अंक सातवा - शेवटचा अंक

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


( राजमार्ग -- दोन चांडाळ व चारुदत्त येतात. )

चांडाळ : ( लोकांस उद्देशून ) आम्ही कोण हें तुम्हास ठाऊक नाही काय ? वधकर्मात निपुण झालेले आम्ही चांडाळ आहो. आमच्या अंगी मुख्य गुण म्ह्टले म्हणजे , वध्यास फार यातना न होऊ देतां , त्याचा शिरच्छेद करणे हा एक व शुलारोपण करण्याच्या कामी कुशलता हा दुसरा ; ऐकलें ? तर व्हा दुर. पौर हो प्रतिक्षणीं क्षीणायु होत आहे , अशा या श्रेष्ठ चारुदत्ताला काय पाहतां ? रस्ता सोडा . या नगरोद्यानाची शोभाच असा हा महावृक्ष , आम्ही काळपुरुष तीक्ष कुठारीनें लवकरच तोडणार , तर याला काय पाहतां ? चारुदत्ता , चल ये इकडे.
चारु० : आज मला ही दशा येईल असें माझ्या स्वप्नातसुध्दां नव्हतें. एकुण ’दैवी विचित्रा गती "असे म्हणतात तें खोटें नाही. काय दशा ही !
पद -- ( चाल -- रमाकांत न ये आजि सये. )
हा सकल देह रक्तचंदने विलोपिला ॥ यज्ञपशूसम यांनी सजविलें .
मला॥धृ॥ कुदशा ही ऐसि बघुनि ॥ ढळिति जन अश्रु नयनिं ।
दोष देती धिक्कारुनि ॥ मनुजयोनिला ॥१॥ रक्षाया बल न म्हणूनि ॥
वदती हे कर जोडूनि ॥ दीर्घकाल सुरभुवनी ॥ होउं सुख तुला ॥२॥
चांडाळा : लोक हो , पाहतां काय ? तुम्हाला माहीत नाही काय ?
ओवी
इंद्रधनु आणि गोप्रसूती ॥ नक्षत्रांची अधोगती ॥
सप्तपुरुषांची प्राणविपत्ती ॥ पाहूं नयेत हीं चार ॥१॥
चारु० : ( कल्याणयुक्त होऊन ) हर हर ! काय प्रसंग् हा --
साकी
साधेवरि बैसोनी कामिनी बघती गवाक्षव्दारें ॥
म्हणति मला हा चारुदत्त ! ही काय द्शा तुजला रे ॥
शोकें तळमळती ॥ अंतरि बहुतचि हळहळती ॥१॥
चांडा० : चारुदत्ता , ये इकडे . ( दुसर्‍यास ) हा चव्हाटा , दवंडी पिट्ण्याचे ठिकाण . तूं मोठयानें अपराध बोल  , मी दवंडी बाजवितो.
दु० चांडा० : ऐका हो लोक , ऐका . हा विनयदत्तशेटीचा नातू , सागरदत्तशेटीचा मुलगा ,याचे नाव चारुदत्त .हा अपराधी आहे. याने या उज्जयिनी नगरीतील नांमांकित गणिका जी वसंतसेना,तिचा धनलोभास्तव पुष्पकरंडक नामक जीर्णोद्यानात बाहुपाश घालून प्राण घेतला. म्हणून पालकराजाने याला मारण्याविषयी आज्ञा दिली आहे. जर दुसरा कोणी उभयलोकांविरुध्द असें वर्तन करील तर त्यालाहि पालकराजा हेंच शासन करील हो . --
चारु० : हाय हाय ! काय दैव हें ! -
दिंडी
यज्ञकर्मी विख्यात गोत्र माझें ॥
असे विप्रांहि योग्य वदाया जें ॥
मरणसमयी तें नीच बोलताती ॥
दुष्कृताचा संबंध लाविताती ॥१॥
-- हर हर ! प्रिये वसंतसेने !
 ( पद-- ललत , त्रिताल. )
सखे शशिवदने ॥ किती रुचिर , बिंवसम अधर, परम
सुकुमार ॥धृ०॥ अधरसुधा तव पिउनि कसें गे ॥
आशयोविष मी सेविन सांगे ॥ विधुकरशुचिरदने ॥१॥
चांडा० : पौराहो , गर्दी मोडा . गुणांचा समुद्र दु:खसागर पार जाण्याचा  हेतू ,संपूर्ण नगराचे भूषण , त्या श्रेष्ठ चारुदत्ताला अशा विपत्तीत काय पाहतां ?
चारु० :
पद -- ( चाल -- उधोजी मनकें मनकें . )
माझे मित्रहि कां फिरले ॥ दीन द्शा ही पाहुनि कैसें लपविति मुख
अपुलें ॥धृ०॥ मिळति बहु वैभवकाळी ॥ परि जातां तें कोणि न जवळीं ॥ येउनियां बोले ॥१॥
चांडा० : लोकांची दाटी मोडली , राजमार्ग मोकळा झाला ,चारुदत्ता , आतां हो पुढें
चारु० : होतो बाबानो , शिव -शिव ! [ " मजवरी हें आले संकट कैसे०" हे पूर्वोक्त पद म्हणतो. ]
( पडद्यात " अहो बाबा , " ’ मित्रा , " असा शब्द होतो. )
चारु० : अहो चांडलहो , तुम्ही स्वजातिश्रेष्ठ अहां ; तुम्हापासून या वेळीं मी काही प्रतिग्रहाची इच्छा करितो.
चांडा० : काय आमच्यापासून प्रतिग्रह ?
चारु० : शिव- शिव ! प्रतिग्रह कशाचा ? काही मागणें आहे. पालक राजासारखे तुम्ही अविचारी नाही ; म्हणून परलोकाम जाण्यापूर्वी एकवार माझ्या पुत्राचे सुख मला पाहू द्या.
चांडा० : बरें पहा. ( पुन: पडद्यात शब्द होतो. )
चारु० : ( करुणार्द्र होऊन ) बाळा , ये रे ! मित्रा ये . ( चांडाळास ) मित्रांनो , मला एक वेळ माझ्या पुत्रा़चे मुख पाहूं द्या. ह्या दाटींतून माझ्याने जाववत नाही .
चांडा० : अहो सज्जनहो,क्षणमात्र एकीकडे व्हा. ह्या चारुदत्ताला एकवार आपल्या पुत्राला भेटूं द्या , बाळा बापाला भेट.
( मैत्रेय व रोहसेन येतात. )
मैत्रे० : बाळा रोहसेना, चल चल लवकर. ते पहा, तुझ्या पित्याला मारायला नेत आहात.
रोह० :
भैरवी
हा तात , हा तात , जासी कुठें रे ॥ आलों पहा मी मज येउं दे रे ॥
मैत्रे० : प्रिय मित्रा ! आतां तुला कोठें पाहूं ?
चारु० : बाळा रोहसेना , मित्रा - मैत्रेया , - हे जगदीशा , काय प्रसंग हा ! -
साकी
चिरकालें ही न होय माझी तृषा शांत परलोकीं ॥
कारण तर्पणजल मज येथें मिळेल अल्पचि तें कीं ॥१॥
-- या समयीं मी माझ्या पुत्राला काय देऊं बरे ? ( यज्ञोपवीत घेऊन ) हां , एवढा हें सत्तेचे आहे . सुवर्णालंकारापेक्षा ब्राह्मणाला हें मोठें भूषण आहे. कारण देवपितरांची याच्यात योगानें तृप्ति होते.
( यज्ञोपवीत पुत्रास देतो. )
चांडा० : अरे चारुदत्ता , पुरे आतां . चल लवकर .
दु० चांडा० : अरे , ह्या श्रेष्ठ चारुदत्ताला उपपदांवाचूंन हांक मारतोस हे ठींक नाही ; कारण जरी आम्ही यास मारावयास नेत आहोत तरी राहुग्रस्त चंद्राप्रमाणे तो सर्वोस पूज्य आहे.
रोह० : अरे चांडाळानो , माझ्या बाबाला कोठें नेता ?
चारु० : वत्सा मी सांगतों --
पद -- ( चाल -- पांडुनृपति जनक जया )
बाळा घालोनियां गळां ॥ रक्तसुमनांच्या माळा ॥
स्कंधावरि स्थापियला ॥ लोहशल हा ॥१॥
ऐसें वत्सा नेति मला ॥ कंठ माझा चिरायला ॥
यज्ञकालिं जैसें पशुला ॥ नेति ओढुनि ॥२॥
रोह० : होय रे चांडाळानों ?
चांडा० : बालका , आम्हीं जातीनें मात्र चांडाळ , कृतीनें नव्हें . जे दुष्ट साधुंचा छल करतात हे खरे चांडाळ.
रोह० : तर मग माझ्या बापाला कां मारतां ?
चांडा० : लेकरां , आम्ही नाहीं मारीत , राजाज्ञा मारते. तुला मात्र ईश्वर दीर्घायु करो .
रोह० : अहो , तुम्ही मला मारा आणि माझ्या बाबाला सोडून द्या.
चांडा० : ( गहिवरुन ) बाळा , तूं चिरकाल वांच.
चारु० : ( पुत्रास मिठी मारुन गहिंवरुन ) --
साकी
स्नेहरसाचें सर्वस्वचि हें पुत्ररत्न समजावें ॥
राजा रंकहि आलिंगुनियां समतोषातें पावे ॥
चंदनवाळ्याची ॥ होते शीतल उटि साची ॥
मैत्रे० : बरें तर , मला मारा आणि माझ्या मित्राला सोडा.
चारु० : छे-छे ! मित्रा , असं म्हणू नकोस.
चांडा० : ( दुसर्‍यास ) हा दुसरा चव्हाटा , तूं अपराध बोल मी दवंडी वाजवितो. ( तसें करितात. )
चारु० : परमेश्वरा ! माझे कान जाते तर बरें होते. --
पद-- ( चाल-- जोगी , गुणगंभीर तूं गुणि रे. )
आलि ही कुदशा ऐशी , जरि अनिवार ॥
दु:ख नसे मजला त्याचें अंतरि फार ॥धृ०॥
परी तिला वधिलें मी हा दोष जनांचा ॥
तीव्रशरासम भेदोनी ह्रदया जाई पार ॥१॥
( बध्द केलेला स्थावरक चेट दृष्टीस पडतो. )
स्थाव० : काय बघा अन्याय हा ! तो चारुदत्त म्हणजे निरुपद्रवी प्राणी ; त्याचा अपराध नसून त्याला विनाकारण मारताहेत.माझ्या धन्यानें तर माझ्या पायांत बिडी घालून मला अडकवून ठेंवले आहे. बरें , आतां येथूनच मोठ्यानें ओरडावें . लोकहो , ऐका . गाडीची अदलाबदल झाल्यामुळे माझ्या गाडीत बसून वसंतसेना पुष्पकरंडक जीर्णोद्यानांत गेली. तेथें माझ्या धन्याने , ती त्याचें म्हणणे कबूल करिना म्हणून तिचे नरडे दाबून मारली. चारुदत्तानें मारली नाही. अरे ! लोक दुर गेले माझे बोलणे कोण ऐकत नाही. आतां खाली उडी टाकतो. मी मेलो तरी हरकत नाही पण दहा जणांचा पोशिंदा वाचों . अशा कामांत मेलो तर स्वर्ग मिळेल . ( उडी टाकतो. ) देव तारणार तेथें काय ! बघा , इतक्या उंचीवरुन उडी टाकली पण शाबूद ! बिडी मात्र तुटून गेली. आतां तिकडे जावें . थांबा ,
रस्ता सोडा.
चारु० : अरे , हा कोण ओरडतो ?
चेट : मी चेट आहे. माझे बोलणे ऐका . सर्व सांगतो.
( " ... माझ्या धन्यानें मारली. " वगैरे पुन: सांगतो. )
चारु० : ( आश्चर्यानें ) अरे , काय हें आश्चर्य ! मी अगदीं कालपाशात सापडलों असतां हा कोण आला ? ऐका हो --
पद-- (चाल -- मांड. युवराज शिवाजिस.)
मज भीति नसे मरणाची कांहीं अंतरीं ॥ येण्यारचि येउं तया
आवडे तरी ॥धृ०॥ निष्पापा मजसि जरी मृत्यु येइ तो ॥पुत्रजन्म -
समचि तया सुखद मानितों ॥ परि कीर्ति मलीन होय भली हानि ह
ही खरी ॥१॥
चांडा० : अरे स्थावरका , हें तूं खरें सांगतोस काय ?
चेट० : अगदीं खरें . ही बातमी कोणाला सांगेन म्हणून माझ्या धन्याने मला तिसर्‍या मजल्यावर अडकवून ठेविलें होते .
( शकार येतो. )
शका० : ( आनंदाने ) वाहवा , काय मौज झाली ! --
आम्लतिक्त मृगभांस आयतें ॥ शाकसूपसह मत्स्य रायतें ॥
भक्ष्य भोज्य नव पेय रक्षिलें ॥ अपुल्या घरिंच सर्व भक्षिलें ॥
-- ( कानोसा घेऊन ) कांशाच्या तुकड्यावर नादाप्रमाणें , खणखणीत असा चांडाळाचा शब्द ऐकू येतो ; आणि वधाच्या दोषाचा उच्चार तसाच दवंडीचा ध्वनि ही सगळीं एकदम ऐकूं येतात. यावरुन वाटतें की त्या दरिद्री चारुदत्ताला मारण्याकरिता नेत आहेत. बरें झाले. ती मौज आतां जाऊन पाहतो. कारण शत्रुचा नाश पाहून मला फार आनंद होतो ; आणि मी असें ऐकले आहे कीं शत्रुला मारताना जो पाहतो त्याला नेत्ररोग कधिही व्हायचा नाही. आतां मी तिसर्‍या मजल्याच्या गच्चीवर जाऊन आपल्या बुध्दिचा प्रताप पाहतो. ( तसें करितो. ) या भिकारड्या चारुदत्ताला मारायला नेत आहेत त्याला पाहण्याकरितां लोकांची इतकी दाटी झाली. मग माझ्यासारख्या श्रेष्ठ पुरुषाला मारायला नेऊं लागले तर किती गर्दी होईल याला कसा नव्या तरण्या बैलाप्रमाणे सजविला आहे. पण माझ्या वाडयासमोर दवंडी कां थांबवली ? कोणी बंद केली की काय ? माझा चेट येथें कोठें दिसत नाहीं ! त्याने पळून जाऊन मसलत फोड्ली तर नसेलना ! असो . तिकडे जाऊन त्याचा शोध करुं या .
चेट : कां धनीसाहेब , आलां काय ? ( लोकांस ) अहो , हाच तो.
चांडा० : लोकहो , मोठा धष्टपुष्ट असा हा बैल इकडे येत आहे; तर त्याला वाडा सोडा.
शका० : अरे वेड्या चेटा , तूं येथें कशाला आलास ? चल आपण जाऊं .
चेट : चल ! त्या बिचार्‍या वसंतसेनेचा प्राण घेऊन ह्या बिचार्‍याचाहि प्राण घेतोस काय ?
शका० : खोटें बोलतोस . मी रानकुंभ्यसारखा श्रेष्ठ असून त्या स्त्रीला मारीन होय ? तुम्ही याचें काय ऐकतां ? चारुदत्तानेंच मारली.
सर्व लोक : नाही नाही , तुम्हीच मारली.
शका० : कोण सांगतो ?
सर्व लोक : हा भला मनुष्य सांगतो.
शका० : ( भय पावून ) अरें , हे कसें झालें ? हा चेट येथें कशाला आला ? यानेच मसलत फोडली . आतां दुसरी कांही युक्ति काढली पाहिजे. ( विचार करुन ) अरे हा खोटें बोलतो. याने माझें सोनें चोरलें म्हणून मी त्याला खूप मार दिला म्हणून असे बोलत असेल.
( वळून हातांतील कडें चेटापुढे करुन ) अरे चेटा , तूं माझा ना ! म्हणून हें कडें घे आणि गोष्ट फिरवून सांग.
चेट० : ( कडें घेऊन ) पहा हो ! हा मला लालूच दाखवून गोष्ट फिरवून सांग म्हणतो.
शका० : अहो हेच ते कडें आणि याच्यासाठीच मीं त्याला खूप मारले होत. पाहिजे तर याची पाठ पहा म्हणजे समजेल .
चांडा० : अहो , याच्या पाठीवर वळ दिसताहेत खरें . यावरुन राजशालक म्हणतो हे खरे आहे. चला , आपण जाऊं .
चेट० : बघा, चाकरी म्हणजे अशी हलकी आहे ! माझें बोलणें खरें असून ते कोणाला खरें वाटत नाही , ( चारुदत्ताच्या पाया पडून ) बाबा , माझा
चारु० : पद -- ( चाल -- मांड . वरुदे वरुदे वरुदेश्वर . )
उठिं रे उठिं रे करुणाकरा । झालासि सखा आजि खरा ॥
निष्कारण ही सुदया करिसी , पतितावरि या साधुवरा ॥
मज वाचविण्यास्तव किती रे ॥ सायास तुवां केलेसि बरें ॥
परि दैव नसे अनुकूल मला ॥ यश नाही आलें तुझिया करा ॥
शका० : अहो , या चेटाला मार देऊन घालवून द्या. अरे चांडाळानो , आतां या चारुदत्ताला मारुन टाका .
चांडा० : तुम्हाला घाई असली तर तुम्ही स्वत: च मारा.
रोह० : ( पुढें सरुन ) अहो , तुम्ही मला मारा आणि माझ्या बापाला सोडा.
शका० : अरे ! पोराला आणि याला एकदम मारुन टाका.
चारु० : हर - हर !
पद -- ( चाल -- भिऊं नको जिवलग सुंदरी )
नीच असे खळ हा मोठा कपटी बोलतो तें , करिल सारें ॥धृ०॥
बापा जाउनि काननभागीं मुनिच्या आश्रमिं राहें , जननीसंगें ॥
क्षणही राहु नको ऐसा नगरामाजी लाडक्या रे , सुख न लागे ॥
तुजला काळमुखी देतिल वैरी मग तो तारणारा , कवण सांगे ॥
मित्रा तूंहि जारे ॥१॥
मैत्रे० : मित्रा , तुला सोडून माझे प्राण कसे राहतील ?
चारु० : मित्रा , तुझे प्राण तुझ्या स्वाधीन आहेत. उगीच प्राणत्याग कां करतोस ?
मैत्रे० : ( मनांत ) या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करावे आणि मग मित्राच्या भेटीला परलोकीं जावें . ( उघड ) मित्रा , या बाळाला घेऊन जातो.
शका० : अरे मी तुम्हाला सांगितले ना कीं , या दोघांना मारुन टाका म्हणून ? तो पोरगा चालला पहा.
चांडा० : तुम्ही सांगतां , पण आम्हाला तशी राजाज्ञा नाही. ( सोबत्यास ) अरे हे दवंडी पिटण्याचे तिसरे ठिकाण . तूं अपराध् बोल मी दवंडी वाजवितो. ( तसें करितात. )
शका० : अजून लोकांना खरे वाटत नाही काय ? ( उघड ) अरे चारुदत्ता, लोकांना खरे वाटत नाही म्हणून तूं आपल्या तोंडानें मी वसंतसेनेला मारली असे म्हण .
चारु० : ( काहीं बोलत नाही. )
शका० : अहो चांडाळानो , मी सांगितल्याप्रमाणे हा बोलत नाही. बघतां काय उडवा याच्या पाठीवर कोरडे.
चांडा० : (  चाबूक  उगारुन ) बोल रे चारुदत्ता , बोल .
चारु० : ( गहिंवरुन ) --
दिंडी
पावलों मी या दु:खसागरातें ॥
खेद त्याचा किमपिही नसे मातें ॥
दु:ख मोठें हें मला वदूं कैसें ॥
मारिली म्यां प्रियसखी आज ऐसें ॥१॥
चांडा० : ( पुन: कोरडे उगारतात. )
चारु० : लोक हो ! ( ’ इहपरलोकांविषयी ’ इत्यादि साकी पूर्वोक्त म्हणतो. )
शका० : मारली हेंच की नाही ! मारली.
चारु० : बरें तसे म्हण .
चांडा० : ( दुसर्‍यास ) अरे आजची पाळी तुझी !
दु० चांडा० : नाही तुझीच .
चांडा० : बरें तर मला दोन घटका थांबले पाहिजे. कारण माझा बाप मरतेवेळी मला म्हणाला कीं , ज्या वेळेस तुझ्यावर वध करण्याची पाळी येईल , त्यावेळेस तूं एकदम वध करुं नको . कारण कोणी साधुपुत्र द्रव्य देऊन वध्यास सोडवितो ; किंवा राजास पुत्र झाला तर वध्य मुक्त होतो , अथवा राज्याची उलटापालट झाली तर सर्वच बंदिवान मुक्त होतात.
शका० : काय राज्याची उलटापालट ?
चांडा० : अहो हा उगीच तर्क आहे.
शका० : अरे , या चारुदत्ताला लवकर मारा. ( चेटाला घेऊन जातो , पण पुन: परत येऊन ) मी जाणार होतो ; पण आतां जात नाही.
चांडा० : आर्या चारुदत्ता , राजज्ञा तुला मारते . वधस्थान जवळ आले , तुला कोणाचें स्मरण कर्तव्य असेल तर कर .
चारु० : ह्या समयीं धर्मवांचून कोणाचे स्मरण करुं ! --
पद -- ( चाल -- उभिं जवळि )
जरि असे धर्म मम साचा या समयी मजला पावो ॥ मजवरी दोष
हत्येचा आला तो मिथ्या होवो ॥ चाल ॥ ती माझी प्रिय सुंदरी ॥
त्यजुनि सुरपुरी ॥ तशिच भूवरी ॥
-- अहो चांडाळानो , आतां मी कोणीकडें जाऊं ?
चांडा० : हें पहा जेथें अर्धे प्रेत लोंबते आहे आणि ज्याला कोल्ही , लांडगी ओढीत आहेत अशा या दक्षिण स्मशानात चल.
चारु० : हाय - हाय ! आतां मात्र मी मंदभाग्य मेलो खचित !
शका० : अरें ! हा चारुदत्त खाली बसला .
चांडा० : चारुदत्ता , भ्यालास वाटतें ?
चारु० : हा मूर्खानो ! मी मरणाला भीत नाही ; परंतू माझ्या किर्तीला कलंक लागला हो !
चांडा० : आर्या चारुदत्ता , गगनांगणांत वास करणारे चंद्रसूर्यहि विपत्ति पावतात , मग मरणधर्म मनुष्याची काय कथा आहे ? या जगात जो चढतो तो पडतो , आणि जो पडतो तोच उठतो ; असें चाललेच आहे. ( दुसर्‍यास ) अरे ; हें दवंडी पिटण्याच चौथे ठिकाण . तूं अपराध बोल मी दवंडी वाजवितो. ( तसे करतात . ) चारुदत्ता , तुझा मरणसमय जवळ आला , आतां कोणाचे स्मरण कर्तव्य असेल तर कर.
चारु० : देवतांची इच्छा ! भगवती देवते --
साकी
असेल माझा धर्मसखा तरि या समयी मज पावो
प्रिय सुंदरि ती ताराया मज झडकरि धांवूनि येवो ॥
जावो दोष दुरी ॥ राहो सुकिर्ति शुध्द खरी ॥
चांडा० : ( तलवार उगारुन ) चारुदत्त , वर छाती करुन ताठ उभा रहा, म्हणजे एका घावानें तुझा शिरच्छेद करुन तुला स्वर्गाला पाठ्वितो. ( उगारलेली तलवार खाली पडलीसे पाहून ) अरे , इतकी घट्ट धरलीअ असून जेव्हां तलवार पडली , तेव्हां चारुदत्ताचें मरण टळलें असेच वाटतें . हे भगवती , साह्यचलवासिनि , देवि रेणुके , जर कृपा करुन या चारुदत्ताचा प्राण वांचविलास तर आमच्या चांडाळ कुळावर अनुग्रह केल्याप्रमाणे होईल.
दु० चांडा० : अरे राजाज्ञेप्रमाणे आपल्याला केलें पाहिजे . याला आतां शुलावर चढवूं. ( तसे करु लागतात. )
वसंत० : ( दुरुन ) अहो ! थांबा , थांबा ! जिच्याकरितां तुम्ही या पुरुषाचा प्राण घेता आहात ती मी - वसंतसेना जिवंत आहे.
चांडाळ० : (आश्चर्याने ) अरे ! ही केश मोकळे सोडलेली " थांबा थांबा " कोण येत आहे बरें ?
वसंत० : ( प्रवेश करुन ) आर्या चारुदत्ता ,काय हे ? ( असे म्हणून त्याच्या अंगावर पडते. )
शका० : अरे , ही जिवंत कशी झाली ! आतां येथे राहून उपयोग नाही. ( जातो . )
चांडा० : काय ही वसंतसेना ? बरें झालें कीं आम्ही हा साधु मारला नाही. ( दुसर्‍यास ) अरे वसंतसेना जिवंत आहे हे वर्तमान राजाला कळीव जा . ( इकडे तिकडे पाहून ) आम्हाला राजाची अशी आज्ञा आहे कीं , ज्यानें वसंतसेनेला पीडा दिली त्यास मारावे. तर तो राजशालक कोठें गेला, त्याला शोधून आणला पाहिजे. ( जातो. )
चारु० : ( विस्मयानें )
पद -- ( चाल -- तुझे पाहुनि स्वरुप )
हें बघुनि बहु पडे भ्रांति ॥ मज काळमुखांतुनि मुक्त करुं ये,
कुठुनि धांवत अवचित ही सुद्ती ॥धृ०॥ प्रियसखि ही दुसरी
काय ॥ अथवा ती मृत न होय ॥ किंवा हा दिव्य काय ॥ धरुनि
वरुनि भूवरि उतरलि ती ॥
वसंत० : ( साश्रु )
पद -- ( चाल -- अया मास आसाड )
आर्या तीच असे पदाची दासी ही हतभगिनी ॥
जिच्या वधाचा दोष लावियला तुम्हां पौरजनांनी ॥१॥
कुदशा ऐशी तुम्हांसि आली कारण तिस ही पापिणी ॥
क्षमा करा अपराध दयाळा विनवित मी कर जोडुनी ॥२॥
चारु० : होय , तीच ही वसंतसेना. ( न्याहाळून )
पद -- ( चाल -- येरी माई  येरी माई )
लोचनांबुधारांनी हे पयोधर ओले ॥ कोठुनि आलिस मज ताराया ॥
मृत पुरुषा जशि संजिवनी ये झट उठवाया ॥धृ०॥ तुजसाठी जो
बंध पावला ॥ तोचि देह त्वां विमुक्त केला ॥ प्रिय संगतिच्या प्रभाव
कळला ॥ जीवित मजला पुनरपि आलें ॥
-- आणखी पहा प्रिये , आज काय चमत्कार झाला तो ! --
पद -- ( चाल -- प्रिये पहा. )
प्रिये कशी दैवाची चित्रकथा अशुभचि शुभ झालें ॥धृ०॥
रक्तकुसुमहार गळां ॥ रक्तांबर रक्तटिळा ॥
लग्नवरा तेविं मला ॥ वाटे कीं सजविलें ॥१॥
लग्नवाद्यनाद जसा ॥ वध्यपटहनाद तसा ॥
श्रवणीं ये मंजुळसा ॥सौख्य मनीं दाटलें ॥२॥
वसंत० : आर्या , तुम्ही अतिदक्ष असून असें कसे झाले ?
चारु० : प्रिये --
साकी
जन्मांतरिंचा बलिष्ठ वैरी दुर्दैवें उदभवला ।
नरकीं पडतां आपण त्यानें मजला स्पर्शचि केला ॥
म्हणूनि असें झालें ॥ विधिचें चरित्र तें कळलें ॥१॥
वसंत० : शिव - शिव ! त्या मेल्या राजशालकानें मला मारिलें ; मेलेच होते , पण आपल्या पुण्याईने वांचले.
चारु० : ( भिक्षुस उद्देशून ) हा कोण ?
वसंत० : ज्याने मला वाचविले तो हा .
चारु० : कारणावाचून बंधुत्व करणारा असा तूं धर्मात्मा कोण आहेस ?
भिक्षु० : मला आपण ओळखले नाही वाटतें ? आपल्या चरणांचे संवाहन करणारा तो मी . या उपासिकेने मला द्युतकारांपासून सोडविले -- अथवा विकत घेतले असे म्हणा ना ! -- त्या दिवसापासून मी भिक्षु झालो . ही वसंतसेना गाडीची अदलाबदल झाल्यामुळे पुष्पकरंडक जीर्णोद्यानांत गेली . तेथे राजशालक होता त्याने " तूं माझ्यावर सुप्रसन्न होत नाहीस " असें म्हणून तिला बाहूपाश घालून मारले ते  मी प्रत्यक्ष पाहिले. नंतर माझ्याकडून जेवढें साहाय्य झाले तेवढें मी केले.
चारु० : दुर्जनाच्या ठिकाणी सर्व कांही संभवतें . त्यानें आपलें दुष्कर्म माझ्यावर घालून मला प्राणसंकटात घातले होते , परंतु तुम्ही वेळेवर येऊन वांचविलेत.
( पडद्यात " आर्यक राजाचा विजय असो . )
श्लोक
दक्षाध्वरा भक्षुनिया जय शंकराचा ॥
कीं क्रौच दानव विदारुनि षण्मुखाचा ॥
जंभास मारुनि जसा जय वासवाचा ॥
झाला तसाच अरि मर्दुनि आर्यकाचा ॥१॥
शर्विल्क : ( येऊन ) त्या दुष्ट पालकाचा वध करुन , त्याच्या जागीं आर्यकाला बसवून त्याची सत्ता सर्वत्र स्थापन केली . आतां त्या श्रेष्ठ चारुदत्ताला सोडवितो. ( पुढें पाहून ) वाहवा ! आर्यकराजाचे हेतु सफल झाले ! हाच तो श्रेष्ठ चारुदत्त . --
दिंडी
व्यसनसिंधूंतुनि ज्यास गुणवतीनें ॥
तारियले धरुनियां निज करानें ॥
अशा श्रेष्ठ पाहतों प्रियायुक्ता ॥
चंद्रिकेसह विधुस कीं राहुमुक्ता ॥१॥
-- परंतू या सत्पुरुषाचा मी महान अपराध केला आहे तेव्हां त्याच्यापुढें कसा जाऊ ? काही चिंता नाही , हा सत्पुरुष आहे , क्षमा करीलच . ( पुढे होऊन ) आर्या चारुदत्ता --
चारु० : तू कोण रे बाबा ?
शर्वि० : आर्या --
साकी
ज्यानें फोडुनि सदन तयांतुनि अलंकार दुसर्‍याचे ॥
नेणुनि केलें स्वार्थासाठीं रात्री हरण तयाचें ॥
तो मी शरण तुला ॥ आलों देई अभयाला ॥
चारु० : छे - छे , मित्रा , असे म्हणू नकोस. तूंच मला स्नेहाचा अपूर्व लाभ जोडून दिलास . ( आलिंगन देतो. )
शर्वि० : आर्या तुम्हाला काहीं आनंदाचे वर्तमान सांगावयाचे आहे. तुमच्या यानांत बसून पूर्वी जो तुम्हाला शरण आला होता , त्या आर्यकाने पालकराजाचा वध करुन , आपण राजपदावर बसून तुमच्या उपकाराबद्दल कुशावती नगरीचे स्वामित्व तुम्हाला दिले. या स्नेहभावाच्या पहिल्या देणगीचा आपण स्वीकार करावा , अशी आर्यकाची आपणास विनंती आहे . कोण आहे रे , आपण त्या पापी राष्ट्रीयाला धरुन . आर्या , आणखी आर्यकराजाची विनंती आहे कीं हे राज्य मी आपल्या गुणांनी संपादन केले आहे . तर याचा आपण हवा तसा उपभोग घ्यावा.
चारु० : माझे कसले गुण ?
( पड्द्यांत " अरे पापी राष्ट्रीया , भोग , भोग , आपल्या कर्माची फळें . " शकाराला पुढे आणतात . )
शका० : मला चोहोकडून कसे वेढले आहे पहा ! आतां कसे करावे ! या श्रेष्ठ चारुदत्ताला शरण जावें . ( पाया पडतो. )
( पडद्यात  आर्या , सोड - सोड त्याला . )
शका० : हे पुण्यपुरुषा , माझें रक्षण कर.
चारु० : शरणागताला अभय आहे.
शर्वि० : न्या रे एकीकडे ओढून . ( चारुदत्तास ) याला सोडायचे नाही . कोणते शासन करुं सांग . --
पद -- ( चाल -- केशिदानव )
चरणिं करिच्या बध्द करुनी ॥ प्राण घ्यावा काय ओढुनि ॥
श्वानीं खावें यास फाडुनि ॥ काय सांगावे ॥१॥
लोहशुलावरी चढवुनि ॥ वधावें कीं यास नेऊनि ॥
करवतानें बळें कापुनि ॥ काय मारावें ॥२॥
चारु० : मी सांगेन तसें करशील ना ?
शर्वि० : करीन ; पण लवकर सांगा .
शका० : आर्या चारुदत्ता , मी शरण आहे. पुन्हा असें करणार नाही.
वसंत० : मेल्या , तुझा सत्यानाश होवो ! ( चारुदत्ताच्या गळ्यातील माळ त्याच्या अंगावर टाकते. )
शका० : अगे गर्भदासी , मी तुला पुन्हा मारणार नाही .
शर्वि० : अरे पाहता काय ? ओढा याला . आर्या , काय करुं सांग.
चारु० : मी सांगेन तसें करशील ना ?
शर्वि० : करीन .
चारु० : तर मग याला लौकर --
शर्वि० : काय ठार मारुं ?
चारु० : नाही - नाही ,सोडून द्या .
शर्वि० : तें कां ?
चारु० : अरे , असें आहे --
साकी
अपराधातें करुनि अरि जरी चरणिं शरण येवोनी ॥
तारावें मज असें म्हणे तरि न वधावा शस्त्रांनी ॥
त्यातें उपकारें ॥ वधावें हेंचि सन्मत खरें ॥१॥
शर्वि० : तुम्ही सोडा म्हणता तर सोड्तो.
शका० : वाहवा , काय मौज झाली ! मी मेलेला वांचलो ! ( उड्या मारीत जातो .)
( पडद्यात. अरे , काय चारुदत्ताची पत्नी धूता आपला पुत्र रोहसेन याला इकीकडे लोटून अश्रुपात करीत निग्रहानें अग्नीपुढे उभी आहे व आतां प्रवेश करणार . " )
शर्वि० :चंदनका , कसली रे गड्बड आहे ?
चंद० : ( बाहेर येऊन ) राजवाड्याच्या दक्षिणेच्या बाजूला लोकांची फार दाटी झाली आहे. त्या बाईना आम्ही पुष्कळ सांगितलें कीं , चारुदत्त जिवंत आहे . पण ऐकतो कोण ?
चारु० : ( दु:खाने ) प्रिये , मी जिवंत असतां काय करितेस हें ?
( मूर्च्छित होतो. )
शर्वि० : शिव - शिव ! इतका प्रयत्न करुन व्यर्थ होतो कीं काय ?
वसंत० : आर्या , सावध व्हां . तिकडे न गेलां तर एखादें भलतेच व्हावयाचे ?
चारु० : (सावध होऊन ) हा प्रिये कोठें आहेस ?
चंद० : आर्या मी दाखिवतों , इकडून ये. (सर्व जातात. )
( अग्नीपुढें उभी आहे अशी धूता , रोहसेन , मैत्रेय व रदनिका येतात. )
धूता : वत्सा मला ओढू नकोस . सोड - सोड , माझ्या धर्मकृत्याला आज येऊं नको. स्वारीची अमंगल वार्ता ऐकून माझ्यानें कसें राहवेल ?
रोह० :  आई  ,मला टाकून तूं कोणीकडे जातेस ? मलाहि घेऊन चल .
मैत्रे० : बाई , तूं ब्राह्मणी आहेस . ब्राह्मणीने भिन्न चिता करुं नये. केल्यास दोष आहे , असे शास्त्रांत सांगितले आहे.
धूता : पतीची अमंगल वार्ता ऐकण्यापेक्षां तो दोष मला पत्करला.
शर्वि० : आर्या चारुदत्ता , तुमची पत्नी अग्नीपुढे उभी आहे.त्वरा करा.
धूता : रदनिके तूं तरी या बाळालां सांभाळ .
रद० : बाईसाहेब , तुम्ही जातां आणि मी या बाळाला संभाळू काय ? नाही नाही , मीहि मागून येणार.
धूता : मैत्रेय भटजी , तुम्ही तरी या बाळाला संभाळा.
मैत्रे० : बाई , जो कोणी इष्टसिध्दीस प्रवृत्त होतो तो ब्राह्मणाला पुढें करितो , म्हणून आधी मी जातो .
धूता : माझ्या बाळाचा संभाळ करण्याचे दोघांनी नाकारिलें  . असो . बाळा आतां तुझे तूंच रक्षण कर. आम्हाला तिलोदक द्यायला तूं पाहिजेस. सर्व मनोरथ मेले जागच्या जागीच राहिले . पित्याने संभाळ करावा . असें तुझ्या नशिबीच नाही.
चारु० : ( पुढे होऊन ) हा पहा. मीच माझ्या बाळाला संभाळतो .
धूता : अग बाई , हा स्वामींचा शब्द ! ( पाहून ) होय ; तेच हे ! ( चारुदत्तास आलिंगते. )
रोह० : माझ्या बाबाने मला उचलून घेतलें बघ आई , बाबा , आतां माझ्या आईला जाऊं देऊं नकोस .
चारु० : -- प्रिये -
पद -- ( चाल -- आवड्ती वस्तु लोभानें )
हा असुनि सजिव पति कांते ॥ करिसी साह्स कां मज न कळे
तें ॥धृ०॥ अस्ताचलिं तो रवि नच जातां ॥ नच मिटी कमलिनि
निज नयनातें ॥१॥
धूता : म्हणूनच तिला अचेतन म्हणतात.
मैत्रे० : हा केवळ या पतिव्रतेचा प्रभाव . अग्निप्रवेश करण्याच्या निश्चयानेच ही पतिसमागम पावली. मित्रा , तुझा जयजयकार असो !
( दोघे भेटतात . )
रद० : महाराज , मी रदनिका वंदन करतें .
चारु० : रदनिके , ऊठ .
धूता : ( वसंतसेनेस ) मी मोठ्या भाग्याची म्हणून तुम्ही मला भेटला.
वसंत० : आतां मला किती आनंद झाला आहे म्हणून सांगू !
शर्वि० : आर्ये , वसंतसेने , नवा राजा बंधुप्रेमाने तुझ्यावर संतुष्ट झाला.
वसंत० : मी कृतार्थ झाले .
शर्वि० : आर्या , या भिक्षुचे काय करावयाचे ?
भिक्षु० : हे सर्व क्षणभंगुर , अनित्य , विनाशी , असें पाहून मला दुप्पट वैराग्य झाले आहे  तर याच आश्रमात सत्कालक्षेप करावा . हेच मला प्रिय आहे.
शर्वि० : ठीक आहे , तर यांस सर्व मठांचे अधिपत्य द्यावे.
चारु० : कां भिक्षो ?
भिक्षु० : यांत माझा संतोष आहे.
शर्वि० : या स्थावरक चेटाचे काय करायचे ?
चारु० : तो दास्यत्वापासून मुक्त व्हवा ; तसेच या चांडाळांना सर्व चांडाळांचे नाईक करावे ; चंदनक याला सर्व राष्ट्राच्या पालनाचा अधिकार असावा व आमचा आदिमित्र जो राजशालक त्याच्याकडे पूर्वीचेच काम असावे.
शर्वि० : ठीक आहे ; आणखी मी आपलें काय प्रिय करावें !
चारु० : पद -- ( चाल -- उठि प्रभात सुमरलियो. )
सकल दोष मजवरिचा आज लया गेला ॥
वैरि चरणिं शरण तया मुक्तिलाभ झाला ॥धृ०॥
आर्यक मम मित्र त्यासि नॄपपद तें आलें ॥
प्रियसखिचा लाभ तसें त्वाहि साह्य केलें ॥
प्रिय याहुनि अधिक काय राहिलें मला ? ॥१॥
-- तथापि हें असो --
पद -- ( चाल -- प्राप्त होय जें निधान . )
धेनु पयोदा असोत , वसुधा तृणधान्य देवो ॥
सुखद पवन तो नित्य सुटोनी वृष्टि समयिं होवो ॥धृ०॥
धर्मनिष्ठ रणशुर भूप ते बलरिपु दंडोनी ॥
करोत वसुमतिचें परिपालन रात्रंदिन जपुनी ॥
निजकर्मी रत असोत जनही नीतिपथा धरुनी ॥
नाट्यकलाही सकलकलांसह पूर्णत्वा येवो ॥१॥
ईशस्तवन
पद -- ( चाल -- राग भूप , त्रिताल . )
शंकरा , पामर हा नर सादर शरण तुम्हां तारा ॥धृ॥
मीपण वायां , तनु शिणवाया , तें नासाया , पंथ खरा ॥
मूढा दावा , भ्रम निरसाव , बोध ठसावा मनीं बरा ॥
जो चुकविल जननमरणाचा फेरा , उमावरा ॥१॥
मिथ्या हा भव , मायासंभव , ऐसा अनुभव घेउनियां ॥
नित्य निरंजनि , मन लावोनी अवमानिति मुनि संसारा ॥
तो अनुभव मजशी यावा सत्सारा, तमोहरा ॥२॥
कवितासुमनें , हीं शुध्दमनें , निरहंमतिनें , वाहियलीं ॥
बल्लाळात्मज गोविंदानें सुप्रेमानें , मान्य करा ॥    ,
भो शीतलशशिशेखर , शूलधरा , पीतगरा ॥३॥
 -- समाप्त --       

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP