अध्याय बारावा

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


॥ श्री गणेशाय नम: ॥
जय जय सद्गुरु आदिनाथा ॥ पतित पावना समर्था ॥ तूं मनबुद्ध्यादिकां परता ॥ तुझी सत्ता सर्वत्रीं ॥१॥
तूं जैसा तैसा व्यापक ॥ अससी अनेकीं एक ॥ माझा हरोनी सर्व शोक ॥ दिल्हें सुख कृपाविधि ॥२॥
ज्यामाजी दु:ख नाहीं ॥ जें प्रकाशिलें सर्वां ठाईं ॥ तेथें तर्कातर्क न चले कांहीं ॥ तेचि सोई लाविलें ॥३॥
ज्यासाठीं योगी तप करिती ॥ गृहदारा सोडून वन सेविती ॥ भगवीं वस्त्रें नेसोनि हिंडती ॥ परी नव्हे प्राप्ती जयाची ॥४॥
एक सर्वस्वीच उदार ॥ भक्ति करावया तत्पर ॥ ज्या वस्तूसाठीं निरंतर ॥ ते मज साचार भासविलें ॥५॥
द्वैतातें निरसून ॥ केलें मज ब्रह्मपूर्ण ॥ सांगितलें ब्रह्मकर्मालागुन ॥ आत्मत्व आहिक्यबोधें ॥६॥
कर्म ब्रह्मरूपचि केलें ॥ जेथींचें तेथें स्थापिलें ॥ आणि वेदमर्यादेतें पाळिलें ॥ मार्गीं लाविलें अज्ञानासी ॥७॥
धन्य धन्य तुमची वाणी ॥ फेडिली ज्ञानाची सिराणी ॥ जेथें बोध होय ज्ञाना लागुनी ॥ तें नाना वचनीं बोधिलें ॥८॥
तुझ्या बोधाची नवलपरी ॥ प्रथम निरसले देह चारी ॥ आत्मानुभव निर्धारीं ॥ बरव्यापरी केलासे ॥९॥
त्या आत्मानुभवेंकरून ॥ सर्वत्रीं भासला नारायण ॥ हरपलें मीतूंपणाचें भान ॥ जैसें अभ्र जाण गगनीं विरे ॥१०॥
अभ्र विरोनी जाय गगनीं ॥ गेलें गगनचि होऊनी ॥ तैसें मीतूंपण दोन्ही ॥ सबाह्य होउनी डुल्लत ॥११॥
जैसें गारेचें उदक झालें ॥ कां तें जळरूप विरघलें ॥ द्वैत नासोन एक उरलें ॥ मीतूं गेलें यापरी ॥१२॥
तरंग विरोनी सागर झाले ॥ कीं वृक्षीं बीज सामावलें ॥ कीं कापड तंतुचि झालें ॥ तैसे मीतूंपण गेलें तव कृपें ॥१३॥
कीं मळ आटोनी सुवर्ण झालें ॥ तैसें एकीं एक सामावलें ॥ ऐसें मज अनुभवासी आलें ॥ मीतूं वेंचलें ब्रह्म - त्वीं ॥१४॥
ऐसें मीतूंपणासीं निरसून ॥ केलें ब्रह्मचि परिपूर्ण ॥ सर्व देहातें सोडून ॥ साक्षी करोनी ठेविलें ॥१५॥
आधीं पूर्ण ठसाउनी ॥ मग स्थापिलें कर्मालागुनी ॥ नाना दृष्टांत देऊनी ॥ जेणें मनीं बोध होय ॥१६॥
जैसें सुवर्ण अलंकार आहे हातीं ॥ परी त्यातें अज्ञान नेणती ॥ म्हणती सुवर्णचि द्या माझे हातीं सांडा वित्तें तीं सर्वही ॥१७॥
जैसें जन ब्रह्मरूपचि आहे पूर्ण ॥ परी ते त्यासी न बाणें खूण ॥ मीतूंपण धरिती म्हणोन ॥ कर्म भिन्न मानिती ॥१८॥
मग त्यासी ओडोन ॥ केली सुवर्णखोटी जाण ॥ म्हणे घेईं बापा सुवर्ण ॥ मूर्ख देखोनी सुखाते ॥१९॥
मग त्यासी कळों आलें ॥ नग सुवर्णरूपचि संचलें ॥ तैसें मज दीनासीं केलें ॥ कर्माचे दाखले दाविले ब्रह्मरूप ॥२०॥
आतां कर्म करितांच ब्रह्म पाहें ॥ जैसें नगचि पाहतां सोनें आहे ॥ ऐसी मज सांगितली सोये ॥ जेणें जाय भवभ्रांति ॥२१॥
आतां हें जैसें आहे तैसें ॥ मज कळों आलें ऐसें ॥ आतां कांहीं संदेह नसे ॥ मजमाजी भासे सर्व हें ॥२२॥
ऐसे तुमचे उपदेशाची नवाई ॥ ज्ञान ध्यान नलगेचि कांहीं ॥ सहजींसहज बोधिलीं पाहीं ॥ हेचि देहीं ब्रह्म केलें ॥२३॥
कांहीं करविलें ना सांडिलें ॥ जेथींच्या तेथेंचि स्थापिलें ॥ सर्वत्रीं ब्रह्म भासलें ॥ दुरी केलें भ्रांतीतें ॥२४॥
एकीं अनेकाचा भ्रम झाला ॥ जैसा रज्जुसर्प भासासीं आला ॥ कीं सर्पीं रज्जु भासविला ॥ तैसा ब्रह्मी भासविला प्रपंच ॥२५॥
ऐसा ब्रह्म भुलला होता ॥ तो तव कृपें सांपडला आतां ॥ धन्य धन्य मी समर्था ॥ तुमचा कर माथां माझ्या पैं ॥२६॥
तुम्हा ऐसा ब्रह्मज्ञानी ॥ आणिक न दिसे कोणी ॥ कीं जेथींचें तेथें स्थापुनी ॥ साक्षी करोनी ठेविलें ॥२७॥
आतां ब्रह्मज्ञानी झालेती ॥ ते कर्मातें दूषिती ॥ तीर्थव्रतातें निंदिती ॥ आणि संसार करिती आदरें ॥२८॥
मुक्त झालों ऐसें म्हणती ॥ म्हणोनी नित्यनैमित्य त्यागिती ॥ वादविवादा प्रवर्तती ॥ विकल्प घालिती जनांचे मनीं ॥२९॥  
म्हणती उगेचि कां करितां कर्म ॥ हा तों अवघाचि आहे भ्रम ॥ व्रत नेमाचा वृथा श्रम ॥ ऐसें अधम बोलती ॥३०॥
उपवास करितां देव जोडे ॥ तरी दुकळीं मेले ते काय थोडे ॥ जेणेंकरूनी जनाची भक्ति उडे ॥ अखंड बडबड ते करिती ॥३१॥
कैची एकादशी सोमवार ॥ कैंचे व्रतनेम आचार ॥ कैंची भक्ति कैंचे शास्त्र ॥ ऐसें अपवित्र वदती ॥३२॥
स्नान न केल्या होय मुक्ती ॥ तरीं बेडूक मत्स्य जळींच वसती ॥ गुहांमाजी जोडे श्रीपती ॥ तरी बिळीं वसती उंदिर ॥३३॥
अरण्यामाजी गेलिया पाहीं ॥ तरी देव जोडता कांहीं ॥ तरी मृगजळ जंबुक आणि करोही ॥ तेही पाहीं मुक्त होती ॥३४॥
कैंची पोथी कैंचे किर्तन ॥ कैंचा देव कैंचे आणि ध्यान ॥ कैंचे वेदशास्त्रपठण ॥ ऐसें जल्पन करितसे ॥३५॥
म्हणती वेदानें ब्रह्मप्राप्ती नाहीं ॥ तेथें शास्त्रांचा पाड कोई ॥ हे ब्राह्मण भुललेती पाहीं ॥ नकळे सोई हिताची ॥३६॥
मुखें बोलतो ब्रह्मज्ञान ॥ परी करणी तैसी नाहीं जाण ॥ कीं जे निंदिती इतरांलागुन ॥ पाखंडी म्हणोनी दिसों येती ॥३७॥
तो जरी ब्रह्मज्ञानी असता ॥ तरी अनेकीं एकचि पाहता ॥ सर्वत्रीं लीनचि असता ॥ न करिता निंदेतें ॥३८॥
ब्रह्मज्ञानी म्हणजे कायी ॥ जो ब्रह्म नेखे सर्वां - ठाई जैसा ॥ जैसा होई तैसा पाहीं ॥ सांडी निंदास्तुतीतें ॥३९॥
जेथें मीतूंपणासाठीं ठाव नाहीं ॥ तर्कातर्काचें न चले कांहीं ॥ जो ब्रह्म देखे सर्वां ठायीं ॥ तो निंदा कोणाची न करी ॥४०॥
जैसें पट पाहतां शेवटवरी ॥ तों तंतुचि भासे निर्धारीं ॥ तैसा एक आत्मा चराचरीं ॥ निंदा तरी मग कोणा ॥४१॥
ऐसें सर्वत्रीं एक जाणते ॥ तरी मुखें निंदा न करिते ॥ जैसें तैसेचि होते ॥ अनुभवें राहते निवांत ॥४२॥
ब्रह्मज्ञान म्हणे काई ॥ जो लीन होये सर्वां ठाईं ॥ आत्मत्वें एक पाही ॥ सांडी सोई द्वैताची ॥४३॥
एक वंदी एक निंदीत ॥ तो जाणावा महापतित ॥ ते ज्ञानदग्ध जाणिजेत ॥ जैसा कोळसा होतो काष्ठाचा ॥४४॥
जैसा काष्ठीं अग्नी लागला ॥ तो रक्षा करोनी विझोनी गेला ॥ काष्ठाचा कोळसा झाला ॥ स्वभावें संचला काष्ठचि ॥४५॥
तो जेथें तेथें लागत ॥ त्यासी तो काळेंचि करित ॥ तैसीं ज्ञानदग्धाची स्थित ॥ असे निंदित इतरातें ॥४६॥
जो पूर्णत्वासीं विसरला ॥ तो निंदास्तुती वरपड झाला ॥ म्हणोनि पाखंडी बोलिला ॥ हा भास झाला तव कृपें ॥४७॥
ऐसे उदंड ज्ञानी झालेती ॥ आपुलालें मत स्थापिती ॥ देहाभिमानें ज्ञानें कथितीं ॥ आणि निंदिती वेदशास्त्रां ॥४८॥
ऐसें नव्हे तुमचें ज्ञान ॥ अनेकीं एकचि पूर्ण ॥ वेदशास्त्रांचें वाढवूनि महिमान ॥ बोधितां ज्ञान विधियुक्त ॥४९॥
जेथींचें तेथें कर्म स्थापुनी ॥ आणि वेगळें केलें चौदेहांलागुनी ॥ ठेवितां सर्वसाक्षी करोनी ॥ धन्य वाणी तुमची ॥५०॥
तीर्थ व्रतें देवी देवता अतीथ ॥ सर्व स्थापिलं जेथींचे तेथें ॥ निरसोनियां पाखांड मतें ॥ ब्रह्मज्ञानातें सांगितलें ॥५१॥
ब्रह्मज्ञानाचा होतां भास ॥ झाला अनेकत्वाचा नाश ॥ जैसा तैसा भासला विश ॥ धन्य तुम्ही सद्गुरुराया ॥५२॥
सांगितलें मागिले अध्यायीं आपण ॥ जें पुढिलें अध्यायीं सांगेन ॥ नैमित्य कर्मालागुन ॥ तें अभयदान सत्य कीजे ॥५३॥
स्नान संध्या जप होम पूर्ण ॥ देवपूजा यज्ञ अतिथिपूजन ॥ साहावें कर्म वैश्वदेव जाण ॥ हे खूण नित्याची ॥५४॥
नित्य कर्माची स्थिती ॥ अनुभवें सांगितली मजप्रती ॥ आतां नैमित्यकर्म गुरुमूर्ती ॥ यथानिगुती सांगावे ॥५५॥
ऐसी ऐकोनी शिष्यप्रार्थना ॥ संतोषला सद्गुरुराणा ॥ तुझ्या वचनें माझ्या मना ॥ संतोष जाण झाला असे ॥५६॥
जें जें म्यां तुज सांगितलें ॥ तें तें तुवां भावें ऐकिलें ॥ ऐकोनी मनीं धरिलें ॥ अनुभवा आलें ब्रह्म तुज ॥५७॥
तुझी ज्ञानदृष्टि प्रकाशली म्हणोनी कार्यसिद्धि झाली ॥ जैसी तैसी वस्तु भासली । बोळवण झाली भवभ्रांतीची ॥५८॥
आतां तूं होईं सावधान ॥ सांगतों नैमित्य कर्मालागोन ॥ ब्राह्मणाचें भूषण ॥ जेणें नारायण संतुष्टे ॥५९॥
व्यतिपात तीर्थपर्वणी ॥ सूर्यग्रहणादि करोनी ॥ आल्या वेळेसी अनुभवें करोनी ॥ साक्षेपुनी आचरावें ॥६०॥
ज्यावेळे जें जें आलें अनुभवें ॥ तें तें विधियुक्त पाहिजे केलें ॥ अहंकर्तेपणातें वहिलें ॥ अनुभवें सांडिलें पाहिजे ॥६१॥
जे व्रतामाजी शिरोमणी ॥ जितें वंदिती ब्रह्मादिकरोनी ॥ जे महापातकांची करिते धुणी ॥ जे वैष्णवजनीं एकादशी ॥६२॥
जीतें ऋषिमुनि आदरें करिती ॥ जे कल्प होय पुण्यप्राप्ती ॥ हरे भवभयाची भ्रांती ॥ जीतें म्हणती एकादशी ॥६३॥
तीं दिवसाचें आहे व्रत ॥ आलिया करावें विधियुक्त ॥ त्याची सांगतो स्थिती ॥ ऐक चित्त देऊनियां ॥६४॥
दहा इंद्रियांचें दमन ॥ करावें तें विधियुक्त करोन ॥ तेचि दशमी पूर्ण ॥ जाणती खूप अनुभवी ॥६५॥
अनेकीं एकचि भान ॥ द्वैताद्वैतांचि बोळवण ॥ आपण राहे नाहींच होवोन ॥ तेशि उपोषण एकादशी ॥६६॥
सर्व आपणामाजी जाणोनि ॥ रहावें नाहींच होवोनी ॥ हें अनुभवें जाणती ज्ञानी ॥ जे सद्गुरुवचनीं विनटले ॥६७॥
अरण्यांत गालिया पाहे ॥ शेतीचें बुजावें तें होये ॥ तैसें आत्मत्वें पाहें ॥ संसार तोही भ्रांतित्वें ॥६८॥
सर्वत्र जाणोनि हृषीकेशी ॥ लय कीजे मनबुद्ध्यादिकांसीं ॥ तोचि उपवास एकादशी ॥ जे वेदशास्त्रीं प्रतिपाद्य ॥६९॥
अहिक्यबोधें करावें भजन ॥ तेंचि द्वादशीचें पारण ॥ सहस्र नामाचें पक्वान्न ॥ आदरें करोनी सेवावें ॥७०॥
हेत सांडोनी व्हावें निर्हेत ॥ हेंचि द्वादशीचें लळित ॥ अनुभवी ऐसें व्रत आचरत ॥ त्यांस प्राप्त गुरुकृपा ॥७१॥
हे मानसी एकादशी ॥ जेणें संतुष्टे हृषीकेशी ॥ हेंचि आचरला अंबऋषी ॥ कांतिनगरासीं निश्चयीं ॥७२॥
मनीं जो भाव उत्पन्न होय ॥ तो सहजस्थितीनें चालताहे ॥ जैसा केतकीचा वास जाय ॥ सबाह्यांतरें फांकत ॥७३॥
केवडा केतकींत फुलला ॥ तो परिमळ बाहेर कळों आला ॥ तैसा अंतरभाव फांकला ॥ असे वहिला इंद्रियद्वारीं ॥७४॥
जैसा सूर्य आहे गगनांत ॥ परी प्रकाशांतरीं भासत ॥ तैसा बाह्यव्यवहारीं कळों येत ॥ अंतर्गत सर्वही ॥७५॥
भूमीवर कीं उखर आहे ॥ तें अंकुर करून ठाऊक होये ॥ तैसें अंतरींच कळताहे ॥ जैसें आहे तैसें तें ॥७६॥
उखर भूमीवरी असे ॥ तरी कोंब निर्बळ दिसे ॥ आर्द्रभाव भूमीं असे ॥ अनायासें टवटवीत ॥७७॥
तैसें ब्रह्मज्ञान अंतरींचें ॥ शरीरकर्मे केलें साचें ॥ म्हणोनी कर्म करितां विधीचे ॥ मनकामनेचें न करीच ॥७८॥
जेथींचें तेथें मन स्थापुन ॥ आदरें करी नित्यनैमित्यालागुन ॥ आपण राहे साक्षी होवोन ॥ अंतरज्ञान केलें वरवरी ॥७९॥
ज्याचे हृदयीं पूर्ण बोध झाला ॥ तो विधियुक्त कर्मीं प्रवर्तला ॥ सोडी द्वैतबुद्धीला ॥ करी नैमित्याला आदरें ॥८०॥
ज्यांसीं अंतरीं बोध नाहीं ॥ तेचि उखर भूमिका पाहीं ॥ म्हणोनी कर्माचार तेही ॥ द्वेष पाहीं करिताती ॥८१॥
जो कर्माविषयीं आळसी ॥ आणि विन्मुख वेदशास्त्रांसीं ॥ निंदी साधुसंतांसीं ॥ ब्रह्मज्ञान त्यासीं नाहीं ॥८२॥
जे सद्गुरुचे अंकित ॥ ते चालती विधियुक्त ॥ करिती नित्य नैमित्य ॥ जना लावित सन्मार्गीं ॥८३॥
सांगितली मानसिक एकादशी ॥ आतां बाह्यव्यवहारें करावी कैसी ॥ तेंहीं सांगतों परियासीं ॥ दे चित्तासीं रत्नाकरा ॥८४॥
आलिया दशमीचा दिवस जाण ॥ आलिया मानावा आपण ॥ म्हणे मी होईन पावन ॥ व्रत पूर्ण आचरतां ॥८५॥
धन जोडिलिया जैसें ॥ लोभी संतोषी होतसे ॥ दशमी आलिया तैसें ॥ अति हर्षे सुखावे ॥८६॥
जैसा मायेतें बाळ देखोन ॥ धांवे हात वरतें करून ॥ तैसी दशमी आलिया जाण ॥ भक्तिपूर्ण आरंभावी ॥८७॥
प्रात:काळीं करोनी स्नान ॥ विधियुक्त करावें आचरण ॥ शालिग्राम शिलेचें पूजन ॥ प्रेमें करोनी करावें ॥८८॥
बाहेर देव पाटावरी ॥ तैसा लक्षावा हृदयांतरीं ॥ जें जें पूजन करावें बाहेरी ॥ तैसेंच अंतरीं भावावें ॥८९॥
बाहेर देव पाटावरी ॥  मूर्ति बैसवावी हृदयाभीतरीं ॥ बाहेर स्नान गंगोदकें करी ॥ सत्रावी अंतरीं न्हाणीतसे ॥९०॥
बाहेर देव आसनीं बैसविले ॥ निर्विकल्प अंतरीं संचलें ॥ बाहेर पृथक् देखिलें ॥ अंतरीं भाविलें सर्वत्र ॥९१॥
देवासी चढविलें चंदन ॥ आणि तुळसी मंजरी लागुन ॥ तैसें अंतरीं मीतूंपण खंडून ॥ प्रेमचंदन लावावें ॥९२॥
सुमनाचें सुमन सुंदर ॥ धूप जाळावा अहंकार ॥ आत्मनिवेदन साचार ॥ नैवेद्य सत्वर अर्पावा ॥९३॥
अत्र गंध पुष्प धूप दीप जाण ॥ नैवेद्य फल तांबुलाचें अर्पण ॥ दक्षिणा ठेवावी अभिमान ॥ तेणें नारायण संतुष्टे ॥९४॥
ऐसें अंतर्बाह्य करोनी पूजन ॥ मग करावें ब्राह्मणाचें चरण क्षालन ॥ षोडशोपचारें करावें पूजन ॥ करावें भोजन एकवेळां ॥९५॥
रात्रौ करावें कीर्तन ॥ मेळउनी वैष्णवजन ॥ टाळमृदंग घोष करोन ॥ की जे उच्चारण नामाचें ॥९६॥
येरे दिवशीं स्नान ॥ एकादशीचें उपोषण ॥ सर्वत्रीं पाहोन भगवान ॥ करावें कीर्तन आवडीनें ॥९७॥
चार प्रहर एकादशीसी ॥ निद्रा करूं नये रात्रीसी ॥ अंतरूं न द्यावी द्वादशी ॥ अति आदरेंसी साधावी ॥९८॥
करावें ब्राह्मणभोजन ॥ यथाशक्ति द्यावें दान ॥ आवडीनें रात्रीं कीर्तन ॥ लळित पूर्ण करावें ॥९९॥
या रीतीनें जे व्रत आचरती ॥ तेचि भवभयातें वंचिती ॥ जे अभिमानानें न करिती ॥ ते जाती नरकालया ॥१००॥
जयासी आपुलें करणें हित ॥ तेणेंचिया व्रतीं ठेवावें चित्त ॥ हें जाणावें नैमित्य ॥ जेणें शोभिवंत ब्राह्मणपण ॥१॥
अथवा पितृतिथि आली ॥ ती अति आदरें पाहिजें केली ॥ जीं नैमित्यकर्मे बोलिलीं ॥ सहज लागलीं ब्राह्मणा ॥२॥
हें सांगीतलें साक्षेपेंकरून ॥ अनुभवीं जाणती खूण ॥ राहती सर्वसाक्षी होवोन ॥ हेंचि भूषण ब्राह्मणाचें ॥३॥
सांगितलें नित्यनैमित्य लक्षण ॥ ज्ञाते करिती अनुभवेंकरून ॥ राहती सर्वसाक्षी होवोन ॥ हेंचि भूषण ब्राह्मणाचे ॥४॥
सद्गुरुवाक्य ऐकोनी ॥ बोले रत्नाकर कर जोडोनी ॥ धन्य धन्य तुमची वाणी ॥ प्रबोधोनी समर्थ थोर ॥५॥
जें जें स्व्वामींनीं सांगीतलें ॥ तें तें अनुभवें ठसावलें ॥ कर्म ब्रह्मरूपचि केलें ॥ माझें झालें समाधान ॥६॥
परी एक आहे विनंती ॥ ऐकावी सद्गुरुमूर्ती ॥ वेदाचे मंत्र आतां कां न फळती ॥ तें मजप्रती सांगावें ॥७॥
पहिलें अग्नीशी करी आव्हान ॥ तेथें अग्नि प्रगटे आपण ॥ वरुण मंत्र म्हणतां जाण ॥ जल येऊनि वृष्टि करी ॥८॥
देवांचें करितां आव्हान ॥ देवही येती आपण ॥ ऐसे वेदांच्या मंत्रेंकरून ॥ सृष्टि जाण चालत होती ॥९॥
आतां तेचि मंत्र आहेती ॥ आपण ब्राह्मणही पढती ॥ परी फलासी कां न येती ॥ तें मजप्रती सांगावें ॥११०॥
म्हणती जैसें कलियुग लागलें ॥ तैसें वेदांचें वीर्य गेलें ॥ ऐसें बहुतांचे मुखें ऐकिलें ॥ तेणें मन झालें कासाविस ॥११॥
कां जें ज्याचें वीर्य गेलें ॥ तेणें हित नोहे आपुलें ॥ आणि स्वामींनीही सांगीतलें ॥ विधियुक्त चालिलें पाहिजे ॥१२॥
तरी सद्गुरु म्हणती सावधान ॥ ऐक बापा पुशिला प्रश्न ॥ जेणें उडे संदेहाचें भान ॥ होय सावधान सांगतों ॥१३॥
वेद तेचि अनादि सिद्ध आहेती ॥ आणि त्यांचें वीर्य गेलें म्हणती ॥ हें जैसें असे तैसें तुजप्रती ॥ यथास्थिति सांगेन ॥१४॥
अरे बापा जे आपणा आपण नेणती ॥ ते अशौच्य सर्व पदार्थीं ॥ कां जे देहचि मी म्हणती ॥ आणि पाहती वेदशास्त्रें ॥१५॥
अशौच्य म्हणजे कायी ॥ ज्याचे चार देह निरशिले नाहीं ॥ व्यापकाची नेणे सोई ॥ तेचि पाहीं अशौच ॥१६॥
ओंकारबिंदु संयुक्त ॥ त्या बिंदुमाजी प्रकाशली ज्योत ॥ जिचेनी हें सर्व प्रकाशित ॥ जे नांदत विषमीं शमीं ॥१७॥
जे अनादि सिद्ध आहे ॥ त्यामाजी हें भासताहे ॥ त्याची नेणें जो सोय ॥ तोचि पाहे अशौच्य ॥१८॥
शरीर तें हें गुणाधीन ॥ मी तों असें गुणातीतपूर्ण ॥ असें ज्यासीं नाहीं ज्ञान ॥ तोचि जाण अशौच्य ॥१९॥
अशौच मंत्र जपतां ॥ फळ न पाविजे तत्वतां ॥ जैसें खडकी बीजे पेरितां ॥ काय तें शेतासम उगवेल ॥१२०॥
खडकीं बीज पेरिलें ॥ तें जैसें वायांचि गेलें ॥ तैसें अशौचें वेद पढिले ॥ ते वंचिले फळासीं ॥२१॥
मूर्ख खडक जाणत नाहीं ॥ म्हणे बीजचि नाशवंत पाहीं ॥ तैसें वेदासीं म्हणती वीर्य नाहीं ॥ ज्यासी नाहीं आत्मशुद्धि ॥२२॥
आपलें अशौच तें नेणती ॥ आणि वेदाचें वीर्य गेलें म्हणती ॥ जैसे व्यभिचारिणी पती ॥ सेवितां चित्तीं नसे भाव ॥२३॥
पतीपुढें लुडबुड करित ॥ उदंड हावभाव दावित ॥ बाह्य संपादनी करित ॥ अंतरीं हेत परपुरुषाचा ॥२४॥
तैसेंच वेदशास्त्र पढती ॥ आणि उदंड वाचाळी करिती ॥ आणि काम्यकर्म वसे चित्तीं ॥ हेचि स्थिति व्यभिचारीची ॥२५॥
आत्मदृष्टीतें त्यजोन ॥ जो वर्ते बाह्यव्यवहारेंकरून ॥ तोचि व्यभिचारी जाण ॥ मंत्र न येती म्हणोनी फळा ॥२६॥
स्वकर्माचा अनादरू ॥ काम्यकर्मीं अतिभरू ॥ भूतदयेविण निष्ठुरु ॥ म्हणोनी साचारु मंत्र न येती फळा ॥२७॥
स्वकर्माचा अनादरु ॥ शुद्ध नाहीं अंतरु ॥ संकल्प विकल्प काम क्रोध घोरू ॥ म्हणोनी मंत्र न येती फला ॥२८॥
मनामागें धांवत ॥ निश्चळ नसेचि चित्त ॥ घाला विषयीं आसक्त ॥ म्हणोनी फळत नाहीं मंत्र ॥२९॥
नित्य नैमित्याची बोळवण ॥ गाई ब्राह्मणाचें न करी पूजन ॥ तीर्थ व्रतासी दोषिती जाण ॥ मंत्र म्हणोनी न फळती ॥१३०॥
आपपर न विचारिती ॥ साधुसंतांतें निंदिती ॥ आप्तवर्गातें दुखविती ॥ मंत्र न फळती म्हणोनियां ॥३१॥
परस्त्री परधन जाण ॥ चित्तीं करिती अभिलाषण ॥ अखंड अशौच जाण ॥ मंत्र न फळती न फळती ॥३२॥
मायामोहें भुललेती ॥ विषयीं जडली असे प्रीति ॥ संसार आदरें करिती ॥ म्हणोनी न येती मंत्र फळा ॥३३॥
परमार्थीं कवडी नाहीं वेंचित ॥ प्रपंचीं सर्व खर्चित ॥ विषयभोगीं आसक्त ॥ नसे हेत परमार्थीं ॥३४॥
मी देहचि ऐसा मानिला ॥ पोटासाठीं विद्याभ्यास केला ॥ परान्नें वेद विकिला ॥ म्हणोनी मंत्र निर्फळ ॥३५॥
जें वेदशास्त्र सांगती ॥ तैसें ते न आचरती ॥ आणि अहंतेसी मिरविती ॥ इतरां दुषिती महापापी ॥३६॥
देह रक्तमूत्रें भरलासे ॥ दुर्गंधी ज्यामाजी वसे ॥ तो मीचि म्हणोनी मानीतसे ॥ निर्फळ होतसे वेद त्यातें ॥३७॥
जैसा विटाळसीनें जप केला ॥ तो अवघाचि वायां गेला ॥ तैसा अशौच प्राणी झाला ॥ वेद पडाला निर्वीर्य ॥३८॥
वेद निर्वीर्य म्हणतां आपण ॥ तों परमार्था पडतसे खाण ॥ उपाय करितां अपाय जाण ॥ होय म्हणोनी प्राणियांसीं ॥३९॥
जे आत्मानुभवातें नेणती ॥ ते वेदातें निर्वीर्य म्हणती ॥ जैसे ज्वरेंकरूनी व्यापिजेती ॥ ते दुग्ध त्यागिती कडू म्हणोनी ॥१४०॥
आपुलें मुख कडू असे ॥ त्याचा तो भावचि नसे ॥ आणि दुग्धातें कडू म्हणतसे ॥ अज्ञान तैसे वेद म्हणती ॥४१॥
जैसे डोळे व्यापिले काविळें ॥ त्यास शुभ्र तें दिसे पिवळें ॥ श्वानासीं चोर साव न कळे ॥ भुंकत पाठीस लागतसे ॥४२॥
अनाचारां नावडे आचार ॥ चोरांसीं नावडे साहुकार ॥ वेडिया नावडे चतुर ॥ तैसा निर्फळ देव मूर्खा ॥४३॥
आपुलें ठायीं भाव नाहीं ॥ वेदातें निर्वीर्य म्हणती पाहीं ॥ ऐसे उठले सृष्टिच्या ठायीं ॥ कितीकाई सांगावें ॥४४॥
आपली अपवित्रता नेणती ॥ एकात्मता नसे चित्तीं ॥ आणि इतरांतें निंदिती ॥ नग्न म्हणती भांडजगा ॥४५॥
ऐसें उलटेचि चालिलें ॥ अनहिता हित मानिलें ॥ जैसें व्याभिचारिणीनें केलें ॥ सुख मानिलें परपुरुषीं ॥४६॥
तैसें झालें जनांसीं ॥ ते भुललेती आपणासीं ॥ त्यांचे पाहतां क्रियेसीं ॥ तों तवं राशि पापाची ॥४७॥
जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ तोंवरी मंत्रफळाशीं न येती कांहीं ॥ या अनुभवें जाणती सोई ॥ जे सदां गुरुपायीं विनटले ॥४८॥
सद्गुरुकृपेविण ॥ त्याची कोणासी न कळे खूण ॥ रत्नाकरा ऐसें जाणोन ॥ सांडीं भान कल्पनेचें ॥४९॥
जैसें कनकबीज सेविले ज्यानें ॥ त्याचें अप्रमाण बोलणें ॥ कीं जैसें बाळाचें क्रीडणें ॥ सत्य मानणें पैं कांहीं ॥१५०॥
जैसें बाळ शुभ अशुभ बोलत ॥ परी ज्ञाता अप्रमाण मानित ॥ तैसें वेदाचें वीर्य गेलें म्हणत ॥ तें सत्य मानों नये कीं ॥५१॥
शब्दोशब्दीं विवेकरहित ॥ तेंचि बोलणें नेमस्त ॥ तैसें आत्महिता नाहीं जाणत ॥ वसे प्रीत देहभावीं ॥५२॥
वय तरी शत वर्षांचें आहे ॥ आणि स्वहिताची नेणे तोये ॥ तोचि एक बोल पाहें ॥ मायामोहें व्यापिलें ॥५३॥
विद्यावैभव निर्फळ जाण ॥ चातुर्यकळा जाणे पूर्ण ॥ परी आत्मानुभवाची नेणे खूण ॥ तोचि जाण बाळ कीं ॥५४॥
विद्या अभिमानें स्फुंदत ॥ अहंकर्तेपणा वागवित ॥ मनामागें जे धांवत ॥ ते जाण चित्तीं बालकीं ॥५५॥
आपलें प्रारब्ध नाहीं जाणत ॥ आणि विषयीं हव्यास न करित ॥ स्वहिताचा नसेचि हेत ॥ तेच होत बालकीं ॥५७॥
पळ पळ वय जातें ॥ हें न कळें गा त्यातें ॥ मीतूंपण वसे जेथें ॥ ते निश्चित बाळकीं ॥५८॥
मेलियाची वार्ता ऐकती ॥ आणि पुढेंही मरेल जाणती ॥ परी अनुताप न धरिती ॥ तोचि निश्चितीं बालकीं ॥५९॥
काळ वेळ नाहीं मरणासीं ॥ विनाप्रयत्नेंचि यमनेयासीं ॥ ऐसें असोनी न करी भजनासी ॥ तेचि निश्चयेंसीं बालकीं ॥६०॥
शुभअशुभ नाहीं जाणत ॥ अहं ब्रह्माचा नाहीं हेत ॥ सर्व सत्यच मानित ॥ तेच बोलत बालकीं ॥६१॥
आपण केलें जाणतसे ॥ परिच्छिन्न अनुभवा येतसे ॥ ऐसें जाणोनी भान नसे ॥ तोचि अनायासें बालकीं ॥६२॥
ज्यासी चौंदेहांचें नाहीं ज्ञान ॥ आपुल्या साक्षित्वासीं नेणे ॥ मानी स्थूळदेहाचि आपण ॥ तोचि जाण बालकीं ॥६३॥
मी गुणातीत निर्गुण ॥ सर्वसाक्षित्वें चैतन्यघन ॥ ऐसें ज्यांसी नाहीं ज्ञान ॥ तेचि पूर्ण बालकीं ॥६४॥
बाळ अद्वातद्वा बोलत ॥ करो नये तें करित ॥ विष्ठामूतीं हात घालित ॥ तैसा हा वर्तत देहासंगें ॥६५॥
बोले अपवित्र पदार्थ ॥ न विचारितां मुखीं घालित ॥ तसा देहचि हा ह्मणत ॥ ज्यामाजी बहुत दुर्गंधी ॥६६॥
जो म्हणे मी देहचि आपण ॥ त्याची वर्तणूक अप्रमाण ॥ ऐसें जाणोन विद्वज्जन ॥ त्याचें ज्ञान न मानिती ॥६७॥
तें शब्दब्रह्म बोलती ॥ ते पशुपक्षावरी जाणती ॥ अथवा झाडें फडफडिती ॥ ऐसें मानिती अनुभवी ॥६८॥
तेणें वेद निर्वीर्य म्हणीतला ॥ तरी तो काय निर्वीर्य झाला ॥ ऐसें जाणोनी कल्पनेला ॥ सांडीं वहिला रत्नाकरा ॥६९॥
दैवाचें आव्हान करितां ॥ देव येती तत्वतां ॥ ऐसें तूं बोलिलासि सुता ॥ तेंचि आतां ऐकावें ॥१७०॥
अग्नीचें करितां आव्हान ॥ तेथें अग्नि होय निर्माण ॥ वरुण मंत्र म्हणतां जाण ॥ जळ येऊन वृष्टि होय ॥७१॥
तूं पृच्छा केली ऐसी ॥ ही विद्या होती नळापाशीं ॥ मंत्रमय देवता हृषीकेशी ॥ मंत्रींच कर्मास करीतसे ॥७२॥
वसिष्ठ विश्वामित्रादिक झाले ॥ त्यांहीं मंत्रमय कर्म केलें ॥ परिच्छिन्न देव आले ॥ ऐसें ऐकिलें नाहीं कीं ॥७३॥
परि त्यांमाजी सामर्थ्य होतें ॥ परि तें नाहीं या ब्राह्मणातें ॥ कां जे अशौच पढती वेदशास्त्रांतें ॥ म्हणोन फळातें न पावती ॥७४॥
पहिलें जे इच्छुनी करिती कर्म ॥ ते पावती फळ उत्तम ॥ कां जे शुद्ध्यांचें अंतर्याम ॥ नेमिला नेम सिद्धि पावे ॥७५॥
वेद निर्विकल्प कल्पतरु ॥ कल्पिल्यासारिखें फळभारू ॥ म्हणोनी ज्ञानी साचारु ॥ करी उच्चारु प्रेमभावें ॥७६॥
कल्पतरूसी फळ लागल्याही ॥ परी कल्पना करीतसे पाहीं ॥ म्हणोनी वेदासीं बोल नाहीं ॥ संदेह कांहीं धरूं नको ॥७७॥
जैसा आरसा पाहतां आपण ॥ तैसेंचि प्रतिबिंब दिसतें जाण ॥ म्हणोनी देव अंतरशुद्धीविण ॥ निर्वीर्य जाण भाविती ॥७८॥
तरी अवघे मिथ्या जाणोनी ॥ तूं चाल रे विधियुक्त स्थापोनी ॥ संदेह असेल जरी नचनीं ॥ बोल वचन रत्नाकरा ॥७९॥
सूर्य अंधारासीं पाहों जाय ॥ तों अंधारचि प्रकाश होय ॥ तैसें अज्ञान झालें पाहें ॥ न कळत गुह्य तव कृपेविना ॥१८०॥
तुझे कृपेची नवलपरी ॥ कर्म ब्रह्मचि झालें साचारी ॥ मी एक व्यापक चराचरीं ॥ ऐसें निर्धारीं ठसावलें ॥८१॥
माझें झालें समाधान ॥ केलें विधियुक्त कर्माचें स्थापन ॥ नित्यनैमित्तिक तेचि खूण ॥ बाणली असे ॥८२॥
मी देही असोनी विदेही ॥ कर्म होय जें जें कांहीं ॥ मज देहाचें नातें नाहीं ॥ तें तें पाहें त्रिगुणयोगें ॥८३॥
गुणीतें स्वाभाविक कर्म असे ॥ तें माझेनी तें प्रकाशे ॥ मी सर्वांतें जाणतसें ॥ साक्षित्वें असें वेगळा ॥८४॥
वेदीं स्थूळकर्म स्थापिलें ॥ ज्या ज्या वर्णीं जें जें भागासीं आलें ॥ तें तें तुम्ही वहिलें ॥ तेणें आपुलें हित होय ॥८५॥
हें माझिया चित्तासी आलें ॥ आतां करणें न करणें अवघेंचि गेलें ॥ शरीरीं कर्म स्वभावें संचलें ॥ तें म्या जाणितलें साक्षित्वेंसीं ॥८६॥
जेणें ब्राह्मणासी ब्राह्मणपण ॥ जेणें वंद्य सर्वांलागुन ॥ निर्गुणाचा झाला सगुण ॥ धर्म स्थापन करावया ॥८७॥
कां जे विधियुक्त कर्म आचरण ॥ सृष्टीचा व्यवहार चाळण ॥ वेद शंखासुरें नेले जाण ॥ म्हणोनी निर्गुणा सगुणत्व ॥८८॥
मत्स्यरूप होऊनी आपण ॥ केलें शंखासुराचें हनन ॥ स्थापिले वेद आणोन ॥ पाप क्षाळण करावया ॥८९॥
सांगावया काय कारण ॥ कां जे देवासी वेदाचा अभिमान ॥ म्हणोनी वेदविहिन होतां आपण ॥ वेदाचे जाण द्रोही होतों ॥१९०॥
चालावें विधियुक्त ॥ हेंचि वेदाचें मनोगत ॥ तुमचे कृपनें माझे चित्त ॥ झालें निरहेत कृपानिधी ॥१९१॥
ब्राह्मणकर्म सांगीतलें ॥ आतां तीन वर्णाचें कर्म राहिलें ॥ तेंही पाहिजे बोधिलें ॥ जें बोलिलें वेदशास्त्र ॥९२॥
तंव सद्गुरु म्हणती सावधान ॥ तें पुढिल्या अध्यायीं सांगेन ॥ जेणें होय तुझें समाधान ॥ साक्षी होवोन राहें तूं ॥९३॥
हा दीपरत्नाकर ग्रंथ ॥ जो उपनिषदांचा मथितार्थ ॥ जेणें बाळ्याभोळ्याचें बोधें चित्त ॥ हरे भ्रांत सर्वही ॥९४॥
जैसा सूर्य उगवे गगनांत ॥ दहाही दिशा प्रकाशित ॥ तैसा दीपरत्नाकर ग्रंथ ॥ असे दावित यथास्थिती ॥९५॥
सूर्यप्रकाशें उच्च नीच दिसत ॥ तैसें या ग्रंथें शुभाशुभ भासत ॥ अज्ञाना मार्गीं लावित ॥ बरोबर जातपतिया ॥९६॥
जें अनिर्वाच्य वस्तु आहे ॥ मन बुद्ध्यादिकां अगोचर होये ॥ तें दीपरत्नाकरें प्राप्त होये ॥ ब्रह्मत्व ये अंगासीं ॥९७॥
जो स्वतां ब्रह्म होईळ ॥ त्यास सर्व ब्रह्म भासेल ॥ अनुभवावीण जे बोलतील ॥ तैसें फोल जाणावें ॥९८॥
ज्यासीं सद्गुरुकृपा असेल ॥ त्यासीं या ग्रंथी रीघ होईळ ॥ देहवादीयासी हाळतील ॥उपाळतील ऐकोनी ॥९९॥
जैसा सूर्य करी सर्व प्रकाश ॥ आणि तैं अंधार होय घुबडास ॥ दु:ख होत चोरास ॥ अज्ञानांस होय तैसें ॥२००॥
ज्वरिता दुग्ध कडू लागत ॥ मर्कट मनुष्यां वाकुल्या दावित । सिंह देखोनी श्वान भुंकत ॥ तैसा ग्रंथ अज्ञाना ॥१॥
अज्ञान म्हणजे काई ॥ ज्यासी अनुभव ज्ञान नाहीं ॥ त्यासीं ग्रंथीं पाहीं ॥ सुखसोई सांपडेना ॥२॥
म्हणोनी तूं आतां एक करीं ॥ या ग्रंथीं प्रेम धरीं ॥ सर्व पाहीं आपणाभीतरीं ॥ मी साक्षी निर्धारीं वेगळा असें ॥३॥
वेदशास्त्रीं जें जें कर्म स्थापिलें ॥ तें साक्षित्वें त्वां जाणितलें ॥ आणि शरीरीं जें कर्म केलें ॥ तें कळों आलें तुजसीच कीं ॥४॥
तूं वेदांचा जाणता ॥ आणि शरीराचा चाळविता ॥ तुज कर्मासीं आतां ॥ संबंध सुता असेचिना ॥५॥
तूं आपणासी नाहींच मान ॥ स्थूळकर्म स्वप्नापरी जाण ॥ तूं निर्हेत राहें सहज होवोन ॥ ब्रह्मपूर्ण तूंचि तुझा ॥६॥
आपुलें ईश्वरत्व विसरलें ॥ स्वप्न देखिलें त्वां बरें ॥ तें म्यां तुज सविस्तरें ॥ यथा प्रकारें सांगीतलें ॥७॥
स्वप्न देखणें आणि सांगणें ॥ परी अवघेंचि खोटें जाणणें ॥ तैसें स्थूळींचें कर्म करणें ॥ मिथ्यापणें मानावें ॥८॥
मिथ्या जाणोनी कर्म करी ॥ तोचि धन्य चराचरीं ॥ त्यासीं आवडला श्रीहरी ॥ वर्ते संसारीं साक्षित्वें ॥९॥
कां जो देह आहे वर्तमान ॥  तोंवरी विधियुक्त कर्म करावें आपण ॥ तैसीं प्रतिष्ठा स्वप्नीं जाण ॥ तैसी ही खूण जाणावी ॥२१०॥
जें जें मन बुद्धीआंत ॥ तें तें स्वप्नचि जाण रे सत्य ॥ ऐसी जाणोनियां रे मात ॥ सांडीं हेत म्हणोनी ॥११॥
हेतु सांडोनी निर्हेत व्हावें ॥ नाहीं आपण आपणासीं योजावें ॥ सहजी सहज जाणावें ॥ तेव्हांचि पाविजे सुखातें ॥१२॥
ज्या जातींत शरीर झालें ॥ तें तें कर्मचि घेवूनी आलें ॥ जैसें पुष्प जें उगवलें ॥ तें परिमळें लागलें महंका ॥१३॥
जैसें झाड तरी एक ॥ आणि पुष्पें येती अनेक ॥ परी सुवास नाहीं भिन्न भिन्न देख ॥ स्थूळकर्म सम्यक् ऐसें जाण ॥१४॥
जेथें ज्ञाति हेचि झाड जाणणें ॥ आणि शरीर तेंचि गा सुमनें ॥ कर्मचि गा सुवास जाणणें ॥ अनुभवें पहावें विचारूनी ॥१५॥
जैसें पुष्पवृक्ष भिन्न भिन्न ॥ तैसी ज्ञाति भिन्न भिन्न ॥ सुमनापरी शरीर जाणोन ॥ कर्म पूर्ण सुवास कीं ॥१६॥
चंपक फुलाचा सुवास ॥ न मिळेचि मोगर्‍यास ॥ मोगर्‍यास जाईस ॥ जाईचा बकुळीसी न मिळेच कीं ॥१७॥
हा तुज दृष्टांत सांगितला ॥ आतां ऐक दृष्टांताला ॥ जेणें नाश होय दुर्बुद्धीला ॥ जाण कर्माला सहजचि ॥१८॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जाण ॥ शूद्र तो चौथा वर्ण ॥ हेंचि गा सुभिन्न ॥ कर्मही आन आन भासतसे ॥१९॥
जैसा चंपकपुष्पाचा सुवास ॥ तो शोभे ज्या वर्णाचा त्यास ॥ तैसा ज्या वर्णाचा मनुष्य ॥ त्याचें त्यास भासते ॥२२०॥
पुष्पास सुवास कोणी लाविला नाहीं ॥ तो उपजत स्वभाव पाहीं ॥ तैसें ज्ञाती कर्म देहीं ॥ नवें कांहीं झालें नसे ॥२१॥
जोंवरी पुष्प आहे ॥ तोंवरी सुवास पाहें ॥ तैसें जोंवरी देह वर्तताहे ॥ तोंवरी नोहे कर्माचा त्याग ॥२२॥
पुष्प जेव्हां कोमेजलें ॥ तें सुवासातें घेउनी गेलें ॥ तैसें देह नाशितां राहिलें ॥ देहाचें कर्मं सर्वही ॥२३॥
पुष्पीं सुवास अर्पितां ॥ तो वेगळाचि रे आहे सुता ॥ तैसा देहकर्माचा नियंता ॥ तूं स्वता: वेगळाचि ॥२४॥
ऐसें जाणोनियां आतां ॥ निर्हेत राहें रे सुता ॥ तूं सर्वांचा प्रकाशिता ॥ सर्व सत्ता तुझीच कीं ॥२५॥
प्रकृती कर्मासीं ॥ तूं साक्षित्व जाणतोसी ॥ स्वयेंचि ब्रह्म मी असें ऐसी ॥ भावना मानसीं करीत जाय ॥२६॥
जे जे वृत्ति उठेल कांहीं ॥ ते ते वेगळेपणें सोडित जाई ॥ आणि खटपट करितांही ॥ हित नाहीं विचारितां ॥२७॥
करीन अथवा न करीन ॥ ऐसें कल्पितांचि होय बंधन ॥ शरीरचेष्टा मिथ्या जाणोन ॥ करीं पाळण वेदशास्त्रांचें ॥२८॥
ज्ञाते कर्म जाणोनी सांडिती ॥ अज्ञानातें नकळेचि स्थिती ॥ आणि देखादेखी कर्म त्यागिती ॥ परी नेणती मी कोण ॥२९॥
मी कोण हें नाहीं ज्ञान ॥ निर्विकल्पता झाले नाहीं मन ॥ आणि देखादेखीं कर्म त्यागून ॥ करी हान मंदमती ॥२३०॥
ऐसें देखादेखीं चालती जाण ॥ म्हणोनी ज्ञात्यानें दाखवावें आपण ॥ जैसें भगवतें केलें धर्म स्थापन ॥ तैसेंचि साधुजन करिताती ॥३१॥
तरी देहबुद्धीचें प्राणी ॥ ते द्वैवतचि मानोनी ॥ ते अज्ञानें शास्त्रेंकरूनि ॥ पडले रानीं भ्रमाच्या ॥३२॥
जो रानीं पडला आपण ॥ तो झाला पराधीन ॥ गमे विधियुक्त संपूर्ण ॥ चाले जाण भयभीत ॥३३॥
म्हणोनी ज्ञातें जैसें बोलती ॥ आणि तैसेचि आपण वर्तती ॥ जनासी मार्गा लाविती ॥ हेचि स्थिति जनांची ॥३४॥
जैसेंचि बोलिले विधियुक्तपूर्ण ॥ तैसेंचि करी विधियुक्त क्रीडण ॥ ऐसें आपणास नेणोन ॥ चालवावे जन सन्मार्गी ॥३५॥
आतां आहेसी तैसाचि राहें ॥ हें सर्व स्वप्नवत्हि पाहें ॥ जनांलागे जेणें सोये ॥ तें करीत जाय रत्नाकरा ॥३६॥
सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदें ॥ रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥२३७॥
इति श्रीचिदादित्य - प्रकाशे दीपरत्नाकरग्रंथे नित्यनैमित्तिक कर्मयोगविलास निरूपण नाम द्वादशोsध्याय: समाप्त: ॥१२॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ओंव्या२३७ ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP