[ स्थळ : दोन खणांची एक खोली. खोलीतील सामानसुमान अव्यवस्थित रीतीने ठेवण्याची किती खबरदारी घेण्यात आली आहे, हे आपल्याला उघडउघड दिसतेच आहे. आरामखुर्चीवर वाकडेतिकडे बसलेले जे सदगृहस्थ आहेत, त्यांचे नाव चिंतोपंत. हे आंम्लकवी शेक्सपिअर याचे ’ मिङसमर नाइट्स ड्रीम ’ हे नाटक वाचीत आहेत. ]
चिंतोपंत : ह्य: ! ह्य: ! मोठी मौज आहे बुवा ! या ’ पक्’ सारखी आपल्याला जर थोडीशी गंमत करायला सापडेल, तर खरोखर किती बहार होईल, नाही ? ( पुन: वाचू लागतो. इतक्यात ’ चिंतोपंत ’ अशी आतून एक हाक ऐकू येते. )
चिंतोपंत : कोण आहे ?
( आतून ) : मी आहे.
चिंतोपंत : कोण तुम्ही ?
( आतून ) : आधी दार उघडा, मग सांगतो मी कोण आहे ते !
चिंतोपंत : कटकट् ! चांगला वाचीत होतो. ( उठून दार उघडतो. ) येथे तर कोणीच नाही ! ( नीट इकडे तिकडे पाहून ) हाक तर चांगली स्पष्ट ऐकू आली, आणि येथे - असेल कोणीतरी ! ( दार लावून घेतो. ) नाही तर तो खालचा राम्या असेल. वात्रट पोर ! ( खुर्चीवर बसणार, तोच दारावर थाप वाजते. ) अरे !
( आतून ) : ह्य: ह्य:, चिंटोपॅंट !
चिंतोपंत : काय चावटपणा आहे रे ! मार पाहिजे वाटते ! ( उठून दार उघडतो, तोच एक सपक्ष व विचित्र पोशाख केलेला मुलगा आत येतो. )
चिंतोपंत : ( घाबरुन ) आं ! कोण ? ( थरथर कापू लागतो. )
मुलगा : ह्य: ! ह्य: ! काय घाबरला आहात हो ! मला ओळखले का मी कोण आहे तो ?
चिंतोपंत : ( नीट पाहून ) नाही.
मुलगा : नाही ओळखले ? तुम्ही आता वाचीत काय होता ?
चिंतोपंत : शेक्सपिअरचे ’ मिड्समर नाइट्स ड्रीम ’.
मुलगा : हो ना ? मग ओळखा आता मी कोण आहे तो.
चिंतोपंत : नाही बोवा अजून काही बरोबर -
मुलगा : हे:, बरे, मघाशी तुम्ही वाचतावाचता मध्येच हसलात का ?
चिंतोपंत : त्या नाटकातील ’ पक्’ ने केलेली गंमत वाचली -
मुलगा : म्हणून हसलात; आणखी म्हणलात काय ?
चिंतोपंत : हो, काही तरी म्हटले खरेच ! काय बरे ? - हां ! की आपल्याला जर अशी पकसारखी मौज करायला सापडेल, तर -
मुलगा : अहो, म्हणूनच तर मी तुमच्याकडे आलो आहे.
चिंतोपंत : म्हणजे ! तू पक् की काय ?
मुलगा : हो ! ज्याची तुम्ही मनापासून आठवण केलीत, तोच मी पक् * ! बोला आता मी तुम्हाला काय गंमत दाखवू ती ?
चिंतोपंत : गंमत का ? आहे माझ्या मनातून एक करायची. पण ती जुळावी कशी ?
पक् : त्याची का तुम्हाला काळजी ? तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आधी.
चिंतोपंत : हे पहा, मला जर आता एके ठिकाणी जायला सापडेल तर मोठी बहार होईल बोवा ! ( घड्याळाकडे पाहून ) हो ! ते आता या वेळेला जमलेच असतील !
पक् : एवढेच ना ? अहो, ते काम माझे ! कोठे घेऊन जायचे ते सांगा आधी, म्हणजे मी हे फूल तुमच्या -
चिंतोपंत : काय ? हे माझ्या डोळ्यात पिळणार ? नको रे बुवा !
पक् : अहो ! ते नाही, हे फूल. हे दुसरे आहे.
चिंतोपंत : हां - मग हरकत नाही ! नाही तर भलतेच काही तरी -
पक् : तसे नाही हो ! हे फूल तुमच्या व माझ्या तोंडाभोवती फिरवतो, की, दोघेही आपण गुप्त ! कोणाला दिसायचे नाही आणि काही नाही !
चिंतोपंत : हो का ? अरे वा !
पक् : मात्र एवढेच, की, कोठेही काही बोलायचे नाही, किंवा कोणाचाही आपल्याला स्पर्श होऊ द्यायचा नाही ! जे काय दिसेल ते मुकाट्याने दूर उभे राहून पाहायचे, व ऐकायचे !
चिंतोपंत : ठीक आहे, काही हरकत नाही. पण आपण एकमेकांना दिसणारच ना ?
पक् : हो हो !
चिंतोपंत : आणि दुसरे असे की, पुन: मी प्रकट कसा होणार ?
पक् : ऍं: त्यात काय आहे ! आपण येथे परत आलो, की, तुमच्या तोंडाभोवती पुन: हे फूल असे मी उलट फिरवीन, की, संपले ! मी खूण केल्याबरोबर तुम्ही तेथून हळूच माझ्या मागून या म्हणजे झाले ! आणि हे पहा, मी जी ही गंमत दाखविणार आहे, ती तुम्हालाच तेवढी !
चिंतोपंत : वा वा ! फारच छान !
पक् : चला आता - मग उशीर नको ! कपडे घाला आधी.
चिंतोपंत : हे पहा घातलेच ! ( चिंतोपंत कपडे घालून तयार होतो, व हातात काठी घेतो. ) हं चला.
पक् : येथे नको. घराच्याबाहेर पडल्यावर गुप्त होऊ; आणि मग कोठे जायचे ते जाऊ.
चिंतोपंत : बरे, तसे करु.
[ दोघेही जातात. ]