[ स्थळ : वसंत श्रीराम अष्टकन्ये बी. ए. एल्. एल्. बी. यांच्या तिसर्या मजल्यावरील पाच खणांचा दिवाणखाना. समोरच भिंतीजवळ चार मोठी कपाटे असून, त्यापैकीं दोहोमध्ये कायद्यांची लठ्ठलठ्ठ पुस्तके आहेत. बाकी राहिलेली दोन कपाटे निरनिराळ्या गहन विषयांवर चर्वितचर्वण केलेल्या अमोलिक पुस्तकांनी भरलेली आहेत. उजव्या हाताला नक्षीकाम केलेले एक भले मोठे शिसवीचे टेबल असून, त्याच्या उजव्या बाजूला चार व डाव्या बाजूला दोन अशा खुर्च्या मांडलेल्या आहेत व पाठीमागे एक कोच दिसतेच आहे. दिवाणखान्याच्या अलीकडील कोपर्यात जिन्याचे दार आहे, व त्याच्याच पलीकडे एका लहानशा टेबलावर रेमिंग्टनचा व्हिजिबल टाइपरायटर विसावा घेत पडलेला आहे. एकंदरीत अप् टु डेट् वकिलाला शोभेल अशा तर्हेचा थाट दिवाणखान्यामध्ये आहे.
वेळ : संध्याकाळी वसंतराव व दलपतराव गप्पा मारीत इकडून तिकडे फिरत आहेत. ]
पात्रे : वसंतराव : उमर वर्षे ३०/ ३२, धंदा वकिलाचा. दलपतराव : त्यांचे रोजचे अद्वातद्वा गप्पा मारणारे व नित्य नेमाने चहा ढोसणारे स्नेही. सुशीलाबाई : वसंतरावांची बहिण. हरिबा : त्यांचा नोकर.
दलपतराव : काल सभेला गर्दी तरी काय झाली होती ! अबबब ! चांगली हजार एक माणसे जमली होती की !
वसंतराव : सहज ! हजाराने काय होते आहे, जवळजवळ दोन हजार माणसे आली होती ! मंडप पार भरुन गेला होता ना.
दलपतराव : आणि भाषणे तरी काय ? फारच भयंकर - अगदी विलक्षण !
वसंतराव : विलक्षण म्हणजे ! ऐशी सणसणीत झाली की यॅंव्.
दलपतराव : छत् ! ते काही विचारु नका, फारच ! ( मुठीत असलेल्या विडीचा जोराने झुरका घेऊन धूर सोडतो. )
वसंतराव : नाहीतरी यंदाची सामाजिक परिषद काही अजबच ! सर गोपाळराव काय, बॅरिस्टर मानुरकर काय, सगळ्यांचीच भाषणे....!
दलपतराव : आणि वसंतराव आपले जरी फारसे कोणाला ऐकू आले नाही, तरीसुध्दा आपले भाषण फार महत्त्वाचे झाले ना ! सगळे जण तारीफ करीत होते की काय भाषण झाले हे !
वसंतराव : ह्य: ह्य: बाकी सर गोपाळराव शेवटी बरेच पॅंथटिक् - अगदी टचिंग बोलले नाही ?
दलपतराव : वा वा वा ! फारच !
वसंतराव : आणि मिस् कोकीळाबाईचे तरी ! ऐसे झणझणीत स्पीच झाले, की पार सगळ्या पुरुषजातीचा फज्जा उडाला ! इथून तिथून क्रॉप रेझर ! ह्य: ह्य: कमाल केलीन तिने अगदी ! बस् - एक्सलंट !
( आरशापुढे उभे राहून भराभरा डंबेल्सचे हात करु लागतो. )
दलपतराव : एक्सलंट म्हणजे किती ! अहो सगळे जण जागच्याजागी अगदी थक्क होऊन गेले ! की काय हे !
वसंतराव : ग्रॅंड ! चीत मारलेन तिने अगदी ! ह्य: ह्य: पण का हो दलपतराव, काल पुष्कळच लोक रागावले असतील नाही ?
दलपतराव : अहो ते काही विचारु नका ! हं: माझ्याजवळचा एकजण तर म्हणाला की, ’ अरे बापरे, ही तर एक मिस् पॅंखर्स्टच दिसते आहे !’
वसंतराव : असे ? अरे वा !
दलपतराव : तिच्यावरच नाही - पण परिषदेशी तुमचा संबंध - म्हणून तुमच्यावर सुध्दा पुष्कळ लोक संतापले आहेत, ठाऊक आहे ?
वसंतराव : संतापू द्या हो ! काय करणार आहेत संतापून ! काही किंमत आहे त्यांना ? इंग्लंडात मतवादी स्त्रियांची किती महत्त्वाची - कोण उदात्त चळवळ चालली आहे, आणि आमचे हे दीडशहाणे उठतात अन् वर्तमानपत्रात लिहितात की ’ मताभिलाषी बायांचा धिंगाणा ’ ! ही यांची अक्कल ! काही शरम आहे त्यांना ?
दलपतराव : ह्यं: ह्यं: ह्यं: भाऊसाहेब, तुम्ही फारच बोवा - !
वसंतराव : किती उत्कृष्ट भाषण झाले तिचे ! आणि हे पाजी लोक त्याला नावे ठेवतात ! काय अधिकार यांना ? याचे वुमनहुडचे आयडियल म्हणजे काय ? तर सीता, मंदोदरी, तारा - अहाहा ! दिवे ओवाळा यांच्यावर ! भिक्षेकरी कुठले !
दलपतराव : ह्यं: ह्यं: शिकस्त केलीत बुवा तुम्ही अगदी !
वसंतराव : तरी मी म्हणतो, की तिचे भाषण जितके स्ट्रॉंग व्हायला पाहिजे तितके झाले नाही ! तिची माझी ओळख कुठे होती ? ती असती तर ? काल सगळ्या मंडपाला आग लावविली असती !
दलपतराव : ओळख नव्हती हे मोठे वाईट झाले बाकी.
वसंतराव : जाऊ द्या हो, येवढ्यानेच काय झाले आहे ? आता मी मुद्दाम कोकिळाबाईंची ओळख करुन घेतो - आणि वुमन्स प्रॉब्लेमवरची मजजवळ असलेली जवळजवळ दोनशे - अडीचशे पुस्तके तिला वाचायला देतो ! म्हणजे मग पहा पुढच्या खेपेला कसे बोलते आहे ती ! ( इतक्यात ’ दादा ’ अशी हाक मारलेली ऐकू येते ) ओ ! ये वर ये.
दलपतराव : ( किंचित् कपाळाला आठ्या घालून ) बरे आहे भाऊसाहेब - जातो आता.
( सुशीलाबाई आत येते. )
वसंतराव : काय निघालात ?
दलपतराव : हो आज जरा - प्रदोष आहे, तेव्हा मी म्हणतो लवकरच घरी जावे. ( सुशीलाबाई टेबलावरील दिवा लावते. )
वसंतराव : ठीक आहे, ठीक आहे. ( दलपतराव जातो. सुशीलाबाई कोचावर बसते, व वसंतराव टेबलाच्या डाव्या बाजूस असलेल्या खुर्चीवर बसून ब्लॉटिंग् पॅडवर उजव्या हाताच्या दोन बोटांनी ड्रमवर वाजवल्यासारखे वाजवतो. ) हं, कसे काय ताईसाहेब ? मग काय ठरले तुमचे ?
सुशीलाबाई : ठरायचे काय ? आपले घरी परत जावे झाले.
वसंतराव : म्हणजे ? पुनः बेत फिसकटला वाटते ?
सुशीलाबाई : फिसकटायला पाहिजे, त्याला आता करायचे कसे ?
वसंतराव : अग पण कालच तू म्हणालीस ना, की तू म्हणतोस तसेच आपण करू म्हणून ? आणि आज पुनः -
सुशीलाबाई : ते खरे, पण तू म्हणतोस तसे करायचे म्हणजे कसेसेच वाटते बाई.
वसंतराव : कसेसेच काय ? चांगले सांगतो आहे की, इथे नाही तर मुंबईस रहा, पुढे अभ्यास कर, तुला काय वाटेल ते कर; पण परत नको जाऊस बोवा; तर ते नाही.
सुशीलाबाई : पण दादा, परत न जाऊन कसे चालेल ?
वसंतराव : न चालायला काय झाले ? समज, तू इथे नाही तर मुंबईस राहिलीस, तर तो काय करणार आहे ? तुझ्यावर किंवा माझ्यावर फिर्याद लावील ?
सुशीलाबाई : तसे नाही करायचे ते.
वसंतराव : अग तसे करायची त्याची छाती नाही. काही झाले तरी तो आज मोठा कामगार आहे, त्याला काही अब्रूची चाड आहे की नाही ? सगळा दुर्लौकिक होईल ना नाही तर !
सुशीलाबाई : नाही तरी आमचा दुर्लौकिक होणारच.
वसंतराव : तो कसा ?
सुशीलाबाई : अरे जर त्यांना सोडून मी इथे किंवा दुसरीकडे कुठे राह्यले, तर लोक आम्हांला नावे नाही का ठेवणार ?
वसंतराव : सगळे काही चालते ! अग लोकापवादाला भिऊन तू आज घरी परत जाऊन राह्यलीस तर तिथे अपमान होईल कोणाचा ? आणि रात्रंदिवस यातना सोसाव्या लागतील कोणाला ? सांग ? लोकांना की तुला ? - हे काय हे ?
सुशीलाबाई : होऊ दे यातना झाल्या तर, मी सोशीन आपली, पण -
वसंतराव : ह्या आमच्या बायका ह्या ! काही मान नाही, अपमान नाही, काही नाही, शुद्ध दगड ! धडधडीत घरामध्ये नवरा त्या - हिच्याशी - व्यवहार करतो आहे, काय वाटेल ते करतो आहे. आणि ही आपली - ( डोक्याला हात लावून ) छे, बोला !
सुशीलाबाई : अरे दादा अंमळ हळू बोल.
वसंतराव : काय हळू काय बोल ? जिथे तुम्हांला अनीतीची किळस येत नाही, अपमानाबद्दल अन् दास्यत्वाबद्दल संताप येत नाही, तिथे तुमच्या पोरांना काय येणार आहे ? हे असे तुम्ही आम्हांला अगदी देव करून डोक्यावर घेऊन नाचता, मग का नाही आम्ही शेफारणार ? नवर्याचा शेंबूड जरी असला, तरी त्यात बोट घालून तुम्ही त्याचा वास घेऊन म्हणणारच ना, ‘ खरेच बाई ! काय गोड वास सुटला आहे ! अहाहा ! ’
सुशीलाबाई : इश्श ! तुझे आपले काहीतरीच !
वसंतराव : काहीतरीच नाही. अगदी अक्षरशः खरे आहे. ( दिवा वाढला आहे असे पाहून त्याची बात अंमळ कमी करतो. ) मी म्हणतो तुला आपले काय वाटेल ते कर, पण मला जर विचारशील तर मी आपले स्पष्ट सांगतो बुवा, की त्याचे वर्तन सुधारले आहे, अशी तुझी पक्की खात्री झाल्याशिवाय काही तू त्याच्याकडे जाऊ नकोस -
सुशीलाबाई : पण मी म्हणते दूर रहाण्यापेक्षा जवळच राहून स्वभावात फरक नाही का पाडता यायचा ?
वसंतराव : ते खरे ! पण तसे तुला करता येत नाही म्हणून तर अगदी रडकुंडीस येऊन तूच मला वरचेवर पत्रे लिहिलीस ना ? आणि परवा इथे येऊन तूच मजजवळ रडलीस ना ? सांग.
सुशीलाबाई : हो, मी नाही कुठे म्हणते. पण दादा तुला खरंच सांगू का ? स्वतःबद्दल तिकडे अगदीच वाईट वाटत नाही असे नाही ! कितीतरी वाटते ! मानेइतक्या खोल गाळामध्ये जसे एखादे माणूस रुतून बसावे की नाही, तश्शी त्यांची अवस्था झाली आहे ! वर येण्यासाठी पुष्कळ धडपड धडपड करतात पण काही नाही ! उलट अधिकाधिकच - ( डोळ्याला पदर लावून रडू लागते. )
वसंतराव : ( स्वस्थ टेबलावरील दौतीकडे पहात राहतो. )
सुशीलाबाई : तेव्हा मी म्हणते, मी जर परत गेले नाही तर तिकडची काय बरे अवस्था होईल ?
वसंतराव : ( किंचित कपाळाला आठ्या घालून ) काय बोवा खरेच !
सुशीलाबाई : आपले परत जावे, आणि जितके होईल तितके करून -
वसंतराव : मला नाही वाटत काही होईलसे. त्याला ताळ्यावर आणायचा म्हणजे - ( दाराकडे पाहून ) अजिबात जरी नाही तरी काही दिवस सेपरेशन - वेगळेच राह्यला पाहिजे. ( हरिबा हातात एक कार्ड घेऊन आत येतो. )
हरिबा : हे माईसाहेबांनी आपल्याला द्यायला सांगितले आहे. ( वसंतराव कार्ड घेऊन ते वाचू लागतो ) आणि आपल्यालाही खाली बोलावले आहे.
सुशीलाबाई : हो का ? बरे आहे दादा मी जाते मग.
वसंतराव : ( तिच्याकडे न पाहता मान हलवून ) हं. ( सुशिलाबाई जाते व तिच्या पाठोपाठ हरीही जाऊ लागतो. ) अरे हरी.
हरिबा : जी साहेब. ( परत येतो. )
वसंतराव : जरा थांब. ( काही वेळ पत्राकडे पाहून नंतर ) काय रे हे कार्ड तुला कोणी दिले म्हणालास ?
हरिबा : साहेब, माईसाहेबांनी दिले हे.
वसंतराव : कोणी तिने.
हरिबा : होय साहेब, त्यांनीच दिले.
वसंतराव : ( पुन्हा पत्राकडे थोडा वेळ पाहिल्यावर ) बरे तुला जेव्हा तिने हे दिले तेव्हा - ती का हे वाचीत होती ?
हरिबा : नाही साहेब, त्यांनी तसेच दिले.
वसंतराव : ( पत्राकडे पाहत व बोटाने हनवटी चोळीत चोळीत ) बरे तू जा आता. ( हरीबा जातो. वसंतराव हातात कार्ड घेऊन खुर्चीवरून उठतो व पत्र चाळवीत चाळवीत दिवाणखान्यात इकडून तिकडे येरझाला घालू लागतो. इतक्यात मध्येच थांबून ‘ दुष्काळ आहे तर मरा तिकडे ! ’ असे म्हणून पत्र फाडतो; व त्याचे तुकडे टेबलाखाली असलेल्या टोकरीत टाकणार तोच ‘ नको, त्याच्यात नको उगीच ’ असे म्हणून तुकडे हातातच घेऊन टेबलावरील आगपेटी घेतो व एका कोपर्यात जाऊन तेथे ते तुकडे जमीनीवर ठेवतो. नंतर काडी ओडून ते पेटवून देतो. ‘ मोठा ताप आहे ! ’ असे संतापून व दातओठ खाऊन म्हणतो, व पत्राच्या झालेल्या राखेकडे एकसारखे टक लावून पाहत उभा राहतो. )