संगीत विक्रमोर्वशीय - अंक पहिला

सन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.


मंगलाचरण

पद.
( कवि वंदुनि आदी० या चा० )
हें वंदन त्या श्रीशुभदाया ॥ गुरूबलवंताच्या मग पायां ॥धृ०॥
जननी जी कां आनंदाची ॥ धवल चंद्रिका हृत्कमलाची ॥
दिव्य दीपिका अज्ञानाची ॥ कामदुहा जी रसिका साची ॥
वाग्देवी ती कविराजाची ॥ स्तवितों मानसमल जाया ॥१॥

पद
( पूर्वी अधरोष्टावरि० या चा० )
शंकर तो सुखदायक होवो ॥ तुम्हां सकलां रसिकांतें ॥
स्थिर भक्तीनें वश जो होतो ॥ अल्पायासें मनुजातें ॥धृ०॥
एक पुरुष जो वेदांतींचा ॥ व्यापुनि उरला जगतातें ॥
ईश्वर शद्बा सार्थकता ही ॥ ज्याच्या ठायिंच कीं येते ॥१॥
मोक्षपदाचा लाभ घडावा ॥ इच्छा ज्यांना ही होते ॥
नियम करोनी प्राणादींचा ॥ शोधिति अंतरिं ते ज्यातें ॥२॥

सूत्रधार : असो, ( पडद्याकडे पाहून ) मारिषा, इकडे ये.
मारिष : ( येऊन ) हा आलों. काय आज्ञा आहे ?
सूत्र० : मारिषा-

साकी.
पूर्व कवींच्या नाट्यरसाचे ज्ञाते जन हे बसले ॥ सुरस विक्रमोर्वशीय नाटक कविवर्यें जें रचिलें ॥ नूतन तें नामी ॥ प्रयोग त्याचा करितों मी ॥१॥
तर सर्व पात्रांना अपापले पाठ तयार ठेवा म्हणून सांगा.

मारिष : आज्ञेप्रमाणे करतों. ( जातो. )
सूत्र० : ( सभेकडे पाहून ) आतां सर्व पंडितांना माझी अशी प्रार्थना आहे कीं :-

दिंडी.
अम्हां दासांवरि लोभ म्हणुनि, किंवा ॥ वस्तु-पुरुषाचा मान बहु करावा ॥ लक्ष यास्तव लावोनि मार्मिकांनीं ॥ कविकृति ही परिसावि नवी कानीं ॥१॥
( पडद्यांत )

अंजनीगीत.
सुर पक्षाचा असेल कोणी ॥ अथवा ज्याची गति या गगनीं ॥
या हो या लवकरि धांवोनी ॥ आम्हां राखाया ॥१॥
सूत्र० : ( ऐकून ) हा अति दीन स्वर कुणाचा बरं ऐकायला येतो? ( विचार करून ) हां, समजलों.

साकी.
नरसख मुनिव्या ऊरूपासुनि झाली जी सुरवनिता ॥
हरिलें तिज असुरांनी मार्गी कुबेर सेवुनि येतां ॥
यास्तव सुरयुवती ॥ वाटे शोक असा करिती ॥१॥
( सूत्रधार जातो. )
( या प्रस्तावनेनंतर पूर्वोक्त म्हणत अप्सरा येतात. इतक्यांत रथस्थ राजा त्याचा सारथी असे प्रवेश करितात. )
राजा : शोक करूं नका --

पद ( शृंगा ताडोनि )
सुंदरिनो आतां ॥ सोडा ॥ सर्वहि भय चिंता ॥ सोडा ॥धृ॥
सन्निध या माझ्या ॥ सांगा ॥ कोण तुम्हां छळिता ॥ सांगा ॥
भूप पुरूरव जाणा यातें ॥ आलों येथें पूजुनि सविता ॥१॥।

दंभा : महाराज, तो दुष्ट राक्षस.
राजा : काय राक्षस ! त्यानं तुमचा कोणता अपराध केला सांगा ?
मेनका : ऐकावं महाराज --

पद ( वीरा भ्रमरा० या चा० )
उग्र तपा भंगाया इंद्रा अस्त्रचि जी सुंदरी ॥
स्वरूपें श्रीगौरीला हरी ॥१॥
सुरलोकाचें भूषण साचें अमुची प्रिय उर्वशी ॥
सखी ही दुसरी तिजसह अशी ॥२॥
कुबेर सदना जाउनि येतां मार्गी सखीच्या सवें ॥
हरीलें तिजला कुणि दानवें ॥३॥

राजा : बरं तो दुष्ट कोणत्या दिशेनें गेला ?
अप्सरा : महाराज, असा ईशान्य दिशेनं गेला.
राजा : ठीक आहे. तुम्हीं शोक करूं नका. मी तुमच्या प्रियसखीला आतां सोडवून आणतों.
मेनका : ( हर्षानें ) चंद्राचे पौत्र आपण ! आपल्याला असंच करणं योग्य आहे.
राजा : बरं तुम्हीं माझी वाट पहात कुठें बसाल ?
सहजन्या : आम्ही सर्वजन त्या हेमकूट पर्वताच्या शिखरावर आपली वाट पहात बसतों.
राजा : ठीक आहे. ( सूताकडे वळून ) सूता, ईशान्य दिशेकडे रथ चालीव.
सूत : जो हुकूम महाराज. ( घोडे हांकतो. )
राजा : ( रथवेग पाहून ) शाबास ! सारथे, शाबास ! या अशा रथवेगानं --

पद ( झडकरी पाव )
टाकिन गरुडासहि मागें ॥ काय कथा मग त्या असुराची व्यर्थचि तो भागे ॥धृ०॥ हे घन चूर्ण पहा होती ॥ बारिक रेणुंपरी दिसती ॥ रथाच्या मागें ते उडती ॥ अरांत दुसरी पंक्ति अरांची दिसत चक्रवेगें ॥१॥ हयशिरिं चामर सकळ कसें ॥ चित्रासम तें अचल दिसे ॥ ध्वजपट हाही स्थिर भासे ॥ अंतीं दंडाग्रीं सम ऐसा, वेग पवनयोगें ॥२॥
( असें बोलून राजा व सूत जातात. )

रंभा : गडे, राजर्षि तर गेला. चला आतां आपण देखील त्या हेमकूट पर्वतावर जाऊन बसूं.
मेनका : चला तर. ( पर्वतावर जातात. )
सहजन्या : सखे, तो राजर्षि आपल्या दु:खाचं निवारण करील का ग ?
रंभा : अग, त्याची तुला अगदीं काळजी नको.
सहजन्या : सखे, दैत्यांना जिंकायचं मोठं कठीण ! म्हणून म्हणतें.
रंभा : गडे, इंद्रसुद्धां मोठमोठ्या युद्धाच्या वेळीं त्याला मध्यलोकांहून मोठ्या सन्मानानं बोलावून आणून आपल्या स्सेनेच्या अग्रभागीं उभा करतो. कारण तो - असला म्हणजे देवांचा जय व्हायचाच आपला.
सहजन्या : बरं बाई ! एकदां विजयी होवो म्हणजे झालं.
मेनका : ( आनंदानें ) अगबाई !
ठुंबरी.
झळके हरिणध्वज ज्यावरचा ॥ सोमदत्त हा रथ भूपाचा ॥धृ०॥ होउनि विजयी आला वाटे ॥ त्याविण नच तो परतायाचा ॥१॥
( सर्वजणी पहात उभ्या राहतात. )
( तदनंतर राजा, सूत, भ्यालेली उर्वशी व चित्रलेखा येतात. )
चित्रलेखा : सखे सावध हो. असं काय करतेस ती ?  
राजा : सुंदरि, सावध हो.

पद ( लाज येई रजनीस० )
लेश ही न उरला आतां दानवी भयाचा ॥ जाण सर्व महिमा हा त्या वज्रधारकाचा ॥धृ०॥ उघडिं नेत्र कमलाक्षी हे सोड सोड भीती ॥ पंचजासि उघडी जैसी रविविकासिनी ती ॥ होय उष:काली जेव्हा लोप तो तमाचा ॥१॥
चित्रलेखा : ही काहीं अजून सावध होत नाहीं. नुसता श्वासोच्छ्वास मात्र चालला आहे. एवढ्यावरूनचे ही जिवंत आहे असं ओळखायचं.
राजा : चित्रलेखे,

पद ( मी कुमार ती हि० )
किति झाली पीडित बघ ही ॥ तव सखी असुरतापानें ॥ धृ॥ अति कोमल कुसुमासम हें ॥ कांपतें हृदय भीतीनें ॥ ॥ वाल ॥ घनकुंचामधें जो दिसतो ॥ मंदारहार सुचवी तो ॥ हृत्कंप किती हा होतो ॥ वर खालेअए श्वासोच्छ्वसनें ॥१॥
चित्रलेखा : सखे, तूं आपल्या मनाला कांहीं तरी धीर दे. अप्सरा असून असं काय करतेस ती ! हें कांहीं बाई चांगलें नव्हे. ( उर्वशी सावध होऊं लागते. )
राजा : ( आनंदानें ) चित्रलेखे,

ठुंबरी ( बघुनि वाटतें मन्मनीं० )
मजसि जाहली वाटतें ॥ सावध ही ॥धृ०॥ हळु हळु शशि उदयाचलिं येतां ॥ सोडितसे तम रात्रीतें ॥१॥ जातां धूर जशी रजनीची ॥ वन्हिज्बाला ती दिसते ॥२॥ तटपातानें कलुषित गंगा ॥ निर्मल जैशी मग होते ॥३॥
चित्रलेखा : सखे, तुला खरंच सांगतें, त्या देवांच्या शत्रूंच्या शत्रूंचा पराभव झाला आणि ते दुष्ट निराश होऊन पळून गेले.
उर्वशी : ( डोळे उघडून ) काय प्रभावदर्शी इंद्रानं का त्यांचा पराभव केला ?
चित्रलेखा : अग इंद्रानं नव्हे. पण इंद्रासारखेच पराक्रमी हे दयाळू पुरुरव राजे यांनीं त्यांचा पराभव करून तुला सोडवून आणलं,
उर्वशेसे : ( राजाकडे पाहून ) तर मग त्या राक्षसांचा हा माझ्यावर मोठा उपकारच समजला पाहिजे.
राजा : ( उर्वश्सीकडे पाहून ) खरोखर ! नारायणऋषीच्या तपाचा भंग करण्याकरितां अप्सरा गेल्या होत्या, त्यांना या उर्वशीला पाहून लज्जा उत्पन्न झाली, यांत काहीं नवल नाहीं. कारण हिचं लावण्यच तसं आहे ! मला तर असं वाटतं कीं :-

पद ( दैव योग दुर्विपाक० )
कांतिप्रद चंद्र; परम रसिक मदन वा ॥ निर्मी कीं कुसुममास सुतनु ही नवा ॥धृ॥ जो वेदाभ्यास करुनि मूढ जाहला ॥ नीरससा सकल विषय ज्यास वाटला ॥ निर्मिल तो जरठ काय कुसुम कोमला ॥ रमणी ही खचित नव्हे ऊरुसंभवा ॥१॥
उर्वशी : गडे, माझ्या सगळ्या मैत्रिणी कुठें आहेत पण ?
चित्रलेखा : सखे, तें या महाराजांना माहित असेल.
राजा : ( उर्वशीला )) त्या सर्वजणी मोठ्या दु:खांत आहेत. कारण तूंच पहा कीं --

पद ( देखो सखी कान्हया० )
ज्या सदा वसति तुज जवळि पाहि ॥ हो विरह त्यांसि तरि नवल नाहिं ॥धृ०॥ सहज एकदां दिसलिस ज्याला ॥ होईल विरहें व्यथित तो हि ॥१॥
उर्वशी : ( आपल्याशीं )

पद ( बासरी बजावे काना० )
भाषण किति मधुर तरी ॥ होय सुधारसें ॥धृ०॥
अथवा,
वर्षे जरि चंद्र सुधा ॥ अधिक त्यांत कायसें ॥१॥
( राजास ) म्हणूनच त्यांना एकदां केव्हां पाहीन असं मला झालं आहे.
राजा : ( दाखवून ) त्या पहा.

साकी.
जैसे लक्षिति उत्सुकतेनें राहुमुक्त चंद्राला ॥ तैसें अवलोकिति त्या पाहे सख्या तुझ्या वदनाला ॥ हेमगिरीवरुनी ॥ उत्कंठित बहु होवोनी ॥१॥
( उर्वशी उत्सुकतेनें पहाते. )
चित्रलेखा : सखे, इतक्या उत्सुकतेनं कुणाला पहातेस ती ?
उर्वशी : अग जो आपल्या सुखदु:खाचा वाटेकरी झाला त्याला एकदां डोळे भरून पहातें.
चित्रलेखा : कोण तो ?
उर्वशी ( गुप्त अभिप्रायानें ) अग कोण म्हणजे ? सखीजन.
सहजन्या : ( हर्षानें मेनकेस. ) सखे, तो पहा राजर्षि, आपल्या मैत्रिणी चित्रलेखा व उर्वशी यांना घेऊन इकडेच येत आहे. कसा दिसतो आहे पण ! अगदीं विशाखा नक्षत्राजवळ चंद्रच !
रंभा : गडे, त्या राक्षसापासून आपल्या सखीला सोडवून, तिला बरोबर घेऊन हा राजा सुखरूप परत आला, हें फ़ार चांगलं झालं.
मेनका : सखे, राक्षसांना जिंकायचं मोठ्ठं कठिण असं म्हणत होतीस ना ?
राजा : सूता, या हेमकूटपर्वताजवळ रथ उभा कर.
सूत : जी हुकुम. ( तसें करितो. )
( रथाखालीं उतरतांना उर्वशीचा राजास स्पर्श होतो. )
राजा : अहाहा !

दिंडी.
रथक्षोमें बाहूस बाहु लागे ॥ अंगिं उठले रोमांच तया योगें ॥ फ़ुटति अंकुर हे साच मन्मथाचे ॥ खरें झालें साफ़ल्य या श्रमाचें ॥१॥
उर्वशी : ( लाजून ) अग जरा पलीकडे हो !
चित्रलेखा : ( हंसत ) पलीकडे कुठें होऊं ?
रंभा : या राजानं आपल्यावर मोठा उपकार केला आहे. म्हणून याचा ही आपण सन्मान केला पाहिजे. ( सर्वजणी राजास सामोर्‍या येतात. )
राजा : सूता, जशी वल्लींना वसंतश्री, तशी ही सुंदरी आपल्या उत्कंठित सखींना भेटून येईपर्यंत रथ इथंच उभा कर.
सूत : जी हुकुम महाराज ! ( रथ उभा करितो. )   
सर्वजणी : आज महाराज विजयी झाले यानं आम्हांला मोठा आनंद झाला.
राजा : तुमची व तुमच्या सखीची भेट झाली, हाही आनंद कांहीं कमी नाहीं !
उर्वशी : ( चित्रलेखेचा हात धरून खालीं उतरून )

पद ( यातके नन्न यबिसी० )
भेटा कडकडुनी ॥ सखींनो ॥धृ॥ भेट पुन्हां ही होईल तुमची ॥ नव्हतिच आशा मजलागोनी ॥१॥
रंभा : महाराजांनीं चिरायु होऊन या पृथ्वीचं सदोदित पालन करावं !
सूत : महाराज, पुरबके तरफ़से घडघड घडघड ऐसा रथका आवाज सुन्नेमे आता है, मेरा ऐसा अंदाज है के --

साकी.
उतरे कोई अकासमएसे देख परत है मुजसे ॥ सोभत तन देखीये जिसकी सुन्नेके भूखनसे ॥ शिरपर परबतके ॥ मेघहि बिजलि लाथ लेके ॥१॥
सर्वजणी : ( पाहून ) अग बाई !हे चित्ररथ गंधर्व आले.
चित्ररथ : ( प्रवेश करून राजास ) राजा, स्वपराक्रमानं आज तूं इंद्रावरही उपकार केलास, शाबास !
राजा : कोण गंधर्वराज ! प्रियमित्रा, ये ये !
( राजा व चित्ररथ एकमेकांस भेटतात. )
चित्ररथ : मित्रा --

पद
केशी दानवाधम उर्वशीला हरण करि हें परिसुनी ॥ इंद्र धाडी विबुधसेना सुंदरीच्या मोचनीं ॥१॥ मार्गीं किन्नरांच्या मुखीं सर्वहि तुझा विक्रम ऐकुनी ॥ प्राप्त झालों नृपा येथें तुष्ट चित्तीं होउनी ॥२॥
आतां -

पद ( शिव शिव ही निर्धनता० )
उर्वशिसह येवोनी भेट वासना ॥ प्रिय त्याचें आचरिलें थोर भूधवा ॥धृ॥ पूर्वीं त्या नारायनमुनिवरें दिली ॥ नारी ही इंद्रा त्वां आज अर्पिली ॥ अरिपासुनि हरण करुनि मित्रपुंगवा ॥१॥
राजा : छे छे ! मित्रा, असं म्हणूं नकोस. कारण --

पद ( सदर. )
हा प्रभाव सर्वहि त्या अमरपतीचा ॥ त्या योगें जिंकी रिपुस मित्रगण तयाचा ॥धृ॥ गिरिकंदरिं पंचानन गर्जना करी ॥
प्रतिशब्दें प्राणचि ते सोडिती करी ॥ तेवि आज मजसि होय विजयलाभ साचा ॥१॥
चित्ररथ : निरभिमानत्व हें एक पराक्रमाचं भूषणच आहे.
राजा : मित्रा, इंद्रदर्शनाला येण्याची ही वेळ नव्हे. यासाठीं तूंच उर्वशीला नेऊन इंद्राच्या सवाधीन कर, म्हणजे झालं.
चित्ररथ : जसं तुझ्या विचाराला येईल तसं.
( अप्सरांस ) चलावं सर्वांनीं. ( उर्वशी  व चित्रलेखा या दोघीशिवाय सर्व जातात. )
उर्वशी : सखे चित्रलेखे, ज्यांनीं आपल्याव्र एवढा उपकार केला, त्यांना विचारल्यावांचून जाण कांहीं बरोबर नाहीं. पण बाई माझ्याच्यानं त्यांच्यापुढें उभे राहून बोलवायचं नाहीं. तर तूंच कां माझ्या वाटचा निरोप घेईनास ?
चित्रलेखा : बरं तर, मी घेतें निरोप. ( राजाजवळ जाऊन ) महाराज! उर्वशीची अशी विनंती आहे, कीं दुसरीं प्रिय सखीच अशी आपली कीर्ति बरोबर घेऊन स्वर्गलोकीं जायची मला आज्ञा असावी.
राजा : बरं आहे तुम्ही आतां जा, परंतु लवकरच परत यालना ?
( उर्वशी व चित्रलेखा आकाशमार्गानें जायला निघतात. )
उर्वशी : ( जातांना अडखळ्यासारखें करून )

ठुंबरी ( लगाये लिनोजा० )
या वेला गुंतली ॥ माळ कशी ही न सुटे मज ॥धृ०॥ तूं तरि येउनि सोडिव आतां ॥ ॥ सखये ॥ गतिं माखी खुंटली ॥१॥
( असें म्हणून राजाकडे बघत उभी राहते )
चित्रलेखा : ( हंसून ) छे बाई ! ही फ़ारच बळकट गुंतली आहे. माझ्यानं सुटणं कठीण दिसतं.
उर्वशी : पुरे गडे, तुझी सारीच थट्टा ! सोडीव किंग.
चित्रलेखा : अग, ही सुटण्याजोगी नाहीं. पण सुटली तर पाहतें बाई ( माळ सोडविण्यास लागते. )
उर्वशी : सखे, या बोलण्याची तुला पक्की आठवण असूंदे बरंका.
राजा : ( आनंदानें. )

पद ( कारे हरी तू० )
लते खरिच तूं प्रियकरणी ॥ माळ धरुनिया मृगनयनेला करिसि उभी क्षणभरि गमनीं ॥धृ॥ पाहतसे मुरडोनि हळुच ही ॥ दृष्टि पडे मुखचंद्र पुन्हां ॥ सुखवीत मना ॥ भरला नयनीं ॥१॥
( चित्रलेखा माळ सोडविते )
सूत : सुनो महाराज -

साकी
सुरबैरीको मारा जिसने डुबा दिया सागरमो ॥ पवनास्त्र ये फ़िरसे आके, बैठ गया शरधीमो ॥ भुजंग के जैसा ॥ आके बारुलमे घूसा ॥१॥
राजा : ठीक आहे. तर मग रथ तयार कर.
( सूत तसें करितो. राजा रथारूढ होतो. )
उर्वशीं --

ठुंबरी.
पडेल पुन्हां गांठ कधीं ॥ नकळे मज यांची ॥धृ०॥ दानवासि जिंकुनि जो ॥ उपकारी होय खरा ॥ प्राणदान दे मला ॥१॥
( असें म्हणत, राजाकडे पाहत, व श्वासोच्छ्वास टाकीत सखीसह गंधर्वाबरोबर निघून जाते. )
राजा : ( उर्वशीच्या मार्गाकडे पाहून ) या मदनाचा सपाटा काय विलक्षण आहे पहा ! जो कोणी याच्या पाशांत सांपडतो, तो दुर्लभ स्त्रीच्याही नाहीं लागतो.

श्लोक ( हरिणी. )
जनक सदना जातां व्योमीं तनूंतुनि या मना ॥ सुतनु कशि ही नेते वेगें बळेचि सुरांगना ॥ खुडुनि कमला जैसी हंसी मृणाल विदारुनी ॥ धरुनि ओढी तंतू सवेंचि तयांतुनी ॥१॥

( सूतासह जातो. )

( अंक १ ला समाप्त )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP