सुट्टी ! शाळेला सुट्टी !!

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : रस्ता. सकाळी साडेसात वाजण्याची वेळ. समोर पलीकडे जी गगनचुंबित इमारत दिसत आहे. ती एका ऍग्लोव्हरनॅक्युलर शाळेची असून तिच्या दरवाज्यावर एक माणूस चतकोर कागदाचा तुकडा चिकटवीत आहे. इतक्यांत दहा - बारा वर्षाचा एक मुलगा धावत धावत येऊन तो लिहिलेला कागद वाचू लागतो. जवळच गटारात मेलेले एक कुत्रे पडले आहे. आलेले चिरंजीव टुणकन् उडी मारुन - ]
सुट्टी ! सुट्टी !! बंड्या विष्ण्या ! अरे गोंद्या ! आज शाळेला सुट्टी आहे !!
ऑं ! काय म्हणतोस ? शाळेला आज सुट्टी ! वा वा ! फार छान झाले !
अरे, पण ती कशाबद्दल ?
रावबहादूर कोणतेसे ते - वारले म्हणून.
कोण रे हे ?
असतील कोणीतरी ! आपल्याला काय, सुट्टी मिळाल्याशी कारण !
अरे, हा देशपांड्या आला बघ ! कम् ऑन बी क्विक् !
ए पांड्या ! कुठे मंडईत निघालास वाटते ? लेका ! शाळेला कशी छान सुट्टी मिळाली आहे. अन् मंडईत काय चालला आहेस ?
शाळेला सुट्टी ! कशावरुन ?
ही बघ ! ही नोटीस बघ ! उगीच नाही !
खरंच की ! अरे, मग आज आपली गणिताची परीक्षा बुडाली !
बुडूं दे रे ! मोठा आला आहे लेकाचा अभ्यासी !
अन् काय रे, इतका अभ्यास करुन काय भीक मागायची, होय ?
बरं, चल आता. मला त्या बाळ्याला अन् रामड्याला आताच्या आता जाऊन कळवलंच पाहिजे, नाही तर उगाच त्यांना हेलपाटा पडेल !
आणि हो ! मीही त्या आगाशाला अन् सहस्रबुध्द्याला जाऊन कळवतो !
पण ते लांब नाही का रहात ?
असेनात ! आता हा पळत जाऊन त्यांना कळवून येतो !
पण हे बघ ए ! वाटेत त्या जॉर्ज वाशिंग्टनला नाही दाद लागू द्यायची बरं का !
कोणाला ? त्या पिंग्याला ना ? नाव कशाला !
पडू दे लेकाच्याला चांगला हिसका ! जिथे तिथे चोंबडेपणा करायला हवा !
तर काय ! अरे, याने उठून सांगितले म्हणून, नाही तर मास्तरांना पत्ता लागला नव्हता कोणी कोयंडा काढला याचा !
अन् मी म्हणतो, खिडकी फडफडा वाजत राहिली असती, तर याच्या काय काकाचे गेले असते !
वा ! हे काय बोलणे ! अभ्या... च् बुडतो ना !
पिटाला पाहिजे धरुन साल्याला एकदा !
हे आले एक दुसरे शहाणे ! केव्हाचे आम्ही इथे उभे आहोत ! आणि हे -
काय हो गुंडेश ! अभ्यास करुन काय मरायचे आहे वाटते ?
खबरदार लेका, पुस्तकाला आज हात लावशील तर ! कशी झकास सुट्टी मिळाली आहे आणि चालला म्हसोबा अभ्यास करायला !
पण माय् डीअर गोपाल, ही सुट्टी कशाबद्दल आहे ?
कशाबद्दल ? हे कुत्रे मेल्याबद्दल !
ह: ! ह: ! ह: !
अरे, ह्योतर आपला मोत्या ! भोव् ! भोव् !
सबूर ! ही कुठल्या बरे शाळेतली मुले येताहेत ?
काय हो, शाळेला आज सुट्टी आहे म्हणे ?
हो, आमच्या शाळेला आहे बुवा ! तुमच्या शाळेला आहे की नाही कुणास ठाऊक !
ए: ! कसली त्यांची भिकार शाळा ! ठेवली आहे त्यांना सुट्टी !
असू द्या हो शाळा आमची भिकार असती तर ! तुमची मोठी श्रीमंत आहे ना ?
हो, मग आहेच !
हॉ: ! आहे ठाऊक ! परवाच तुमचे ते सुप्रिटेंड पलीकडच्या त्या चौकात आ वासून उताणे पडले होते !
अहो पण शहाणे, सायकलवरुन काय कोणीही पडेल ! तुमच्या यांना तर धड चालताही येत नाही !
अरे, फेगडोबा तर आहे शुध्द !
अहो अहो, जरा तोंड संभाळून बोला !
काय, काय करणार हो तुम्ही ?
दात पाडून टाकीन, ठाऊक नाही ?
आणि आमचे हात काय केळी खायला गेलेत, होय ?
थांबा ! हात आटोपा ! हात आटोपा ! उभय शाळातील छकुल्यांनो, आज भांडण नाही ! कशी नामी सुट्टी मिळाली आहे, तेव्हा पंत जेहेत्ते म्हणतात: - ]
काय म्हणतात बरं - का...य ?
की बापहो !
" समरांगणी क्रिकेटच्या आपण आहोत शे उलट पाच ।
परि समयी सुट्टीच्या आपण एकत्र एकशे पाच ॥"
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल !!]
सीताsकान्त ....
ह: ! काय गमत्या आहे रे !
ओ हो हो ! खूपच मुले आली आहेत शाळेतली आपल्या ! सुट्टी ! शाळेला सुट्टी !
आहे आहे, ठाऊक आहे ! मला तर आधीच सर्वांच्या अगोदर कळले होते की, आज सुट्टी आहे म्हणून !
मोठा शहाणा ! नोटीस चिकटवल्याबरोबर मी - मीच जर पहिल्याने ती पाहिली -
अहो पण दीड शहाणे ! इथे तुम्ही पाहिली असेल, पण या पठ्ठ्याला तर सुप्रिटेंडनी आधीच दाखवली होती ! तिथे राहतो म्हटले मी ! उगीच नाही !
हो का ! मग रे काय !
बाकी आपले सुप्रिटेंड मोठे छान आहेत, नाही ?
हो तर ! आणि शिकवतातही किती फक्कड !
मारण्याचे म्हणून नाव नाही ! रामराजा आहे बिचारा !
नाही तर ते मागचे ! अहाहा ! काय पण -
गेल्या वर्षी नाही ? असेच कोणीतरी मेले होते, तर या बाबाने आपली एक वाजता सुट्टी दिली !
एक वाजता कुठली असेल ? अरे, त्या वेळेला तर भाई नोटीस काढली !
आणि तीही बाबा अश्शी काही काढली की, शेवटच्या वर्गातून वाचून यायलाच मुळी चार वाजले ! त्याच्यापुढे मग घंटा !
छे, छे ! काटाच काढला त्यांनी पोरट्यांचा !
आणि अस्से पिटून काढले की ज्याचे नाव ते ! धर पोर, की पीट ! धर पोर की पीट ! हा सपाटा !
बरं शिकवणं तरी धड ?
ही: ! वर्गात आले की उगीच काही तरी व्या... व्या...
ह: ! ह: ! ह: !
बरं, पण ए बंपर ! आज तुला लवकर खेळायला आले पाहिजे ! काल माझी पहिल्या बॉलला वुईकेट घेतलीस नाही का ? थांब ! आज चांगलाच तुला पिटून काढतो !
अबे जारे ! नाही तुझा पहिल्या बॉलला त्रिफळा उडवला तर कशाला पाहिजे !
थांबा ! हे आले एक शिष्ट !
मामाच आहे लेकाचा ! चांगले सांगतो आहे की सुट्टी आहे म्हणून, तर म्हणे -
नको, तसे नको बुवा ! मला आपली नोटीसच वाचून पाहू दे !
हं पॅहा ! नीट चांगले डोळे वासून पहा !
बाकी का - य मोठीशी सुट्टी मिळाली आहे ! दोन वाजता नाही तरी मिळालीच असती !
उ: ! हे मोठे वाईट झाले ! शनिवारीच सुट्टी आली आहे हे नाही ठीक झालं !
पेक्षा गेल्या सोमवारी आली असती की नाही -
हां, हां ! म्हणजे फारच बहार उडाली असती ! कारण, शनिवारी अर्धी -
आणि रविवारी तर काय आपल्या बापजाद्यांचाच !
लगेच मग सोमवारची ही सबंध !
पुढे मंगळवारी नारळी पौर्णिमा, अन् बुधवारी श्रावण्या !
गुरुवारी गव्हर्नरसाहेब आले म्हणून, अन् शुक्रवारी येऊन गेले म्हणून !!
म्हणजे ओळीने आपला सहा साडेसहा दिवस चालला आहे धडाका !
हं - अं ! बरे चला ! नशीबच आपले फुटके, त्याला काय करायचे बाबा !
म्हणून म्हणतो की, हे सुट्टीसाठी टाहो फोडणार्‍या जीवांनो,
दुर्दैवाने वेळ साधिली म्हणुनी ऐसे घडले,
इलाज नाही काही त्याला नशिबच अपुले फुटले,
तेव्हा स्वस्थ रहा । घरचा मार्ग आता सुधरा ! ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP