[ स्थळ : सरकारी जनरल हॉस्पिटलमधील एक खोली. हिची लांबी रुंदी अदामासे वीस फूट आणि उंची जवळ जवळ पंधरा फूट असेल. भिंतीना फिक्कट हिरवा रंग दिलेला आहे. उजव्या हाताशी असलेल्या भिंतीना दोन मोठ्या खिडक्या आहेत. पण त्यांच्या तावदानाला ज्या काचा बसविलेल्या आहेत, त्या उजेडाशिवाय पलीकडचे काहीच दाखवत नाहीत. समोरच्या भिंतीना दार नाही आणि खिडकीही नाही. आत शिरण्याचे दार डाव्या हाताकडील भिंतीला असून ते अलीकडच्या कोपर्यात आहे. दार चांगले मोठे असून त्याची तावदानेसुध्दा खिडकीसारखीच आहेत. या महाद्वाराशिवाय भिंतीला खिडकी वगैरे काही नाही. याच भिंतीला लागून दाराच्या पलीकडे कोपर्यात एक लहानसे टेबल आहे. चारपाच औषधांच्या बाटल्या, काचेच्या लहान लहान नळ्या वगैरे जिनसा त्यावर व्यवस्थित रीतीने मांडून ठेवल्या आहेत. उजव्या हाताकडील कोपर्यात एक वॉशिंग स्टॅंड ठेवलेला आहे. मध्यभागी जे टेबल दिसत आहे. त्याच्यावर लिहिण्याचे समान, सरकारी कागदपत्रे व पुस्तके तसेच वैद्यकीय विषयाचे दोनतीन भले मोठे ग्रंथ असे साहित्य मोठ्या टापटिपीने मांडलेले आहे. पलीकडे जवळच एक चांगली खुर्ची आहे. वैद्यकीय ज्ञानाच्या भारदस्तपणाला, व तद्विषयक पंडितांच्या गंभीर अभिरुचीला अनुसरुन सदर्हू खोलीमध्ये तसबिरी लावलेल्या नाहीत, इतकेच नव्हे तर टेबलावर फ्लॉवरपॉटमध्ये जो पुष्पगुच्छ ठेवलेला आहे, त्यात चुकूनसुध्दा सुवासिक फूल आलेले आढळत नाही. समोरच्या भिंतीला डोळे तपासण्याच्या अक्षरांचा, व एक ठिपक्यांचा असे दोन नकाशे लटकावलेले आहेत.
पात्रे : डॉक्टर स्ट्रिंगमन : असिस्टंट सिव्हिल सर्जन. दिनकरपंत, गोविंदराव, गोपाळराव, अनंतराव : सरकारी कारकून. हणमंतराव : हॉस्पिटचे कारकून. एक पोलिसशिपाई व एक पट्टेवाला. ]
पट्टेवाला : ( आत येऊन ) या इकडे. बसा इथे या बाकावर. कोठून पोष्टखात्याकडून आलात काय ? ( गोविंदराव आत येऊन बिचकत बिचकत बाकावर बसतो. )
गोविंदराव : हो, पोस्टखात्याकडूनच.
पट्टेवाला : ( टेबलावरील सामान इकडे तिकडे हलवीत व पुन: जागच्या जागी ठेवीत असता ) तुमचे पाकीट कोठे आहे पाहू.
गोविंदराव : काय ? पाकीट ?
पट्टेवाला : हो पाकीटच ! ऐकायला येत नाही वाटते तुम्हाला नीट ? ( गोविंदरावाने दिलेले पाकीट टेबलावर ठेवून ) असे करुन कसे चालेले ! एकदम अनफिट व्हाल ना ? ( टेबलावरील बाटल्यांत औषधे आहेत किंवा नाहीत हे पाहत असता ) माझ्याशी बोलताना जर तुमची ही तर्हा, तर मग साहेब आल्यावर कसे होईल ? पार घाबरुन जाल की !
गोविंदराव : ( किंचित भीत भीत आसपास एकदा सगळी खोली पाहून ) सिव्हिल सर्जन साहेबांची हीच खोली वाटते ?
पट्टेवाला : नाही, नाही ! ही नाही ! ही असिस्टंट साहेबांची - आमच्या धाकल्या साहेबांची खोली आहे. थोरल्या साहेबांची पलीकडे आहे.
गोविंदराव : अस्से ! पण... काय हो, डोळे तपासायचा.... हा.... हाच -
पट्टेवाला : ( ’ सावज बरे आहे !’ अशा अर्थाने मान हालवून ) हो हाच तो कागद, उठा, त्या तिथे उभे रहा पाहू ! जरा... जरा पुढे. ( गोविंदराव सांगितल्या ठिकाणी उभा राहतो. ) बस् ! ठेवा डाव्या डोळ्यावर एक हात. ( गोविंदराव डावा डोळा झाकतो. ) अन् सांगा पाहू आता हे किती ठिपके आहेत ते ?
गोविंदराव : ( मोजीत ) एक.... दोन...
पट्टेवाला : अहो, असे मोठ्याने मोजायचे नाही. एकदम सांगा.... आता ?
गोविंदराव : आठ.
पट्टेवाला : हे ?
गोविंदराव : चा... चार.
पट्टेवाला : अहो असे चाचतर काय सांगता ! बरं झाका आता उजवा डोळा. ( गोविंदराव उजवा डोळा झाकतो. ) बोला. हे किती ठिपके ? लवकर !
गोविंदरा : नऊ.
पट्टेवाला : अस्से.... हे किती ?
गोविंदराव : सहा.
पट्टेवाला : ( मान हलवीत ) आहे ! फिट् व्हायला काही हरकत नाही ! बसा. आता आमचे साहेब येतील.
गोविंदराव : वेळ झाली वाटते त्यांची यायची ?
पट्टेवाला : हो, झालीच म्हणायची. बाकी.... पाहिले डोळे तुमचे आधी मी, म्हणून बरं झाले ! नाहीतर... जाताना मी आपल्याला भेटेनच.
गोविंदराव : हो, हो, जरुर !
पट्टेवाला : ( दाराशी जाऊन ) कोण ? कोण आहे, नाईकसाहेब ! ( पोलिस आत डोकावतो; गोविंदराव जरा उठल्यासारखे करतो ) या, या !
पोलिस शिपाई : ( आत येतो. गोविंडरावाकडे पाहून व दाढीवरुन हात फिरवून ) हे कोण ? कोणीकडून आले आहेत हे ?
पट्टेवाला : हे कोण ? काय हो ? तुम्ही पोष्टाकडून आला आहात नाही का ?
गोविंदराव : ( अर्धवट उठून ) हो, पोस्टाकडूनच.
पट्टेवाला : क्यॅंव नाईकसाब, कुच खबरबात ?
पोलिस शिपाई : अरे क्या खबरबात ? पु़छो मत !
पट्टेवाला : ऐसा ! क्या हुवा क्या ?
पोलिस शिपाई : बडा साब आज बहोत गरम झाला होता !
पट्टेवाला : हां ? ते काय म्हणून ? अन् कोणावर ?
पोलिस शिपाई ? परवा तो कलेक्टर साहेबांचा कारकून नव्हता आला ?
पट्टेवाला : हां, तो चष्मेवाला ?
पोलिस शिपाई : तोच तो. त्याने जो बाबा चष्मा आणला होता, तो निघाला चुकीचा ! अस्सा साहेब त्याच्या अंगावर ओरडला, की बेटा पार भेदरुनच गेला !
पट्टेवाला : ह: ! ह: ! बहोत गम्मत हुई ! फिर ?
पोलिस शिपाई : फिर क्या ? दिला त्याला हाकून ! अन् अशी ताकीद दिली की, दोन दिवसांनी चांगला चष्मा आण, नाहीतर अनफिट करीन !
पट्टेवाला : करील बाबा ! थोरला साहेब म्हणजे काय.... भारीच कडक ! आग्या वेताळ तो ! अरे परवाचीच गंमत !
पोलिस शिपाई : क्या, क्या हुआ !
पट्टेवाला : इथं हपिसात झटकत होतो मी. इतक्यात मेमसाहेब आल्या, अन् पलीकडच्या हपिसात निरोप पाठवला. लगेच बाबाने सांगून पाठवले, की, " कामात आहे, बाहेर उभी रहा !" झाले ! पाच मिनिटे झाली, दहा झाली, पत्ता नाही याचा ! अन् ती तर इकडं उभी !
पोलिस शिपाई : ऐसा ?
पट्टेवाला : आता मेमसाहेब ती ! तेव्हा इथली एक खुर्ची घेतली, अन् तिला मी बसायला दिली ! ती कुठे खुर्चीवर टेकते न टेकते, अन् मी मागे फिरतो, तो बाबा आला आतून !
पोलिस शिपाई : अरे बापरे !
पट्टेवाला : अन् हातपाय आपटून जो माझ्यावर उखडला, अन् म्हणाला, " तुला खुर्ची द्यायला कोणी सांगितली ! काम सोडून तू बाहेर का आलास ? मेमसाहेबाला उभे राह्यला सांगितले होते, राहिली असती उभी !"
पोलिस शिपाई : क्या जुलूम आहे ! फिर ?
पट्टेवाला : फिर क्या ? मेरा नशीब ! अशिस्टंट साहेबांना सांगितले, आणि शिक्षा म्हणून तासभर मला उन्हांत उभे केले !
( दोघेही मोठ्याने हसतात. )
पोलिस शिपाई : बहोत कडक ! बडा साहब बहोत कडक !
गोविंदराव : ( अदबीने ) कोण ? सिव्हिल सर्जन वाटते ?
पोलिस शिपाई : क्या ? सिव्हिल सर्जन क्यॅंव बोलता आहे ? बडा साब बोलो !
गोपाळराव व अनंतराव : ( एकदा आत येऊन ) हेच अशिस्टंट -
पट्टेवाला : हो, हेच अशिस्टंट साहेबांचे हपीस ! पण तुम्ही एकदम आत कसे शिरलात ? आधी विचारल्याशिवाय ? बसा त्या बाकावर ! ( गोपाळराव व अनंतराव बाकावर बसतात तोच ) तुमची पाकीटे आणा पाहू.
पोलिस शिपाई : कुठून आलात तुम्ही ? ( पट्टेवाला पाकिटे टेबलावर ठेवतो. )
गोपाळराव : फॉरेस्ट डिपार्टमेंट.
पोलिस शिपाई : फारीष्ट ?
( हणमंतराव व दिनकरपंत आत येतात. बाकावर बसलेले तिघेजण उभे राहतात व लगेच खाली बसतात. )
हणमंतराव : पण तुम्ही इतके उशीरा का आलात ? आता साहेब येतील.
दिनकरपंत : घरी मुलगा फार आजारी -
हणमंतराव : ( टेबलावर दिनकरपंतांचे पाकीट आपटून ) ते खरे ! पण हे सरकारी काम आहे ना ? साहेब तुम्हाला पहिल्याने तपासणार आहेत - बसा त्या बाकावर. ( दिनकरपंत बाकावर बसतो. ठणठण असे मोठ्याने घड्याळाचे ठोके पडतात. ) अरे, आठ वाजले, साहेब आत्ता येतील.
( पट्टेवाला व पोलिस शिपाई आपले कपडे झाडून नीट ताठ उभे राहतात. बाकावर बसलेली मंडळी नीट सावरुन बसतात. सगळेजण दरवाज्याकडे पाहतात. इतक्यात मोटारीचे शिंग वाजते. पट्टेवाला बाहेर धावतो. पोलिस शिपाई दाराकडे पाहून हळूच ’ साब आया !’ असे म्हणतो. इतक्यात बुटांचा आवाज होतो; सर्वजण उभे राहतात. स्ट्रिंगमन साहेब व पट्टेवाला आत येतात. सर्वजण साहेबांना सलाम करतात, व उभेच राहतात. साहेब खुर्चीवर बसतात. )
स्ट्रिंगमन : ( टेबलावरील पाकिटे फोडून ती वाचल्यावर वर पाहून ) आज काय चार माणसे तपासायची आहेत ? ( पुन्हा कागदाकडे पाहू लागतो. )
हणमंतराव : होय साहेब, चार -
स्ट्रिंगमन : नो ! मला आज इतका वेळ नाही. पोटाचे ते ऑपरेशन करावयाचे आहे. तर.... डिनकर कोण आहे ?
हणमंतराव : डिनकर कोण तुम्ही का ? हे डिनकर. ( बोटाने दाखवतो. )
स्ट्रिंगमन : मी फक्त आज याच माणसाला पाहीन. बाकीच्यांना उद्या यायला सांग -
( दुसरे कागद पाहू लागतो व मधून मधून लिहितो. )
हणमंतराव : ( गोविंदराव, गोपाळराव व अनंतराव यांस ) आज साहेबांना वेळ नाही. उद्या तुम्ही पुन: या. दिनकरपंत, तुम्ही जाऊ नका. तुम्ही बसा.
गोपाळराव : उद्या किती.... आठाच्या सुमाराला ना ? ( जाऊ लागतात. )
हणमंतराव : नो नो ! बरोबर साताला या ! ( तिघेजण जातात. )
स्टिंगमन : सीपॉय् !
पोलिस शिपाई : ( सलाम करुन ) साsब !
स्ट्रिंगमन : हे पाकीट बडा साबकू देव और सलाम बोलो.
पोलिस शिपाई : अच्छा साब. ( जातो. )
स्ट्रिंगमन : डावा हात अधू असलेल्या माणसाचा अनफिट कागद पाठविला ?
हणमंतराव : होय साहेब, कालच पाठविला. ( आपल्याशी ) तो तर तसाच विसरुन राहिला वाटते त्या खणात !
स्ट्रिंगमन : गेट् अप् ! ( खिशातून ठिपक्यांचे कागद काढतो, व समोरच्या भिंतीजवळ जाऊन उभा राहतो. )
हणमंतराव : ( दिनकरपंतास ) हं, या इथं उभे रहा. ( दिनकरपंतांचा डावा डोळा झाकून ) सांगा किती ठिपके - ?
स्ट्रिंगमन : ( कार्ड दाखवून ) किती ?
दिनकरपंत : ( मनात ) बरोबर दिसत नाही ! ( उघड ) चार.
स्ट्रिंगमन : ( दुसरे कार्ड दाखवून ) हे किती ?
दिनकरपंत : पाच.
स्ट्रिंगमन : ऑल राइट् ! आता डावा डोळा. ( हणमंतराव दिनकरपंतांचा डावा डोळा झाकतो. )
हणमंतराव : ( दिनकरपंतास ) हं, सांगा नीट.
स्ट्रिंगमन : ( कार्ड दाखवून ) हे किती ?
दिनकरपंत : ( मनात ) अरे ! यानेही - ( उघड ) तीन.
स्ट्रिंगमन : ( दुसरे कार्ड दाखवून ) हे किती ?
दिनकरपंत : सहा. ( साहेब खुर्चीवर जाऊन बसतात. )
पट्टेवाला : स्वारी डोळ्यांत तर गचकली !
स्ट्रिंगमन : ( दिनकरपंतास ) इकडे या. तुम्हांला बरोबर दिसत नाही. हपीसात किती दिवस काम करीत आहा ?
दिनकरपंत : साहेब, दोन वर्षे झाली जवळ जवळ.
स्ट्रिंगमन : अन् तुम्हाला तर दिसत नाही ! मग काम कसे करता ?
दिनकरपंत : तसेच !
स्ट्रिंगमन : पाहू ? ( दिनकरपंतांचे डोळे काही वेळ पाहून ) अच्छा ! कपडे खोलो.
हणमंतराव : अंगातले कपडे काढा. दिनकरपंत अंगांतले कपडे काढून बाकावर ठेवतो.
स्ट्रिंगमन : ( छाती ठोकून पाहतो. छातीला नळी लावून काही वेळाने: ) व्हेरि बॅड्.... बोहोत खराब ! ( पोट दाबून पहातो. ) उं: ! हे काय ? स्प्लीन ! जाव ( खुर्चीवर जाऊन बसतो व कागदावर लिहू लागतो. )
हणमंतराव : तुम्ही कपडे घाला.
दिनकरपंत : ( कपडे घालीत असता मनात ) मी कुठे आहे ? ( शून्यदृष्टीने पाहू लागतो. )
स्ट्रिंगमन : ( लिहिलेला कागद हणमंतरावाजवळ देतो व एका मोठ्या पुस्तकांत नोंद केलेल्या ठिकाणी बोटाने दाखवून ) इथे त्याचा अंगठा घे, अन् त्याला जाऊ दे. ( दुसरे कागद वाचीत असता मनात ) अलीकडे काय असे व्हायला लागले आहे कुणास ठाऊक ? खराब प्रकृतीचीच माणसे फार !
हणमंतराव : ( कागद हातांत घेऊन दिनकरपंतास ) या इकडे पाहू. इथे तुमचा अंगठा उठवा.
दिनकरपंत : ( उजव्या हाताचा अंगठा पुढे करतो. )
हणमंतराव व पट्टेवाला : उजवा नाही, डावा !
दिनकरपंत : ( डाव्या हाताचा अंगठा शाईवर दाबून तो सांगितलेल्या ठिकाणी उठवू लागतो. )
हणमंतराव : तुमचा हात किती कापतो आहे ? सावकाश.
स्ट्रिंगमन : ( दिनकरपंताकडे पाहून मनात ) पूअर् मॅन् ! ( जातो. )
दिनकरपंत : ( अंगठा उठवून तसाच हात पुढे करुन उभा राहतो. )
हणमंतराव : ( दिनकरपंतास ) नाही, तुम्ही नाही द्यायचा. इथून रवाना होईल तो कागद.
दिनकरपंत : ( पुस्तकाकडे पाहून आपल्याशी ) आटपला बाजार ! मरेपर्यंत अभ्यास केला, छाती फुटेपर्यंत काम केले ! देवा ? आता मी कुठे - बाहेर ! बाहेर ! इथे नाही !
हणमंतराव : हं, जा आता घरी. ( दिनकरपंत छत्री घेऊन जातो. ) ( एक कागद मोठ्या पाकिटात घालतो, व वर पट्टेवाल्याकडे पाहतो.)
पट्टेवाला : काय झाले साहेब !
हणमंतराव : व्हायचे काय ? अनफिट् झाला अन् काय !
पट्टेवाला : हं: ! हं: ! हं: !
हणमंतराव : बरे, हे पुस्तक घेऊन चल माझ्याबरोबर.
( दोघेही जातात. )