अंक दुसरा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : तीन खणांची खोली. आत शिरण्याचे दार उजव्या बाजूस अलीकडच्या कोपर्‍यात आहे. दाराच्याच पलीकडे दोन मोठाले कोनाडे असून त्यात मोगरा, गुलाब, गुलछबू वगैरे फुलझाडांच्या लहान लहान सुंदर कुंड्या ठेवल्या आहेत. त्यातेल फुलांवरून सायंकाळ्च्या पश्चिमेकडील वारा आनंदाने सावित्री - सत्यवानाची मोठी तसबीर भिंतीला लावलेली आहे. तसेच डाव्या हाताकडे असलेल्या टेबलाच्या किंचित वरच अतिशय सुंदर चौकटीमध्ये बसविलेली वसंतरावांची रंगीत तसबीर आहे. बारीकबारीक पण तेजस्वी अशा खोट्या मोत्यांचा व रंगीत मण्यांचा गुंफलेला हार त्या तसविरीला घातलेला दिसतो आहे. आणखीही काही सृष्टीच्या हृदयातील रम्यरम्य देखावे खोलीत ठिकठिकाणी भिंतींना लावलेले आहेत. टेबलाला लागूनच पलीकडे एक व तेही लहानसेच असे पुस्तकांचे कपाट आहे. खोलीतील सर्व सामान अतिशय व्यवस्थित रीतीने व स्वच्छ ठेवलेले आहे.
वेळ : साडेचार पाचाचा सुमार असेल.
पात्रे : इंदिराबाई : वसंतरावांची बायको. गणपतराग: वसंतरावांचा मित्र. हे दोघेही खोलीत मध्यभागी असलेल्या राउंडटेबलाच्या दोन्ही बाजूस खुर्च्यावर बोलत बसले आहेत. ]

गणपतराव : ( आसपास इकडे तिकडे पाहून ) सगळे काही सांगतो. मात्र काय बोलायचे असेल, ते अगदी हळू बोला. - मी काय सांगतो यातले एक अक्षरसुद्धा कुठे - नाहीतर सगळाच घोटाळा होईल.
इंदिराबाई : माझ्या अंगाचा तर बाई थरकापच झाला आहे. ( दोघेही थोडा वेळ काही बोलत नाहीत ) तुम्ही म्हणता हे सगळे खरेच का हे ?
गणपतराव : अगदी अक्षरशः खरे आहे.
इंदिराबाई : मला नाही बाई अजून वाटत. ( दचकून दाराकडे पाहते ) कोण आहे ?
गणपतराव : छे ! तिकडे कोणी नाही. वार्‍याने तो दाराचा पडदा फडफडला येवढेच.
इंदिराबाई : तुम्हाला कधी - काल कळले नाही का ?
गणपतराव : नाही, काल नाही. परवा रात्रीची गोष्ट ही. आमच्या त्या घरासंबंधाचा तंटा मिटवायला, मी सात आठ दिवसांपूर्वी नगरला गेलो हे तुम्हाला ठाऊकच आहे ?
इंदिराबाई : हो, ते आहे मला माहीत.
गणपतराव : हां, तर मग नगरहून मी इकडे परत येत असताना, अचानकच त्यांची आणि माझी दौंडाला एकाच डब्यात गाठ पडली. रात्री बारा किंवा साडेबाराचा सुमार असेल, मी जो कंपार्टमेंटमध्ये शिरतो, तोच त्या गृहस्थाने - म्हणजे तिच्या भावाने - मला चटकन् नमस्कार केला.
इंदिराबाई : त्यांची तुमची ओळख कुठली ?
गणपतराव : अहो ती इथलीच. जरी एकमेकांकडे कधी आमचे जाणे येणे नाही, तरी नमस्कारापुरती ओळख आहेच.
इंदिराबाई : अस्से, बरे मग पुढे ?
गणपतराव : झाले, पुढे मग आम्ही दोघे ज्या बाकावर बसलो होतो, त्याच्याच समोरच्या बाकावर ती ( आसपास पाहून ) आणखी तीची ती सात आठ वर्षांची मुलगी, अशी ती दोघेही निजलेली -
इंदिराबाई : बरे पण ही माणसे येत होती कुठून ?
गणपतराव : हो, ते सांगायचे राह्यलेच नाही का ? ती येत होती-  ( अगदी हलक्या स्वरात ) सोलापूराहून.
इंदिराबाई : कुठून म्हणालात ?
गणपतराव : सोलापूरहूनच. तिथेच ती...
इंदिराबाई : ( काहीतरी आठवू लागते ) तिचे - त्यांचे नाव आहे का तुम्हाला ठाऊक ?
गणपतराव : तिचे नाव का ? काय पहा ? ( आठवून ) हो बरोबर. प..ण.. ( दाराकडे व इंदिराबाईकडे पाहत राहतो. )
इंदिराबाई : सांगा, सांगा कुणी नाही तिकडे.
गणपतराव : तिचे नाव ( अगदी हळूच ) कृष्णाबाई.
इंदिराबाई : काय कृष्णाबाई.
गणपतराव : हो तेच. ( दोघेही काही बोलत नाहीत. इतक्यात पाठीमागील दाराचा पडदा बाजूला सारून हरिबा आत येतो, व थबकून दाराशीच उभा राहतो. )
इंदिराबाई : ( दचकून ) कोण आहे ?
हरिबा : जी माईसाहेब, मी आहे. खाली दलपतराव आले आहेत.
इंदिराबाई : बरे मग त्यांना म्हणावे, की सुशीलाबाईना - वन्संना पोहचवायला ते स्टेशनावर गेले आहेत.
हरिबा : ते कळवले मी त्यांना, पण ते विचारीत आहेत की रावसाहेव घरी केव्हा परत येतील ?
इंदिराबाई : म्हणावे की परस्परच जिमखान्यावर जाणार आहेत, तिथून मग इकडे येतील.
हरिबा : जी माईसाहेब. ( असे म्हणून एकवार इंदिराबाईकडे व गणपतरावाकडे चटकन पाहतो व आलेल्या दारानेच परत जातो. )
इंदिराबाई : ( हरिबा गेल्यानंतर थोड्या वेळाने ) काय असेल ते असो. अजून काही केल्या..
गणपतराव : अहो मला तरी कुठे प्रथम खरे वाटले ते, पण त्यानेच जेव्हा बोलता बोलता सगळी इत्यंभूत हकीकत सांगितली तेव्हा मला कुठे...
इंदिराबाई : मला वाटले जवळजवळ आठ एक वर्षे झाली असतील; तुमच्या लग्नाच्या आधीचीच - हो वर्षा सव्वा वर्षाचीच गोष्ट. ह्यांचे गोविंदराव म्हणून एक स्नेही आहेत. तुम्हाला ठाऊक आहेत ? हल्ली ते मुंबईला असतात ?
इंदिराबाई : हो ऐकून माहीत आहेत. पण त्यांना अजून कधी मी -
गणपतराग : ते कसचे आता तुमच्या दृष्टीस पडतात, हंः त्यांचे यांचे जवळजवळ चांगलेच बिनसले आहे.
इंदिराबाई : ते काय म्हणून ?
गणपतराव : अहो याच भानगडीमुळे. तो ज्या घरामध्ये इथे राहात होता, त्याच घरात - ही विधवा मुलगी आणि तिचा हा भाऊ असे हे राहात होते. यांचे तिथे वरचेवर जाणे - येणे. आणि शिवाय ती मुलगीही अतिशय सुरेख व हल्लीच्या मानाने थोडीफार शिकलेली. झाले. पुढे हळूहळू लग्नाचे ठरले, भाऊ किंचित जुन्या विचाराचा असून त्यानेही रुकार दिला, इतके सगळे होऊन शेवटी...
इंदिराबाई : ( रागाने ला होऊन सारखी खाली पाहत राहते. )
गणपतराव : जेव्हा श्रीमंताची, मोठी, अन् चांगली शिकलेली मुलगी मिळते आहे असे दिसते, तेव्हा -
इंदिराबाई : ( दचकून ओरडते ) अगबाई ! काय तिकडे फुटले हो ?
गणपतराव : ( उठतो व आसपास पाहतो ) खरेच की ! बराच मोठा -
इंदिराबाई : ( थरथर कापत दाराकडे पाहून ) हंडी नाही तर काचेचे एखादे मोठे काही फुटून, खळकन् आवाज व्हावा, तसा झाला नाही ?
गणपतराव : हो झाला खराच. ( आसपास पाहून ) पण इथे तर काही नाही, बाहेर कुठे ( इंदिराबाईकडे पाहून ) बाकी माझ्या सांगण्यामुळे तुम्हाला त्रास -
इंदिराबाई : पण का हो त्यांनी कधी इकडे पत्रे पाठविली होती का ?
गणपतराव : पत्रे ना ? हो हो, निदान दोन तीन वेळा तरी - अहो न पाठवून करते काय ? खायला नाही पैसा, दोघीही मोलमजुरी करून किती मिळविणार ?
इंदिराबाई : का ? भाऊ नव्हता का इथून काही पाठवीत ?
गणपतराव : तो काय दगड पाठवतो ! त्याला मिळणार इथे दहा नाही तर पंधरा रुपडे - बरे, ती इथे राहिली असती, तर त्यातूनही त्याने भागवले असते. पण तेही शक्य नाही ! काही झाले तरी अब्रूची चाड आहेच ना ? तेव्हा आज सात आठ वर्षे होती ती आईजवळच.
इंदिराबाई : मग पुन्हा इकडे का आल्या ?
गणपतराव : मग काय करणार ? आई जर मेली -
इंदिराबाई : खरेच का ? ( डोळ्याला पदर लावते. )
गणपतराव : हो, नुसते पंधरा एक दिवस झाले असतील. आणि पुन्हा तिथे यंदा दुष्काळ किती आहे !
इंदिराबाई : ( थोड्या वेळाने ) त्यांणी जर पत्रे पाठविली होती तर त्यांना कधी काही मिळाले का हो ?
गणपतराव : छेः काहीसुद्धा नाही ! उलट भावाच्या सांगण्यात तर असे आले की, ‘ आईच्या क्रियेसाठी तरी काही पाठवा ’ असे तिने यांना, नुसते पाच - सहा दिवसांपूर्वी लिहिले होते, पण काही नाही.
इंदिराबाई : ( अधिकच रडू लागते. )
गणपतराव : माई ! नका रडू तुम्ही ! कोणी पाहिले तर - खरोखर मी तुम्हाला आधी हे सांगणारच नव्हतो. पण त्या बिचार्‍यांची मला अतिशय कीव आली ! आणखी - काय असेल ते असो, तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहवेच ना. काही दुसरा उपायच -
इंदिराबाई : नाही, मला सांगितले हेच फार चांगले केले - खरोखर, माझ्यावर तुम्ही उपकारच केलेत. ( उठून टेबलाजवळ जाते व खण उघडून काही पाहू लागते. )
गणपतराव : माई यात उपकार कशाचे ?
इंदिराबाई : उपकारच म्हणायचे. ( खणातून एक नोट काढून परत राऊंड टेबलाजवळ येते. ) त्या - इथे राहतात कुठे हे तुम्हाला ठाऊकच आहे ना ?
गणपतराव : हो,हो, आमच्या घरापासून जवळच -
इंदिराबाई : ( नोट पुढे करून ) मग कसेही करून त्यांना हे - म्हणावे सध्या मजजवळ येवढेच - दहाच आहेत, आले म्हणजे आणखी देईन.
गणपतराव : ( नोट न घेता दाराकडे पाहत राहतो. )
इंदिराबाई : हं, हे घ्या लवकर. आणखी म्हणावे काही काळजी करू नका, माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मी तुमचे, तुमच्या - नाही माझ्याच मुलीचे, काहीसुद्धा कमी पडू द्यायची नाही. हं, हेघ्या आटपा लवकर.
गणपतराव : माई ! खरोखर तुम्ही किती - ! ( पुन्हा दाराकडे पाहून ) मी हे देतो त्यांना, पण त्य ऐथे आल्या आहेत, किंवा त्यांची मुलगी आली आहे, यातले अक्षरसुद्धा -
इंदिराबाई : नाही, त्याची नको काळजी ! एक चकार शब्दसुद्धा कुठे -
गणपतराव : बरे द्या इकडे ( नोट घेतो इतक्यात हरिबा आत येतो. गणपतराव चटकन् नोट खिशात घालतो. )
हरिबा : माईसाहेब दिवा लावायचा आहे ना ?
इंदिराबाई : जा, मी लावीन जा ! अजून अवकाश आहे. ( हरिबा जातो. )
गणपतराव : बरे मग मी जातो आता.वसंतरावांना सांगा मी आलो होतो म्हणून. उद्या येईनच.
इंदिराबाई : बरे आहे त्यांना कळवते मी. पण हे - आताच्या आता त्यांना नेऊन द्या अं.
गणपतराव : नको, त्याची नको आता काळजी. सगळे काही मी - ( जातो. )
इंदिराबाई : ( तो गेल्यावर बराच वेळ दाराकडे पाहत बसते. नंतर उठून दिवा लावते. इतक्यात तिची नजर वसंतरावांच्या तसबिरीकडे जाते. पाहिल्याबरोबर ती थरथर कापू लागते. नंतर क्षणभर सावित्री - सत्यवानाच्या तसबिरीकडे पाहून राऊंड टेबलावर डोके ठेऊन स्फुंदून स्फुंदून रडू लागते ) देवा ! ( असे म्हणून अधिकच मोठ्याने रडू लागते. इतक्यात दाराचा पडदा बाजूला सारून वसंतराव आत येतो, व एकदम चकित होऊन दाराजवळ उभा राहतो. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP