प्रवेश चौथा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : मार्केट. हौदाजवळ एक व्हिक्टोरिया उभी आहे. तिच्या पुढच्या बाजूला राघोपंत व चिंतोपंत बोलत उभे आहेत. जवळच दत्तोपंत व पक् हेही त्यांचे संभाषण ऐकत उभे आहेत. इतर लोक जात येत आहेत. ]

राघोपंत : इतका जर हा दत्तोपंत चैनीत राहतो, तर मग याचे चालते कसे हो !
चिंतोपंत : सांगितले ना, याची टोपी त्याच्या डोक्यावर घाल, त्याचे पागोटे याच्या डोक्यावर घाल, हा उद्योग !
राघोपंत : तरीच !
चिंतोपंत : फुटकी कवडीही स्वत:च्या मेहनतीने न मिळविता वर्षभर ऐटीत कसे रहावे हे जर कोणाला शिकायचे असेल तर त्याने आमच्या दत्तोबांचा कित्ता गिरवावा. स्वारीच्या घरी जाऊन तर पहा ! खुर्च्या, टेबले अन् पुस्तके, मारे ऐसा थाट आहे की, यंव ! जसा काही लॉर्ड फॉकलंड !
राघोपंत : ये: ! वर्णन तर मोठ्या बहारीचे केलेत बोवा !
चिंतोपंत : बरे, इतक्या जिनसा विकत घेतल्या आहेत ना ! एकीचेही पैसे दिले असतील तर शपथ !
राघोपंत : म्हणजे ?
चिंतोपंत : अहो, सगळा कर्जबाजारीपणा ! याचे पाच रुपये काढ, त्याचे दहा रुपये काढ, सदा हे ! काही अब्रू आहे का त्या ठोंब्याला ? बरे, इतके असून पुन: व्यवहारज्ञानाची किती ऐट !
राघोपंत : ह्य: ह्य: ह्य: !
चिंतोपंत : मी शहाणा ! सदा तोंडाशी तर कुत्रे बांधलेले ! याच्याशी भांड, त्याच्याशी भांड ! वा ! मध्ये तर याने एकदा भंग्याशी मारामारी केली !
राघोपंत : भंग्याशी ?
चिंतोपंत : हो ! तुम्हाला नाही का ठाऊक ? एक दिवस सकाळी हे जो शौचाला जातात, तोच भंग्याने घेतली पाटी काढून ! झाला संताप ! अन् काय ? बाहेर येऊन त्याच्याशी मारामारी करायला सुरुवात केली !
राघोपंत : ह्य: ह्य: ह्य: !
चिंतोपंत : मग काय ! त्या वेळेला ही गर्दी !
राघोपंत : घाणेरडा तर इतका आहे, की सुमार नाही. तंबाखूचा बोकणा भरलेला ! आणि जिथेतिथे पचापचा थुंकायचे ! तसेच शिंकरायचे झाले की नाही, म्हणजे नेसलेल्या धोतरातच !
राघोपंत : ऍ !
( चिंतोपंत व्हिक्टोरियाच्या पायरीवर डावा पाय ठेवून उभा राहतो. इतक्यात राघोपंताचा कारकून मार्केटातून भाजी घेऊन येतो; व सर्व भाजी व्हिक्टोरियाच्या आत ठेवून पलीकडे उभा राहतो. )
राघोपंत : आणली सगळी भाजी ? ठीक आहे. चला आता घरी.
चिंतोपंत : मला तर त्याच्या नकट्या नाकाचा इतका काही संताप येतो, की, काही पुसू नका !
राघोपंत : ह्य: ह्य: !
चिंतोपंत : तसेच हे पडले ठेंगू ! चालताना जी काही यांची धादल होते, ती काही विचारु नका ! ते ढंगाळे गोविंदराव मारे सपाट्याने चालले असतात, आणि हे जे अचे अचे हात करुन जे काही कुलुंगी कुत्र्यासारखे धावत असते ! हा: ! हा: !
( इतक्यात चिडलेला दत्तोपंत पुढे होऊन चिंतोपंताला चाट मारतो, तो चिंतोपंत तोंडघशी पडतो. द्त्तोपंत व पक् हे नाहीसे होतात. राघोपंत, त्यांचा कारकून व कोचमन हे धावत जाऊन चिंतोपंताना उभे करतात. आसपासचे लोक गोळा होतात. )
राघोपंत : काय झाले हो चिंतोपंत ?
चिंतोपंत : काही नाही  ! थंडीने पायाला सहज वाताचा झटका बसला.
राघोपंत : बसा. गाडीत बसा, चला.
[ उभयता गाडीत बसून जातात. ]

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP