पाऊस
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
[ स्थळ : कोणते ते वाचताना हळूहळू समजेलत. पात्रे - हवेचे परमाणू. ]
हुश्श ! काय रखरखीत ऊन पडले आहे !
आणि पोटात तर पाण्याचा लवलेश नाही !
पा....णी ! पोटभर तरी चांगले पाणी प्यायला द्या हो !
ठेवले आहे आता चांगले पाणी !
हे तर बाबा नेहमीचेच आहे ! कसे चांगले छानदार आणि हवे तितके पाणी येते. पण आपले वाहून जाते !
मग आहेच आता जुनाट विहिरीतील आणि तळ्यातील नासके, सडलेले पाणी ! प्या ते आता !
सगळाच मूर्खपणा ! जुने ते घाणेरडे म्हणून त्यातला गाळ काढला नाही, आणि नवे फार होईल.....सोसायचे नाही म्हणून त्याची काळजी घेतली नाही !
शेवटी आपले कोरडे ते कोरडेच !
पहा कशी जिकडे तिकडे प्रेतकळा आली आहे ती !
निराशा आणि भीती यांनी तर आपण गांगरुन गेलो आहोत बुवा !
काय पुढे होणार तरी काय आपले ?
दुसरे काय व्हायचे ? मरायचे झाले आता !
नाही रे ! मला वाटते अजून आपला यातून निभाव लागेल !
नाही नको ! अहो, कुठे काही चांगुलपणा असेल तर निभाव लागेल ना ? सगळा अप्पलपोटेपणा !
टिप्पुसभर पाणी ! पण त्यासाठी कापतो आहोत दिवसाढवळ्या एकमेकांचे गळे !
राम राम ! कोण घाण.... आणि दुर्गधी सुटली आहे ही !
पा....णी ! पा.....णी !
छे ! छे ! कोण पाण्यासाठी धावपळ ही !
आणि काय धुळीचे लोटचे लोट हे !
अहो, जीव कासावीस झाला ! गुदमरुन मेलो ! पाणी !
अरे, मग निष्कारण धावता आहा काय असे ? मूर्ख कोठले !
पळा ! पळा ! स्वस्थ बसू नका !
काय स्वस्थ काय बसू नका ! फुकट नाश होईल झाले अशा धावण्याने !
पण नाशच होईल हे कशावरुन !
हो, झालाच तर कदाचित् फायदा होईल यातून !
ठेवला आहे फायदा ! कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, आणि नाही कोणी कोणाला विचारीत, तेव्हा कसला आला आहे फायदा ?
काही असो ! सगळीकडे अस्वस्थता झाली आहे ना ? ठीक आहे ! तीच जितकी आता वाढेल तितकी - पळा !
अहोहो ! काय वादळ सुटले आहे हे ! धूळच धूळ ! काही दिसले तर शपथ !
नको नको ! परमेश्वरा, सोडीव रे बाबा या यातनातून !
ठेवला आहे आता परमेश्वर ! आधी पळा ! आटपा लवकर !
कोण वेडेपणा हा ! अगदी पिसाळून गेले आहेत की !
आहो ! आले ! आले ! आकाशात ढग जमत चालले !
अरे, मग आता तरी उगीच धावू नका ! नाही तर चांगले आलेले ढग पार नाहीसे होतील.
काय बिशाद आहे नाहीसे होतील ! आटपा लवकर ! उगीच आता आळस करु नका !
लागला ! पाऊस पडायला लागला !
पाऊस ! पाऊस !!
वेड लागले आहे वेड ! पाऊस कसा चांगला पडायला लागला आहे आणि आता का रे उगीच धावपळ ?
खरेच आहे ? पाऊस कसा आयता पडतो आहे ! तो तरी आता नीट पडू द्या !
कुछ नही ! असला अर्धवट पाऊस नही मंगता है !
मारे धुव्वा उडायला पाहिजे !
बरोबर ! चांगला जोराचा पाऊस पडायला हवा !
अहो पडायचा काय म्हणून ? चांगला झोडपून पाडला पाहिजे !
अरे राम ! काय पाऊस तरी हा !
पाहिलेत ? मघाशी अतिशय धूळ, आता अतिशय पाऊस ! सगळा अतिरेकच !
दोन्हीकडून मरण !
येऊ द्या हो ! मरायचेच तर धावपळीने तरी मरु !
बापरे ! काय जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे हे !
किती दिवसांच्या जुनाट विहिरी आणि तळी ! पण ती सुध्दा ..... नवजीवनाने तुडुंब भरुन वाह्यला लागली आहेत !
याचे नाव काम ! घाण म्हणून आता राहिली नाही ! पार सगळी ....
हं: ! काय मघाशी धूळ उसळली होती हो !
पण राव, आधी इतकी धूळ उडाली, म्हणूनच हा इतका पाऊस झाला ना ?
खरे आहे बोवा !
चार थेंब पडल्याबरोबर स्वस्थ बसलो नाही, हे किती चांगले केले ?
तर काय ! थोडक्यात समाधान मानले, आणि अर्धवटपणा केला असता की वाटोळंच !
अहो, तेच आजपर्यंत भोवले !
बाकी कैक दिवसात असा पाऊस झाला नव्हता, नाही ?
वाहवा ! काय जिकडे तिकडे टवटवी आली आहे !
तसेच मघाशी अक्राळविक्राळ आणि भेसूर दिसणारे हे ढग निरनिराळ्या तेजस्वी रंगानी काय खुलले आहेत पण !
अरे भाई आधी इकडे बघ ! केवढे रे झाड पडले आहे हे !
खरेच की !
ऍं ! होते काय त्यात ! सगळे वठून तर गेले होते !
बिचारी लहान लहान झाडे तर मोजायलाच नकोत !
हे काय बोलणे ! वादळ म्हटले, म्हणजे असेच व्हायचे !
ओहो ! काय झकास इंद्रधनुष्य पडले आहे हे !
तो पहा ! खोपटाबाहेर आपली मेंढरे घेऊन आलेला तो म्हातारा....सूर्यप्रकाशात किती गंभीर आणि तेज:पुंज दिसत आहे !
पक्ष्यांची किलबिलसुध्दा किती गोड लागते आहे !
घाणीने आणि धुळीने भरुन गेलेले मघाचे हे वातावरण, आता कसे अगदी शुध्द आणि पवित्र होऊन गेले आहे, नाही ?
आणि सर्व चराचर प्रेमाने किती आर्द्र झाले आहे !
अहाहा ! जिकडेतिकडे गुलाबच गुलाब उधळून भगवान सूर्यनारायण पहा कसे आपले अभिनंदन करतो आहे ! धन्य आहे !
हे सूर्यनारायणा !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP