अध्याय दुसरा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥ श्रीगणेशाय नम: ॥
ॐ नमो सद्गुरू परात्परा ॥ सर्वयापका निर्विकारा ॥ कृपा करोनी सर्वेश्वरा ॥ मज पामरा तारावें ॥१॥
तुमचें होतां दर्शन ॥ मी झालोंजी पावन ॥ जेणें करूनी होय ब्रह्मज्ञान ॥ ते मज खूण सांगिजे ॥२॥
तूं पतिताचा पावन ॥ अनाथाचा नाथ पूर्ण ॥ मज सांगोनी अनुभव खूण ॥ करा पावन कृपाळुवा ॥३॥
घडीघडी पळपळ ॥ वय नेतो माझें काळ ॥ यास्तव सुटली तळमळ ॥ जीवीं शांति न होयसि ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस ॥ यांहीं केलें कासाविस ॥ पडला वासनेचा पाश ॥ वाढ्ला सोस संसाराचा ॥५॥
रात्रंदिवस चिंता करी ॥ स्थिरता नाहीं क्षणभरी ॥ ऐसा आकांतवर्तला भारी ॥ धांव झडकरी गुरूराया ॥६॥
मागील अध्यायीं आपण ॥ मज दिधलें अभयदान ॥ जें पुढिले अध्यायीं सांगेन ॥ तेंचि आतां सांगावें ॥७॥
जेणें करूनि तुम्हांस संतोष झाला ॥ तेंचि सांगावें जी दयाळा ॥ तोडी विषयाची श्रृंखळा ॥ दाविजे कळा ज्ञानाची ॥८॥
तुमचे चरणीं माझी प्रीत ॥ काया वाचा बैसली सत्य ॥ जेणें होय माझें हित ॥ तेंचि त्वरित करावें ॥९॥
जरी सांगाल संस्कृत वाणी ॥ तरी नकळे मजलागुनी ॥ बोधा महाराष्ट्रवचनीं ॥ जो निजमनीं ठसावा ॥१०॥
मीच आधीं अज्ञान ॥ नाहीं शब्दार्थाचें ज्ञान ॥ म्हणून महाराष्ट्रवचनें ॥ बोध आपण करावा ॥११॥
ऐसें ऐकोन वचन ॥ बोलिले सद्गुरू ज्ञानपंचानन ॥ म्हणे बापा सावधान ॥ सांगतो खूण जीवींची ॥१२॥
ज्ञानेश्वर नामदेव आपण ॥ त्याहीं मज सांगितली खूण ॥ तें रत्नाकरा तुज लागोन ॥ ब्रह्मज्ञान सांगतों ॥१३॥
मजही त्यांची आज्ञा प्रमाण ॥ आतां होईं सावधान ॥ जेणें होय तुझें समाधान ॥ तेंचि ज्ञान सांगतों ॥१४॥
परि तूं आतां येक करीं ॥ मन बैसवीं कर्णद्वारीं ॥ शब्द श्रवण केलियावरी ॥ मननिर्धारीं करावें ॥१५॥
उदंड ऐकिती कथा कीर्तन ॥ परी कोणी नच करिती मनन ॥ मनना वेगळें ज्ञान ॥ नोहे जाण कल्पांतीं ॥१६॥
शर्करा म्हणतां वाचेसी ॥ जरी गोडी येती जिव्हेसी ॥ तरी श्रवणेंचि ज्ञानासी ॥ रिग प्राण्यासी होती कीं ॥१७॥
भोजन म्हणतां होय तृप्ती ॥ कीं जीवन म्हणतां तृषा हरती ॥ तरी स्वयंपाक यथास्थिती ॥ कासया करिती लोक सर्व ॥१८॥
तैसें श्रवणेंचि होतें ज्ञान ॥ तरी किमर्थ करावें मनन ॥ ऐकतां वाराणसीचें महिमान ॥ घडातें स्नान भागीरथींचें ॥१९॥
तरी आतां अति प्रयत्नें करून ॥ कां वाराणशीस जाते जन ॥ म्हणोन मननाविना ज्ञान ॥ नव्हे जाण सर्वथा ॥२०॥
चालिल्याविण न चाले पंथ ॥ तैंसे मननाविण नव्हे हित ॥ भोजनावेगळी तृप्त ॥ नोहे सत्य जाणिजे ॥२१॥
औषध म्हणतांचि आपण ॥ दु:ख जातें जरी निघोन ॥ तरी श्रवणें ज्ञान ॥ मननेंविना होतें कीं ॥२२॥
म्हणोन जें जें करिती श्रवण ॥ तें तें कीजे गा मनन ॥ मननावेगळें वैराग्य पूर्ण ॥ नव्हे जाण निश्चयें ॥२३॥
वैराग्यावेगळें साधन ॥ नोहे नोहे सत्य जाण ॥ तरी वैराग्य म्हणसी कोण ॥ तेंही लक्षण सांगतों ॥२४॥
अणूपासून ब्रह्मांडावरी ॥ काकविष्ठाबरोबरी ॥ येक पाहे चराचरी ॥ तेंचि निर्धारीं वैराग्य ॥ २५॥
जें जें मन बुद्धीस आलें ॥ तें वमनप्राय मानिलें ॥ आपणा आपण जाणितलें ॥ तेंचि बोलिलें वैराग्य ॥२६॥
मी आहें ब्रह्म सदादित ॥ ऐसी भावना अखंड करित ॥ समदृष्टि असे देखत ॥ तेचि वस्तु वैराग्य ॥२७॥
शरीरभावना सांडोन ॥ अखंड निरालंबी ठाण ॥ वर्ततो साक्षी होऊन ॥ तेंचि जाण वैराग्य ॥२८॥
कर्म त्रिगुणापासूनि होत ॥ तो मी असें गुणातीत ॥ ऐसें म्हणोनि झाला निर्हेत ॥ म्हणती सत्य वैरागी ॥२९॥
हें सर्व स्वप्नवत् जाणोन ॥ सुखदु:खातीत आपण ॥ जाणोन चाले विधियुक्त स्थापून ॥ तेचि खूण वैराग्याची ॥३०॥
मीतूंपणासी सोडून ॥ राहिला सहजासहजी होऊन ॥ प्रपंचतृष्णेतें सांडून ॥ करी भजन तो वैरागी ॥३१॥
शरीर अशनवसन ॥ तें तों असे प्रारब्धाधीन ॥ ऐसे जाणोनि करी भजन ॥ तोचि पूर्ण वैरागी ॥३२॥
प्रारब्धाचें करूनि आसन ॥ वर करी निश्चयाचे ठाण ॥ सर्व संदेह सांडून ॥ करी कीर्तन वैरागी तो ॥३३॥
काळवेळ न म्हणत ॥ प्रेमें नामगर्जना करीत ॥ साळ्याभोळ्यांचें बोधित ॥ तोचि निश्चित वैरागी ॥३४॥
आळस निद्रेतें सांडून ॥ निंदा स्तुति त्यागून ॥ अखंड करिती मनन ॥ असे ज्ञानवैराग्य तें ॥३५॥
आकाश पडतां कोसळोन ॥ परि न डळमळे आपण ॥ म्हणे मी अविनाश पूर्ण ॥ मज कोण बाधों शके ॥३६॥
मीच अढळ अचळ अविनाश ॥ या सर्वांचा मजमाजी वास ॥ स्वप्नाऐसा होय भास ॥ कासाविस नोहेचि कीं ॥३७॥
ऐसा जो धैर्यवंत ॥ तोचि वैरागी गा सत्य ॥ हरिभजनीं ज्यासी आर्त ॥ विषयीं अनार्त वैरागी तो ॥३८॥
ब्रह्म अनिर्वाच्य अनादि ॥ तेथें कायसी उपाधी ॥ ऐसें जाणोन द्वंद्वछेदी ॥ तोचि सद्धोधी वैरागी ॥३९॥
निर्विकार ब्रह्म जाणोन ॥ ब्रह्मरूप झाला आपण ॥ वरी कल्पनेचें छेदन ॥ तोचि निर्वाण वैरागी ॥४०॥
हेचि वैराग्यासी स्थिती ॥ वेदशास्त्रें बोलताती ॥ याविण जे वैराग्य करिती ॥ ते शिणती वायंचि ॥४१॥
हें ज्ञानयुक्त वैराग्य ॥ वस्तुलाभांचे भाग्य ॥ हे जाणती योगी चांग ॥ राहाती मग निर्विकल्प ॥४२॥
इतर वैराग्य ते विटंबना ॥ ज्यामासी उदंड कल्पना ॥ परस्परें वाद करिती नाना ॥ तेचि जाण अवैरागी ॥४३॥
जें जें मन बुद्धीसीं आलें ॥ तें सत्यचि मानलें ॥ शब्दब्रह्मीं जें गुंतलें ॥ तेंचि बोलिल अवैराग्य कीं ॥४४॥
ऐसें जाणोनियां चित्ता ॥ तूं सावध होंईं आतां ॥ वैराग्य धरूनियां सुता ॥ श्रवण तत्त्वतां करावें ॥४५॥
शुद्ध वैराग्याचें लक्षण ॥ तुज सांगितलें विवरोन ॥ हें आपुले मनीं धरून ॥ करीं श्रवण वैराग्यासीं ॥४६॥
शब्द निघतां मुखांतुनी ॥ वरिच्यावरी घ्यावे झेलोनी ॥ जैसा चकोर चंद्रामृतालागुनी ॥ मोठ्या श्रद्धेनें घेतसे ॥४७॥
तैसें शब्दचातुर्ये - करून ॥ सर्वांस होईल समाधान ॥ परी अर्थ तोचि आर्तेविण ॥ प्राप्त जाण नोहेची ॥४८॥
चंद्र सर्वत्र प्रकाशत ॥ शीतळ सर्वांसीं लागत ॥ परी अमृत चकोराशीं प्राप्त ॥ अति प्रीत म्हणोनी ॥४९॥
श्रवण करोनी मनन करीत ॥ तेंचि जाणावें आर्तभूत ॥ निजध्यानीं जो राहत ॥ त्यासी प्राप्त पूर्ण तें ॥५०॥
आर्त म्हणिजे श्रद्धापूर्ण ॥ श्रद्धेविना नव्हे ज्ञान ॥ जैसी कन्या रजोदर्शनाविण ॥ गर्भ जाण न धरीच ॥५१॥
येक ते अधोकमळाचें रजोदर्शन ॥ तेथें तो गर्भ न संभवे जाण ॥ तैसें तें ज्ञान श्रद्धेविण ॥ प्राप्त साधकां नव्हेचि ॥५२॥
ज्ञानयुक्त श्रद्धा होये ॥ तेचि ऊर्ध्वमुख पाहें ॥ तेथेंचि विज्ञानगर्भ राहे ॥ म्हणोन सोय धरावी ॥५३॥
अधोमुखी कमळ असे ॥ तेथें गर्भ न संभवे सायासें ॥ ऊर्ध्वमुखी अनायसें ॥ सावकाश गर्भ धरी ॥५४॥
अधोमुखी रजोदर्शन ॥ ते जाणावी श्रद्धा अज्ञान ॥ उदंड करितां श्रवण पठण ॥ परी ज्ञान नोहेचि ॥५५॥
ऊर्ध्वमुख श्रद्धेचें रजोदर्शन ॥ तेथें विज्ञानगर्भ संभवे जाण ॥ गुरूमुखें करितां श्रवण ॥ होय निर्विकल्प तत्काळीं ॥५६॥
म्हणोनि शब्द श्रद्धेवीण ॥ केल्या करवेल मनन ॥ मननें निजध्यासीं आपण ॥ सहज करूनी राहता ॥५७॥
श्रवण मनन निजध्यास ॥ सद्गुरूकृपेने आत्मलाभास ॥ आत्मत्व भासे होय प्रकाश ॥ तुटती पाश देहाचे ॥५८॥
देह जड अचेतन ॥ त्यासी तूं म्हणसी सज्ञान ॥ येणें तुज देहाभिमान ॥ सहज करोनी ऊठतो ॥५९॥
तूं तंव देहाचा चाळक अससी ॥ देहेंच मी ऐसें जाणसी ॥ अरे देह आणि तुजसीं ॥ नातें सहसा असेना ॥६०॥
देह मूढ अचेतन ॥ तुझ्यानें होय सचेतन ॥ तूं तों परिपूर्ण चैतन्यघन ॥ पाहें परतोन आपणासीं ॥६१॥
मुक्ततेचा धरिसी अभिमान ॥ तरी तूं मुक्तचि आहेसि जाण ॥ बद्धतेची कल्पना करून ॥ बळेंचि बंधन करूनि घेसी ॥६२॥
पंचभूतें आणि त्रिगुण ॥ यांपासून सर्व निर्माण ॥ तूं याचा जाणता याहून ॥ अससी जाण वेगळाचि ॥६३॥
तूं पृथ्वी न जळ होसी ॥ अग्नि ना वायु होसी ॥ तूं साक्षी आकाशीं ॥ ब्रह्म आहेसी स्वत:सिद्ध ॥६४॥
तूं नव्हेसि विप्रादि वर्ण ॥ आश्रमी नव्हेसी आपण ॥ सर्वांचा साक्षी सर्वांहून ॥ ब्रह्मपूर्ण तूंचि तूं ॥६५॥
तूं भ्रमें भुलोनि आपण ॥ म्हणसी मीच देह जाण ॥ सुख दु:ख घेसी मानोन ॥ साक्षीपण विसरोनि ॥६६॥
तूं प्रकाशरूप सुंदर ॥ देह मळमूत्राचें माहेर ॥ अस्थिमांसाचें कोठार ॥ पाहें विचार करूनियां ॥६७॥
देहामाजी भरले विकार ॥ ते असत्याचें भांडार ॥ देह नाशिवंत साचार ॥ सांडीं वेव्हार याचा तूं ॥६८॥
अरे देह अनित्य आहे ॥ क्षणक्षणा नाश तुझाये ॥ वाळुकायंत्रन्याय होय ॥ मिथ्या काय भुललासी ॥६९॥
शरीर चालवितो प्राण ॥ तो तूं प्राणाचाही प्राण ॥ तुज आदि मध्य अवसान ॥ नाहीं जाण निश्चयें ॥७०॥
तूं मुळींचा असंग आहेसी ॥ साक्षित्वें सर्व चालविसी ॥ परी भ्रांतिगुणें नेणसी ॥ विसरलाशी आपणा ॥७१॥
जैसा जातीचा ब्राह्मण असे ॥ त्यांशीं भूतसंचार झाला असे ॥ तेणें त्यासीं ज्ञान नसे ॥ बरळतसे भलतेंचि ॥७२॥
त्यास पुसतां तूं कोण ॥ ते म्हणे मी मांग आपण ॥ तरी काय त्यांचे ब्राह्मणपण ॥ गेलें जाण निश्चयेंसी ॥७३॥
तो ब्राह्मण असे सत्य ॥ परी भूतसंचारें असे बरळत ॥ तैसा आत्मभ्रम तुज होत ॥ धरीं हेत मुळींचा ॥७४॥
तूं आपणा आपण नेणसी ॥ तेणेंचि भ्रांति संचरली तुजशी ॥ म्हणोनि देह मी म्हणसी ॥ ब्रह्मत्वासी विसरोनी ॥७५॥
सद्गुरूवाक्य ऐकोनी ॥ बोले रत्नाकर कर जोडुनी ॥ हे येळवेळ परतोनी ॥ वेगळें करोनी सांगावें ॥७६॥
रत्नाकरा तूं तों अज्ञान ॥ झालासि मायामोहें करून ॥ तुझें तुजला नाही ज्ञान ॥ तुज हें पूर्ण सांगावें ॥७७॥
आधीं तुझीं वोळख करूं ॥ मग सांगूं पूर्ण विचारू ॥ जेणें हा भवसागरूं ॥ उतरोनि पार जाइजे ॥७८॥
अरे हा मिथ्या आहे ॥ मृगजळाच्या परी भासताहे ॥ जैसें निद्रेसंगें स्वप्न होये ॥ परी तें काय सत्यचि ॥७९॥
अरे सत्य जरी असतें ॥ तरी नाशातें न पावतें ॥ याचे जे कांहीं जाणते ॥ ते तुझे तुज दाखऊं ॥८०॥
तें तूं स्वयेंचि आहेसी ॥ आणि आपणा मीच म्हणसी ॥ तें मीपण स्थापुनि देहासीं ॥ घात करिसी आपुला ॥८१॥
ब्रह्मीचें जें मीपण पूर्ण ॥ तें तूं म्हणसी देह आपण ॥ येणेंचि बद्ध झालासि पूर्ण ॥ नकळेचि खूण हिताची ॥८२॥
आतांचि देहीं मीपण सांडोन ॥ तूं म्हणसी मी ब्रह्म पूर्ण ॥ सर्व हें झालें मजपासून ॥ मी विलक्षण याहुनी ॥८३॥
ऐसें जेव्हां तूं मानिसी ॥ तेव्हांच गा सुख पावसी ॥ हें उपनिषदांचे गुह्य तुजसी ॥ अत्यादरेंसी सांगितलें ॥८४॥
सावध होऊनियां आतां ॥ ऐक बापा ब्रह्मकथा ॥ जेणें हरे जन्मव्यथा ॥ पावे पूर्णता तात्काळ ॥८५॥
अरे तूं आहेसी ब्रह्मपूर्ण ॥ परी भ्रमें झालासि देहबंधन ॥ जैसें रज्जूस सर्पपण ॥ अंध:काराकरोनि आलेंसे ॥८६॥
जंववरी अंधकार आहे ॥ तोंवरी सर्प भासताहे ॥ प्रकाश होतांचि पाहे ॥ कोणा काय मारील ॥८७॥
तैसें त्रिगुणाचे अंध:कारें ॥ ब्रह्मीं भास दृश्याकारें ॥ परि नसेचि गा खरें ॥ मानीं वचनासी निर्धार ॥८८॥
या त्रिगुणाचे योगेंकरून ॥ ब्रह्मही माया भासे जाण ॥ ज्ञानप्रकाशें पाहतां पूर्ण ॥ ब्रह्म आपण स्वयेंचि ॥८९॥
मग प्रकाशे प्रकाश ॥ झाला असे सावकाश ॥ पाहों जातां अज्ञान आस ॥ ठाव वस्तीस नाहींस कीं ॥९०॥
तूं म्हणसी देह मी आपण ॥ परी हे जड केवळ अचेतन ॥ तूं याचा जाणता याहोन ॥ साक्षी करोनि वर्तसी ॥९१॥
अरे तूं यावेगळा आहेसी ॥ म्हणोन शुभाशुभ जाणसी ॥ जाणोनि अलिप्त अससी ॥ जैसा घरासी दीपक ॥९२॥
घरामध्यें दीप आहे ॥ परी गृहकर्मासी लिप्त नोहे ॥ तैसें आपणा शरीर पाहे ॥ सांडीं सोय कल्पनेची ॥९३॥
अरे हे सर्व साक्षित्वें वर्तती ॥ आणि वेगळेपणाची बोली बोलती ॥ परि ते नकळे कवणाप्रती ॥ मीच म्हणती देहातें ॥९४॥
माझा देह ऐसे बोलताती ॥ परी मीच देह ऐसें न म्हणती ॥ मी वेगळा ऐसें दाविती ॥ परि नेणती देहसंगें ॥९५॥
यदर्थी येक दृष्टांत ॥ सांगतों येथें देईं चित्त ॥ तूं ऐकोनि मानी सत्य ॥ तेणें हित होईळ रे ॥९६॥
जैसा जळामाजी उभा राहात ॥ तों आपणासी जळामाजी देखत ॥ बुडालों म्हणोनि बोंब मारित ॥ नाहीं हेत आपुला ॥९७॥
आण तडीसीं उभा राहे ॥ जळासीं त्यांसी संबंध काय ॥ जळ पाहतां आपुला भास होय ॥ म्हणोनि मारीतो हांका ॥९८॥
तो जरी जळामाजी बुडता ॥ तरी बुडाला कोण म्हणता ॥ बोंबेचा नाद कैसा होता ॥ तैसी तुजला अहंता नाथिली ॥९९॥
तूं जरी देह असतासी ॥ तरी देहकर्मासी न जाणतासी ॥ पापपुण्यें न वर्ततासी ॥ धरीं मानसीं खूण हे ॥१००॥
तैसा जो जळीं बुडाला ॥ तो बोंबसकट गेला ॥ मग आठवण नाहीं त्याला ॥ वाहवला प्रवाहीं ॥१॥
मी मेलों ऐसिया प्रेता ॥ कोणी देखिलें सांगतां ॥ हे अवघी मिथ्या वार्ता ॥ होईं आतां सावध ॥२॥
मी बुडालों ऐसें बोंबलत ॥ म्हणून तो बुडालों म्हणत ॥ तैसा तूं देह सलिलीं आपला देखत ॥ म्हणून मानिसी देह मी ॥३॥
तो तडीस असतां बुडालों म्हणत ॥ तैसा तूं असशी देहातीत ॥ म्हणवोनि देहकर्मांतें जाणत ॥ मानी सत्य वचनाशीं ॥४॥
मी अज्ञान ऐसें म्हणत ॥ तरी काय अज्ञान अज्ञाना दावित ॥ तरी देह मानीं रे असत्य ॥ ज्ञान म्हणत अज्ञान मी ॥५॥
मीं देह या भ्रमेंकरोन ॥ ज्ञानचि म्हणे मी अज्ञान ॥ जसा जळीं देखे आपणा आपण ॥ बुडालों म्हणूनि बोंबलत ॥६॥
तैसा तूं देहसंगें करोन ॥ मिथ्या मानोन घेशी बंधन ॥ मग मी म्हणशी अज्ञान ॥ करा पावन मजलागीं ॥७॥
अज्ञान म्हणतां ज्ञान आहे ॥ तैसा देह म्हणतां विदेही पाहें ॥ म्हणवोन देहकर्म जाणता हें ॥ मुळींच आहे साक्षित्वें ॥८॥
त्या साक्षित्वा विसरोन ॥ तूं म्हणशी देह आपण ॥ मीपण ब्रह्मचि जाण ॥ सांडीं भान भ्रांतीचें ॥९॥
शस्त्र जरी आपणा जाणतें ॥ कीं मी प्रवर्ततो घातातें ॥ तें जड ज्ञान कैचें त्यातें ॥ परि शूरातें कळे सर्व ॥११०॥
शस्त्र धरोनियां करीं ॥ शस्त्रचि दुसरियातें मारी ॥ परी तें शस्त्र नेणेचि निर्धारीं ॥ जाणें अंतरीं शूर तो ॥११॥
तैसा तूं देह वर्तविशी ॥ जैसा चुंबक चालवी लोहाशीं ॥ म्हणवोन देहकर्मातें जाणशी ॥ साक्षी आहे देहाची ॥१२॥
विष जरी आपणा जाणतें ॥ माझ्या योगें घात जगातें ॥ तरी अज्ञान आपणातें दावितें ॥ सांडीं चित्तिं कल्पना ॥१३॥
पाषाण जरी आपणा आपण ॥ म्हणता मी आहें पाषाण ॥ तरी अज्ञानाचा अज्ञान ॥ जाणते जाण निश्चयीं ॥१४॥
कांटा रूतता आपणा आपण ॥ तरी अज्ञान म्हणे ज्ञान ॥ पावक जाणता दाहकपण ॥ तरी हें ज्ञान जाणते ॥१५॥
नपुंसकाचे कन्येचा ॥ जरी जन्मकाळ करिता पुत्र वांझेचा ॥ तरी अज्ञान अज्ञानाचा ॥ करितो साचा निर्धारें ॥१६॥
चित्रामाजील पुतळी ॥ जरी बुडती मृगजळीं ॥ तरी ज्ञानाची रांडोळी ॥ जळमेळीं करिते गा ॥१७॥
चित्रींचे अग्नि - करोन ॥ जरी जळतें वन ॥ तरी अज्ञान इच्छित आपण ॥ म्यां पावन व्हावें कीं ॥१८॥
म्हणवोन मुळींच नाहीं अज्ञान ॥ अज्ञान म्हणे तेंचि ज्ञान ॥ परी हें देहसंगें भ्रमण जाण ॥ मी अज्ञान मानीत ॥१९॥
जैसा भूत संचारलेला ब्राह्मण ॥ म्हणे मी धेड मांग आपण ॥ तैसें देहसंगें ज्ञान ॥ मी अज्ञान म्हणत कीं ॥१२०॥
तरी धेडमांगातें वाच्यांश ॥ आणि ब्राह्मणातें लक्षांश ॥ तैसें अज्ञान हे वाच्यांश ॥ लक्षांश ज्ञान कीं ॥२१॥
म्हणवोन तूं अज्ञान नोहेशी ॥ मुळींचा ज्ञानरूपी आहेशी ॥ म्हणवोन सर्वां जाणतोशी ॥ मिथ्या भ्रमशी देहसंगें ॥२२॥
ज्या ज्या शरीरीं चेष्टा होत ॥ त्या त्या तूं असशी जाणत ॥ तूं शरीर नोहेशी सत्य सत्य ॥ धरीं हेत जीवीं हा ॥२३॥
रत्नाकरा तूं देह नोहेसी ॥ मी देहचि इंद्रियें कैसा होशी ॥ चौ देहेंचा साक्षी आहेसी ॥ मिथ्या जल्पशी भ्रमगुणें ॥२४॥
तरी चारि देह ते कोण कोण ॥ ऐसें करिशी अनुमान ॥ तरी स्थूल सूक्ष्म कारण ॥ चौथा महाकारण जाणिजे कीं ॥२५॥
तूं चौ देहांचा जाणता ॥ असशी जैं देहांपरता ॥ आतां सांडोनियां अहंता ॥ ब्रह्मसाम्यता साधीं वेगें ॥२६॥
तूं एक आत्मा चराचरीं ॥ पिंडब्रह्मांड तुजमाझारीं ॥ तूं त्या सबाह्यअंतरीं ॥ व्यापक निर्धारीं अससी ॥२७॥
जें कांहीं ब्रह्मांडामाजी आहे ॥ तें तूं या पिंडीं पाहें ॥ पिंड त्यागिल्यानें ब्रह्मांड जाय ॥ मग सुख राहे खालतें ॥२८॥
जोंवरीं पिंडब्रह्मांडाचें भान ॥ अखंड करिती विवरण ॥ जीवदशा भुलली जाण ॥ प्राप्त पूर्ण नाहीं त्यासीं ॥२९॥
जीव शिव माया ब्रह्म ॥ हा जाणावा महाभ्रम ॥ नेणती परवस्तूचें वर्म ॥ झाले सकाम देहसंगें ॥१३०॥
पिंडब्रह्मांड शब्दीं आली ॥ वस्तु शब्दातीत संचली ॥ जैशी तैशी उरली ॥ मनें कल्पिली नवजाय ॥३१॥
जे परावाचा परते ॥ एकचि व्यापक सर्वांतें ॥ कर्मी भासोन अकर्ते ॥ आकाश जळातें अलिप्त जैसें ॥३२॥
आकाश जैसें जळीं भासे ॥ भासोनियां कोरडेंचि असे ॥ जळायोगें हालत दिसे ॥ परी तें असे वेगळेंची ॥३३॥
तैसें गुणपरत्वें कर्म भिन्न ॥ सहज होतसे जाण ॥ तूं त्या कर्माशीं आपण ॥ साक्षित्वें करोन जाणशी ॥३४॥
पिंडब्रह्मांडीं वस्तू असे ॥ अनुभवी जाणोनि ऐसें ॥ सांडोनियां देहपिसें ॥ स्वप्रकाशे वर्तती ॥३५॥
तरी तूं आतां एक करीं ॥ मनवृत्तीतें आवरीं ॥ सहजस्थिती करोन कर्म करीं ॥ ब्रह्म निर्धारी तूंचि तुझा ॥३६॥
जैसें भिंतीवरी चित्र लिहिती ॥ तैशी तुझ्याठाईं चौं देहांची वस्ती ॥ भुतें अवस्थादिक भासती ॥ नाना स्थिती रंगाची ॥३७॥
हे कल्पना चितारण ॥ चित्रें करितां झालें जाण ॥ निर्विकल्पाचे हातें करोन ॥ टाकी पुसोन उतावेळ ॥३८॥
हें सर्व कल्पनीक आहे ॥ भवभयें मिथ्या पाहें ॥ निर्विकल्प होतांचि जाये ॥ ब्रह्मत्व ये अंगाशीं ॥३९॥
ब्रह्म निर्विकारचि आहे ॥ आणि निर्विकल्पाचे अनुभवा ये ॥ ऐसें जाणोनि सावधान होये ॥ तुज तूं पाहें परतोनी ॥१४०॥
पिंडब्रह्मांड तुझे ठाईं असती ॥ जशी गगनीं दिवस आणि रात्री ॥ असोन गगन दोघांप्रती ॥ सहजस्थिती अलिप्त ॥४१॥
जैसें सूर्याचे अंगीं दिवसरात्र ॥ परी सूर्य दोघांसीं अलिप्त ॥ तैसें पिंडब्रह्मांड तुझे न भासत ॥ तूं अतीत दोघांशी ॥४२॥
तरी जोंवरी जीवाचा अभिमान ॥ आणि कल्पनेचें अधिष्ठान ॥ तेंचि ब्रह्मांडीचें विवरण ॥ निर्विकल्प जाणों न शकेचि ॥४३॥
तरी आतां कल्पना सांडोन ॥ राहें निर्विकल्प होऊन ॥ पिंडींचें सांडितां भान ॥ ब्रह्मांड जाण जातसे ॥४४॥
आता पिंडाचें झालें निरसन ॥ ब्रह्मांडाचें होय जाण ॥ जैसें सुत त्यागें पटही आपण ॥ सहज करोन त्यागिलें ॥४५॥
गूळ त्यागें गोडी देख ॥ मृत्तिका त्यागें घटादिक ॥ धन त्यागें विषयसुख ॥ सहजचि देख त्यागिलें ॥४६॥
ममता त्यागितां शोक ॥ अभिमान त्यागें दु:ख ॥ संगत्यागें हरिख ॥ सहजचि देख त्यागिलें ॥४७॥
रूपत्यागें काम गेला ॥ उदकत्याग रस गेला ॥ अग्नि त्यागी उष्णतेला ॥ सहज झाला अभाव ॥४८॥
प्रपंचत्यागें लौकिक ॥ हेतुत्यागें संकल्प ॥ वैखरी त्यागें जल्प ॥ सहज देख त्यागिलें ॥४९॥
मनत्यागें कल्पना ॥ कल्पनात्यागें जीवित्व जाणा ॥ जीवित्वत्यागें शिवपणा ॥ आपणा आपण येतसे ॥१५०॥
शिवत्यागें ब्रह्म पूर्ण ॥ स्वत:सिद्धचि आहे जाण ॥ तैसें पिंडत्यागें ब्रह्मांड आपण ॥ सहज करोन त्यागवलें ॥५१॥
जोंवरी पिंडीं आहे प्रीत ॥ तोंवरी ब्रह्मांडी आहे सत्य ॥ तूं तों पिंड - ब्रह्मांडा अतीत ॥ अससी जाण दोघांतें ॥५२॥
जैसे आपले झांकितां डोळे ॥ असतांचि सर्व मावळे ॥ रात्रंदिवस कांहीं नकळे ॥ तैसें पिंडत्यागें ब्रह्मांड जातसे ॥५३॥
जें जें नेत्रीं देखिलें ॥ तें नेत्र झांकतांचि हारपलें ॥ ब्रह्मांड मनें कल्पिलें ॥ मन त्यागिलें ब्रह्मांडही ॥५४॥
ब्रह्मांड श्रवण ऐकिलें ॥ आणि मनें करोन कल्पिलें ॥ तें मन त्यागितां ब्रह्मांड गेलें ॥ ऐक्य झालें परब्रह्म ॥५५॥
ब्रह्मांडी भासला तो शिव ॥ पिंडी भासला तो जीव ॥ दोघे त्यागितां वाव ॥ जीवशिव झालेती ॥५६॥
ऐसें ऐकोन वचन ॥ बोले रत्नाकर कर जोडून ॥ कैसें करावें पिंडाचें निरसन ॥ ते खूण सांगिजें ॥५७॥
स्वामींचें ऐंकता वचन ॥ अति आल्हादे माझें मन ॥ सांगावें वेगळें करोन ॥ जेणें खूण बाणेजी ॥५८॥
कृपा करोनियां दयाळें ॥ करावें पिंडब्रह्मांडावेगळें ॥ पुरवावे बाळकाचे लळे ॥ उघडावे डोळे ज्ञानाचे ॥५९॥
आधीं मज ज्ञानदृष्टि देवोन ॥ सांगा पिंडब्रह्मांडाचें कथन ॥ होय कल्पनेचें निर्दळण ॥ म्हणवोन चरण धरियले ॥१६०॥
तवं सद्गुरूने करीं धरूनी ॥ उठविलें त्याला तत्क्षणीं ॥ भला भला म्हणवोनी ॥ कृपा करोनि आश्वासिलें ॥६१॥
आहा निर्विकल्प होऊन ॥ बैसे बापा सावधान ॥ पुढिले अध्यायीं सांगेन ॥ अध्याय येथोन जाहला हा ॥६२॥
द्वितीयोsध्याय पूर्ण झाला ॥ आतां तृतीयोsध्याय: आरंभिला ॥ रामानंद म्हणे रत्नाकरा वहिला ॥ चित्त कथेला दीजे बापा ॥६३॥
पुढें अपूर्व निरोपण आहे ॥ जेणें ब्रह्म अनुभव होय ॥ तें सांगेन जीवींचें गुह्य ॥ श्रवणीं होय सादर ॥६४॥
सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥१६५॥
इति श्रीचिदादित्यप्रकाशे दीपरत्नाकर ग्रंथे वैराग्ययोगोनाम द्वितीयोध्याय: ॥२॥ओंव्या॥१६५॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥    ॥
॥ इति दीपरत्नाकर द्वितीयोsध्याय: समाप्त: ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP