मंदार मंजिरी - गोमती नदीच्या काठी सुचलेले विचार.

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


एके दिवशी सायंकाळी विश्रांति घ्यावयासाठी ।
एकाकी मी बसलों होतों श्रीगोमतिचिया काठीं ॥१॥
हृच्चिंता वाराया वारा या समयिं मंद वेगानें ।
वाहत होता गंधित शीतल तुरुकुसुमसलिलसंगानें ॥२॥
नीलाम्बरीं धवल घन घनदाट कुठें, कुठें विरल भारी ।
द्युति पिंजलिया होते तुलाची धरित ते मनोहारी ॥३॥
ह्या समयीं संलापा नव्हता कोणिहि मित्र मजपाशी ।
बसलों विचार बहुविध मी आपुलियाच घोळित मनाशी ॥४॥
झुळझुळ वाहत होतें ह्या तटनीचें अभिन्नगति तोय ।
तदध्वनि अमिश्र अन्य ध्वनिने कर्णास सुखद बहु होय ॥५॥
ह्याच जलानें माझें केलें सारेच लक्ष्य आकृष्ट ।
झाले अन्य विचारें जलविषय न मद्विचार उपसृष्ट ॥६॥
उगमापासून मुखापर्यंत नदीप्रवास तइं आला- ।
सर्व मनस्श्चक्षुपुढे, त्यांतचि आत्मा निविष्ट मम झाला ॥७॥
“जल हें वाहे संतत, थांबे मार्गी न एकही क्षण तें ।
किति दृढ निश्चय त्याचा ! एका स्थानी कधीम न तें ठरतें ॥८॥
वाहे, वाहे, वाहे, क्षणहि न थांबे, सदैव ते वाहे ।
अधिक उणा बेग करो, परि तें वाहे सदा, स्थिर न राहे ॥९॥
ह्या न नदीचा एकहि बिंदु तटाच्या विलोकनीं रंगे ।
जाय पुढें, सारे ते गाठाया ध्येय वाहती संगे ॥१०॥
जलबिंदुमय नदी ही गोठाया ध्येय आपुलें वाहे ।
वाहे, वाहे, वाहे, न कशाचाही विरोध ती साहे ॥११॥
गंतव्ये स्थान किती जवळ असे दूर वा न ती पाहे ।
वाहे, वाहे, वाहे, संतत ती एकसारखी वाहे ॥१२॥
आलीं विघ्ने मार्गी तरि ती न ध्येय आपुले सोडी ।
ध्येयप्राप्तीतचि तिज वाते, दुसर्‍या कशांतहि न, गोडी ॥१३॥
अति डोंगराळ देश न तिजला भिववुनि शके परतवाया ।
रमणीय देश तिजला मोहवुनि शके न पळहि खळवाया ॥१४॥
हा अति रमणीय असो देश विविधधान्यफलेंविभवशाली ।
तटिनी ह्या विभवाच्या आस्वादी मन न आपुलें घाली ॥१५॥
प्रस्तरसंस्तरदुस्तर देश असो, ही नदी न भय पावे ।
ध्येय मनीं वागवुनी ती सिंधुपतीकडे सतत धावे ॥१६॥
मार्गी पर्वत येओ, ती थांबविनाच आपुलें क्रमण ।
त्या पार्वतीस पाश्वी टाकुनि घेऊनि जाय ती वळण ॥१७॥
न नदीस पर्वताचा भिववि कडा, तशिच ती पुढे जाई ।
टाकी उडी धडाडा, साधाया ध्येय ती करी घाई ॥१८॥
वाटेमध्ये येतां डोंगर सानां चिरोनि ती देहा ।
वाहोनि दो प्रवाही जाय पुढें ती, त्यजी नचि निजेहां ॥१९॥
वाटेत जी नदी तिज भेटे तद्ध्येय तेंचि असल्याने ।
तिजही घेउनि संगे ती जाय पुढें स्वकीय मार्गाने ॥२०॥
सागर मत्पति त्याला गांठुनि मज्जन्म सफल होईल ।
ह्या निश्चये नदी ती वागे, स्तुत्यर्ह खचित तच्छील ॥२१॥
मी गोमतीतटावरि बसलों असतां मनातं जे आले- ।
ते मम विचार काव्यस्फूर्तीने ह्यापरी ग्रथित झाले ॥२२॥
केलें अनुकरण खरें शिवबाच्या काळच्या मराठयांनी- ।
तटिनीचे नि:संशय, हें मित्रांनो सदैव घ्या ध्यानीं ॥२३॥
तटिनीच्या अनुकरणें मित्रांनो ध्येय तुम्हिहि गांठाल ।
संततिच्या दोषाला हें तुम्हि केल्यास भाजन न व्हाल ॥२४॥
“गोमती ” नाम हें काव्य रची वामननंदन ।
त्यांत जें उक्त तें तत्व प्रेमाने आदरो जन ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP