अंक पहिला

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : सरकारी कचेरी. एक मोठी खोली. चार कारकून काम करीत बसले आहेत. उजव्या हाताशी असलेल्या खोलीतून टाइपरायटर्सचा आवाज ऐकू येत आहे. पाठीमागच्या बाजूस एक मोठा दिवाणखाना असून त्यांतही बरेचसे कारकून काम करीत बसले आहेत. मधूनमधून पट्टेवाले वेताच्या टोपल्यांत कागद घेऊन व मध्येच ’ साssब !’ असे ओरडत इकडून तिकडे धावत आहेत. लांबवर कोणीतरी टेलिफोनवर बोलत आहे असे वाटते. खोलीच्या डाव्या हाताकडे दुसरी एक खोली असून तिचे दार अर्धवट उघडे आहे. दारावरच किंचित् वरच्या बाजूला ’ रेकॉर्ड ’ अशी डोळे बटारुन बघणारी पाटी दिसत आहे. ]

काल : १९०८ ते १९१५ या सालातील कोणतेही वर्ष.
पात्रे : केशवराव, गोविंदराव दिनकरपंत : कारकून, अप्पासाहेब : एक जुने व अनुभवी कारकून नानासाहेब : सरकारकून ।

केशवराव : ( जांभई देऊन हातातील कागदाने वारा घेत घेत ) आर्‍या आई ! छे बोवा ! काय भयंकर उन्हाळा हो !
गोविंदराव : काही विचारु नकोस ! सारख्या डोक्यातून अन् अंगातून घामाच्या धारा चालल्या आहेत ! हुश्श ! हा, हा, हा !
केशवराव : नाही - पण यंदाचा उन्हाळा जरा जास्तच -
गोविंदराव : अरे चालायचेच, दिवसेंदिवस उन्हाळा आला जास्तच कडक येत जायचा कारण -
अप्पासाहेब : डॅम् ! कोठली निब्स् आणली आहेत कोणाला ठाऊक ! नांगर जसे काही !
केशवराव : अहो, नांगरच नाही तर काय ? अक्षरसुध्दा धड येत नाही ! भीक लागली आहे डिपार्टमेंटला, तेव्हा हे असले काही तरी आपल्या गळ्यात ( लगबगीने अप्पासाहेबांजवळ जाऊन ) अप्पासाहेब, हे पहा बरे, निव् कसे काय चालते आहे ते !
अप्पासाहेब : ( पहिले निव फेकून देऊन दुसरे लावतो व लिहू लागतो. ) आहे ! फक्कड आहे !
केशवराव : ( हसत ) हें: हे: हे आपले माझे खासगी आहे हो ! ( आपल्या जागेवर जाऊन बसतो व काम करु लागतो. )
गोविंदराव : ( आपल्याशी ) हो, हो असायचेच ते ! असा खाजगी कारभार केल्याशिवाय झोपा कशा ताणायला सापडतील हपिसात ! चोर लेकाचा !
अप्पासाहेब : अरे केशवराव, कोण म्हणालास तू कोकणातून कोण आले आहे ? आत्या का तुझी ?
केशवराव : साहेब, आत्या नाही. मावशी आली काल माझी !
अप्पासाहेब : फणस मोठा छान निघाला बोवा तुझा !
केशवराव : ( हसत) हें: हें: नानासाहेबही तेच म्हणत होते. उठल्याबरोबर सकाळी दुसरे तिसरे काही केले नाही ! नानासाहेबांकडे जाऊन तिथे एक फणस ठेवला, आणि लगेच तडक आपल्याकडे -
गोविंदराव : ( आपल्याशी ) पहा, लेकाच्याचे कसे खासगी आहे ते !
पट्टेवाला : ( आत येऊन ) हं, दिनकरपंत हे श्टेटमेंट घ्या. नानासाहेबांनी सांगितले आहे की, हे आजच्या आज तयार होऊन मिळायला पाहिजे ! समजेल का ?
दिनकरपंत : अहो, पण हे आजच्या आज होणार कसे ?
पट्टेवाला : ते मला नाही ठाऊक ! नानासाहेबांनी सांगितले की,आजच्या आज -
दिनकरपंत : आधीच काम किती पडले आहे,आणखी -
पट्टेवाला : ही कुरकुर माझ्याजवळ का ? साहेबांनी सांगितले मी आणून दिले करा नाही तर तिकडे फेकून द्या ! ( निघून जातो )
गोविंदराव : ( दिनकरपंताच्या टेबलावरील कागदाच्या भार्‍याकडे व खुद्द दिनकरपंताकडे पाहून थोड्या वेळाने ) खरेच, काम बाकी पुष्कळच पडले आहे ! आणि स्टेटमेंटही काही लहान सहान दिसत नाही !
केशवराव : अहो, तुम्हाला ठाऊक नाही पंतांचे ! अक्षर चांगले आहे. अन् ते काम फार काळजीपूर्वक करतात, म्हणून साहेबांची त्यांच्यावर इतकी मर्जी आहे ! आपल्यासारखे थोडेच आहे ! बोलून चालून आळशी माणसे !
गोविंदराव : हं: चांगली मर्जी आहे अन् काय ! एखाद्याचे अक्षर चांगले आहे अन् तो काळजीने काम करतो, म्हणून त्याच्यावर वरच्यावर कामाचा बोजा लादणे, ही छान तुमजी मर्जी आहे बुवा !
केशवराव : अरे अजून रुळले नाहीत ते ! येऊ दे एकदा अनुभव येऊ दे म्हणजे आपसुखच ताळ्यावर येतील.
गोविंदराव : ते कसे ?
केशवराव :अरे तर, नोकरी म्हटली की, आपण होऊन जीव तोडून उगीच भरधाव धावू नये, हे कळले नाही त्यांना अजून ! मी म्हणतो, केले - छाती फुटेपर्यंत काम केले ! फायदा काय ? पैशाच्या नावाने तर बाजा !
गोविंदराव : अरे अंमळ हळू बोल ! तो काकोबा तुझे ऐकेल ना ! हं: केव्हाचा तो एक कागद घेऊन  बसले आहेत !
केशवराव : मजा आहे अन काय ! जाऊ दे ! आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशी ? ( बरेचसे कागद टेबलावर इकडे तिकडे पसरुन ) आता काहीतरी काम करायला पाहिजे ! नाही तर आपल्याही गळ्यात एखादे घोंगडे यायचे !
गोविंदराव : ( दिनकरपंताकडे पहात आपल्याशी ) सारखे खाली मान घालून काम करतो आहे ! जरा अमळ मदत करु का ? - पण नको ! आज एकदा मदत केली, तर रोज उठून कटकट लागायची पाठीमागे ! आणि ’ तुला काम कमी !’ म्हणून आणखी एखाद्या उडाणटप्पूचे काम बसायचे टाळक्यावर ! तेव्हा नकोच ते ! ( काम करु लागतो )
दिनकरपंत : ( घड्याळाकडे पाहतो. )
केशवराव : काय पंत, घड्याळाकडेसे पाहता आहात ?
दिनकरपंत : काही नाही, सहज किती वाजले ते पाहिले. ( आपल्याशी ) साडेपाच तर आताच झाले. आठच्या आत काही आज घरी जायला सापडत नाही ! ( थांबून ) रोजचेच आहे ! आणि घरी... घरी तर - चूप ! आता उगीच गडबड करु नकोस !
अप्पासाहेब : ( काही वेळाने ) साहेब गेले का हो ?
केशवराव : हो केव्हाच ! ते तर साडेचारलाच गेले ! कामात होता आपण, म्हणून आपल्याला समजले नाही ! अप्पासाहेब, सहा वाजायला आले !
अप्पासाहेब : येऊ दे रे ! पण हो, आज तुम्हाला एक आनंदाची बातमी समजली का ?
केशवराव : ह्य: ! ह्य: ! ती कोणती, अप्पासाहेब ?
अप्पासाहेब : काय ठाऊक नाही ? काय गोविंदराव, तुम्हाला काही सुगावा ?
गोविंदराव : नाही बोवा, काहीच समजले नाही मला !
केशवराव : अहो, नाहीतर आमच्या पंताना ठाऊक असेल, काय पंत ?
अप्पासाहेब : अरे त्याला कोठले ठाऊक असायला ! साहेबांना आपल्या प्रमोशन झाले ! समजले का ?
केशवराव : अस्से ! पण ते किती ?
अप्पासाहेब : किती म्हणजे ? बाराशेचे अठराशे आणि शिवाय भत्ता !
गोविंदराव : चैन झाली अन् काय !
अप्पासाहेब : बाकी साहेब आपला हुशार माणूस म्हणा !
केशवराव : हो तर ! यात काय संशय ! अहो ते... मागे नाही ? त्या भत्तेबिलाच्या बाबतीत अकौटंट जनरलला ऐसा टरकावला की, ज्याचे नाव ते ! याला म्हणावे लेखणी ! नाही तर आम्ही ! बसलो आहोत दळीत ! ( दिनकरपंताखेरीज सर्वजण हसतात. )
केशवराव : ( दिनकरपंताकडे रोखून पाहत ) प...ण काहो अप्पासाहेब, आमच्या पंताना नाही का काही मिळाले ? ते तर कवी आहेत !
दिनकरपंत : काय, काहीतरी बडबडता हो ?
केशवराव : अरे वा ! मोठे चमत्कारिकच दिसता ! काय बडबडलो हो ?
गोविंदराव : श्शूक ! गप बसा - नानासाहेब आले.
केशवराव : येईनात आले तर ! काही अक्कल आहे की नाही ?
दिनकरपंत : चूप रहा !
नानासाहेब : ( आत येऊन ) सायलेन्स ! काय गडबड आहे ? अप्पासाहेब, अहो, हे डायरेक्टर जनरलचे प्रकरण इन्स्पेक्टर जनरलकडे काय म्हणून गेले ?
अप्पासाहेब : पाहू पाहू बरे. ( प्रकरण हातात घेऊन पाहतो. )
नानासाहेब : अहो, साहेब किती ओरडत होते ! काम नीट होत नाही अन काही नाही, हपीसात सगळा गोंधळ माजला आहे म्हणून ! हे काय हे ?
अप्पासाहेब : हं, आता आले लक्षात. दिनकरपंत, इकडे या पाहू.
नानासाहेब : कोणाची ? यांचीच चूक का ?
अप्पासाहेब : हो, - तुम्ही हे प्रकरण डि. जी. कडे पाठवायचे सोडून आय.जी.कडे काय म्हणून पाठविले ?
दिनकरपंत : ( प्रकरण पाहून ) साहेब, आपण पत्ता तर हा आय. जी. चा -
नानासाहेब : अहो, नुसते पत्त्याचे काय घेऊन बसला आहात ? मजकूर नको का वाचून पाहायला ? असे कसे डिस्पॅच करता तुम्ही ? डोळे उघडे ठेऊन काम करता का झोप घेता !
अप्पासाहेब : ( कागद टेबलावर ठेवून त्यावर काही लिहू लागतो. )
गोविंदराव : ( आपल्याशी ) आहे की नाही ! घसरले अप्पासाहेब ! नानासाहेबांनी लक्ष दिले नाही, साहेबांनी पाहिले नाही ! अन् उट्टे निघते आहे त्याचे दिनकरपंतांवर ! खासा न्याय !
अप्पासाहेब : ( प्रकरण दिनकरपंताच्या हातांत देऊन ) जा ! पुन: अशी चूक करु नका. नीट केअरफुली - काळजीने - काम करीत जा - समजले ?
केशवराव : ( दिनकरपंताकडे पाहून ) आधी ते स्टेटमेंट तयार करा आणि मग-
नानासाहेब : काय ! ते अजून तयार झाले नाही ? शाबास !
दिनकरपंत : साहेब -
नानासाहेब : काय, साहेब काय ? आजच्या आज तयार व्हायला पाहिजे, असे सांगून पाठविले होते, आणि तुम्ही तर - काहो अप्पासाहेब, तुम्ही तर यांची मोठी शिफारस केली होती की, हे फार कळकळीने काम करणारे आहेत म्हणून ? पण हे तर अगदी सुस्त दिसतात ! ते काही नाही ! आताच्या आता ते स्टेटमेंट तयार होऊन साहेबांच्या बंगल्यावर रवाना झालेच पाहिजे !
दिनकरपंत : साहेब, अजून टपालच किती - ( अप्पासाहेब डोळ्याने खुणावतात. )
नानासाहेब : काय ! टपालही अजून शिल्लकच ! हपीसात भांडणे करा, ( केशवरावाकडे नजर टाकून दिनकरपंतास ) नाही तर कविता खरडा, म्हणजे छान काम लौकर होईल !
दिनकपंत : पण साहेब -
नानासाहेब : ( उसळून ) वर तोंड करुन बोलता आणखी ? दिनकरपंत, तुम्हाला अजून कायम व्हायचे आहे, लक्षात ठेवा.
केशवराव : ( आपल्याशी ) खाशी - छान झाली !
पट्टेवाला : ( आत येऊन ) साहेब, बाहेर टांगा उभा आहे.
नानासाहेब : अरे हो, खरेच की ! चला अप्पासाहेब, येता का ?
अप्पासाहेब : हो, हो, चला की ! माझी तयारी आहे. दिनकरपंत आजच्या आज सगळे टपाल, आणि ते स्टेटमेंट तयार करुन, मग घरी जा बरे.
नानासाहेब : काम पाहिले तर काही नाही, पण गोंधळ किती ? का हो अप्पासाहेब, आपल्या वेळेला तर याच्या तिप्पट काम होते !
अप्पासाहेब : ह्य:! ह:! ह्य:! ह्य: !
नानासाहेब : पण काही नाही ! पाचच्या आत पार फडशा ! चला येता ना ? ( जातो )
अप्पासाहेब : हा आलोच. सुपिरियरशी कसे बोलावे हे अजून समजत नाही तुम्हाला ! ( उपरणे झटकून व हातात छत्री घेऊन ) परवाच नानासाहेब म्हणत होते की, सिव्हिल सर्जनकडे तुम्हाला पाठवावयाचे म्हणून. अन् तुम्ही तर हे असे - केशवराव, जर त्यांना मदत करा हो. ( जातो. )
केशवराव : होय साहेब. काय दिनकरपंत, पाहू काय काय -
गोविंदराव : ( सगळे आवरुन ठेवून ) चला, आता आपण कशाला उगीच बसा ? ( जाऊ लागतो. )
केशवराव : काहो ? निघाला वाटते ? थांबा, मी येतो ना. ( डोक्याला रुमाल बांधू लागतो ) अहो, घरात म्हणजे कोण अडचण ! अन त्यांत आणखी पाहुण्याची भर ! का..य एक एक ( गोविंदरावाबरोबर दाराशी गेल्यावर दात विचकून व मागे वळून ) पंत ! सगळे ते करा आणि मग घरी जा बरे !
( दोघेही जातात. )
दिनकरपंत : ( थोडावेळ काम करुन आपल्याशी ) असे वाटते की - स्स ! ( दात ओठ खातो. ) आहाहाहा ! डोके कसे पेटून गेले आहे ! ( काम करु लागतो. ) जीवा ! तुला अजून कायम व्हायचे आहे, अजून तुला कायम व्हायचे आहे. ( थांबून ) येऊ दे, लागतील तितके अश्रुंचे लोट येऊ देत ! दु:खाची इतकी आग भडकली आहे, की ते पार करपून - हुश्श ! ( काम करु लागतो. ) तू काय समजलास आहेस ? जरुर नाही त्या नोकरीची ! ( झटकन एक कोरा कागद घेऊन त्यावर काही लिहू लागतो. ) पण हो, हो, बेटा ! अंमळ घराकडे - ( शून्य दृष्टीने पाहू लागतो, तो पुन: डोळे भरुन येतात व कंठ दाटून येतो. ) देवा ! कुठे रे गेल्या त्या जीवाच्या ऊंच ऊंच उड्या, आणि त्याची ती गोड स्वप्ने !
( टेबलावर अंग टाकून स्फुंदू लागतो. वार्‍याने दार झटकन बंद होते. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP