी० - तुंम्ही संपत्तीचा चवथा हिस्सा देणार होता म्हणून बरें . आतां झाले तुमचे प्रश्न ? मला उत्तरे द्यायचा कंटाळा आला. तेव्हा मला आतां कुठे घेऊन जाणार तिकडे घेऊन चला म्हणजे झालें .
जिवाजी० - भोग चांडाळा तुझ्या कर्माची फळें ! हे कोतवाल आहेत आणि तूं आहेस. हिरा गेला , आतां खापरी कशाला पाहिजे ? ( हें ऐकताच कोतवाल त्यास घेऊन जातो. )
जिवाजी० - देवा ! आतां हा पुत्रशोक मला कसा सहन होईल ! या पूर्वीच माझे डोळॆ मिटले असते तर चांगले झाले असतें . ( कोणी येत आहेसें पाहून ) अरे रे रे ! ही माझी सून येत आहे वाटतें ! देवा ! काय ही हिची दशा केलीस ! ही तर अगदी भ्रमिष्ट झालीशी दिसते.झाले खचली माझी कंबर . ( इतक्यांत भ्रमिष्ट झालेली दुर्गा येते . मागून मुलगा रडत रडत येतो. )
आनंद० - ( तिला पाहून ) अरे ही कशी आली इथें !
दुर्गा ० - ( भ्रमांत ) काही नको बरें ! हा मेला सगळा कसायांचा बाजार आहे, मी कुणाचेंच काही ऐकत नाही. अहो ! पण कोतवाल कचेरी कुणीकडे आहे ? मला एक फिर्याद करायची आहे. तुमच्याकडे करु का ? हालवा माना ! नको तर राहिलें . तुम्ही कसे हे माझॆ हाल मांडले आहेत याबद्द्ल मी देवाजवळ फिर्याद करतें . देवा ! बघरे हे मला कसे छळतात ते ! ( असे म्हणून पुढे येऊ लागते. )
जिवाजी० - ( रडत ) हिच्या तोंडाकडे सुध्दा मला पहावत नाही ! देवा ! आतां माझे हे डोळे मिटीव.
दुर्गा - ( चंद्ररावाचें प्रेत नाहीसें पाहून ) अरे प्रारब्धा ! तुम्ही कुठे नेलेत त्यांना ! आत्तां इतक्यात इथे होते, मी प्रत्यक्ष पाहीलें होते. ( रडू लागते. ) कुठे हो तुम्हाला नेऊन माझ्या दृष्टीआड दडवून ठेवलें ! ( लोकांस ) दाखवा हो. मला त्यांना काही विचारायचे आहे. एकदा तरी डोळे भरुन पहातें हो ! नाहीना भेटवीत ? बरें तर . ( मुलाला उचलून घेऊन ) हा माझा लाल ग बाई ! आतां कसे होणार ? ( चुंबन घेऊन ) या माझ्या सोन्यावर दयेचें पांघरुण कोण घालणार आतां ? जगातला तर न्याय मेला बुडालाच सगळा. पण देवा , तुझ्या घरीं सुध्दां कसा नाहीसा झाला रे ! ( चंद्ररावास उद्देशून ) त्यांनी कशी खाशी वेळ साधली ! जातो म्हणून मला नुसतें कळविलें देखील नाहीं . पण त्यांचा माझ्यावर खरा जीव बरें ! कुणाला नकळत लौकर ये म्हणून मला मूळ धाडलें . बाळ्यां , तुझें नशीब तुझ्याबरोबर. ( मुलाचें चुंबन घेऊन ) मी आतां येत हं ! ( असें म्हणून लपवून आणलेला खंजीर चट्कन उरांत भोसकते व पड्ते. मंडळी धावतात, पण व्यर्थ . ) आतां मी तुमच्या देवालासुध्दा भीत नाहीं बरें ! मांगांनो ! कसायांनों ! रडा आतां मागें आमच्या नांवानें. अंबाबाई मला लवकर - ( मरते. )
जिवाजी० - ( गोंधळून ) तोच खंजीर खुपसारे या माझ्या उरांत . नाहीं तर मला जिवंत तरी जाळून टाका !
( मूर्च्छा येऊन पडतो. त्याच वेळेस पडदाही पडतो. )
समाप्त.  

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP