[ स्थळ : दत्तोपंत दाभणमिशे यांची माडी. मध्यभागी गालिचावर दत्तोपंत व राघोपंत गप्पा मारीत बसले आहेत. जवळच पानतंबाखूचा डबा व पिकदाणी आहे. चिंतोपंत व पक् हे दोघे हळूच एका कोपर्यात येऊन बसतात. ]
दत्तोपंत : पण तुम्ही तर त्याच्या नाटकावर मोठा चांगला अभिप्राय दिला आहे !
राघोपंत : दिला झाले ! म्हटले, आहे काय त्याच्यामध्ये एवढे मोठेसे ! फारच तोंड वेंगाडायला लागला - तेव्हा देऊन टाकला !
दत्तोपंत : हं: मी सुध्दा वाचले ते नाटक, पण मला बोवा इतके काही -
राघोपंत : अहो, कशाचे आले आहे, अगदी गचाळ आहे ! कोठे एकदोन ठिकाणे चांगली असली म्हणजे झाले की काय ? खरेच जर पुसाल तर मला ते नाटक मुळीच आवडले नाही !
दत्तोपंत : बरे, नाटकातील भाषाही फारशी चांगली साधली आहे असे म्हणावे, तर तेही नाही !
राघोपंत : छे: मुळीच नाही ! किती तरी ठिकाणी अशुध्द आणि अस्वाभाविक आहे. अहो, भाषा चांगली येईल कोठून ? त्या शिंच्याला धड व्याकरण समजत असेल तेव्हा ना !
दत्तोपंत : हं: हं: - इतकेच नाही पण दोनतीन ठिकाणी तर ग्राम्य आणि अश्लील झाली आहे.
राघोपंत : खरेच ! अभिप्राय द्यायच्या वेळेला हे नाही माझ्या लक्षात आले. मी आधी धड वाचले कोठे म्हणा ते !
दत्तोपंत : हं: हं: !
राघोपंत : खरेच बोवा, चिंतोपंताच्या त्य नाटकापेक्षा तुमच्या वडिलांचे ते काव्यच किती सुंदर आहे ! क्च ! काय ती प्रतिभा ! काय तो भाषेचा ओघ ! छे बोवा, विलक्षणच प्रकरण ते !
दत्तोपंत : पण राहोपंत, त्याला आपल्या नाटकाची किती घमेंड आहे !
राघोपंत : अहो, त्याला स्वत:ची काय घमेंड कमी आहे !
दत्तोपंत : ते काही विचारु नका. हं: !
राघोपंत : मी सांगतो ना, तो शिंचा नेहमी घमेंडीतच मरायचा ! ह्य: - अगदीच मूर्ख आहे ! जेथेतेथे आपले नाटक घेऊन नाचत असतो, आणि अभिप्राय गोळा करीत असतो, झाले ! या अभिप्रायांचे आणि प्रस्तावनांचे अलीकडे एक खूळच माजले आहे ! लिहिणारांनाही अक्कल तितकीच असते, आणि अभिप्राय देणारांनाही पण तितकीच असते ! ह्य: ह्य: - घ्या - पान घ्या !
दत्तोपंत : जाऊ द्या हो ! हे पहा राघोपंत, हे असेच चालायचे.
राघोपंत : तसे नाही ! मी आपला निर्भिड माणूस आहे. आत एक आणि बाहेर एक, हे मला नाही खपत !
दत्तोपंत : अहो, पण ते जगाला खपले पाहिजे ना ? निव्वळ आपणा दोघांनाच एकमेकांचे स्वभाव आवडून चालत नाही !
राघोपंत : नाही आवडत तर मरु दे शिंचे जग ! जरुर नाही -
दत्तोपंत : ह्य: ह्य: ! भारीच निर्भिड बोवा तुम्ही ! नाहीतर आमचे ते चिंतोपंत -
राघोपंत : हां हां, अहो, चिंतोपंत नका म्हणू ! नाही तर -
द्त्तोपंत : म्हणजे ?
राघोपंत : वा ! तुम्हाला नाही का गंमत ठाऊक ?
दत्तोपंत : नाही बोवा !
राघोपंत : अहो, परवा त्याला कोठे मी सहज चिंतामणराव असे म्हणालो, तो त्याने मला सांगितले, की, माझ्या नावापुढे ’ मणराव ’ किंवा ’ पंत ’ अशी अक्षरे लावलेली मला नाही खपत ! मला आपले साधे सिंपल् चिंतो -
दत्तोपंत : ह्य: ह्य: अगदीच सिंपलट्न आहे !
राघोपंत : ते काही विचारु नका ! तशीच शिंच्याला आपल्या लेखनाची आणि वाचनाची घमेंड ! ती तरी किती पण ! ज्याच्या त्याच्या पुढेपुढे नाचायचे ! आणि आपले हे ! मला शेक्सपिअर समजतो, ब्राऊनिंग समजतो, शेले वाचतो, हे लिहितो आणि ते लिहितो !
द्त्तोपंत : हं: हं: - पण खरेच त्याला काही समजते का हो ?
राघोपंत : बोडके समजते आहे ! आम्ही शिंचे इतके शिकलो - सवरलो, पण अजून आम्हाला शेक्सपिअर आणि ब्राऊनिंग काही सुध्दा समजत नाही ! आणि हे तर एस्. एफ्. झालेले कालचे पोर ! या म्हसोबाला -
दत्तोपंत : हं: हं: हं: आहे ! चिंतोपंत म्हणजे एक वल्ली आहे !
राघोपंत : नुसती वल्ली नाही, चांगला गांजा आहे गांजा !
( दोघेही मोठमोठ्याने हसू लागतात. इतक्यात चिंतोपंतांना भान न राहून राघोपंताच्या पाठीवर ते जोराने काठीचा तडाखा मारतात. राघोपंत ’ अरे बापरे ’ ! असे ओरडतो. तोच खूण केल्याबरोबर, चिंतोपंत व पक् हे दोघेही पळून जातात. )
दत्तोपंत : ( घाईघाईने राघोपंताच्या जवळ जाऊन ) काय, काय झाले राघोपंत ?
राघोपंत : आई ! आ - ! काही नाही ! केवढी पाठीत कळ निघाली हो !
[ तक्क्यावर मान ठेवून पडून राहतो. दत्तोपंत त्याच्याजवळ बसून पाठ चोळू लागतो. ]