अंक तिसरा - प्रवेश तिसरा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


( रेवती तसबीर शोधीत येते. )

रेवती - ही काय पण भूतचेष्टा झाली म्हणतें मी ? त्यांनीं मला याच झाडाखाली तसबीर दिली वाटतं ? हो, हेंच तें आंब्याचं झाड ! आणि ती पाहून मी पदराखाली झांकून घेतली, इथूनच पुढं कार्तिकनाथाला गेले, प्रदक्षिणा घालून बाहेर तुळशीं कट्ट्यावर थोडीशीं टेकलें. तिथं तर पडली नसेल ना ! नाहीं, कारण तिथून निघाल्यावर देवळाबाहेर येतांना ती थोडीशी उघडी पडली होती ती मी झांकून घेतलेली मला चांगली आठवते ! मग, मग - हो ! मी याच सुमाराला घेरी येऊन पडलें; तेव्हां कदाचित् खालीं जमिनीवर पडली असेल, आणखी मी शुध्दीवर येऊन घरीं जातांना माझं मन जरासं गोंधळून गेलं होतं म्हणून कीं काय कोण जाणे, तिची काही मला शुध्द राहिली नसावी. मला ज्यांनी घरीं पोंचविली त्यांच्या तर ती हाती लागली नसेल ना ? पण तसं झालं असतं तर त्यांनी ती माझी मला पोंचती केली असती ! तर मग काय झालं तसबिरीचं ? आश्विनशेट म्हणाले, ती मी एका गृहस्थाच्या हातांत पाहिली. तो गृहस्थ कोण असावा बाई ? त्यांच्या मनांत जी शंका आली ती त्यांच्या समजुतीप्रमाणं वाजवी आहे. पण आतां मी काय करुं ? ते माझ्यावर रागावून गेले; म्हणून मेली मनाला हळहळ लागून राहिली आहे !

पद ( शाम घुंगट पट खोलो या चालीवर )
संशय कां मनिं आला ॥ कळेना ॥ कारण काय तयाला ॥धृ०॥
आळ वृथा कीं, चित्र दिलें मी ॥ कोणा पर - पुरुषाला ॥१॥
कोपुनि गेले, ही मज लागे ॥ हळहळ थोर मनाला ॥२॥

( पाहून ) अग बाई, हे आश्विनशेटजीच येत आहेत. ही मुद्रा रागाची म्हणावी कीं संशयाची म्हणावी ? या चिन्हांवरुन मनांत कांहीं गोंधळ चालला आहे खरा. ( आश्विनशेट येतो. ) दुष्टि बिचारी माझ्याकडे धांव घेते तिला बलात्कारानं दुसरीकडे वळविण्यांत काय अर्थ ?
आश्विन - ( पुटपुटतो ) हो, दुष्टि धांव घेते ! फोडून टाकीन अशी सैरावैरा धांवू लागली तर !
रेवती - मला ऐकूं येण्यासारखं मुद्दाम पुटपुटायचं, त्यापेक्षां उलट बोललेलं काय वाईट ? हें मीं झाडावरच्या पोपटाला म्हणतें हो नाहीतर इथं कुणी आपल्याकडेच ओढून घेईल.
आश्विन - लागली मायाजाळ पसरायला. पण हा पोपट असला तसला नव्हे ! असलीं दहावीस जाळीं घेऊन उडून जाणारा हा पोपट आहे !
रेवती - मग कां घोटाळतो आहे इथं ?
आश्विन - कांही कुणाची भीति नाही. हमरस्ता आहे हा; पाहिजे त्यानं तिथं, तब्येत लागेल तितका वेळ उभं राहावं आणि लहर लागेल तेव्हा जावं ! ज्याचा तो मुखत्यार आहे !
रेवती - ( जवळ जाऊन ) परवा त्या बुवानं किती उघड अर्थाचं कवन म्हटलं तें मी आपल्या मनाशीं मोठ्यांदां म्हणते. कुणी ऐकायचं नाहीं ! काय बरं तें ! हो !

पद ( जल जयो ऐसी - या चालीवर )
ह्रदयिं धरा हा बोध खरा ॥ संसारीं शांतिचा झरा ॥धृ०॥
संशय खट झोटिंग महा ॥ देऊं नका त्या ठाव जरा ॥१॥
निशाचरी कल्पना खुळी ॥ कवटाळिल ही भीति धरा ॥२॥
बहुरुपा ती जनवाणी ॥ खरी मानितां घात पुरा ॥३॥

कां समजला का याचा अर्थ ?
आश्विन - हो ! हो ! समजला याचा अर्थ. आणखी तुझाहि अर्थ लक्षांत आला !
रेवती - नुसती मेली माझ्या अर्थाची ओळख पटायला इतकी का उरस्फोड करावी लागली ? आतां तरी पुरती ओळखू पटली ना ?
आश्विन - पटली. आतां अगदीं पुरीं ओळख पटली ! तूं एक छानदार सोनेरी मुलामा दिलेली - हिणकस - चालती - बोलती बाहुली आहेस झालं !
रेवती - ( मनाशीं ) अजून कांहीं यांच्यावरचा संशयविषाचा अम्मल उतरला नाही. काय बरं करावं ? ( उघड ) इतका विनोद पुरे नाहीं का झाला ! हा मेला विनोदाचा मामला मला नाहीं आवडत; म्हणून म्हणतें, एकदां गालांतच कां होईना पण गोंडस हंसून घरापर्यंत चला ! आणखी मी एक गोड पट्टी करुन देतें तेवढी खाऊन मग हवें तर पुन्हां माझ्यावर रागावून चला. कां ? झालं ? झालं मनासारखं ? हें पहा. तुम्ही न हंसता हे गालच हंसूं लागले !
आश्विन - आतां तुझं घर आणखी तुझ्या हातची पट्टी ? विसरा- विसरा तें आतां !
रेवती - पहा बरं, काय बोलतां याचा विचार करा ! ही संधि पुन्हां यावयाची नाही ! इतकंच नव्हें, पण मग कितीहि शपथा घेतल्यात, वचनं दिलींत, चुकलों म्हटलंत, क्षमा मागितलीत तरी मी तिकडे लक्षसुध्दां द्यायची नाहीं ! म्हणून म्हणतें, नीट विचार करा आणखी चला माझ्या घरापर्यंत !
आश्विन - ती आर्जवाची आणि क्षमा मागण्याची वेळ गेली पार निघून ! याउप्पर तसली गोष्ट स्वप्नांतसुध्दां आणूं नकोस ! इतका कांहीं मी हा नाही !
रेवती - खरंच का ? पण ना मला नाही वाटत ! ( हंसते )
आश्विन - हांस, वाटेल तितकी हांस. इतके दिवस मला आपल भोळसर पाहून पिंजर्‍यात कोंडून ठेवायचा बेत केला होतास, पण !

पद ( ’ कर नुले जाये ’ या चालीवर .)
कटिल हेतु तुझा फसला ॥ निजपाशीं मज बांधायाचा ॥धृ०॥
महा घोर मरणांतुनि सुटलों ॥ उरीं विषारी नेत्र भल्ल हा होत घुसला ॥१॥

रेवती - बरं झालं हो ! तुमचं नशीब चांगलं म्हणून लौकर मोकळे झालांत ! आतां पाहिजे तिकडे बिनघोर चला !
आश्विन - मी पाहिजे तिकडे जातों आणि तूहि पाहिजे तिकडे जा किंवा पाहिजे त्याच्या --
रेवती - हं महाराज, मर्यादा सुटू लागली.
आश्विन - कांहीं हरकत नाही. मर्यादेची पर्वा बाळगाण्याची वेळ ही नव्हे ! तुझ्यासारखा खोडसाळ बायकोजवळ कसली आली आहे मर्यादा ?
रेवती - मी खोडसाळ ?
आश्विन - हो, हो, तूं खोडसाळ ! तुझं सर्व गारुड मला समजलं आहे, पण कशाला बोलूं ? रेवती खरोखर मी तुला प्राणांपेक्षा प्यार समजत होतों ; पण तोच तुझा आतां इतका तिटकारा आला आहे कीं काय सांगूं ? थोडसं वाईट वाटतं, पण सांगतोंच कीं, याउप्पर माझी भेट तुला कधीं व्हायची नाहीं !
रेवती - ती कां व्हायची नाहीं ? आणि असं तिटकारा येण्यासारखं माझ्या हातून काय झालं ?
आश्विन - काय झालं ? एकतर मी दिलेली तसबीर तूं एका सोद्याला देऊन टाकलीस ?
रेवती - ( मनाशी ) अगदीं खोटा आरोप करतात, तेव्हां यांची अशीच खोड मोडली पाहिजे ! त्याशिवाय इलाज नाहीं !
आश्विन - कां ? बोलत नाहीस ? दिलीस कीं नाहींस ?
रेवती - हो दिली ! मग काय म्हणणं आहे आपलं ?
आश्विन - कां दिलीस ?
रेवती - कां म्हणजे ? मला वाटलं, मी दिली.
आश्विन - दिलीस तर दिलीस ! मला थोडंच वाईट वाटणार आहे त्याबद्दल ?
रेवती - मग असे सुस्कारे कां सोडतां ?
आश्विन - मी आणि सुस्कारे ? कांहीं बांगड्या नाहीं भरल्या हातांत ?
रेवती - हो, हातांत दिसत नाहींत खर्‍याच ! पण सांभाळा हो ! हे वीरश्रीचं पाणी जाईल जिरुन आणि पुन्हां लागाल माझ्या दाराचे उंबरठे झिजवायला ? पण मग मी पाऊलसुध्दां द्यायची नाही, संभाळून असा !
आश्विन - आणखी तूंहि पण सांभाळून ऐस ! नाहीतर एकदां पडलीस तशी पुन्हां भर रस्त्यात त्याच्या गळ्यांत जाऊन पडशील !
रेवती - ती कुणाच्या ? केव्हां ? कुठं ? ( मनाशीं ) हें नवीनच काढलंय् यांनी.
आश्विन - कुठं म्हणजे ? या झाडाखालीं. काल सकाळी. तो म्हणत होता ’ घरांत चल ! ’ कां आलं कीं नाही ध्यानांत अजून ?
रेवती - ( मनाशीं ) समजलें, मी घेरी येऊन पडलें होतें त्या वेळचं असावं हें. पण यांच्याशी खरं बोलून उपयोग नाही. कांही वेळ मघासारखं वांकडंच बोललं पाहिजे !
आश्विन - पटली की नाही खूण ?
रेवती - बरं पटली. मग ?
आश्विन - पुन्हां तशी पडूं नकोस !
रेवती - तें कां ? कुणाची बंदी आहे मला ? माझी मी मुखत्यारीण आहे !
आश्विन - मग असं तूं अगोदरच सांगायचं होतंस मला.
रेवती - आम्ही नायकिणीच जर असं सांगायला लागलों; तर आटपलाच आमचा बाजार !
आश्विन - तर मग ? -

पद ( नगरी मोरी )
स्वकर शपथ वचनिं वाहिला ॥
उगिच कां तुवां ? निजतनु दिधली मला, तो काय, पोरखेळ नवा ॥धृ०॥
पसरिली माया लटकिच कां ती ॥
वरिलें मग कां धरुनि साक्षी त्या माधवा ॥१॥

रेवती - त्या शपथा आपण खर्‍या समजलांत एकूण ?

पद ( हे श्रवण )
भोळी खुळी गवसति जीं धनिक वणिक बाळें ॥
धरायास त्यांस पाश असति निरनिराळे ॥धृ०॥
आण शपथ मम वचनें मानिली खरीं कां ॥
हंसतिल जन म्हणतील तें शंभु खरे भोळे ॥१॥

आश्विन - बस्स,बस्स, झालं ! हीच तुझी माझी अखेरची भेट जातों आतां --
रेवती - सुखरुप चला बरं ! पुन्हा असे फसूं नका !
आश्विन - ( परतून ) तुला वाटत असेल कीं मी पुन्हां भेटेन म्हणून, पण तें विसर आतां !
रेवती - विसरतें बरं, पण चला आतां एकदांचे ! अग बाई, पुन्हां परतली स्वारी ! आणखी काय राहिलं सांगायचं ?
आश्विन - शेवटची, अखेरची एकच गोष्ट सांगायची राहिली ती ही कीं, तूं खरोखर माझं मन चोरुन घेतलं होतसं आणि मीहि तें मोठ्या आनंदानं तुझ्या स्वाधीन केलं होतं, म्हणून तुला सोडून जायचं माझ्या जीवावर आलं आहे; तरी एकदा निश्चय केला तो फिरायचा नाही ! पण शेवटचं इतकंच सांगायचं कीं, तूं कुठंहि खुशाल ऐस ! ( जाऊ लागतो व पुन्हां परततो, ) आणि तुझ्याबद्दल कांहीं वेडंवाकडं माझ्या कानांवर येईल असं करुं नकोस ! कारण

पद ( क्षण एक जो )
मानिले आपुली तुजसि मीं एकदां ॥
दु:ख शोक न कदा शिवुत तुजलागिं ते ॥धृ०॥
वंचिलें त्वां जरी हितचि तव वांछितों ॥
वरुनि सन्मार्ग तो धरि सदा सुमतिते ॥१॥
कष्ट जरि सोडितां वच नये मोडितां ॥
म्हणुनी जातों अतां गाळि नयनाश्रु ते ॥२॥

रेवती - या बरं ? खरोखरचं पुन्हां भेटणार नाहीं ?
आश्विन - आतां नांवच नको काढूं भेटायचं ! एकदां तोंडातून शब्द गेले ते गेले ! धनुष्यावरचे बाण !
रेवती - तें खरं पण, संध्याकाळी मीं बाहेर नको ना जाऊं ? नाहीतर आपण याल आणि चुकामूक पडेल, म्हणून विचारतें.
आश्विन - प्राण गेला तरी यायचं नाहीं म्हणतों ना ? मग चुकामूक कशी पडणार ?
रेवती - आलं माझ्या ध्यानांत; पण मी स्वत: मसाल्याचं दूध करणार आहे. आलां नाहीत तर मी रागावेन बरं !
आश्विन - रागाव, खुशाल रागाव ! ( निघून जातो. )
रेवती - खरंच, यांच माझ्यावर मनापासून प्रेम आहे, पण त्या तसबिरीनं मेला घोंटाळा करुन ठेवला आहे, तो आधीं घरीं जाऊन उलगडला पाहिजे !

पद ( मेरा चित्त )
मजवरी तयांचे प्रेम खरें ॥ जें पहिलें जडलें तें उरे ॥धृ०॥
कसास लावुनि अंत पाहिला ॥ परि न जराहि ओसरे ॥१॥
संशय - पटला दूर सारितां ॥ प्रकाशेल कीं मग पुरें ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP