प्राकृत मनन - अध्याय अकरावा

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


शिष्य :- आत्मा सच्चिदानंदरूपी कसा ओळखावा ?
गुरु :- कालत्रयीं निर्बाध, तें सत्. ( सृष्टीच्या पूर्वी अद्वितीय एक सत् होतें. ) हें श्रुतिप्रमाण आहे. आढ्य, दरिद्री, कर्मीं, भक्त, मुमुक्षु यांचा अनुभव आहे, तो असा. मीं पूर्वीं सत्पात्रीं धर्म केला म्हणून या जन्मीं धनी जाहलों; आतांही धर्म करीन तर पुढें ऐश्वर्य भोगीन, हा आढ्याचा अनुभव. पूर्वीं धर्म केला नाहीं म्हणून दरिद्री जाहलों; आतांही मी दान न देईन तर पुढें हीच गती होईल, हा दरिद्री याचा अनुभव. पूर्वीं सत्कर्में केलीं, त्या योगें ही कर्मनिष्ठा जडली; आतांही तशीच केली तर स्वर्ग मिळेल, हा कर्मनिष्ठाचा अनुभव. पूर्वीं ईश्वराराधन केलें त्या योगें ही भक्ति जडली; आतांही तसेंच घडेल तर सरूपता मिळेल, हा भक्तानुभव. एवं, दर जन्मीं अध्यस्त देहाचा मात्र नाश होतो. पण कालत्रयीं मी आहें हें तर सर्व लोकांच्या अनुभवानें सिद्ध होतें. पुन्हां असें पहा कीं, मी येथें आहें हा सशरीर तर, हें शरीर कशानें आलें ? कर्मानें आलें. तें कर्म माझें, कीं अन्याचें ? अन्याचें कर्म, अन्याला फल देणार नाहीं. ज्याचें त्यालाच फल देईल. तेव्हां तें माझेंच कर्म, तर तें, या जन्मी केलेलें कीं पूर्वजन्मीं ? या जन्मी केल्याने हा देह कसा होईल ? तेव्हां तें कर्म पूर्वजन्माचेंच असलें पाहिजे. पूर्वजन्मीं कर्म कर्ते वेळी मी सशरीरी होतों कीं अशरीरी ? शरीर नसतां कर्म घडणार नाहीं. तेव्हां सशरीर होतों. तर तें शरीर कशानें आलें ? त्याचे पूर्वजन्मीच्या कर्मानें. एवं पुन: पुन: विचार केला तर पूर्वकाली कर्म व देहप्रवाह यांचा अंत नाहीं. त्यापेक्षां त्या दोहोंना अनुभवणारा आत्मा सद्रूप सिद्ध जाहला.  पूर्वी श्रवणादि न केलें म्हणून हें जन्म झालें. आतांही न करीन तर पुढें क्रियमाणानें पुन: जन्म होईल, व याप्रमाणें कितीही कल्प लोटले तरी पुन: पुन: जन्ममरण चुकणार नाहीं. ज्ञानानें मात्र कर्मक्षय जाहला तर पुढें जन्म होणार नाही. तोंपर्यंत आत्मा सृष्टि - प्रलय अनुभवून पापानें तिर्यग्लोक, पुण्यानें देवलोक अनुभवून राहील, नष्ट होणार नाहीं, हा भविश्य कालानुभव. तेव्हां ज्ञान न होतां किती कल्प लोटले तरी जन्ममरण चुकणार नाहीं. याप्रमाणें कालत्रयीं आत्म्याला अबाधितत्व आहे. म्हणून त्याचे ठिकाणीं सद्रूपत्व सिद्ध जहालें. सृष्टिप्रलय देहाला घडतात. आत्मा तर अज, अविनाशी आहे, हें सद्रूप. स्वयंप्रकाश तेंच चिद्रूप. आत्मा गाढांधकारामध्यें सूर्यादिकांची गरज न ठेवितां स्वयं प्रकाशमान असून स्वारोपित देहाद्यवस्था स्वयमेव जाणतो म्हणून सर्वज्ञत्वामुळें चिद्रूप जाणावा.
शिष्य :- आम्हाला सर्व ज्ञान कोठें आहे ?
गुरु :- बाह्य,  आंतर असा हा दोन प्रकारचा प्रपंच आम्ही अनेक प्रमाणानें जाणतों तो असा. हीं पंचभूतें, हीं पंचीकृत भूतें, हे विषय, हीं चतुर्विध शरीरें, हें ब्रह्मांड इत्यादि विविध नामरूपगुणकर्मशक्त्याश्रय हा बाह्यप्रपंच प्रत्यक्ष प्रमाणानें आम्ही जाणतों, पण तो आम्हांस जाणत नाहीं. हीं तीन शरीरें, हे पांच कोश, तीन करणें, या षडूर्मी, हे रागादि, हीं प्राणेंद्रियान्त: करणें, हे तीन अभिमानी, हे गुण, हें सुखादु:ख इत्यादि हा आंतर प्रपंच आम्ही जाणतों, पण तो आम्हांस जाणत नाहीं. कारण, आत्मा चिद्रूप आहे. याला कोण जाणील ?
शिष्य :- मन जाणणार नाहीं काय ?
गुरु :- उत्पत्ति, विनाश, संकल्प, विकल्प, स्मृति, विस्मृतियुक्त हें मन घटासारखें जड आहे; तें आत्म्याला कसें जाणेल ?
शिष्य :- तर ( मनानें जाणावें ) या श्रुतीचें तात्पर्य काय ?
गुरु :- अग्नीची आंच दिली असतां मलिन सोन्यावर प्रकाश येतो तो सोन्याच्या अंगचाच होता. पण ज्या मलानें झांकला होता, तो मळ जातांच दिसूं लागतो. अग्नीनेम संपादन केला असें नाहीं. अग्नीनें संपादन केला म्हणावें तर घटावर सुद्धां अग्नीनें सोन्याप्रमाणें प्रकाश आणावा, पण तसें होत नाहीं; म्हणून या उदाहरणानें असें जाणावें कीं, आत्मप्रतिबिंबसहित आत्माकार परिणत जाहलेलें मन आत्मस्वरूपावरचें मिथ्या ज्ञान दूर करतें. मग आत्मा स्वयमेव भासतो असें जाणावें. नाहींतर ( चक्षु, वाक्, मन ही आत्मस्वरूपीं जात नाहींत. ) या श्रुतीला बाध येईल. समई, वात, तेल आणि व्यापक कारणाग्नि अंधकार नाश करण्यास समर्थ होत नाहींत. तोच वर्तिसंबंधी अग्नि, दीपनामक पेटला म्हणजे स्वयें प्रकाशमान असून अंधकार दूर करितो व समई, तेल, वात वगैरे पदार्थांना दाखवितो. तसा समईरूप देहामध्यें श्रवणादि कर्मरूप तेलानें भिजलेल्या मनोरूप वातीला लागलेला आत्मरूप अग्नि ज्ञानदीप नामक होत्साता, आवरक अज्ञानांधकार दूर करून आंतबाहेर प्रकाश करितो. जसा दिवा स्वयें प्रकाशमान तसा चिद्रूप आत्मा आहे; म्हणून तो चिद्रूप जाणावा. निरुपाधिक, निरतिशय, असून नित्य असणारे जें सुख तो आनंद हें आत्मस्वरूप होय. स्रक्, चंदन आणि स्त्रीविषयादि भोगांपासून होणारें सोपाधिक सातिशयसुख अनित्य जाणावें. नित्यसुखानुभव सर्वांना झोपेंत येतो.
शिष्य :- झोपेंत दु:खनिवृत्ति मात्र भासते. तेथें सुखानुभव कोठें आहे ?
गुरु :- निजून उठलेला पुरुष मी एवढा वेळ सुखी होतों, असा अनुभव बोलतो, तेव्हां तेथें सुखच आहे. स्त्री, स्रक्, चंदनादि विषय उपाधि होत. यांपासून होणारें सुख तें सोपाधिक होय. झोपेंत तर यांपैकीं कांहींच उपाधि नाहीं; म्हणून तें सुख निरुपाधिक जाणावें. मनुष्य, गंधर्व, पितर, कर्मदेव, देव इंद्र, बृहस्पति, ब्रह्मा व ब्रह्म यांचा उत्तरोत्तर आनंद शतपट आहे. तो ब्रह्मावांचून सातिशय. सर्वोत्तर ब्रह्मानंद मात्र. निरतिशयत्वाचें लक्षण निद्रानंदाला आहे. हा शय्यादिसाधन असो वा नसो, निजणार्‍याला सर्व सुख सोडून निद्रानंद घेत असतां रूपवती स्त्री येऊन ढकलीत असतांही तो निद्रानंद घेतो. भोजनादिकाकरितां बळेंच उठविल्यावरही नेत्र झांकून पुन्हा तो आनंद घेण्यास पहातो; तो आनंद निरतिशय होय. जाग्रत्स्वप्नांमध्यें तोच आनंद अनेक वृत्तींनीं फांकतो, म्हणून अनित्य भासतो. वृत्तींनीं आवरला जातो, म्हणून सोपाधिक, सातिशय, जाणावा.
शिष्य :- कारणरूप आनंदाला कार्यरूप वृत्ति कशा आवरतात ?
गुरु :- कार्यरूप मेघ कारणरूप सूर्याला झांकतो तशा वृत्ति मूढदृष्टीनें आनंदाला झांकतात, असें वाटतें. ज्ञानी तर सर्वत्र ब्रह्मानंदानुभवच घेतो, म्हणून त्या आनंदाला नित्यत्व आहे. एवं निरतिशय, नित्य, निरुपाधिक, आनंदरूप ब्रह्म होय. याप्रमाणें मी सच्चिदानंदरूपी आत्मा आहें असा श्रवण, मनन, निदिच्यासनानें अखंडैकरस, अपरोक्षानुभव घेतो तो जीवन्मुक्त जाणावा.
अकरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP