ती बिचारी रडतेच आहे !

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : कोणाच्याशा घरी एक मोठा थोरला ग्रामोफोन आहे. किल्ली दिलेलीच आहे. आता ही जी प्लेट ठेवण्यात येणार आहे, तिचे नाव ’ ती बिचारी रडतेच आहे ! ’ असे आहे. प्लेट मोठी नामांकित आहे. करु सुरु ? - ऐका, ऐका ! बडबड नका करु. ]

ताई ! मी मंगळागौरीच्या पूजेला जाते अं ?
लवकर ये हो ! - देवा ! गत वर्षी मी अशीच नटून थटून पुजेला गेले होते ना ! आणि यंदा ? - आई !
अरे ! कोण रडत आहे रे ?
असेल कोणीतरी ! आपल्याला काय करायचे आहे ! तू आपला चहा पी लवकर; नाही तर निवून जाई.
कुठले आम्ही या शेजाराला राह्यला आलो आहोत कुणाला ठाऊक ! रोजी मेली कटकट ! रड बाई रड, आणखी रड !
खरेच किती दुर्दैवी प्राणी आहे ! आता हिचे पुढे काय होणार ?
राम्या, अरे खिडकीत उभा राहून काय वेड्यासारखा ऐकत आहेस ? मंडईत जातोस ना ?
अग जातो ग ? अजून माझे व्याकरणाचे नियम व्हायचे आहेत, आणि म्हणे मंडईत जा ! हं, काय बरे ? ज्या शब्दांच्या योगाने पदार्थाबद्दल कसा व किती, अशी विशेष माहिती कळते, ती सारी विशेषणे, ती सारी विशेष माहिती कळते, ती सारी विशेषणे, विशेषनामे.
देवा ! आता माझे कसे रे होईल !
हं: ! आमच्या त्या गणपतराव सुधारकांना तरी सांगितले पाहिजे की ही एक गाळात आयती गाय रुतलेली आहे, तर करा म्हणावे हिची लवकर सुटका !
रडते आहे बिचारी ! मागच्या जन्मी जसे केले, तसे आता भरते आहे ! काय करायचे बाई त्याला ! कोणाच्या का हातचे आहे ?
हं: ! आहे काय त्याच्यामध्ये ! एकदम पुनर्विवाह लावून टाकायचा आणि सोडून द्यायचे !
हो ! जसा काही तुह्मीच विचार केला आहे नाही ?
अलबत् ! मी विचार केलेला आहे म्हणूनच मी अधिकार वाणाने सांगतो की, तुम्ही जे हे सुधारणा, म्हणून चालवलेले आहे तो सगळा येथूनतेथून बाष्कळपणा आहे !
हायरे देवा !
स्स ! असा संताप येतो ! अरे काय बिचारी रडते आहे ?
अहो रडते आहे, मग त्याला आता करायचे काय ? मला सांगा ती जे हे रडते आहे, त्या रडण्याची आधी मीमांसा नको का करायला ? ती का रडते आहे ? त्या रडण्याची कारणे काय काय आहेत ? तसेच ती कारणे ज्या समाजात आहेत तो समाज आरंभापासून आतापर्य़ंत बनत कसा आला ? वगैरे गोष्टींच्या इतिहासाचा आधी नीट पुष्कळ वर्षे अभ्यास करा, आणि मग पुढे !
ही जी मुलगी रडते आहे, ती मी अजून पाहिली नाही रे ?
असे ? अरे मग ती पलिकडच्या खोलीत आहे ! इकडे ये, - ती बघ. या दाराच्या फटीतून दिसते आहे, दिसली ?
अरे वा ? मोठी छानदार आहे रे !
आ - हे ! काही विशेष नाही.
हरहर ! काय बिचारीच्या ह्रदयाला पीळ पडतो आहे ! एक हुंदका ! अनाथ विधवेचा एक हुंदका ! पण त्यात केवढे ब्रह्मांड - किती काव्य भरलेले असते !
अहो असे एकीच्या रडण्याने कुठे काही होते आहे ? एक काय - पण अशा पाच पन्नास जेव्हा एकदम रडायला लागतील, तेव्हा कुठे समाज हळू हळू जागा होईल, आणि मग आपली चिपडे पुसायला लागेल.
छे बोवा ! आमच्या या समाजात किती अन्याय भरला आहे, आणि किती नाही ! छे ! छे ! छे !
काय, छे ! छे ! काय ? आमच्या समाजात काय अन्याय भरला आहे ? उगीच काही तरी बडबडावे ! अहो हे सगळीकडेच आहे ! त्यात आहे काय मोठेसे ! इंग्लंडात, अमेरिकेत, तसेच अफ्रिकेतसुध्दा तिथे नाही का अशाच मुली रडत ?- तसेच इथे उगीच काही तरी -
कोण यमे ? का ग रडतेस ?
आई ! आई !!
अरेरे ! किती कळवळून रडते आहे रे !
ए: ! काय रडते आहे ! इतके मोठ्याने रडणे तिला आता काही शोभत नाही ! काही तरीच अननॅचरल् ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP