शिष्य :- अनुबंधचतुष्टय कोणतें ?
गुरु :- विषय, प्रयोजन, संबंध आणि अधिकारी हे अनुबंद्घ चतुष्टय होय. वेदांतशास्त्राचा ब्रम्ह विषय, मोक्ष प्रयोजन, बोध्यबोधकभावसंबंध, साधनचतुष्टयसंपन्न प्रमाता अधिकारी होय. ब्राह्मणानेंच बृहस्पतीसव, आणि क्षत्रियानेंच राजसूययज्ञ करावा. त्याप्रमाणेंच या अधिकार्यानें वेदांत श्रवण करावा.
शिष्य :- चार साधनें कोणतीं ?
गुरु :- नित्यानित्यवस्तुविवेक ( विचार ), इहामूत्रार्थभोग विराग ( वैराग्य ). - शमादिषट्क व मुमुक्षा ( मोक्षाची इच्छा ) हीं चार साधनें; त्यांतून ब्रम्ह सत्य, आणि जग अनित्य ( मिथ्या ) असा श्रवणानें होणारा विचार हें पहिलें साधन होय. या लोकांतील स्त्रीभोगादि व स्वर्गीं अमृतपानादि हीं सर्व अनित्य जानून कुत्र्याच्या ओकीप्रमाणें त्या विषयांचा वीट मानणें हें दुसरें ( वैराग्य ) होय. १ शम, २ दम, ३ उपरति, ४ तितिक्षा, ५ श्रद्धा, ६ समाधान हें शमादिषट्क. विषयांकडून मनाला वळवून स्वरूपीं ठेवणें तो शम ( शांति ) . बाह्येंद्रियांचा निग्रह करणें ( स्वाधीन ठेवणें ) तो दम. २ उपरति म्हणजे संन्यास तो न घडेल तर निष्कामकर्मानुष्ठान किंवा व्यवहारलोप करणें. ३ प्रारब्धानें प्राप्त झालेलें शीतोष्ण दु:खादि सहन करणें ती तितिक्षा. ४ गुरुवाक्यावर विश्वास ठेवणें ती श्रद्धा. ५ श्रवणादिक होत असतां मनाचे समाधान करणें हे समाधान. ६ हीं सहा मिळून शमादिषट्क होय. चोहों बाजूंनीं घर जळत असतां धन, धान्य, स्त्री, पुत्रादिकांला सोडून घरधनी स्वतापोपशांत्यर्थ आपणच बाहेर पडून तापशांतीची जशी इच्छा करितो, तशी संसारिक तापत्रय शमन करण्याची जी तीव्र इच्छा होणें ती मुमुक्षा होय.
शिष्य :- ही चार्हीं साधनें पाहिजेत काय ?
गुरु :- कित्येकाला नित्यानित्य विचार जाहला तरी विषयाभिलाष असतो तो ज्ञानाला प्रतिबंधक होतो. म्हणून वैराग्य पाहिजे व तें असतांही कित्येकाला कोपताप होतो, म्हणून शमादिक पाहिजे व तेही असले तथापि सगुणोपासकाला मोक्षाची इच्छा होत नाहीं म्हणून मुमुक्षाही पाहिजे. अशा अधिकार्यानें हातीं उपहार ( नजराणा ) घेऊन गुरूला शरण जाऊन प्रार्थना करावी कीं, हे भगवत् जीव कोण, ईश्वर कोण, जग कसें, हें त्रय कोठून उत्पन्न झालें व याचा उपरम कसा ( शांती ) होईल असा प्रश्न करावा. श्रुतिश्च ( लोकीं नाना योनी फिरतां फिरतां शेवट प्रारब्धवशें वैराग्य उत्पन्न होतें - त्यानें ज्ञानाकरितां श्रीगुरूला ( शाब्दज्ञान आणि ब्रह्मानुभव असणार्या पुरुषाला ) हाती समिधा घेऊन शरण जावें ) स्मृतिश्च ( तत्त्वदर्शी ज्ञानी जे, त्यांना नमून प्रश्न करून सेवेनें तें ज्ञान जाणावें तेच उपदेश करतील ) असा शिष्य शरण आल्यावर गुरु सत्व, रज, तमोगुणें, ईश्वर, जीव आणि जगदुद्भव प्रकार सांगून करतलामलकवत् आत्मबोध करतात. अशा अधिकार्याला अशीं साधनें व तो गुरु मिळणें हा ईश्वरानुग्रह आणि याला पूर्वपुण्योदयच पाहिजे. हें ज्ञान देणारा गुरु ईश्वरच जाणावा. त्याच्या प्रसादें जो जीवात्म्याचा आनि ब्रह्माचा भेद निरसून टाकितो तो मुक्त होतो.
दुसरा अध्याय समाप्त.