( रस्ता - भिक्षु येतो. )
भिक्षु० : हे सर्व लोक आज्ञानांधकरांत केवळ बुडून गेले आहेत. -
पद -- ( चाल -- कालंगडा. दीप )
मूढ हो मनीं उमजा ॥ या जगिं धर्मचि धन समजा ॥धृ०॥
पंचेंद्रिय खल तस्कर यातें ॥ नित्यचि टपती चोरायाते ॥
म्हणूनि करा हो ध्यानरवातें ॥ रात्रंदिन न निजा ॥१॥
-- मी या मूढ लोकांचा मार्ग सोडून देऊन कसा चटकन सुखी झालों !
तो प्रपंच नको आणि त्या विवंचनाहि नकोत . बरें , आतां या उद्यानांत जाऊन एवढी छाटी धुऊन द्यावी. ( पाहून ) अरें , हा कोण ? श्रेष्ठ चारुदत्त वाटतें , हो आणि तो दुसरा ? त्याचा मित्र मैत्रेय . बरें , ज्यानें आपलें मस्तक चारुदत्ताच्या पायावर ठेविले आहे व ज्याच्याजवळ एक तुटलेली बिडी पडली आहे तो कोण ? ( न्याहाळून ) अरे हा गोपाळपुत्र आर्यक असावा. यालाच धरण्याकरितां पालक राजानें नुकतीच दवंडी पिटविली होती. होय, तोच हा. याला श्रेष्ठ चारुदत्तानें गुप्तपणे साहाय्य केलें वाटतें . शाबास चारुदत्ता ! तूं खरा उदार पुरुष आहेस. असो ; या वेळी याच्या दृष्टीस पड्णें उचित नाही; तर आपण राजशलाकाच्या
उद्यानांत जावें .
( जाऊं लागतो व चालतां चालतां )
पद -- ( चाल -- कैसा जोग कमाया बे . )
तो नर दु:खमुक्त झाला ॥ तयाच्या करीं स्वर्ग आला ॥धृ०॥
ज्यानें जिंकुनि पंचेंद्रियेगण , मोहनासही केला ॥
अहीकार चांडाळ जयानें , नष्ट्दशेला नेला ॥१॥
-अरे , हेच ते उद्यान -- ( आतां जातां जातां ) -
पद -- ( चाल - जातां पंढरिला पंढरिला. )
आधीं मन मुंडा ॥ व्यर्थ मुंडितां मुंडा ॥धृ०॥
मुंड मुंडिलें तुंड मुंडिलें , परंतु ज्यानें लोभें ॥
नाही मुंडिले , चित्त आपुलें , काय तयाला लाभे ॥१॥
( पडद्यात शब्द होतो. )
" कोण आहे रे तो ? गोसावडा रे गोसावडा ! अरे दुष्टा गोसावड्या , उभा रहा थांब. "
भिक्षु : अरे हा राजशालक संस्थानक मला धरतो की काय कोण जाणें . एका भिक्षुने याचा अपमान केला होता, म्हणून जो भिक्षु भेटेल , त्याच्या नाकात वेसण घालून हा त्याला हिंडवितो. मी तर निरश्रित आहे , शरण कुणाला जाऊं ! आतां बुध्दा , तूंच माझं रक्षण कर.
( शकार व विट येतात )
शका० : अरे दुष्टा गोसावड्या ,थांब , उभा रहा. मद्यप्राशनसमयी खाण्या करितां जसा तांबड्या मुळ्याचा बुडाखा तोडतात तसा तुझा मी गळा तोडतो बघ . ( त्याला मारु लागतो. )
विट : अरे काणेलीपुत्रा , प्रपंचाला त्रासून ज्यानें भगवी वस्त्रें धारण केली , त्याला ताडण करणे बरोबर नाही. दे सोडून त्याला. हा पहा या बागेत काय चमत्कार आहे तो --
साकी
शरणप्रद हे तरु अनाथ सौख्यद वडिलांसम कीं ॥
नगरा सोडुनि वनीं उभे तरि उपकारक हे लोकीं ॥
सत्यचि जाणावे ॥ यांना साधुचि मानावें ॥१॥
भिक्षु : हे उपासका , माझ्यावर कृपा कर.
शका० : पहा रे विटा, हा गोसावडा माझी निंदा करितो.
विट : काय म्हणतो तो ?
शका० : मला उपासक म्हणतो, तर मी काय न्हावी आहें वाटतें ?
विट : अरे , अरे हा तुझी स्तुती करितो - निंदा नव्हें ही .
शका० : मग चिंता नाहीं. अरे श्रमणका , ऐक.
भिक्षु : तूं धन्य आहेस ,तूं पुण्य आहेस.
शका० : पहा रे विटा हा गोसावडा मला ’ तूं धन्य आहेस . ’ तूं पुण्य आहेस ’ असें म्हणतो. तर मी श्रावक आहे की कोष्टी आहे ?
विट : मित्रा , हीसुध्दां स्तुतिच - निंदा नव्हें .
शका० : खरोखरच निंदा नव्हें ना ? स्तुति करुं दे हवी तेवढी ,स्तुतीला मी पात्रच आहे. पण हा येथे कशाला आला आहे ?
भिक्षु : मी आपली छाटी धुण्याकरिता येथे आलो आहे.
शका० : अरे दुष्टा श्रमणका , सर्व उद्यानांमध्यें श्रेष्ठ असें हे पुष्पकरंडक नामक जीर्णोद्यान माझ्या मेव्हण्यानं मला दिलें . आहे . ज्यांत कोल्ही - कुत्री खुशालपाणी पितात, पण मी वरपुरुष ज्यांत कधी स्नान सुध्दां करीत नाहीं , त्यां पुष्पकरणीत तूं ही आपली कुळथाच्या पाण्यांत बुडविल्यासारखी ओंगळ ,घाणेरडी भगवीं लक्तरें धुतोस काय ? तर तुला आणखी मारतो.
विट : मला वाटतें हा नवा संन्यासी आहे - घटलेला नाही.
भिक्षु : उपासका ,तुझा तर्क खरा आहे ; मी नुकताच संन्यासी झालों .
शका० : तूं जन्मापासून कां रे संन्यासी नाहीं झालास ? अरे चोरा !
( मारतो. )
भिक्षु : ( मार सोसून ) नमो बुध्दाय , नमो बुध्दाय !
विट : या गरिबाला मारुन तुला काय लाभ होणार आहे ?
शका० : अरे गोसावड्या , मी विचार करतो तोपर्यंत उभा रहा.
विट : विचार कोणाबरोबर करतोस ?
शका० : आपल्या मनाबरोबर.
विट : बरें कर. ( मनांत ) हा संन्यासी अजून पळून जात नाहीं, तेव्हां हा मूर्ख आहे !
शका० : ( आपल्याशी ) हे पुत्रका मना , या संन्याशानें जावें कीं रहावें ? किंवा जाऊ नये आणि राहूंहि नये ? ( विटास ) हां ! केला मीं विचार . माझे शहाणे मन मला हळूच सांगतें कीं , यानें जाऊं नये, राहूं नये, उच्छवास टाकू नये , निश्वास टाकूं नये, येथेचं पडून लवकर मरावें .
भिक्षु : नमो बुध्दाय ! ,मी शरण आहे.
विट : जाऊं दे त्याला.
शका० : बरें जायचे तर कांही संकेताने जावे.
विट : कोणता संकेत ?
शका० : संकेत हा कीं , यानें पाण्यातं चिखल टाकावा , पण पाणी गढूळ होऊं नये. हें त्याला कठिण वाटत असेल तर पाण्याचा ढीग करुन त्यावर चिखलाचा गोळा ठेवावा आणि मग जावें .
विट : ( मनांशी ) काय मूर्खपणा आहे हा !
साकी
दुश्चरिताश्रय खरे चालते पुत्रचि पाषाणाचे ॥
मनुष्याला लाजविणारे वृक्षचि कीं मांसाचे ॥
ऐसे मूर्खशिरोमणि असती ॥
जन्मा आले भूवरतीं ॥ भारचि होती ॥ जननिस कष्टविती ॥१॥
भिक्षु : ( शकारास शाप देतो. )
शका० : मित्रा विटा , हा काय म्हणतो रे ?
विट : हा तुझी मोठी स्तुति करितो .
शका० : स्तुतिच करतो ना ! मग चिंता नाही . जारे , जा आतां .
भिक्षु : ( चरफडत निघून जातो. )
शका० : विटा हा पहा रे पुन: --
विट : जाऊं दे रे ! हे वृक्ष पहा आपल्या लतातरु स्त्रियांबरोबर कसे आनंदाने डुलत आहेत .
शका० : खरें रे खरें ; आणि हे वानर पहा कसे फणसासारखे लोंबताहेत !
विट : मित्रा , या सुंदर शिलातलावर बैस तरी .
शका० : हा पहा मी बसलों , तूं पण बैस . ( बसतात. ) मित्रा , अजून पहा वसंतसेनेची मला वारंवार आठवण होते.
विट : ( आपल्याशीं ) तिनें याची इतकी निर्भत्सना केली तरी हा तिचेंच चिंतन करितो. अथवा हेंहि योग्यच आहे, कारण --
अंजनीगीत
स्त्री जरी अवमानी नीचाला ॥ कामज्वर ये अधिकचि त्याला ॥
सुजनीं पावे परि शमनाला ॥ नष्टचि बा होई ॥१॥
शका : काय रे विटा , लवकर ये म्हणून स्थावरक चेटास सांगितले असून तो अजून कां बरें आला नाही ? मला तर भूक फार लागली आहे. पायांनी जाववत नाहीं . हा सूर्य पाहा , एखाद्या चिडलेल्या तांबड्या तोंडाचा माकडा-सारखा दिसतो आहे. अगदीं पाहवत नाहीं याच्याकडे.
पद -- ( चाल -- बाळा जो जो रे )
चारा सोडुनिया , गोकुळ हें तरुतलिं बसल पाहे ॥धृ०॥
तृषतचि मृगपंक्ति , बघ पीती, रविकरतप्तजलें कीं ॥
तपनाची भीती , बहु चित्तीं , मार्गी कोणी न फिरती ॥
यास्तव वाहन तें , मज वाटे , येतां मार्गी राहे ॥१॥
शका० : पण स्थावरक चेट अजून कां येत नाहीं रें ? बरें तो येईपर्यंत मी थोडेसे छानदार गातो. गाऊं ना ? ( गाऊन ) मित्रा . कसा गायलो रे मी ?
विट : तें काय विचारावें ? आपण केवळ गंधर्वच आहां .
शका० : अरे , मी गंधर्व कसा नसेन ? पहा --
ओवी
हिंगू जीरक भद्रमुक्ता । सगुडा शुंठी वचा सुहिता ॥
ती म्यां सेविली गंधयुक्ता । गंधर्व मग मी कसा नव्हे ? ॥
इतकेच करुन नाही गायला येत ! आणखी काय केलें , सांगूं का ?
हिंग मिर्यांचा लावुनि सुवास ॥ घृतपाचित करुनि त्यास ॥
भक्षिलें म्यां कोकिलांचे मांस कोकिळस्वर मी - कसा नव्हे ? ॥२॥
-- अरे , पण तो चेट कां येत नाहीं ?
विट : आतां लवकरच येईल.
( गाडीचा आवाज होतो. चेट व वसंतसेना येतात. )
चेट : माझ्या पोटांत धाक पड्ला आहे, दिवस वर डोईवर आला , आतां धनी काय म्हणतील कोण जाणे ! झ्यां झ्यां , बाळ्या बाळ्या !
वसंत० : अगे बाई हा वर्धमानकाचा शब्द नव्हे ! चारुदत्तानें दुसरा गाडीवान पाठविला कीं काय कोण जाणे . ( दुश्चिन्ह झालेसें दाखवून ) देवा ! --
पद -- ( चाल-- मना तळमळसी )
शून्य कां भासे , चहुंकडे शून्य कां भासे ॥
कांपतें ह्र्दय कां असें , गति न भली दिस ॥धृ०॥
स्फुरतो कां हा नयन कळेना ॥
भीति मनींची केविं गळेना ॥
अवघें विपरीत असे ॥१॥
शका० : मित्रा विटा , गाडी आलीसें वाटतें .
विट : कशावरुन तुला समजलें ?
शका० : हा पहा म्हतार्या डुकरासारखा चाकांचा घरघर शब्द होत आहे.
( चेट येतोस त्यास पाहून ) पुत्रका , स्थावरका चेटा, आलास ? बरें झालें .
चेट : आलो महाराज.
शका० : गाडी आली ?
चेट : आली महाराज.
शका० : बैल आले ?
चेट : आले धनीसाहेब .
शका० : बरें , तूंहि आलास ?
चेट : हा मी महाराज आपल्यापुढचं उभा आहें .
शका० : बरें तर आण गाडी आंत .
चेट : कोणत्यां वाटेंने आणूं ?
शका० : ह्या पडक्या भिंताडावरुन आण.
चेट : त्या वाटेंने आणली तर गाडी मोडेल , बैल मरतील आणि मीहि मरेन महाराज.
शका० : बरें मग ? मी राजाच्या मेव्हणा आहें, मला काय कमी आहे ? गाडी मोडली तर दुसरी करीन; बैल मेले तर दुसरे घेईन आणि तूं मेलास तर दुसरा गाडीवान ठेवीन.
चेट : महाराज , तुमचें सगळें ठीक आहे, पण मी गरीब विनाकारण प्राणाला मुकेन त्याचें काय ?
शका० : कांही चिंता नाही ; त्या पडक्या भिंताडावरुन गाडी आणली पाहिजे बस्स !
चेट : पण महाराज --
शका० : बस्स , बोलूं नकोस , लवकर आण.
चेट : बरें महाराज . चला रे बाबांनो , ( संभाळून आणून ) ही आली
महाराज गाडी .
शका० : काय रे रांडलेका , तूं मेला नाहीस आणि बैलहि मेले नाहीत ?
चेट : आपल्या पायांच्या पुण्याईनें वाचलों महाराज.
शका० : मित्रा चल आपण गाडीत बसू. तूं माझा गुरु,तूं माझा शिक्षक , तूं माझा मित्र , ,म्हणून तूंच आधी बैस.
विट : बरें मी बसतो. ( बसू लागतो. )
शका० : अरे , थांब थांब ; ही गाडी तुझी म्हणून तूं आधी बसतोस वाटते ? गाडीचा धनी मी आहे , तेव्हां मी बसणार आधीं . चल हो बाजूला.
विट : आपणच मला बैस म्हणून सांगितलें आणि आतां आपणच असें म्हणतां ?
शका० : मी तसे म्हटले म्हणून ? ’ महाराज , आपणच आधी बसावें ’ असें म्हणावे कीं नाही तूं ?
विट : बरें , आपण् बसा आधीं .
शका० : हा फिरवी रे गाडी .
चेट : ( गाडी फिरवून ) चढावें महाराज.
शका० : ( गाडीजवळ जाऊन , पाहून , भिऊन , विटाच्या गळ्याला मिठी मारतो . ) अरे मी मेलो रे मेलों ! गाडीत कोणी राक्षसी बसली आहे , किंवा कोणी चोर बसला आहे. राक्षसी असली तर आम्हांला चोरुन नेईल, आणि चोर असला तर खाऊन टाकील ! आतां कसें करावें बरें ?
विट : मित्रा , भिऊं नकोस . दुपारच्या उन्हानें तुझी दृष्टी दिपली म्हणून तुला असें दिसतें , चेटाची सावली ती.
शका० : पुत्रका चेटा , जिवंत आहेस ना बाबा ?
चेट : होय महाराज.
शका० : मित्रा विटा , गाडींत कोणी स्त्री बसली आहे . तूं बघ बरें .
विट : चल पाहूं .
वसंत० : ( विस्मय पावून ) अरे प्रारब्धा ! हा माझ्या नेत्रांना त्रास देणारा राजशालक आला ! आतां माझे प्राण राहतात कीं नाहीं कोण जाणें . माझ्रें येथे येणे निष्फळ झालेसे वाटतें .
विट : ( वसंतसेनेस पाहून आपल्याशी ) अरे अरे ! फार वाईट गोष्ट झाली ! --
पद -- ( चाल -- लावणीची. )
वसंतसेना हरिणीसम या व्याघ्रकरीं सांपडली ॥
वाटे दुर्दैव ही अबला मृत्युमुखांतचि दिधली ॥१॥
चंद्र्धवल जो मृदुपुलिनावरि करि आनंदें केली ॥
त्या हंसा सोडूनि ही हंसी काका कां अनुसरली ॥२॥
-- वसंतसेने , काय केलेस हें ?
नेतां पूर्वी आर्जवूनि तुज अवगणना कां केली ॥
परि धनलोभें आलिस आतां बुध्दी कशी गे चळली ॥३॥
वसंत० : नाहीं - नाही, मी त्याच्यावर अनुरक्त होऊन आलें असें नाही. गाडीची अदलाबदल झाल्यामुळें चुकून इकडे आलें आहे. मी तुला शरण आहे. आतां तूंच माझें रक्षण कर.
विट : भिऊं नकोस. ( मनांत ) येथे आतां ठकविद्या लढविली पाहिजे. ( शकाराजवळ येऊन ) खरेंच रे मित्रा , गाडीत कोणी राक्षसी बसली आहे.
शका० : राक्षसी आहे म्हणतोस , मग तिनें तुला कसें रे नाही खाल्लें ?
विट : अशी भलतीच कल्पना करण्यात काही अर्थ नाही. तर चल , आपण या दाट झाडीच्या सावलीतून चालत जाऊं .
शका० : चालत गेल्याने काय होईल ?
विट : असें केल्याने आपल्याला व्यायाम होईल आणि बैलांना विसावां सापडेल.
शका० : बरें तर तसेच करुं , येथें काय ! चेटा , गाडी घेऊन जा , आम्ही पायांनीच येतों -- पण नाहीं नाहीं , गाडीतच बसून गेले पाहिजे. कारण मी गाडीत बसून चाललो म्हणजे लोक म्हणतील कीं , ही राजशालक संस्थानकाची स्वारी आली आहे.
विट : ( मनांत ) आतां कोणता उपाय करावा बरें ? विषाचें अमृत करायच म्हणजे मोठें कठीण . असो. आतां काय होईल ते होवो. खरें सांगावे हें बरें .
( उघड ) मित्रा , गाडीत राक्षसी आहे म्हणून जें सांगितले तें थट्टेने सांगितले. ही वसंतसेना गाडीत बसून तुझ्याशी रमण्याकरितां आली आहे.
वसंत० : इडापिडा टळो , अमंगळ पळो ; हा काय भलतेच बोलला हें !
शका० : ( आनंदाने ) हां ! मी वीरपुरुष , मनुष्यवासुदेव , म्हणून मला भेटण्याकरितां आली होय ? मित्रा, मीं पूर्वी तिला कोप आणला होतां पण तिला आतां सुप्रसन्न करितो बरें का.
विट : बरें , कर.
शका० : हा मी तिच्या पायां पडतो. ( जवळ जाऊन ) हे अंबिके देवी, मी तुझा दास विनंती करितो ,ऐक . हे सुंदरी,मी तुझ्या पायांवर मस्तक ठेवितों , तुला हात जोड्तों , मी पूर्वी केलेल्या अपराधांची तूं मला क्षमा कर .
( पाया पडूं लागतो. )
वसंत० : चल , दुर हो मूर्खा, काय बोलतोस हें ! ( पायाने लोटून देतें ).
शका० : ( क्रोधाने ) काय गे दांडगे ! --
श्लोक
जें अंबांनी प्रीतिनें चुंबियेलें ॥ देवालाहि जें नसें नम्र झालें ॥
तें पायांनी ताडिलें उत्तमांग ॥ जैसे रानीं दु:श्रृगालें मृगांग ॥१॥
--काय रें चेटा , ही तुला कोठें सापड्ली रे ?
चेट : माझा तर्क असा वाहतो कीं , गावातल्या ओझ्याच्या गाड्यांनी जेव्हां रस्त्यात दाटी झाली तेव्हां चारुदत्ताच्या बागेच्या दाराजवळ मी आपली गाडी अम्मळ उभी केली होती. तेव्हां ही बाई आपलीच गाडी समजून आंत केव्हां बसली हे काहीं मला समजले नाही. मी तसाच गाडी घेऊन आलो.
शका० : तर मग गाडीची अदलाबदल झाल्यामुळे ही इकडे आली ; माझ्याशीं रमण्याकरितां काही आली नाही ! अगे , हे गर्भदासी , उतर , उतर माझ्या गाडीतून. त्या भिकारड्या चारुदत्ताला अनुरक्त होऊन माझे बैल खराब करतेस काय ?
वसंत० : ( मनाशीं ) चारुदत्ताला अनुरक्त झालें हे ह्याच्या तोंडचे शब्द माझ्या कानाला फार गोड लागले . आतां पुढें काय होईल तें होवो !
शका० : उतरतेस कीं वेणी धरुन ओढूं खालीं ?
विट : छे - छे ! मित्रा, असे करु नकोस , मी तिला उतरवितो. ( जवळ जाऊन ) वसंतसेने , उतर बरें .
वसंत० : ( उतरुन ) आतां काय गति होईल कोण जाणें !
शका० : ( आपल्याशी ) मागे हिनें माझा अपमान केला होता, त्यामुळें जो कोपाग्नि धुमसत होता तो आज हिच्या लाथेनें पेटला आहे. तर हिला ठार मारल्यावांचून काही तो शांत होणार नाही. ( उघड ) अरे विटा --
जरी इच्छिसी लांब आणि विशाल ॥
गुलानार बारीक ऐशी दुशाला ॥
जरी पाहिजे मांसहि खावयाला ॥
कुचकूच कूच्चू कुचू चावयाला ॥१॥
विट : तर काय म्हणतोस ?
शका० : माझे एक काम कर.
विट : करीन ; पण अकार्य नाही करणार.
शका० : अरे , अकार्य तर नाहीच आणि त्या राक्षसीचेंहि भय नाही.
विट : तर मग सांग काय तें .
शका० : दुसरें काही नाहीं , वसंतसेनेला मारुन टाक .
विट : शिव - शिव ! काय बोलतोस हें --
पद -- ( चाल - असतें जरि तें अन्य रत्न बाला. )
अबला स्त्री ही केवल बाला, भूषण नगरीचें ॥
वेश्या परि कुलयोषेसम आचरण लीनतेचें ॥
लवहि हिचा अपराध नसोनी वधिन जरी मी अंगें ॥
परलोकनदी तरुनि जावया नाव कोणती सांगें ॥१॥
शका० : अरे ,ती नाव मी देईन तुला ; आणि हे बघ,या बागेच्या एका कोपर्यात जर तिला मारुन पुरुन टाकलीस, तर तुला कोण पहायला आले आहे ? भित्राच आहेस तूं !
विट : कोणी मनुष्य पाहात नसलें तरी दुसरे आहेत --
साकी
दाहि दिशा वनदेवी हिमकर दीत्पकिरण भास्कर कीं ॥
मारुत आत्मा गगन तसें हें , दुष्कृत सत्कृत लोकीं ॥
असतां साक्षी हे ॥ दुष्कर्मी नच वाहे ॥१॥
शका० : अरे , हिच्या अंगावर वस्त्रांचे झांकण घालून भार .
विट : महा अधम आहेस तूं !
शका० : ( मनांत ) हा म्हातारडा कोल्हा अर्धमाभीरु आहे , तर आतां चेटाला अनुकूल करुन घ्यावें . ( उघड ) पुत्रका चेटा, मी तुला सोन्याची कडी देईन.
चेट : तुम्ही दिली तर मी हातांत घालीन .
शका० : तुझी बैठक किनखापाची करीन.
चेट : मग मी त्यावर बसेन.
शका० : तुला सर्व चेटांचा नाईक करीन.
चेट : मग मी त्याचा धनी होईन.
शका० : तर मग मी सांगतो तसे कर .
चेट : महाराज , वाईट काम सोडून पाहिजे तें सांग , मी करीन.
शका० : वाईट तर नाहीच नाही.
चेट : तर मग सांग .
शका० : दुसरे काही नाही , या वसंतसेनेला मारुन टाक.
चेट : कृपा करा महाराज! गाडीची अदलाबदल झाल्यामुळे ही बिचारी चुकून येथे आली , तर तिला मी मारणार नाही.
शका० : तूं माझे ऐकत नाहीस ? बघ सांभाळ ! ( त्याला लाथाबुक्क्यानी मारु लागतो. )
चेट : तुम्ही मला मारा, काय पाहिजे तें करा ,पण ही गोष्ट मी करणार नाही. मागच्या जन्मी काय पाप केले होते म्हणून या जन्मी तुमची चाकरी करुन पोट भरतो. तेव्हां या जन्मी पाप करुन पुढ्ची तयारी करुन ठेवीत नाही.
वसंत० : मी शरण आहे , माझे रक्षण करा.
विट : मित्रा, त्या गरिबाला कां मारतोस ? ( मनांत ) हा चाकर असून याची योग्यता केवढी आहे ! शाबास ! एकूण , दैव विचित्र खरें . हा बिचारा सदगुणी असून चाकर झाला, आणि हा महानीच नरपशु धनी झाला.
शका० : ( मनांत ) हे दोघेहि भित्रे आहेत. याच्या हातून हें काम होण्यासारखे नाही. स्वत: या राजशालकांनेच कंबर बांधली पाहिजे . मला कोणाचीच भीति वाटत नाही. ( उघड ) चेटा, तूं जा येथून . वसंतसेने, तूं जा सावलीत बैस जा.
चेट : ( वसंत सेनेजवळ येऊन ) बाई माझे सामर्थ्य ,माझे पुण्य ,काय तें इतकेच. ( जातो. )
शका० : वसंतसेने, चल ये आतां इकडे मी तुला मारणार आहे.
विट : मूर्खा , चल हो एकीकडे . माझ्या समक्ष तूं हिला मारशील काय ?
( जोरानें ढकलून देतो . )
शका० : ( उठतां उठतां ) अरे विटा , मी प्रत्यक्ष राजशालक ! तुला आजपर्यंत हवे तें खायला घातलें , तूपसाखरेचा रतीब लाविला आणि आज तुला काम सांगितले म्हणून मला मारतोस काय ? ( मनाशीं विचार करीत ) हां , आतां मला युक्ति सुचली. ह्या कोल्ह्याने मान हालवून त्या चेटाला काही खूण केली आहे. तर याला दुसरीकडे पाठवून द्यावें आणि मग वसंतसेनेला मारुन टाकावें . ( उघड ) मित्रा विटा , वसंतसेनेला मारुन टाक असें जे म्हटले तें खरें नव्हें ; अरे थट्टा ती ! पत्रावळीएवढ्या विस्तीर्ण कुळांत माझा अवतार
असून मी असें हलके काम करीन ? तिनें भय पावून मला वश व्हावें म्हणून मी तें ढोंग केले.
विट : तर मग आतां म्हणतोस काय ?
शका० : तूं जवळ आहेस म्हणून ही लाजते, मला वश होत नाही ; यासाठी तूं जा आणि मी मारलें म्हणून तो चेट पळून जात आहे त्याला धरुन आण.
विट : ( आपल्याशीं ) असेसुध्दां असेल , कारण एकांताशिवाय मन्मथ संचरत नाही. ( उघड ) बरें तर , मित्रा , मी जातो.
वसंत० : मी शरण आले असून मला सोडून कसे चालला ?
विट : तू अगदी भिऊ नकोस , स्वस्थ ऐस . मित्रा ,ही वसंतसेना माझी ठेव म्हणून तुझ्यापाशी असू दे . मी आल्यावर मला परत दे.
शका० : त्याला काही चिंता नाही. ठेवीप्रमाणे हिला अगदी सुरक्षित ठेवितो म्हणजे झाले ना ?
विट : खरें ना ?
शका० : अगदी खरें ! मी खोटें सांगेन कसें ?
विट : बरें ; ( काहीसां दुर जाऊन ) अथवा मी गेलो तर हा घातकी हिचा वध करील. यासाठीं येथे आड उभे राहून याचा बेत काय आहे तो पाहू.
( तसें करितो. )
शका० : ठीक झाले , आतां हिला मारुन टाकावे ! अथवा तो विट महाठक आहे.कोठे तरी आड उभा राहून कोल्ह्याप्रमाणे कपट करीत असेल तर त्यालाहि फसविण्याची युक्ति काढली पाहिजे. --
( काही फुले कानांत व मंदिलात खोचून हंसत हंसत )
-- हे प्रिये सुंदरी ,वसंतसेने, ये - ये ,
विट : आतां हा कामातुर झाला खरा . आपण जावें . ( जातो . )
शका० : ( आर्जव करुन ) हे सुंदरी , हें काय बरें ?--
ओव्या
देत असतां बहू कांचन ॥ बोलत असतां प्रिय वचन ॥
नम्र करितां सवेष्ट्न ॥ हें मस्तक तुजपुढें ॥१॥
तथापि तूं मजला सुदती ॥ इच्छित नाहीस गजगती ॥
सेवा करिती तयांप्रती ॥ कष्ठविति काय मनुष्यें ॥२॥
वसंत० : हा अधमा ! चांडाळा ! काय बोलतोस हें ? --
पद -- ( चाल -- थाट्माट सदनि नवा . )
दाउनि धनलोभ मला व्यर्थ भुलविशी ॥
प्राप्त होय शुध्द काय काय हा तुशीं ? ॥धृ०॥
पाहुनि कुलशील नरा आम्हि सेवितों ॥
त्यासंगे सकल काम पूर्ण मानितों ॥
सेवुनिया भ्रमरि खला आम्रविटप तो ॥
आदरि मग नीच पलश सांग ती कशी ॥१॥
शका० : अगे बट्कीचे पोरी, त्या भिकारड्या चारुद्त्ताला आम्रवृक्ष आणि मला पलश म्हणतेस काय ? अशा रीतीने मला शिव्या देतेस काय ?
वसंत० : तो निरंतर माझ्या ह्र्दयात वास करित आहे; तर त्याचें स्मरण करुं नको तर कोणाचे करुं ?
शका० : अजून तो तुझ्या ह्र्दयात आहे कां ? तर त्याला आणि तुला एकदमच मोक्ष देतो. त्या भिकारड्या चारुद्त्तावर अनुरक्त झालीस नाही कां ?रहा अशी.
वसंत० : तीच अक्षरे पुन: म्हण ; ती माझ्या कानाला फार गोड लागतात.
शका० : तोच दासीपुत्र चारुदत्त तुझे रक्षण करो !
वसंत० : तो येथे असतां तर माझे रक्षण झालेच असते.
शका० : तो असतां तर रक्षण करतां काय ? करुं दे तर , हा पहा मी तुला मारुन टाकतो. कसें रक्षण करतो तें पाहतो. तो भिकारी रक्षण करतो म्हणें !
वसंत० : ( भिऊन ) अग बाई , तूं कोठें आहेस ? हे प्राणप्रिया चारुदत्ता, मनोरथ पूर्ण न होता आज माझे प्राण जाणार ना ? आतां मी काय करुं ? मोठयाने तरी ओरडूं कां ? छे ग बाई ,तेंहि नीट दिसत नाही. कारण वसंतसेना मोठयाने ओरडतें असे लोक म्हणतील.ल आर्या चारुदत्ता ,हा मी तुला शेवटचा प्रणाम करितें .
शका० : पुन: त्याचे नाव घेतेस ? ( हातांनी गळा दाबून ) आतां कर त्या भिकार्याचे स्मरण .
वसंत० : आर्या चारुदत्ता.
शका० : मर - मर , मर आतां ! (आनंदाने ) पहा आतां माझ्या बाहूचें शौर्य कसें आहे तें ! ( मारतो व मेली असें समजून दुर होतो. ) माझे मन तुझ्यावर बसले असून तुझें माझ्यावर नाही म्हणून मी तुला मारले. आजचे माझे हे शौर्य पाहून माझ्या वाड्वडिलांना फार आनंद होईल . ओ हो ! तो कोल्हा येत आहे ; तर आतां दुर व्हावे.
( विट व चेट येतात. )
विट : हा तर पाय पसरुन वाटेंत बसला आहे, तेव्हां याने स्त्रीवध केला खचित. ईश्चर आतां कल्याण करो ! ( येऊन ) मित्रा , तूं सांगितल्याप्रमाणे चेटाला समजावून आणले.
शका० : विटा , आलास बरें झाले चेटा तूंहि आलास ?
चेट : होय महाराज.
विट : माझी ठेव मला परत दे.
शका० : कोणाती ठेव ?
विट : वसंतसेना .
शका० : अरे ती गेली .
विट : कोठें ?
शका० : ( तर्क करुन ) अशी या दिशेने गेली. बरे पण तूं कोणत्या दिशेने आलास ?
विट : मी पूर्व दिशेने आलो.
शका० : हा तर ती दक्षिण दिशेने गेली.
विट : मी दक्षिण दिशेने आलो.
शका० : तर मग ती उत्तर दिशेने गेली.
विट " अरे, असें संदिग्ध कां बोलतोस ? नीट सांग काय तें .
शका० : खरें सांगू ? मारली .
विट : अजून मला खरें वाटत नाही.
शका० : तुझ्या गळयाची शपथ , मी मारली.
विट : ( खेदाने ) खरेंच का रे मारलीस
शका० : तुझी खात्री होत नसेल तर हें पहा , या राजशालक संस्थानकांचे शूरत्व ! ( दाखवितो . )
विट : शिव शिव ! मी पापी काय पाहातो हें ! ( मूर्च्छित पड्तो. )
शका० : अरेरे ! माझा मित्र शांत झाला !
चेट : विटा , सावध हो , विचार न करितां मी हिला आणलें , तेव्हां मीच हिला मारले.
विट : ( सावध होऊन ) वसंतसेने ! तुझा असा परिणाम व्हावा काय ? --
पद -- ( बागेश्री. त्रिताल )
विलासिनी ही गेली ॥ मूर्ती रतीची काय निमाली ॥धृ०॥
सरितां कीं औदार्यजलाची ॥ होती भूषा सुभूषणांची ॥
चारुमुखी खनि सौंदर्याची ॥ विक्रयभूमिच सुरतरसाची ॥
काळामुखी कशी दैवा पडली ॥१॥
-- हा दुष्टा ! नगरींचे सौंदर्य तूं नष्ट केलेस , यांत तुला काय मिळालें ? ( मनांत ) कदाचित हा अधम आपलें दुष्कर्म माझ्यावर घालील ; तर येथून जावे हे बरें . ( उघड ) नीचा पुरे तुझी संगत ; जातो मी .
शका० : ( हात धरुन )अरे, जातोस कोठें ?
विट : सोड माझा हात.
शका० : अरे , वसंतसेनेला मारुन , मला दोष लावून , पळून जातोस काय आतां ? सांप्रत मी अनाथ आहे असें तुला वाटलें वाटतें ?
विट : तूं महा अधम आहेस .
शका० : अरे मित्रा , असें काय बरें मी तुला शंभर मोहरा देतो , गळ्यांत घालायला एक छानदार कंठी देतो. पण हा आरोप माझ्यावर न येतां दुसर्या कोणावर जाईल असें कर .
विट : चल मूर्खा .
शका० : ( ही ही करुन हंसतो ) मित्रा विटा , चल आपण तळ्यांत जाऊन क्रिडा करुं .
विट : सोड मला -
साकी
स्नेह नको मज तुझा क्षणभरी होवो रोष बरा तो ॥
अपतित असतां पतितासंगें दोष नराला येतो ॥
त्यजिलें मी तुजला ॥ जैसें विगुणा धनुषाला ॥१॥
( जाऊं लागतो. )
शका० : ( ओरडून ) अरे माझ्या पुष्पकरंड्क जीर्णोद्यानात वसंतसेनेला मारुन पळून जातोस काय ? थांब माझ्या मेव्हण्यापुढें तुझ्यावर फिर्याद करतो .
विट : आं काय ? फिर्याद करतोस ? ( तरवार उपसतो. )
शका० : ( भिऊन मागे सरुन ) अरे भ्यालास होय ? तर जा जा .
( विट जातो. )
शका० : गेला , पीडा टळली . पुत्रका चेटा , आज कसे नामी काम केले !
चेट : फार वाईट काम केलेत , महाराज !
शका० : काय वाईट काम केले असें म्हणतोस ? बरें , झाले तें झालें . आतां काय त्याचें ! ही कंठी तुला .
चेट : नको मला . ती तुम्हालाच शोभते .
शका० : बरें राहिले . तूं गाडी घेऊन जा आणि माझ्या वाड्यासमोर बोळात उभा रहा. मी इतक्यांत येतो.
चेट : जी महाराज . ( जातो. )
शका० : विट गेला तो नाहीसा झालाच . आतां चेटाला वाड्यासमोरच्या गल्लीत उभे रहायला सांगितले आहे , त्याला बिडी घालून अड्कावून टाकावें . असो . ती मेली किंवा नाही हें पाहावे . ( पाहून ) ही खचित
मेली. आतां हिला शेल्याने झाकून ठेवितो. पण नको लोक हा शेला कोणाचा हें ओळखतील . तर या हिला या वाळलेल्या पानांनी झांकून ठेवितो . ( तसे करुन ) आतां राजसभेत जाऊन , धनलोभास्तव चारुदत्ताने वसंतसेनेस माझ्या पुष्पकरंड्क जीर्णोद्यानात ठार मारले अशी फिर्याद करितो. ही युक्ती फार चांगली आहे. ( पुढें पाहून ) अरे पण मी ज्या वाटेने
जाणार त्याच वाटेने हा गोसावडा येत आहे. वसंतसेनेला मी मारले म्हणून सांगेल. तर आपण या पडक्या भिंताडावरुन जावे. ( जातो. )
( संवाहक भिक्षु येतो. )
भिक्षु : ही आपली छाटी तळयांत धुतली , आतां झाडाच्या खांदीवर घालून वाळवितो . पण येथे वानरांचा उपद्रव फार आहे , तेव्हां ती धुरळ्यांत पड्ली तर वाळवावी . ( तसे करुन खाली बसून ) उगीच काय बसावें ? धर्माक्षराचा तरी पाठ करावा.
जो जिकुंनि पांच जणांसी ॥ टाकी मारुनियां ममतेसी ॥धृ०॥
नाशि अहंता जो यत्नानें ॥ स्वर्ग लाभे निश्चित त्यासी ॥१॥
--अथवा जोपर्यत बुध्दोपासिक जी वसंतसेना तिचा उपकार माझ्याकडून फिटला नाही तोपर्यंत मला स्वर्ग नको . तिनें दहा मोहोरा देऊन त्या द्युतकारापासून मला सोडविलें , त्या दिवसापासून तिनें मला विकत घेतले असें मी समजतो. ( पुढे सरुन ) अरे, या पानांत हालतें आहे काय ? सुस्कारा कोण टाकतें आहे ?
( वसंतसेना सावध होत असतां तिचा एक हात बाहेर दिसतो. )
भिक्षु : वाहवा ! काय चमत्कार हा ! उत्तम अलंकारांनी भूषित असा हा हात कोणाचा असावा बरें ? अथवा विचार कशाला पाहिजे ? ज्याने मला अभय दिले तोच हा हात. असो . नीट पहावें ( पाने सारुन पाहून ) अरे , हीच ती बुध्दोपासिका वसंतसेना ! पण हिची अशी दशा कां झाली ?
वसंत० : ( खोल शब्दानें ) मला थोडें पाणी ...
भिक्षु० : काय , ही पाणी मागते ? पण येथून बावडी फार दूर आहे . असो . माझी छाटी ओली आहे हीच हिच्या अंगावर घालतो.
( वसंतसेना उठून बसते, भिक्षु वारा घालतो . )
भिक्षु : आतां पाणी आणून देऊं काय ?
वसंत० : आर्या, तूं कोण आहेस ?
भिक्षु : उपासिके , तूं मला ओळखिले नाही वाटतें ? दहा मोहरा देऊन विकत घेतला तो हा.
वसंत० : होय , मी ओळखिले ; पण तुम्ही म्हणता तें मला स्मरत नाही. मी मेले असते तर बरें झाले असते.
भिक्षु : पण तुझी अशी अवस्था कां झाली ?
वसंत० : ( दु:खानें ) वेश्यापणाला जें योग्य तेंच झालें !
भिक्षु : बरें , तूं आतां ऊठ . मला तुला शिवतां कामा नये म्हणून ह्या जवळच्या फांदीला धरुन ऊठ . ( वसंतसेना तसे करुन उठते. )
वसंत० : ह्या समयी तूं मला जीवनदान दिले असें मी समजतें .
भिक्षु : येथून जवळच त्या मठात माझ्री धर्मभगिनी राहते, तेथपर्यंत हळूहळू चल. मग आपल्या घरी जा . ( दोघे चालू लागतात. ) ( पुढें पाहून ) श्रेष्ठ जनहो , एकीकडे व्हा . ही तरुण स्त्री आहे आणि मी भिक्षु आहे. हिला स्पर्श न व्हावा म्हणून एकीकडे व्हा -
पद
तो नर दुख:मुक्त झाला ॥ तयाच्या करीं स्वर्ग आला ॥धृ०॥
ज्यानें जिंकुनि पंचेद्रियगण , मोहनाशही केला ॥
अहंकार चांडाळा जयानें , नष्टदशेला नेला ॥१॥
( जातात . )