अंक तिसरा - प्रवेश २ रा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


( चेटी प्रवेश करिते. )
चेटी : आईसाहेबांनी मला ताईसाहेबांकडे कांही निरोप सांगायला पाठविलें
आहे ; तर तिकडेच जावें .( पाहून ) ह्या पहा ताईसाहेब ! हातांत चित्राची फळी घेऊन मदनिकेसह इकडेच येताहेत.
वसंत० : मदनिके, ही चारुद्त्ताची तसबीर अगदीं हुबेहूब काढिली आहे नाही बरें ?
मद० : खरेंच ताईसाहेब , अगदीं हुबेहूब काढिली आहे.
वसंत० : हें तूं कशावरुन म्हणतेस ?
मद० : आपली स्नेहायुक्त दृष्टी या तसबिरीकडे लागली आहे म्हणून .
वसंत० : हें तूं वेश्याजनांच्या चालीप्रमाणे तोंडापुरतें बोलतेस वाटतें ?
मद० : सर्वच वेश्या तसें बोलतात कीं काय ?
वसंत० : अगे हो , अनेक प्रकारच्या पुरुषांशी प्रसंग पडतो म्हणून त्यांना तोंडापुरतें बोलणें भाग पडतें ज.
मद० : पण मी तर ताईसाहेब , तुमची दृष्टि आणि मन ही दोन्ही या तसबिरीवर जडलीं म्हणूनच तसें म्हट्ले.
( चेटी पुढे होतो . )
चेटी : ताईसाहेब , आईसाहेबांनी सांगितलें आहे कीं , मागल्या दारीं बुरख्याची गाडी आली आहे ; तिच्यांत बसून आपण जावे .
वसंत० : श्रेष्ठ चारुदत्ताकडून का आली आहे ?
चेटी : नाही. ज्यानें गाडीबरोबर दहा हजार मोहरांचा दागिना पाठविला आहे त्याच्याकडून .
वसंत० : तो कोण ?
चेटी : तो राजशालक संस्थानक .
वसंत० : ( रागानें ) चल नीघ येथून अगोदर . पुन्हां ही गोष्ट माझ्यापाशीं काढलीस तर खबरदार !
चेटी : ताईसाहेब , क्षमा करा. मी काय करुं ? आज्ञेप्रमाणे निरोप कळविला.
बरें , आईसाहेबांना काय जाऊन सांगूं ?
वसंत० : आईला जाऊन सांग कीं , मी जिवंत रहावें असें जर तुझ्या मनांत
असेल तर पुन्हां असलां निरोप पाठवू नको.
चेटी : आज्ञेप्रमाणें जाऊन कळवितें.
वसंत० : अगे थांब , मीच सांगतें . मदनिके , तसबीर पलंगावर नेऊन ठेव आणि येतांना ताडाचा पंखा घेऊन ये . मी आईकडे जाते.
( सर्व जातात; शर्विलक प्रवेश करितो. )
शर्विलक : या शर्विलकानें काल रात्रीं -
पद -- ( चाल -- प्रतिकूल होईल कैसा. )
लाज येई रजनिस ऐसें घोर कर्म केलें ॥ राजदूत सावध असतां त्यांसी
वंचियले ॥धृ०॥ मोह घालि निद्रा जरि ती तीस जिंकियेलें ॥ चौर्य -
निपुण ऐसा मी परि अरुणकांतिजालें ॥ पहा कसें मुख हें माझें
तेजशुन्य झालें ॥ तेज जसें या चंद्राचे सर्व लया गेलें ? ॥१॥
- चौर्यकर्म करणें तरी किती भीतीचें आहे ! --
साकी
कोणी चालत येतां वाटे शोधाया मज आला ॥
धांवत येतां आला वाटे वध्द कराया मजला ॥
दूषित मन ज्याचें ॥ येतो संशय मनिं त्याचे ॥१॥
- ही मदनिकाच आली वाटतें. वाहवा --
पद- ( चाल -- निजरुप इला मी दावूं का )
मज लावण्याची खनि दिसते ॥धृ०॥ केवळ रतिची मूर्ति विराजे
चंदनलेपासम ही साजे ॥ कामाकुल या देहातें ॥१॥
-- मदनिकें ये. मी तुझ्याच भेटीची वाट पहात आहे.
मद० : ( प्रवेश करुन ) अगबाई ! हा शर्विलक येथे कोठून आलां बरें ?
शर्विलका , ये, कोणीकडून आलास ?
शर्वि० : सर्व सांगतों पण -
वसंत० : ( बाहेरुन येऊन आपल्याशीं ) कोणाशी बोलत आहे बरें ही मदनिका ? हं , समजलें. हिला दासीपणांतून सोडवून नेणारा तोच हा असावा. बोलूं दे दोघांना , आपण कशाला त्यांच्या सुखाआड या !
मद० : शर्विलका , पण तूं आलास कोठून ?
शर्वि० : ( शंकित होऊन मागेपुढें पाहतो. )
मद० : अरे , तूं असा कावराबावरा कां दिसतोस ?
शर्वि० : तुला काही गुह्य गोष्ट सांगायची आहे, पण येथें कोणी ऐकत नाही ना ?
मद० : कोणी नाही येथें, सांग पाहूं ; भिऊं नको.
वसंत० : ( मनांत ) काय ? गुह्य गोष्ट आहे म्हणतो ? तर आपण ऐकूं नये.
शर्वि० : काय गे मदनिके, कांहीं द्रव्य घेऊन तुला वसंतसेना सोडील का ?
वसंत० : ( मनांत ) काय, माझ्या संबंधीच्या गोष्टी आहेत ? तर मग आड उभें
राहून ऐकूं या.
मद० : शर्विलका, ही गोष्ट मी एक वेळ ताईसाहेबांना विचारली होती. त्या वेळेस त्या म्हणाल्या कीं , मी जर स्वतंत्र असतें , तर द्रव्य घेतल्यावाचून सर्व दासीजनांना सोडले असते, पण काय करुं ? धनीपणा पडला आईकडे , तेथें माझे काही चालत नाही. बरें पण शर्विलका, मला सोडवून नेण्यापुरतें तुझ्याजवळ द्रव्य कोठे आहे अगोदर ?
शर्वि० : त्यासंबंधाने मी काहीं तजवीज केली आहे, ती तुला सांगतो --
साकी
दारिद्र्यानें जरि पीडित मी तव रुपी हें जडलें ॥
मानस माझें यास्तव रात्रीं काहीं साहस केलें ॥
लाभ तुझा व्हाया ॥ हा तव दासपणा जाया ॥१॥
वसंत० : ( मनांत ) याची मुद्रा प्रसन्न असून साहसकर्मानें घाबरल्यासारखी दिसते.
मद० : शर्विलका , स्त्रियांच्या नादीं लागून तूं साहस करतोस , पण यांत तुझ्या शरीराची व अब्रुची हानी होईल, समजलास !
शर्वि० : वेडी आहेस तूं ; भित्री कोठली ! अगे, असे साहस केल्यावाचून का कोठे संपत्ती मिळते ?
मद० : अरे, पण माझ्याकरितां साहस करतांना तूं काही भलतेंच तर केले नाहीस ना ?
शर्वि० : तशी शंकासुध्दां घेऊ नकोस . हें पहा --
पद-- ( चाल - उद्या बघ जातें . )
फुलें वेलीचीं ॥
भूषणें तशी युवतीचीं ॥धृ०॥
नाहीं कधिं मीं गे चोरिलीं ॥ व्दिजयज्ञधनें नच मीं हरिलीं ॥
बाळें वित्तार्थ न कधिं नेली ॥ रीति चौर्याची ॥
धरिली ही सुविचाराची ॥१॥
-- तर मदनिके , वसंतसेनेला अशी विनंती कर कीं , आपल्या अंगाच्या बेताचे हे दागिने मुद्दाम घडवून आणले आहेत, तर एवढे गुप्तपणें अंगावर घालावे .
मद० : उघड रीतीनें अंगावर घालतां येत नाहीत, असे दागिनेच आमच्या ताईसाहेब कधी घालीत नाहीत. पण कसे आहेत ते दाखीव तर अगोदर.
शर्वि० : हे पहा ( शंकितपणॆ ते तिला देतो. )
मद० : ( पाहून ) अगबाई ! हे दागिने ओळखीचे दिसतात. शर्विलका , कोठून रे आणलेस हे ?
शर्वि० : तुला कां त्याची पंचाईत ? घे म्हणजे झाले मुकाट्याने.
मद० : अरे , पण सांगेनास कां कोठून आणलेस ते.
शर्वि० : मुकाट्याने घे म्हणतों ना ! कोठून आणले , कसे आणले , तुला
काय त्याचें ?
मद० : इतका जर तुझा माझ्यावर विश्वास नाही तर , मला द्रव्य देऊन
सोडवून तरी कशाला नेतोस ? ( दागिने टाकून जाऊं लागते. )
शर्वि० : बरें , रागावू नको , सर्व सांगतो. हे दागिने मोतीचौकांत जो चारुदत्त म्हणून सावकारपुत्र राहतो, त्याच्या घरचे; आणि हेंदेखील मला आज सकाळी समजलें . ( मदनिका व वसंतसेना घाबरतात. ) मदनिके, चारुद्त्ताचें नाव घेताच तूं अशी घाबरलीस कां ?
मद० : अरे साहसिका, निर्दया ! हें साहस करताना त्या घरांत तूं कोणाचा प्राण तर घेतला नाहीस ना ? किंवा कोणावर घाव तर घातला नाहीस ना ?
शर्वि० : हा शर्विलक भ्यालेल्यावर किंवा निजलेल्यावर् घाव घालणारा नाही, समजलीस ? कोणाचा प्राणहि घेतला नाहीं आणि कोणावर घावहि घातला नाहीं , उगीच कां भितेस ?
मद० : खरेंच ना पण हें ?
शर्वि० : तुझ्या गळ्याची शपथ .
मद० : बरें झालें बाई ! आतां माझ्या जिवांत जीव आला !
शर्वि० : ( असूयेनें ) काय ग मदनिके, ’बरें झालें ’ असें जें तूं म्हटलेस तें काय म्हणून ? समजलो; त्या चारुदत्ताच्या जिवाला काहीं अपाय झाला नाहीं असे जेव्हां समजलें , तेव्हां तुला बरें वाटलें ? हा दुष्टे -
पद
व्हावा लाभ तुझा मजला ॥ यास्तव निंद्य मार्ग धरिला ॥
त्वदर्थाचि डागहि लावियला ॥ निर्मलशा कुलकिर्तीला ॥
बहुसन्मानें नेत असुनि तुज येथून सदनाला ॥
प्रेम दाखवूनि मजवरी लटिकें वांछिसि अन्याला ॥१॥
-- खर्‍या शहाण्यानें या स्त्रियांच्या नादीं कधीं लागूं नये. --
साकी
काम अग्निसम सुरतज्वला प्रेम होय इंधन तें ॥
नर यौवनधन या दोहोंची त्यांत आहुती पड्ते ॥
यास्तव सुविचारें ॥ असावें सावध हेंचि बरें ॥१॥
मद० : अरे , पण , एकदम इतका संतापलास कां ? मीं काय केलें ?
( जवळ जाते. )
शर्वि० : चल हो एकीकडे ! तुम्ही स्त्रिया म्हणजे अशा नीच आहां कीं , तुम्हावर अनुरक्त होणार्‍याला तुम्ही अगदी कस्पटासमान समजतां .
पद - ( चाल -- कवणे तुज गांजियले. )
लक्ष्मीसम चंचल या वारकामिनी ॥
दहनभूमिघटिकेसम त्याज्य बुधजनीं ॥धृ०॥
धनलोभें हंसति रडति ॥ सहज नरा नागवीति ॥
पुरुषांचे चित्त हरिति ॥ मन अपुलें कधिं न देति ॥
होतां तो निर्धन अति ॥ धिक्कारुनि टाकिताति ॥
रंग पिळूनि अळिता जणूं ॥ देति फेंकुनी ॥१॥
मद० : अरे , पण माझ्या हातून अशी चूक तरी काय झाली ?
शर्वि० : चल बोलूं नकोस -
साकी
एकवारि मन ठेवूनि नेत्रें खूण करिति दुसर्‍याला
प्रेमवृष्टि तशि एकावरतीं संगमसुख भलत्याला ॥
ऐशा या कुलटा ॥ यांचा संग नको खोटा ॥१॥
--अरे दुष्टा चारुदत्ता, होतास कीं नव्हतांस असें करुन टाकतो ?
( जाऊ लागतो. )
मद० : ( त्याचा पदर धरुन ) अरे , असें असंबध्द भाषण करुन व्यर्थ कां रागावतोस ?
शर्वि० : व्यर्थ कसा रागावतों ?
मद० : अरें , हे दागिने माझ्या धनिनीचे आहेत ; तिने ते आपणासाठी करविले होते.
शर्वि० : ( त्रासानें ) मग म्हणतेस तरी काय ?
मद० : हे तिने चारुदत्ताजवळ ठेवायला दिले होते.
शर्वि० : त्याच्याजवळ कशाकरितां दिले ?
मद० : ( त्याच्या कानाशी लागून ) अशाकरितां .
शर्वि० : अरेरे, तर मग फार वाईट गोष्ट झाली माझ्याकडून ?
वसंत० : ( मनांत ) काय ह्याला पश्चाताप झाला ? यावरुन यानें समजून
उमजून काहीं हे काम केले नाही असें दिसतें .
शर्वि० : आतां पुढें कसें करावें बरें ?
मद० : पुढें काय करायचें हें मला बायकोला काय समजतें ?
शर्वि० : छे : ! असें कसें म्हणतेंस ! -
साकी
पांडित्य वसे स्त्रीच्या अंगीं जन्मापासोनी तें ॥
बहु शास्त्रांच्या अभ्यासानें परि तें पुरुषा येतें ॥
अनुभव हा सकलां ॥ या गुणिं तुम्ही नच अबला ॥१॥
मद० : शर्विलका, माझें ऐकशील तर हे दागिने त्या श्रेष्ठ चारुदत्ताला नेऊन दे.
शर्वि० : वा : , म्हणजे त्यानें मला आयतेंच चावडीवर न्यावें !
मद० : भलतेंच ; चंद्रापासून कधी ताप झाला आहे का ?
शर्वि० : ( मनांत ) शाबास मदनिके !
शर्वि० : तें खरें , पण दुसरा काही तरी उपाय सांग .
मद० : बरें , असें कर आतां ; तूं चारुदत्ताचा दूत हो आणि हे दागिने त्यानें
पाठविले आहेत असें सांगून ताईसाहेबांना दे.
शर्वि० : म्हणजे काय होईल ?
मद० : एक तर तूं चोर होणार नाहीस ; दुसरें , चारुदत्त ऋणमुक्त होईल, आणि ताईसाहेबांचे दागिने ताईसाहेबांना परत मिळतील.
शर्वि० : हें तर मोठेच साहस !
मद० : छे : ! असें न करशील तर मात्र साहस खरें .
वसंत० : ( मनांत ) शाबास मदनिके, तूं दासी असून कुलीन स्त्रीप्रमाणे मसलत
दिलीस , तेव्हां तुला दासी कोण म्हणेल ?
शर्वि० : पण तिची गांठ कशी पडणार ?
मद० : अरे, त्या पहा इकडेच येत आहेत. तूं बाजूला उभा रहा आणि मी
बोलविले म्हणजे ये.
शर्वि० : बरें तर . ( जातो. )
( वसंतसेना पुढे येते. )
मद० : ( वसंतसेनेजवळ जाऊन ) ताईसाहेब , चारुदत्ताकडून कोणी ब्राह्मण आला आहे.
वसंत० : त्याच्याकडून आला आहे , असें तुला कसें समजलें ?
मद० : ( गोंधळून ) त्यांत काय कठीण ?
वसंत० : येऊं दे त्याला आत.
( मदनिका शर्विलकास वसंतसेनेकडे आणते. )
भटजीबुवा नमस्कार करते. या आसनावर बसा.
शर्वि० : तुझे कल्याण असो ! ( खाली बसून ) श्रेष्ठ चारुदत्ताला तुला विनंती आहे कीं आमचा वाडा जुना होऊन मोडकळीला आला आहे . तेव्हां हे दागिने सांभाळणॆ कठीण पडतें , म्हणून एवढे तूंच सांभाळ .
( मदनिकेच्या हाती गांठोडी देऊन जाऊ लागतो. )
वसंत० : भटजीबुवा , जरा थांबून माझा उलट निरोप त्या श्रेष्ठ चारुदत्ताला जाऊन कळवा .
शर्वि० : ( मनांत ) आतां तिकडें जाणार तरी कोण लेक ? ( उघड ) कोणता निरोप घेऊन जाऊं ?
वसंत० : ही मदनिका आपण न्यावी .
शर्वि० : म्हणजे ? यातला अभिप्राय मला नाही समजला.
वसंत० : तुम्हालां नाहीं पण मला समजला .
शर्वि० : तो कोणता ?
वसंत० : श्रेष्ठ चारुदत्तानें मला सांगितलें आहे कीं , जो मनुष्य हे अलंकार आणून देईल त्याला तूं आपली मदनिका द्यावी.
शर्वि० : ( मनांत ) हिनें ओळखलें रे ओळखलें ! ( उघड ) चारुद्त्त .
धन्य आहे तुझी.
वसंत० : अरे गाडी जोडून आणा रे . गडे मदनिके, -
पद -- ( चाल - प्रियकर माझे भ्राते )
या विप्राच्या करीं तुला मीं आज गडे दिधलें ॥
जाई तयासह नेत्र असें कां अश्रुजलें भरले ? ॥
भेट मला तूं एकवार गे मन हें गहिवरलें ॥
स्मरण असूं दे सखये, माझें अधिक न मी बोलें ॥१॥
मद० : ताईसाहेब --
येतें आतां प्रेम असावें पूर्वीपरि अपुलें ॥
गरिब दासि मी या पायांची स्नेहा अंतरलें ॥
कधीं बोलता विनोदात हो जरि चुकलें असलें ।
क्षमा करावी हीच विनंती मान्य करा झालें ॥२॥
( रडत रडत पायां पडतें )
वसंत० : या भटजीबोवांनी तुझा स्वीकार केला , तेव्हा आतां मीच तुझ्या पाया पडतें . ऊठ , जा बरें .
शर्वि० : वसंतसेने. तुझें कल्याण असो ! ( जाऊं लागतात . )
( पड्द्यात शब्द होतो. )
" कोण आहे रे येथें ? कोतवालाची अशी आज्ञा आहे की , आर्यक नावाचा गोपालपुत्र राजा होणार असें कोणी सिध्दाने भविष्य केल्यावरुन , पालकराजानें त्याला बंदींत टाकले आहे , तरी सर्वांनी सावधगिरीनें रहावें ! "
शर्वि० : काय ! पालकराजानें माझा मित्र आर्यक बध्द करुन नेला काय ! काय करावें आतां ! इकडे प्रियेचा मोह सोडवत नाहीं आणि तिकडे मित्राचा स्नेह तोडवत नाही. दोन्हीकडून संकट !
साकी
स्नेही वनिता दोन्ही प्रिय बहू या लोकीं मनुजाला
प्रिय मित्राचि तो शतवनिताधिक परि या काळीं भजला ॥
योग्य असे  त्यातें ॥ जावें मुक्त करायातें ॥१॥   
( जातो.चेटी येते. )
चेटी० : ( वसंतसेनेस ) ताईसाहेब ! चारुदत्ताकडून कोणी ब्राह्मण आला आहे .
वसंत० : आज हा सुदिनच उगवला म्हणायचा ! जा ; त्याला आंत घेऊन ये.
( बाहेरुन जाऊन मैत्रेयाला घेऊन येते. )
चेटी : भटजीबोवा , या असे.
मैत्रे० : अहोहो ! काय भाग्य या वसंतसेनेचे ! घीवर , साखरफेण्या ,मोतीचूर , जिलब्या , केशरीभात , खमंग वडे , घारगे, मोदक , श्रीखंड इत्यादि पक्वान्नांचे ढीगच्या ढीग पडले आहेत हे ! पण व्यर्थ . मला कोणी असें म्हणेना
कीं , " भटजी या आणि एखादा मोदक नाहीतर एखादी जिलबी खाऊन थोडेसे पाणी प्या. " नाही, पण हिचें सुख स्वर्गातल्या अप्सरांनादेखील मिळत नसेल ! सात, चौक ओलांडून आलों , पण इंद्रलोक, चंद्र्लोक अशा सप्तलोकांतूनच आलो असे वाटतें . काय हें वैभव ! केवढी ही श्रीमंती ! आपले डोळे तर अगदी दिपून गेले !
वसंत० : यावें मैत्रेयभटजी , या आसनावर बसावें .
मैत्रे० : ( बसून ) तूंहि बैस.
वसंत० : आर्या, श्रेष्ठ चारुदत्त खुशाल आहे ना ?
मैत्रे० : हो हो , खुशाल आहे.
वसंत० :
पद -- ( चाल - लावणीची )
शाखा सदगुण जया पालवी विनयाची साजिरी ॥
विश्वासाची मुळें, दयेची छाया पड्ली खरी ॥
निजाचरा हें प्रकांड कुसुमें चारित्र्याचीं बरीं ॥
उपकारादर फळें मधूर तीं सर्वहि काळी धरी ॥
ऐसा सज्जनरुपविटप हो मिळतां त्याच्या वरी ॥
सुह्नत्पक्षिगण वास सदा तो आनंदानें करी ॥१॥
मैत्रे० : ( मनांत ) या दुष्ट गणिकेनें खरां प्रकार ताडला वाटतें ! ( उघड ) हो, यांत काय संशय ! तूं म्हणतेस तसेंच आहे.
वसंत० : बरें भटजी , आज इकडे कशाकरितां येणॆ केलेतं ?
मैत्रे० : श्रेष्ठ चारुदत्ताची तुला हात जोडून अशी विनंती आहे -  
वसंत० : ( हात जोडून ) त्यांची काय आज्ञा आहे ?
मैत्रे० : ही कीं , तूं जे सुवर्णालंकार विश्वासाने माझ्यापाशी ठेविलेस , ते माझेच असें समजून मीं द्युतांत गमावले आणि ज्या द्युतकारानें ते जिंकून घेतले , तो राजाचा अपराधी असून प्रस्तूत कोठे आहे हे समजत नाही.
वसंत० : ( मनांत ) काय , चोराने नेले असून द्युतांत घालविले म्हणतो ?
चारुदत्ता , या तुझ्या गुणावर प्राण ओवाळून टाकावे असे वाटते.
( उघड ) बरें पुढें ?
मैत्रे० : म्हणून त्याच्या मोबदला ही रत्नमाला आपण घ्यावी.
वसंत० : ( मनांत ) ते अलंकार याला दाखवू का ? पण नको . पुढे काय म्हणतो तें तर ऐकूं .
मैत्रे० : कां ? ही रत्नमाला कां घेत नाहीस ?
वसंत० : आर्या, त्या सज्जनानें पाठविलेली रत्नमाला मी कशी घेणार नाही बरें ? आणा इकडे. ( मनांत ) काय आश्चर्य हें ! फुलांचा भर गेला तरी सहकारतरुपासून मकरंदबिंदू पडतातच. ( उघड ) मैत्रेया ,त्या द्युतकाराला माझा निरोप सांग कीं , मीहि संध्याकाळी आपल्या दर्शनाला येणार आहे.
मैत्रे० : ( मनांत ) ही त्याच्याकडे जाऊन आणखी काही मागणार आहे.
वाटतें ( उघड ) मी सांगेन त्याला ... ( एकीकडे ) की , गणिकेच्या प्रसंगापासून दूर रहा म्हणून ( जातो . )
वसंत० : अगे चेटी  , ही रत्नमाला घे आणि चल माझ्याबरोबर चारुदत्ताकडे.
चेटी० : पण ताईसाहेब , हें पहा , आभाळ भरुन आले आहे. ही जायची
वेळ नव्हे.
वसंत० :
ठुंबरी -- ( चाल -- व्यर्थ अम्ही अबला )
रमवाया जाऊं ॥ प्रियासी ॥ रमवाया जाऊं ॥धृ०॥
मेघ असो कीं रात्र असो ही ॥ पर्जन्याची वृष्टी पडो ही ॥
भीति तयाची मजला नाहीं ॥ विघ्न कांहिं येऊं ॥१॥  

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP