स्थळ : रेवतीचें घर
( रेवती व तारका )
रेवती - ( मनाशीं ) असा भिडस्तपणाच माणासाला बाधतो मेला ! तें कांही नाहीं, दुर्जनाला दुरुनच नमस्कार केला पाहिजे ! काय ग तारके, आश्विनशेटजींनी कसा नीचपणा केला तो ऐकलास ना ?
तारका - हो, ऐकाला !
रेवती - इतकीं वचनं, आणाभाका देऊन; प्रत्यक्ष रमाकांतासमोर पाणिग्रहणाचा विधि, करुन शेवटीं उघड उघड लग्न करण्याचं ठरवून अखेरीस त्यांनी मला हें असं फशीं पाडलं ! तें कांहीं नाहीं ! तूं अशीच्य अशीच जा आणि सांग, आजपासून मी तुम्हाला अंतरले आणि तुम्ही मला अंतरलांत ! आणि त्यांना निक्षून सांग, इतकं होऊन पुन्हां माझ्या घरी आलांत तर मी तुम्हांला, भेटायची नाही. तुमच्याशीं भाषण करावयाची नाही ! चिठ्ठीचपाटी असली तर वाचायची नाही, तुमच्या नोकरमाणसाशीं बोलायचीसुध्दां नाही कीं निरोपसुध्दां ऐकायची नाहीं ! आलं लक्षांत काय सांगायचं तें ?
तारका - लक्षांत आलं, पण हें फार नाही का होत ?
रेवती - फार नाही निं कमी नाहीं, अस्सचं जाऊन सांग !
तारका - पण मी म्हणतें --
रेवती - कांहीं म्हणूं नको ! अशा माणसाची अशीच खोड मोडली पाहिजे !
तारका - पण बाईसाहेब, तेच आले पहा. आतां --
रेवती - येऊं देत, मी माडीवर जाऊन बसतें. ते आले म्हणजे मीं तुला मघाशीं सांगितलं तसंच्या तसं जाऊन सांग ! ( जातां जातां मागें वळून ) ते गेले म्हणजे मी येईन ! ( जाते. )
( आश्विनशेट येतो. )
आश्विन - तारके, रेवती आहे का घरांत ?
तारका - हो आहेत ; पण ’ भेट व्हायची नाहीं ’ असं त्यांनी मला निक्षून सांगितलं आहे सांगायला !
आश्विन - असं सांगायला कारण ?
तारका - कारण काय असेल तें असो, पण काल संध्याकाळी त्यांच्याकडे फाल्गुनराव आले होते नि त्यांनी त्यांच्या मनांत भरवून दिलं असावं.
आश्विन - रेवतीकडे फाल्गुनराव आला होता ? तर मग या गोष्टीचा उलगडा करण्याकरितां मला रेवतीला जरुर भेटलंच पाहिजे !
तारका - छे - छे, आपला निरोप ऐकायला नाही, आपली चिठ्ठीसुध्दां पहायची नाहीं असं त्यांनी ठरवलं आहे; मग भेट घ्यायचं, बोलायचं मनांतसुध्दां आणूं नका ! अशा वेळी त्यांची भेट घेण्यापेक्षा फाल्गुनरावांनाच जाऊन का भेटत नाहीं ? मला वाटतं त्याचा उपयोग जास्त होईल !
आश्विन - हो, तुझंहि म्हणणं वाजवी आहे. मी तिकडेच जातो. पण माझं एक काम करशील का ? मी जाऊन येईतों तिची समजूत घाल, जराशी रदबदली कर माझ्याकरितां ! तिच्या मनांत काय भरलें आहे तें मी खात्रीनं दूर करीन ! पण तारके, रेवतीनं हें चांगलं केलन् का ?
पद ( चाल - मारगमूं कोन )
सदय किती कोमलमति रेवती ती ॥
शोभे ही काय तिला निष्ठुरा कृती ॥धृ०॥
कानिं कुणीं विष मानुनी खरें ॥
कूपित होय भेट न घे प्रेम सांडिती ॥१॥
तारका - म्हणूनच म्हणतें, तुम्ही फाल्गुनरावांना भेटून या ! आपण सांगितल्याप्रमाणें मी त्यांच मन वळवायचं बघतें.
आश्विन - ठीक आहे. तिला आणखी असं सांग, तुझ्याबद्दल माझ्या मनांत आलेला सर्व संशय दूर झाला, तुझ्यावर विनाकारण दोषारोप केल्याबद्दल माझ्या मनास अतिशय पश्चाताप झाला आहे, म्हणून मी क्षमा मागण्याकरितां आतां इथं आलों होतो. जाऊं तर ?
तारका - हं चला ; माझ्याकडे लागलं सगळं ! ( आश्विनशेट जातो. ) त्यांच्या बोलण्यांत कांहीं कपट दिसत नाही, अगदीं खरं नाणं दिसतं. ( रेवती येते. )
रेवती - काय ग, काय म्हणत होते ?
तारका - अगदीं मोठ्या कष्टानं गेले आणि जातांना मला तुमच्याशीं रतबदली करायला सांगितली आहे. विनाकारण तुमच्याबद्दल संशय घेतल्याचा आपल्याला फार पश्चाताप झाल्याचं सांगत होते. तुमची भेट व्हायची नाही, असं जेव्हां मी निक्षून सांगितलं, तेव्हां तर त्यांना फार वाईट वाटलं ; आणि जातांनासुध्दां अगदीं कष्टी मुद्रा करुन गेले आणि तूं तरी माझ्याकरितां रतबदली कर म्हणून मला सांगून गेले !
रेवती - याचं तर हें असं सांगतेस, फाल्गुनराव तर तसं म्हणतात, तेव्हां आतां मी काय करावं ?
तारका - मला वाटतं, सांगोसांगी गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षां फाल्गुनरावांच्या बायकोलाच विचारलं म्हणजे सर्व निकाल लागेल. शिवाय आश्विनशेटजीसुध्दां आतां तिकडेच जाणार आहेत, तेव्हां हा काय प्रकार आहे हें प्रत्यक्ष पहायला सांपडेल. असल्या गोष्टी समक्षा - समक्ष झालेल्या चांगल्या. म्हणजे संशय राहत नाही !
रेवती - ही तुझी मसलत बरी दिसते. जा, तो माझा पांघरायचा हा - घेऊन ये म्हणजे मी कृत्तिकाबाईंना जाऊन भेटतें. ( तारका जाते. ) हो नुसत्या संशयावरच आश्विनशेटजींना मी गमावून बसले, तर जन्मभर तळमळ लागेल ! ( तारका येते. ) आणलास का ?
दे इकडे, ( पांघरते ) कदाचित कुठं गेली आहे असं आईनं जर विचारलं तर फाल्गुनरावांच्या घरी जाऊन आतां येतें, असं सांगून गेल्या आहेत, असं सांग ! ( जाते . )