स्थळ - रेवतीचें घर
( रेवती बोलतं बसली आहे. )
रेवती - ( आपल्याशीं ) आपला शेंडा ना बुडखा ! संशय तरी कसा मनांत ? खरं म्हणून म्हणजे, त्यांच तोंडसुध्दां पाहूं नये पुन्हां ! पण असं मनांत येतं कीं, त्याच्याकडे तरी काय दोष आहे ? त्या कृत्तिकाबाईनं त्यांच्या मनांत विषारी वारं फुंकलं, त्यानं त्यांच डोक असं भणभणून गेलं ! कोण आहे ग तिकडे ? तारके, शेटजींकडे पत्र घेऊन गेलेला मनुष्य आला का ? ( तारका येते )
तारका - अजून नाही आला.
रेवती - कां बरें नाहीं आला ? म्हटलं म्हणजे इतका उशीर लागूं नये. केव्हां एकदां त्यांना भेटेन आणि संशय दूर करीन असं झालं आहे ! उगीच मी चांडाळणीनं त्यांना नांव ठेवली. त्यांचा पाणउतारा केला; तसाच त्यांचा राग शांत करायचा टाकून, उलट मींच त्यांना टाकून बोलून खिजवंल ! बरं फाल्गुनरावांकडे निरोप घेऊन गेला होता त्याच काय झालं ?
तारका - त्यांचा निरोप आला, ते स्वत: इकडे यायला निघाले आहेत, इतक्यांत येतील !
रेवती - ( मनाशीं ) ते आले म्हणजे त्यांच्याकडून आश्विनशेटजींच्या मनांतली तळमळ काढली पाहिजे. निघेल अशी खात्री नाहीच, पण आपली मनाची समजूत ! यापुढं मात्र कानाला चिमटा ! अगदीं बेतानं, मर्जीचा कल पाहून तोंडांतून शब्द काढायचा. ( पाहून ) हे फाल्गुनरावच आले. तारके, ते आले म्हणजे तूं बाहेर जा, बरं का ?
( फाल्गुनराव येतो )
रेवती - या बसा ! माझ्या विनंतीला मान दिलात, आनंद झाला मला !
फाल्गुन - यांत कसला मान ? हे चालायचंच असं.
रेवती - निरोप पाठवायचं कारण इतकंच कीं, आपल्या घरांत कांहीं प्रकार घडला आहे. मला कांहीं त्यासंबंधानं बोलायची गरज नाही. पण त्याची झळ मला येऊन लागली म्हणून बोलायचं.
फाल्गुन - तुला ही एकदांच लागली; पण मला रात्रंदिवस त्या झळीतच होरपळावं लागतं; त्याची फिर्याद कुठं करुं ?
रेवती - मग काय, म्हणायंच ! पण आपण कृपा करुन मनावर घ्याल तर माझा तरी त्रास चुकणार आहे !
फाल्गुन - कसा तो सांग, म्हणजे माझ्याकडून कांहीं कसूर व्हायची नाही हें मी अगदीं मनापासून सांगतो !
रेवती - माझ्यावर जो प्रसंग गुदरला आहे तो आपल्या कुटुंबा --
फाल्गुन - समजलों. तिच्यामुळें माझ्यावर काय कहर उठला आहे तो सांगूनसुध्दां तुला कळायचा नाही ! असो ; पण तिनं काय केलं ?
रेवती - त्यांनी आमच्या ह्यांच्यात आणि माझ्यांत कांहीं कलागत लावून, माझ्या जन्माच गहत करुन टाकला ! अशी मी त्यांची काय गाय मारली होतीं बरं !
फाल्गुन - ( मनाशीं ) ही कांहीं नवीनच भानगड दिसते ! ( उघड ) तिनं काय कलागत लावली आहे सांग पाहूं ?
रेवती - कलागत हीच कीं, आमच्यांची माझ्यावर कायमची गैरमर्जी करविली.
फाल्गुन - आणि तिची मर्जी त्यांनी संपादन केली, असंच ना ?
रेवती - तसं मी कशाला म्हणूं ? पण कृत्तिकाबाईंच्या मनांत माझ्याबद्दल सवतीमत्सर शिरला आहे खरा !
फाल्गुन - सवतीमत्सर ! तुझ्याबद्दल सवतीमत्सर ! तों कां ?
रेवती - रमाकांन्ताला ठाऊक ! आपण मला काल पडतां पडतां सांवरुन धरलीत ती ? त्याचा कांहीं त्यांनी भलताच अर्थ केला आणि आमच्यांना असं सांगितलं कीं, आपला माझा म्हणे - काय बरं हें ?
फाल्गुन - अग कुभांडे ! हां, समजलो. आपली कारस्थान लपवायाला तिनं हा कावा केला आहे !
रेवती - तें काय असेल तें ईश्वराला माहीत ! पण आपणचं सांगा कीं, या कुंभांडांत एक अक्षर तरी खरं आहे कां ? मला नायकिणीला म्हणजे अगदींच का अब्रो नाहीं ?
फाल्गुन - तूं अगदीं काळजी करुं नकोस ! मीच तुझ्या त्यांना भेटून सांगता म्हणजे झालं कीं नाहीं ? नांव काय त्यांचं ?
रेवती - बहुतकरुन इतक्यांतच येतील ते. त्यांचं नांव आश्विनशेट.
फाल्गुन - आश्विनशेट !
रेवती - होय, पण आपण असे दचकलांत कां ? ओळख आहे बाटतं कांहीं ?
फाल्गुन - ओळख ? अशी तशी नाहीं ! त्याला मी चांगला हात दाखविन, तेव्हांच कदाचित् त्याची ओळख विसरेन !
रेवती - ( घाबरुन ) अग बाई ! म्हणजे ?
फाल्गुन - हा माझ्या बायकोचा कावा आहे म्हणून मी तुला मघाशीं सांगितलंच. त्या संबंधांत त्याचंहि अंग आहे. त्या दोघांनीं मिळून तुझ्याप्रमाणंच माझ्यावरहि आरोप आणला आहे. म्हणजे तूं आणि मी निव्वळ खोटं आहे कीं नाहीं हें ?
रेवती - मी अग्नीत उभी राहून सांगतें कीं, हें अगदीं खोटं आहे म्हणून ! पण आश्विनशेट अशी गोष्ट करतीलसं आपल्याला वाटतं ?
फाल्गुन - नुसतं वाटत नाही, माझी खात्री झाली आहे त्याविषयी; आणि म्हणूनच तर मी इतका जळतों त्याच्याबद्दल !
रेवती - मला नाहीं खरं वाटत बाई, खरंच का सांगतां हें ?
फाल्गुन - संशय कशाला ? ही तसबीर आश्विनशेटांनीं तिला दिली ! ( ती दाखवितो. ) पाहिलीस ! आणि मी ही तिच्या हातांतून हिसकावून घेतली ! तिनं हिच मुके घेतलेले आणि हिला उराशीं धरलेली मीं पाहिली. बोल, आतां कोणती शंका राहिली ?
रेवती - त्यांनी ही तसबीर तुमच्या कुटुंबाला दिली ? मग मात्र शिकस्त झाली लुच्चेगिरींची ! आपण दुसर्याला देऊन माझ्याशीं विनाकारण कीं हो तंटा केला ? त्यांनी दिली हें जर खरं ठरलं --
फाल्गुन - त्यांत शंकाच घेऊं नकोस ! घरांतून असा भामट्यासारखा टेहेळीत, टेहेळीत, छपून येतांना मी त्याला पाहिला ; त्याची माझी बोलाचाली उडाली ; त्याला मी चांगला खरपूस झाडाला, इतकं झाल्यावर शंका कसली ?
रेवती - लफंगे हो लफंगे हे ! काय वचनं दिलीं, किती आणा शपथा वाहिल्या, कशी साखर पेरली ! पण सारी लबाडी ! आतां आपल्याला माझी काळजी ! दुसरं का बोलूं ?
फाल्गुन - त्याची नको फिकीर. त्याचे सर्व बेत ढांसळून टाकले नाहींत तर मी कसला फाल्गुनराव ! बरं मी जातों. आतां बभ्रा करुन फायदा नाही. त्याला चांगला नरम आणला पाहिजे !
रेवती - ( पानाला चुना लावीत ) चांगली फजिती करा बरं का ! पुन्हां तोंड काढूं नये वर !
फाल्गुन - माझ्या हातून होईल तितकी करतों, झालं !
रेवती - ( पट्टी करीत मनाशीं ) उगीच मी पत्र लिहिलं असं वाटतं आतां. ( ती पट्टी देते. फाल्गुनराव निरोप घेऊन जातो. )
पद ( वाट चलत छेडत. )
हा खचित दिसे मम भाग्यकाल ॥
मोहिनी त्यांच्या कपटभाषणा ॥
नाहि सोडिलें सदन काल ॥धृ०॥
श्रीयुत हे संभाविति दाविती ॥
परिं आचरणीं उलट चाल ॥१॥
भल्या, हीन मग गणिका आम्ही ॥
उघड घालितों मोहजाल ॥२॥
पुन्हां पत्र लिहितें कीं, आतां भेटायला यायची कांहीं जरुर नाही. झाल्या भेटी तितक्या पुष्कळ झाल्या ! ( जाते. )