अंक दुसरा - प्रवेश तिसरा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


स्थळ -- रेवतीचें घर.

( रेवती व तिची मैत्रीण अनुराधा. )

अनुराधा - अलिकडे बरेच दिवस, आश्विनशेटजींचे तुझ्याकडे वरचेवर येण जाण, बोलण - बसणं पाहून मला हें कधींच स्वप्न पडलं होतं. पण मला न कळवतां असं करशील हें मात्र माझ्या ध्यानांत आलं नव्हतं !
रेवती - तुझा रुकार पडेलसं वाटलं नाही म्हणून नाहीं कळवलं.
अनुराधा - कसा रुकार पडेल ! खरचं सांगतें, अगदीं पोरकट विचार केलास ! अग, हे तुझे चांगले पैसे मिळवायचे दिवस आणि यांत जर एकाच पुरुषाला धरुन राहिलीस, तर पुढे काय करणार ? तोंडाला सुरकुत्या पडल्यावर का ही घडी येईल ?
रेवती - आज गोष्ट काढलीस म्हणून सांगतें --

पद
तनुविक्रय़ पाप महा ॥ पापांच्या वसलें कळसीं ॥
स्त्रियांत भूषण लाज विनय हे कोमल भाव मनींचे ॥
ते जळाया धनार्थ नच तो देव घालि जन्मासी ॥१॥

अनुराधा - अग, दररोज नवा थाट ! कसली काळजी नाही. रात्रन् दिवस आनंदात घालवायचे सोडून हें कुठलं ब्रह्मज्ञान शिकलीस कोण जाणे ! मी कशाला बोलूं ? आठ दिवसांत दिवसांत कंटाळशील बघ ! मी म्हणतें, तुझ्या आजीपणजीपासून हा धंदा करीत आल्या त्या सगळ्या वेड्या कां होत्या ? त्यांनी शरीराची विक्री करुन पैसा करुन ठेवला ना ? आणि त्याच पैशावर तूं उड्या मारतेस ना ? यांत काय अधिक केलेंस ? यापेक्षा बैरागीण होऊन एकतारी वाजवीत फिरलीस तर मी खरं तरी म्हणेन. अजागळ कुठली ? अग, कुणाचा घातपात न करतां, हा धंदा चालवून पैसा मिळविण्यात कांही पाप नाही; उलट लोकांच मन सांभाळून संतुष्ट राखण्यांत पुण्यच आहे. समजलीस ?
रेवती - पुरेत पुरेत ह्या पाप - पुण्याच्या गोष्टी ! मी तुला इतकंच सांगतें --

पद ( ढोलन मेंढे घर आवे )
निंद्य जीननक्रम अमुचा ॥
आमरणांत निशिदिनिं सततचि एक रुप पालट ना त्याचा ॥धृ०॥
स्मित सोंगी स्तुति लटकी आर्जव ॥
तोषरोष दांभिक वरवरचा ॥१॥

अनुराधा - अग, त्यापेक्षा असंच करीनास मग ? अलीकडे ह्या शाळा बोकाळ्यापासून आमच्या जातीतल्या मुलींत लग्नाचं खूळ डोकावूं लागलयं, म्हणून लग्नच लावून कां घेत नाहीस त्यांच्याशीं ?
रेवती - लग्न नाहीं तर काय म्हणायचं याला ?

पद
लग्नविधींतील खरें मर्म काय । ठाऊक तें मुळिंहि तुज नसे ॥धृ०॥
वैवाहिक होममंत्र अंत:पट अक्षतादि ॥
पोषक हे विधि, मिळणी जीव जिवा सार हें असे ॥१॥

अनुराधा - बर बाई, तूं आहेस पटाईत, शिकून तरबेज झालेली. मला का बोलण्यात हटणार आहेस ? रहा, आश्विनशेटजींचे बायको होऊन तरी आनंदात रहा म्हणजे मिळवलीस ! तुझी माझी मैत्री म्हणून सांगून ठेवतें, त्यांच्या स्वभाव आहे म्हणे तर्‍हेवाईक ; तेव्हां नीट जपून वाग ! जातें आतां, उशीर झाला. गजरे करुन ठेवावयाचे आहेत. ( जाऊ लागते. )
रेवती - अग, गजरे गजरे ते असे किती करायचेत ? जरा बसून जा.
अनुराधा - ( दूर पाहून ) मी तुला कांहीं एकटी नाहीं सोडून जात. ते पहा तुझे नवीन यजमान, अग बाई ! हें काय भलतंच बोललें मी . तुझे पतिराज आले हो, आतां तरी जाऊं ?
रेवती - समजलं, समजलं, संध्याकाळी येशील का ? जा तर ! ( अनुराधा जाते. ) ही कांहीं नेहमीची वेळ नव्हे. दुसरं कोण आहे बरोबर ? वैशाखशेट आहेत वाटतं ! पण स्वारीची मुद्रा फिरलेली दिसते. काल रात्री सत्यनारायणाच्या गडबडीत त्यांच्याशीं बोला - बसायला झालं नव्हतं म्हणून रागावले होते त्यातलाच हा बासा राग असेल ! ( आश्विनशेट व वैशाखशेट येतात ) यायचं असं वैशाखशेट, या बसा - आज हवा फार गरम झाली आहे नाहीं !
वैशाख - उन्हानं, दुसरं काय ! ऊन उतरलं म्हणजे होईल थंड आपोआप.
आश्विन - ( वैशाखास ) ही पाचपेंचाचीं बोलणी नकोत. आत्ताच्या आतां काय तो उलगडा झाला पाहिजे ! ( कुजबूजूं लागतो )
रेवती - हळूच हो, मला ऐकायला येईल नाहीतर. माझे कान फार तिखट आहेत म्हणून म्हणतें - कुजबूज करायला बाहेर नव्हती वाटतं फुरसत? बरं तर चालूं दे. मी जराशीं जाऊन येतें. ( जाऊं लागते. )
वैशाख - छे:, तसं कांहीं नाहीं. काल तुम्हांला यांनी तसबीर दिली, ती माझ्या मनांत एकदां पहावयाची आहे.
रेवती - मला दिल्यावरच पाहाण्यांत कांहीं अधिक आहे वाटतं ? बरं, पाहिजेच असेल तर दाखवितें. डोळे नकोत कांही मोठे व्हायला ! ( तसबीर पाहाण्यास जाते )
वैशाख - झालं आश्विनशेट ! ती पहा आणायला गेली. दिलिन् म्हणजे झाली अगदीं सोळा आणे !
आश्विन - होणारसा रंग दिसतो खरा. हिच्यावर भलताच आरोप ठेवून आपण मोठी चुकी केली बुवा ! बरं झालं तें झालं ! आतां मेहरबानी करुन तिच्याजवळ तरी यांतलं कांहीं बोलूं नकोस, नाहींतर आमच्या फजितीला पारावारच नाहींसा होईल.
रेवती - अं ! ह्या खणांत नाहीं दिसत. मग कुठें ठेवली ? बरं - हो, खरंच, काल घरीं आल्यावर पहिल्यांदा मी त्या तावदानी पेटीकडे गेलें होतें तिच्यावर पाहूं या ! ( तिकडे जाते )
वैशाख - यापुढें तरी असा भलताच संशय घेत जाऊं नका !
आश्विन - छे:, आतां कधीं स्वप्नांतसुध्दां संशय यायचा नाही. चांगली अद्दल घडलीं आज - पण बोलू नकोस रे. तिचा कान इकडे आहे, तो पहा !
रेवती - म्हणजे ! इथेंहि नाहीं ? मग ठेवली कुठें तर - ही नव्हें - इथेंहि नाही. आतां ? हं समजलें. ( उघड ) अहो महाराज, आपण कांही तरी नजरबंद विद्या लढविलीत इथं खास ! खास सांगते. नाहीतर इथें ठेवलेली तसबीर नाहीशीं कशी झाली हो, होय ना वैशाखशेट ? वैशाख - नाहीं, शपथपूर्वक आमच्याकडे नाही. तुम्हीच पहा कुठें ठेवली ती !
आश्विन - ( वैशाखास ) कां ? माझा संशय खरा का खोटा ? अरे - मला पक्क ठाऊक. मी कसा खोटा संशय घेईन ? ( रेवतीस ) अहो, आमची नजरबंद नव्हे.
वैशाख - ( त्याला दाबून ) अरे, ती थट्टेनं म्हणत असेल, म्हणून म्हणतों इतक्यांत बोलूं नको, जरा दम खा !
रेवती - इथंहि नाही. कुठं मेली पडली आहे कोण जाणे !
आश्विन - ( वैशाखास ) ती पहा,मी मोठ्या प्रेमानं दिलेल्या तसबिरीला मेली म्हणते, ही आमच्या तसबिरीची किंमत काय ?
रेवती - ( आश्विनशेटास ) खरोखरच ती कुठें ठेवली ती सांपडत नाहीं !
आश्विन - नाहींच सांपडायची. मला ठाऊक आहे.
रेवती - ठाऊक आहे म्हणजे ? ( जवळ जाऊन ) मग द्या कुठं आहे ती !
आश्विन - हं ! अशी लाडीगोडी पाघळणारा मी गृहस्थ नव्हे !
रेवती - अग बाई, आतां मात्र अगदीं खरा राग आलां हं - भ्यालें मी अगदी- हं सांगा आतां कुठं आहे ती ?
आश्विन - अशा थट्टेथट्टेनंच दुसर्‍याच्या प्राण घेणार्‍या तुम्ही ! समजलीस ! निव्वळ थट्टेनंच ती तसबीर देऊन टाकली असशील !
रेवती - कुणाला देऊण टाकली असशील !
आश्विन - फिरलान् मोहरा. ( रेवतीस ) कुणाला म्हणजे ! ज्याला दिलीस त्याला आणि त्याच्या हातांत मी आज आत्तां नुकतीच पाहिली !
रेवती - हं ! हें मात्र मला नाहीं हो खपायचं ! कुणाला दिली ? नांव काय त्याचं ?
आश्विन - नांव विचारायला विसरलो, पण त्याचा चेहरा माझ्या लक्षांत राहिला आहे चांगला. बस्स झालं !
रेवती - ( हंसत ) तर मग हा नुसता विनोद चालला आहे. चालूं द्या हवा तितका !
आश्विन - हांस - हांस तूं - मलाहि याचं उसनं फेडावं लागेल ध्यानांत ठेव !
रेवती - चालूं द्या आतां. मी मधे बोलतच नाही. हो, तुमची फजिती करावी म्हणून मी ती तसबीर देऊन टाकली, अस्संच आपण समजा, आलं आतां !
आश्विन - समजा कशाला ? खरोखरच दिलीस - या डोळ्यांनी मी पाहिली आहे. त्यांत कांहीं ऐकीव प्रकार नाही !
रेवती - वैशाख राव, हें असचं चालायचं कांहीं वेळ. मी जाते आतां. अजून अंग धुऊन पूजा करायची आहे. त्या पहा काडीला पट्ट्या आहेत.
आश्विन - पण जरा -
रेवती - छे: छे:, आतां नकोच तें. ज्यांच मनुष्य त्याला ठाऊक ! ( जाते )
आश्विन - पहा पहा वैशाख , कशी बेपर्वा आहे ती ! त्या म्हणे काडीला पट्ट्या आहेत, ते तुमचे हात, ती तुमची तोंड, हव्या तर खा नाहींतर खाऊं नका, असाच बोलण्यांतल्या झोंक कीं नाही ? बरं जा म्हणावं ! तुझ्या पट्ट्यांना कांही इतकें ओशाळलों नाहीं आम्ही ! चल, प्रथम त्या गृहस्थाचा शोध काढून त्यालाच विचारुं. बरं, पण वैशाख, तुझी तरी खात्री झाली ना ?
वैशाख - छे: , अजून नाहीं होत खात्री. कारण तिच्या चेहर्‍यांत काहीं कपट दिसत नाही.
आश्विन - अरे, तुला ठाऊक नाहीं --

पद ( ठुमक चलत. )
नाट्यगाननिपुण कलावतिची ही माया ॥धृ०॥
अंतरिचा भाव एक ॥
दाखवि वरपांगिं एक ॥
बाह्यांवर वृत्ति देख ॥ भिन्न भिन्न छाया ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP