प्राकृत मनन - अध्याय नववा

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


शिष्य :- आत्मा अवस्थासाक्षी कसा जाणावा ?
गुरु :- तमोगुन स्थूल, रजोगुण चंचल व सत्त्वगुण सूक्ष्म. तेव्हां धूमप्रवेशयोग्य छिद्रामध्यें स्तंभ जात नाहीं, चंचल दिव्याकडे बारीक लिपी वाचली जात नाहीं, तसा आत्मा राजस, तामस मनानें जाणला जात नाहीं, तसा आत्मा राजस, तामस मनानें जाणला जात नाहीं. तर सात्विक मनानेंच जाणावा. तो असा. इंद्रियांनीं बाह्य विषय घेणें, ती जाग्रदवस्था. जाग्रत्वासनेनें अन्त:करणाचा दृष्टश्रुताविषयीं भोक्तृभोग्यरूप परिणाम होतो, तें स्वप्न. सर्वोपसंहार होऊन कारणरूपानें बुद्धि राहिली असतां अज्ञानसाक्षीपणा होतो, ती निद्रा अवस्था. आपण निर्विकार साक्षात् पाहणें, तें साक्षित्व. जसें एक संन्यासी स्वस्थ बसला असतां तेथें दोन पुरुष आले व भांडून परस्परास मारूं लागले; तें सन्याश्यानें पाहिलें, म्हणून तो साक्षी. तसा आत्मा, जीव आणि जीवांचे अवस्थाव्यापार साक्षात् जाणतो, म्हणून तो (  आत्मा ) साक्षी होय.
शिष्य :- यास दृष्टांत सांगावा.
गुरु :- मोठ्या नगरासारखी जाग्रदवस्था, राजवाड्यासारखी स्वप्नावस्था, अंत:पुरासारखी निद्रावस्था. तेथें राजासारखा अभिमानी जीव. जसा राजा चतुरंग सेनेसहित मोठ्या नगरामध्यें फिरून शुभाशुभ अनुभवून त्या सैन्यास सोडून राजवाड्यांत येतो; व शुभाशुभाचा विचार करून, सर्वांचें निवारण करून, अन्त:पुरांत जाऊ, सर्व व्यापार सोडून, आनंदानें स्त्रीशीं रति घेतो; तसा जीवात्मा स्थूलशरीराभिमानी विश्व होऊन, जाग्रदवस्था भोगून ( अनुभवून ), नंतर सूक्ष्मशरीराभिमानी तैजस होऊन, स्वप्नावस्था अनुभवून, नंतर कारणशरीराभिमानी प्राज्ञ होऊन सर्व व्यापार सोडून, बुद्धीला घेऊन, स्वरूपानंदाचा अनुभव घेतो ( निजतो ). ह्या जीवाच्या तीन्ही अवस्था पहाणारा कूटस्थ आत्मा तर प्रत्यक् स्वरूपानें आकाशवत् असंग आहे. याविषयीं ( साक्षी चेता केवल निर्गुण ) ही श्रुति, आकाशदृष्टांत ही युक्ति, गेलेल्या अवस्था स्मरतात हा अनुभव.
शिष्य :- जीवच अवस्थासाक्षी मानला तर निराळा कूटस्थ साक्षी कां घ्यावा ?
गुरु :- अंत:करणप्रतिबिंबित जीव, तो झोपेंत लीन होतो. तो तीन्ही अवस्थांचा साक्षी कसा होईल ? होणार नाहीं. तेव्हां बिंबभूत आत्मा साक्षी जाणावा. कारण, त्याला अवस्था नाहींत. म्हणून तो अविकारी नित्य आहे. जीव तर अंत:करणतादात्म्यानें मी सुखी, मी दु:खी असा विकारी होतो.
शिष्य :- जीवाशिवाय दुसरा आत्मा कोण ? त्याचें लक्षण काय ? तो आहे म्हणण्यास प्रमाण काय ? व तो कसा कळावा ?
गुरु :- निर्विकार कूटस्थ आत्मा आकाशवत् सर्व व्यापक आहे. त्याचें अंत:करणांत प्रतिबिंब पडलें तोच ( प्रतिबिंब ) संसारीं जीव होय. याविषयीं श्रुतिप्रमाण आहे. तो सच्चिदानंद आत्मा ( बिंबभूत ) या वेळीं जीव जागतो, स्वप्न पहातो, या वेळीं अज्ञानानें मोहित होऊन गाढ झोप घेतो, या वेळीं उदासीन, सुखी, दु:खी आहे, इत्यादि जाणतो. तो सर्व अवस्थांचा साक्षी. स्वमुखसौंदर्य पहाणें असेल तर जसें आरशांत पहातां येतें, तसें या आत्म्याला जाणणार तर अंत:करणप्रतिबिंबानें जाणतां येतें. स्वमुख पहाणारा हा आरसा, हें सुखाचें प्रतिबिंब व त्यानें कळलेलें हें ग्रीवास्थमुख असें स्पष्ट जाणतो; तसें विचारानें हें अंत:करण, हा अंत:करणप्रतिबिंबित जीव आणि हा निर्विकार साक्षी कूटस्था आत्मा, असे तो आपणच आपणाला जाणील. कारण, तो द्रष्टा आहे. कधींही कोणाला दृश्य होत नाहीं. जसा दृश्य घट द्रष्ट्याला जाणीत नाहीं. द्रष्टा तर आपल्यासह घटालाही जाणतो. तसें स्वयंप्रकाश आत्म्याला, इंद्रियें, प्राण, अंत:करण हीं जाणत नाहींत. स्वयंप्रकाश आत्मा तर आपणांसहित सर्वांना जाणतो. हें प्रमाणानें कळतें.
शिष्य :- प्रमाणें किती व त्यांचीं लक्षणें काय ?
गुरु :- १ प्रत्यक्ष २ अनुमान ३ उपमान ४ शब्द हीं चार प्रमाणें. शिवाय १ अर्थापत्ति २ अनुपलब्धि ३ ऐतिह्य ४ असंभव हे चार त्याचेच पोटभेद आहेत. इंद्रियसन्निकर्षानें होणारें तें प्रत्यक्ष प्रमाण. पण आत्मा अतींद्रिय आहे म्हणून तें उपयोगी नाहीं. धूमादि लिंगानें होणारें तें अनुमान. आत्मा निरंश आहे म्हणून हें उपयोगी नाहीं. सादृश्यानें होणारें तें उपमान. आत्मा अद्वितीय आहे म्हणून हेंही अनुपयुक्त. बाकी शब्दप्रमाण हें आत्मज्ञानाला उपयुक्त आहे. आप्ताचें ( ईश्वराचें ) वाक्य ( वेद ) हें शब्दप्रमाण त्यानें मी अविकारी, अवस्थासाक्षी, पंचकोशांहून वेगळा असें जाणतो तो मुक्त होतो.
नववा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP