[ स्थळ : दिनकरपंतांचे बिर्हाड. त्यांची उठण्याबसण्याची व निजण्याची दोन खणांची खोली. तिच्या पाठीमागे एकदोन खणी स्वयंपाकघर. अंधार असल्यामुळे त्यातले फारसे दिसत नाही. पण रोखेने दडपून टाकलेला चुलीतील विस्तव मधून मधून मोठ्या कष्टाने डोकावत आहे ! रात्र एकसारखी ओरडत आहे. दिनकरपंताच्या खोलीत एक रॉकेलचे डबडे धूर ओकीत एका कोपर्यात बसलेले आहे. जवळच एक घडवंची आहे. तिच्यावर धान्याचे डबे वगैरे पुष्कळच सामानसुमान खचलेले आहे. भिंतींना जागजागी खिळे ठोकलेले असून त्यांवर मुलांचे अर्धवट फाटलेले कपडे, मळक्या व फाटलेल्या टोप्या, एक दोन जुनेरी लुगडी, वगैरे पांघरुणे, चिरगुटे कशीतरी जुलुमाने अडकवून ठेवलेली आहेत. जमिनीवर मध्यभागी फाटलेल्या दारिद्र्यात गुरफटून तीन माणसे निजलेली आहेत. दिनकरपंतांची बायको यमुनाबाई ही जवळजवळ तेवीस वर्षांची आहे. तिच्या उजव्या हाताला जवळच सखाराम नावाचा साताआठ वर्षांचा मुलगा तापाने कण्हत व मधूनमधून बडबडत पडलेला असून त्याच्या उशाशी एक दोन औषधांच्या बाटल्या व पुड्या पडलेल्या आहेत. धाकटा मुलगा त्र्यंबक हा चार पाच वर्षांचा असून आपल्या आईजवळच डाव्या बाजूला निजलेला आहे. खोलीला वरच्या बाजूस पटई वगैरे काही नाही; नुसतेच कौलारु छप्पर आहे. दिनकरपंतांचे हे बिर्हाड एका मोठ्या वाड्याच्या मागच्या आवारात असून, जमिनीला थोडीशी ओल आहे. आत शिरण्याचे दार उजव्या हाताकडच्या भिंतीला दिसतच आहे.
पात्रे : यमुनाबाई : दिनकरपंतांची बायको. सखाराम व त्र्यंबक : त्यांची मुले. सुंदराबाई : घराची मालकीण. ]
सुंदराबाई : ( आतून ) हा कोण मेला रोज उठून कहार ! बायकोला आपल्या ताकीद करा ! रोज उठून तुम्हाला. कड्या काढाव्या कोणी ?
दिनकरपंत : ( आतून ) रोज कधी बरं काढता तुम्ही ? आजच कुठे जरा उशीर -
सुंदराबाई : ( आतून ) अहो, म्हणून काय झाले ! रोजचा तुमचा हाका मारण्याचा सपाटा असतोच की नाही ? झोपमोड नाही होत लोकांची ?
दिनकरपंत : ( आतून ) बरं, मी आज....
यमुनाबाई : अगबाई ! आले वाटते ! ( दाराची कडी काढते. )
सुंदराबाई : ( आतून ) मेली झोप की काय ही ! यमुनाबाई !
यमुनाबाई : आले हो. ( जाते. )
( दिनकरपंत आत येतात, व कपडे काढू लागतात. )
सुंदराबाई : ( आतून ) शंभरदा सांगितले की, रोजचा हा तुमचा ताप नको म्हणून ! राह्यचं असेल तर नीट रहावं, नाहीतर खुशाल दुसरीकडे सोय करावी. आम्हाला नाही खपायचे हे ! सांगून ठेवते !
यमुनाबाई : ( आतून ) अहो, पण आता या वेळेला तरी - घरात मूल आजारी आहे !
सुंदराबाई : ( आतून ) बरं झाल आहे तर !
यमुनाबाई : ( घरात येऊन ) रोज उठून मेलं तेच !
दिनकरपंत : अग चालायचेच ! आपले ऐकून घ्यावे झाले.
यमुनाबाई : ऐकून काय घ्यावं ? सगळी माणसं वाड्यातील नावं ठेवतात की, रोज उठून जर ही असं बोलते, तर तुम्ही तरी इतकं का सोसून घेता ?
दिनकरपंत : का सोसून घेता ? बोलून चालून भिकारी माणसे आपण ! पाहिजे कशाला येवढी ऐट ?
यमुनाबाई : हो ! असं म्हटलं म्हणजे झालं !
दिनकरपंत : मग आता करायचं काय त्याला ? लोकं बोलली - मी म्हणतो वेळेनुसार, लाथा जरी त्यांनी मारल्या - तरी त्या सोसल्या पाहिजेत आपल्याला ! सोशीकपणा, कोडगेपणा, अगदी लोचटपणा दाखविल्याशिवाय आपल्याला खायला एक तुकडासुध्दा मिळायचा नाही ! हे पोट ! - ( हुंदका देतो. )
यमुनाबाई : अगबाई ! हे काय बरं असं ! ( जवळ जाते. )
दिनकरपंत : पगार मिळणार पंधरा रुपडे ! आणि गावात तर दहा आणे बारा आणे खणाखाली जागा मिळत नाही. आणू कुठले ? ( पुन: रडू लागतो. )
यमुनाबाई : पुर गडे ! आज हे काय आरंभलं आहे ? ( पदराने डोळे पुसू लागते. )
दिनकरपंत : बरे, दुसरे काही करीन म्हटले, तर रोज रात्री आठ आठ - नऊ नऊपर्यंतच्या कामाने खचून, अगदी मेल्यासारखे होऊन जाते ?
यमुनाबाई : आणखी कुठं नाही का जमण्यासारखं ?
दिनकरपंत : कुठे आणखी ? होती सरकारी ती सुटली, अन् दुसरीचा हा असा नऊ नऊ वाजेपर्यंत ताप ! बरं, एखादी जागा रिकामी आहे असे कुठे कळायचा अवकाश, की, त्या जागेसाठी दुष्काळाने खवखवलेली माझ्यासारखी शंभर कुत्री धापा टाकीत येताते ! त्यांत पुन: वशिला ! खरोखर, या वशिल्याने तर माणसाला भंडावून सोडले आहे ! प्रत्येक गोष्टीत - मला वाटते, ईश्वराच्या घरी आपण चांगला वशिला लावला नाही, म्हणून या दारिद्रयाच्या - हाडेन् हाडे पिळून काढणार्या दारिद्र्याच्या पोटी - ( पुन: रडू लागतो. )
सखाराम : ( किंकाळून उठतो. ) आई !
यमुनाबाई : गडे पुरे आता ! असं काय अगदी पोरासोरासारखे ! ( सखारामाजवळ जाते. ) सखाराम ! बाळ ! आतापर्यंत अंमळ बरी झोप लागली होती. पुन: आणखी -
दिनकरपंत : हा ! हा ! हा ! डोके कसे -
सखाराम : आई ! - पाणी -
दिनकरपंत : तहानेनं त्याचा जीव कासावीस होत आहे ग !
यमुनाबाई : पण पाणी कसं द्यायचं त्याला ! हे दूध देते म्हणजे झालं. सखाराम, हे दूध घे बाळ. ( त्याच्या तोंडाशी वाटी धरते. )
सखाराम : असेना फाटका कोट - मला चालतो. आई -
यमुनाबाई : बरं, हे दूध घे आता. ( त्याच्या तोंडात दूध ओतते. )
दिनकरपंत : ( मनांत ) पैसा !
सखाराम : मी नाही खेळायला येत जा ! गाडीखाली सापडून मघाशीच एक मुलगा मेला ! अण्णा ! अण्णा ! बाजूला व्हा !
यमुनाबाई : अगबाई ! पाहिलं यानं कसे डोळे फिरवले ते ! मला बाई ! ( डोळ्यांना पदर लावून रडू लागते. )
दिनकरपंत : नको रडूस ! आपण तरी काय करणार ? जे व्हायचे असेल ते -
सखाराम : आई ! पाणी !
दिनकरपंत : का उगीच त्याला तहानेनं मारते आहेस ? पिऊ दे पाणी त्याला.
यमुनाबाई : नको हो - असं काय ? ( त्याच्या हातातून भांडे हिसकावून घेते ) तुम्ही की नाही - आता मी राधाबाईकडे जाऊन दूध घेऊन येते.
दिनकरपंत : बरं तर लवकर ये. पण हे बघ, त्या निजल्या असतील तर -
सखाराम : आई ! आई !
यमुनाबाई : आले बरं बाळ ! ( हातात भांडे घेऊन जाते. )
दिनकरपंत : ( क्षणभर दाराकडे पाहून आपल्याशी ) यमुने ! या अभाग्याच्या घरात पाऊल टाकण्यापूर्वी, विवाहस्थितीची जी जी म्हणून गोड स्वप्ने आपल्या ह्रदयात साठविली होतीस, त्यांतले एक तरी खरे झाले आहे का ? ( सखारामाच्या तोंडाकडे पाहत राहतो. )
सखाराम : ( बडबडत ) अहो, अहो ! मला कामाला ठेवता का ? आई !
दिनकरपंत : सखाराम ! सारखी मान हलवतो आहे ! तहानेने याचा जीव तर अगदी कासावीस झाला आहे ! ( पाण्याचे भांडे हातात घेतो. )
सखाराम : आ.... आ !
दिनकरपंत : पाजतोच हे पाणी. काय हरकत आहे ? पण, नको !
सखाराम : ( आचके देतो ) आ....आई !
दिनकरपंत : अरेरेरे ! काय बिचार्याचे हाल होत आहेत हे ! सखा ! हे घे बाळ पाणी. ( पाण्याचे भांडे मुलाच्या तोंडाशी नेतो. ) काय ? मुलाला मारु नकोस - पाणी पाजू नकोस - म्हणून कोण ओरडले ते ?
सखाराम : अण्णा !
दिनकरपंत : ओ बाळ ! पाणी पाहिजे ? ( पुन: भांडे तोंडाशी नेतो. ) पी ! थोडे का ? चांगले पोटभर पी ! - ओरडा ! लागेल तितके ओरडा ! - मरतो आहे तर सुखाने तरी मरु द्या ! का उगीच ? - आणि आता जरा अंमळ त्याला - हो ! मी तरी तेच म्हणतो, की, ’ बापाने मरायच्या वेळेला पोटभर पाणीसुध्दा पाजले नाही !’ असे म्हणून देवाजवळ हा रडणार तरी नाही ! ( सखारामाच्या डोक्यावरुन हात फिरवतो. )
सखाराम : ( कण्हत ) अण्णा ! आई ! आ...ई ! आ..... ( आचके देतो व प्राण सोडतो. )
दिनकरपंत : ( घाबरुन व गहिवरुन ) सखा ! सखाराम !.... यमुने ! ( सखारामाच्या अंगावरुन हात फिरवतो व नाडी पाहतो. ) सगळ्या जगाचाच थरकाप झाला आहे ! सखाराम ! ( पुन: छातीला हात लावतो. ) जा ! सुखाने जा ! पुन: म्हणून मनुष्यजन्माला येऊ नकोस ! हे दुर्दैवी प्राण्या ! सुटलास या घोर नरकातून ! ( रडू लागतो. ) मी तुला आजपर्यंत काही रागाने बोललो असेन, जे काही छळले असेल, त्याची - सखाराम ! - मला क्षमा कर ! ( मुलाच्या ह्रदयावर डोके ठेवून अधिकच रडू लागतो. ) कुणाच्या पाया पडून - सखाराम - आता नादारी मागू नकोस ! ’ कामाल ठेवता का ?’ असे म्हणून कोणाला आता विचारु नकोस ! जा ! बाळा ! मागेसुध्दा वळून पाहू नकोस ! नाहीतर या जगात - या घोर नरकात - कायम होण्यासाठी तुला उन्हातान्हात भणभण भटकावे लागेल ! ढसढसा रडावे लागेल ! सखाराम ! यमुने ! ( इतक्यात यमुनाबाई दूध घेऊन रडत रडत आत येते. ) नको ओरडूस ! सुटला बरे आपला बाळ ! - आता रडायचे असेल तर आनंदाने ! -
यमुनाबाई : हायरे बाळा ! सखाराम ! कसा रे मला टाकून गेलास ? बाळा ! ( मुलाच्या अंगावर पडून मोठमोठ्याने रडू लागते. त्र्यंबक जागा होतो. आपल्या भावाच्या प्रेताकडे - नंतर आईकडे व बापाकडे कावर्याबावर्या नजरेने पाहतो. ’ आई काय झाले ? अण्णा ! का रडता ?’ असे विचारु लागताच ती उभयता मोठमोठ्याने रडू लागतात. )