अंक तिसरा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : दुसर्‍या अंकातील इंदिराबाईचीच खोली. कुंड्यातील फुलझाडे सुकून गेली आहेत. गुलाबाच्या झाडाला दोन फुले आहेत पण त्यांच्या बहुतेक सर्व पाकळ्या गळून पडून, एखाददुसरीच पाकळी - तीही सुकलेलीच - कसातरी जीव धरुन राहिली आहे. खोलीतील सामानसुमानावर पडलेली धूळ रोजच्या रोज झाडली जात नसावी, असे वरवर पाहणार्‍याच्या सुध्दा चटकन् लक्षात येईल.
वेळ : संध्याकाळ ; साडेचार होऊन गेले आहेत.
पात्रे : दुष्काळ फंडाकरिता वर्गणी गोळा करीत फिरणारा एक स्वयंसेवक. कृष्णाबाई : सरासरी इंदिराबाईच्याच वयाची एक विधवा बाई. शांता : तिची सात आठ वर्षांची मुलगी. ]

( वसंतराव खेळायला जाण्याचा पोशाख करुन व हातात टेनिसरची बॅट फिरवीत व स्वयंसेवकाशी बोलत समोरील दाराने आत येतात. )
स्वयंसेवक : हो, काल संध्याकाळीच मी आपणाकडे येऊन गेलो.
वसंतराव : असे ? ओ व्हेरी, सॉरी, तुम्हाला उगीच हेलपाटा पडला - बसा. ( बॅट राऊंड टेबलावर ठेवून डाव्या बाजूकडील खुर्चीवर बसतो. )
स्वयंसेवक : ह्ये: ! हेलपाटा कशाचा ? चाललेच आहे. ( असे बोलत खुर्चीवर बसायला जातो. तोच खाली पडतो. ) अरे !
वसंतराव : असू द्या ! असू द्या ! ( उठून त्याला नीट सावरुन उभा करतो. )
स्वयंसेवक : नाही, काही नाही ! ( पडलेली टोपी डोक्याला घालून व कागदपत्रे गोळा करुन ) असल्या खुर्चीवर बसायची, कधी सवयच नाही की नाही, त्यामुळे - ( खुर्चीवर नीट जपून बसतो. )
वसंतराव : हं: ? चाललेच आहे. असे होतेच आहे एखादे वेळेस - बरे आतापर्यंत वर्गणी किती गोळा झाली आहे ?
स्वयंसेवक : झाली आहे की, आतापर्यंत जवळ जवळ - पाच साडेपाचशे रुपये जमले आहेत. ( वसंतरावांच्या हातात एक छापील कागद देतो. )
वसंतराव : ( कागद घेऊन ) छान ! ( वाचू लागतो. ) सगळ्यात जास्त कोणी - ?
स्वयंसेवक : सगळ्यात जास्त का ? हो, त्या ह्यांनी - खानबहादूर कल्याणजी दादरजी भायखळावाला ह्यांनी शंभर रुपये दिले आहेत. ( इंदिराबाई आत येते. ) झालेच तर...
वसंतराव : ( इंदिराबाईस ) हे पहा, हे गृहस्थ सोलापूर दुष्काळ फंडाकरता वर्गणी मागायला आले आहेत, परवा जे मी शंभर रुपये दिले आहेत नाही ? तेवढे यांना द्या पाहू. ( खाली कोणीतरी मोठमोठ्याने बोलत असल्याचे ऐकू येते. ) काय खाली गडबड आहे ?
इंदिराबाई : ( काही न बोलता टेबलाजवळ जाऊन खण उघडते. नोटा व रुपये मोजून टेबलावर ठेवते व काहीतरी आठवू लागते. )
वसंतराव : ( मागे वळून ) काय, झाले का ? आणा इकडे.
इंदिराबाई : पाच कमी आहेत. ( स्वयंसेवक पावती बुक लिहितो. )
वसंतराव : पाच रुपये कमी आहेत ? कोणाला दिले असतील ?
इंदिराबाई : ( काही बोलत नाही. )
वसंतराव : बरे नसले तर मी देतो. ( इंदिराबाई नोटा व रुपये राऊंड टेबलावर आणून ठेवते, वसंतराव खिशातून पाकीट काढून त्यातील पाच रुपये टेबलावर ठेवतो, व सर्व रुपये व नोटा स्वयंसेवकाच्या पुढे करतो. ) हं, हे घ्या.
स्वयंसेवक : ठीक आहे.  ( रुपये घेतो व पावती फाडून वसंतरावांच्या हातात देतो. ) ही पावती. ( रुपये व नोटा कोटाच्या आतील खिशात ठेवून ) खरोखर ! आपण फारच मोठी देणगी दिलीत ! ( नमस्कार करुन ) बरे आहे मग मी जातो आता.
वसंतराव : ( उलट नमस्कार करतो. ) ह्य: ! ह्यं: ! - ठीक आहे. ( हरिबा आत येतो. )
हरिबा : ( स्वयंसेवक जातो आहे तोच ) साहेब, गाडी माईसाहेबांनी कुठे पाठवली आहे, तवा टांगाच जोडून तयार ठेवला आहे.
वसंतराव : गाडी पाठवली आहे ? कुठे ?
इंदिराबाई : जिमखान्यावर नेहमी टांग्यात बसून जाणे होते, म्हणून मी -
वसंतराव : पण विचारल्याशिवाय - कायरे हरी ? काय तुमची गडबड चालली होती खाली ?
हरिबा : काही नाही साहेब, तो पांडू उगीच माझ्या घरच्या भानगडीत -
वसंतराव : हो बरी आठवण झाली, कायरे, तू आताशा म्हणे, - बायकोला वरचेवर मारीत असतोस ?
हरिबा : अहो, ती साहेब आहेच तशी.
वसंतराव : म्हणजे ?
हरिबा : साहेब, आमच्या शेजारचा तो गोंद्या नाही ? त्याच्याकडे पाहून एखादे वेळेस हसते.
वसंतराव : अरे मग यात बिघडले कुठे ? अं ?
हरिबा : साहेब - आम्हाला नाही खपायचे हे, बायको कोणाकडे पाहून हसली, कोणाशी बोलली, आपल्याला नाही - लोकांना चालत असेल - पण आपल्याला नाही साफ खपायचे हे ! तिथल्या तिथे - !
वसंतराव : बरे जा ! चल ! ( हरिबा पाहत पाहत जातो. )
इंदिराबाई : ( थोड्या वेळाने ) चमत्कारिकच आहे !
वसंतराव : चमत्कारिक नाही कोण ? सगळे जगच चमत्कारिक झाले आहे. खुद्द घरातील माणसेच जर -
इंदिराबाई : घरातल्या माणसांनी काय केले ?
वसंतराव : काय करायचे आहे अन् सावरायचे आहे ? आपले बोलू नये इतकेच - वाटेल तसे वागायचे मग लोक सोडतील उघडउघड तोंडावर बोलायला !
इंदिराबाई : काय वाटेल तसे वागले मी ?
वसंतराव : कुठे ही काय, जपूनच असायला पाहिजे ! लोकांची आपल्यावर नजर असते, ते काय बोलतील, काय नेम नाही, याचा काही नियम आहे ? जगात अब्रूने दिवस काढावे लागतात, ठाऊक आहे ?
इंदिराबाई : मग यात कोणी काय अब्रू घालवली ? बाई असे मोघम....
वसंतराव : पुरे झाले बोवा ! आताशा मला अगदी वीट आला आहे !
इंदिराबाई : काय असेल ते उघड बोलावे, हे काय बाई !
वसंतराव : उघड काय बोलावे ! त्या गणपतरावाशी तू तासनतास एकान्तात बोलत बसतेस, मधूनमधून तू त्याला पैसेसुध्दा देतेस ! का नाही लोकांना संशय येऊ ?
इंदिराबाई : मी म्हणते, घेईनात संशय. लोकांशी काय करायचे आपल्याला ? ते काय हवे ते -
वसंतराव : काय ! काहीतरी बडबडतेस ? म्हणे लोकांशी काय करायचे आहे आपल्याला ! काही - आहे की नाही ?
इंदिराबाई : काय बाई तरी ! लोकं काय हवे ते बडबडतील. पण आपल्याला तर -
वसंतराव : काय वाटेल ते असो ! पण नाही बोलायचे त्याच्याशी. एक अक्षरसुध्दा त्या गणपतरावाशी बोलायचे नाही ! ध्यानात ठेव !
इंदिराबाई : म्हणजे ? आपल्यासुध्दा - ?
वसंतराव : तू जास्त बोलू नकोस !
इंदिराबाई : इतकी वर्षे लग्न होऊन झाली, अजून का मजवर आपला विश्वास -
वसंतराव : ( किंचित गोंधळून ) नाही विश्वास !
इंदिराबाई : काय म्हटलेत ?
वसंतराव : नाही ! नाही ! नाही !! - नाही विश्वास ! काय म्हणणे आहे तुझे ?
इंदिराबाई : खरेच का ?
वसंतराव : नको मला जास्त संतापवूस ! ( थोड्या वेळाने ) तू तरी काय कमी आहेस ग ? पन्नास वेळा तुला विचारले, पण तू दाद लागू देत नाहीस ! - काय येवढे ? - त्या गणपतरावाशी काय येवढे एकान्तात बोलायचे असते ? त्याला पैसे देतेस, त्याच्याकडे वरचेवर जात असतेस - !
इंदिराबाई : पण त्यांच्याकडे नाही गेले मी.
वसंतराव : मग कोणाकडे गेली होतीस ?
इंदिराबाई : कितीवेळा बरे आपल्याला सांगावे ?
वसंतराव : काय सांगितलेस मला तू ?
इंदिराबाई : पुन: सांगते ! - खरोखर ! आपल्याजवळ पदर पसरुन पुन: सांगते, की आपण हे विचारु नये ! मी काय करते, कुठे जाते, हे जर कळले तर इकडच्याच जीवाला किती त्रास होईल ! अन् शिवाय, त्या बिचार्‍याचे जन्माचे मातेरे होईल ! म्हणून म्हणते -
वसंतराव : ते काही नाही ! आत्ताच्या आता मला सांग ! नाहीतर - ( किंचित थांबून ) शरम नाही वाटत ? सगळ्या संसाराची माझ्या माती - माती केलीस ! चालती हो घरातून !
इंदिराबाई : संसाराची माती केली ?
वसंतराव : हो ! माझ्या संसाराची माती केलीस !
इंदिराबाई : कोणी केली ?
वसंतराव : तू ! तूच केलीस !
इंदिराबाई : बरे ! आपण ही संसाराची अन् लौकिकाची येवढी ही इमारत उभारलीत - अगदी शिखरावर उभे आहात, पण तिच्या पायथ्याशीच - आले का लक्षात ? - तिच्या पायथ्याशी कोण विवळते आहे - कोण मोठमोठ्याने रडते आहे. काही ऐकू येत आहे का ?
वसंतराव : काय ! काहीतरी ! तू आपली -
इंदिराबाई : काहीतरीच कसे ? जिला आपण लग्नाच्या आधी नादी लावून फसवलीत -
वसंतराव : ( संतापून ) काय !
इंदिराबाई : ती कृष्णाबाई आणि तिची मुलगी - दोघीही बिचार्‍या तडफडत आहेत, देवळाजवळ आपल्या नावाने तळतळत आहेत. म्हणूनच मी इतके आपल्या स्नेह्याशी बोलले, त्यांच्याजवळ पैसे दिले, आले का ध्यानात ?
वसंतराव : ( संतापाने लाल होऊन अगदी दगडासारखा निश्चल बसतो. )
इंदिराबाई : सांगायचे ? कशाला आपल्याला सांगायचे ? त्यांनी काय आपल्याला अगदी जीव तोडून कमी पत्रे लिहिली ? पण काहीतरी पाठवलेत का ? लौकिकाकरता दुष्काळ फंडाला तेवढे शंभर रुपये !
वसंतराव : ( ओरडून ) खबरदार ! तू जास्त बोलशील तर !
इंदिराबाई : बोलू नको ? ते काय म्हणून ? मी का शेणामातीची बाहुली आहे ? सर्व गोष्टी कळल्या नाहीत, म्हणून आपण खुशाल संतापायचे होते ! मला नसते काही वाटले ! पण ( सावित्री - सत्यवानाच्या तसबिरीकडे बोट दाखवून ) त्या सत्यवानासारखी - मी आपली रात्रंदिवस मनामध्ये पूजा केली.... अगदी विश्वास ठेवला ! आणि आपण ?... संसाराची माती केली ! घरातून - चालती हो ( संतापाने लाल होऊन थरथर कापते. इतक्यात समोरुन दाराचा पडदा बाजूला सारुन कृष्णाबाई व शांता आत येतात, पण वसंतरावाला पाहून जाऊ लागतात. ) या - आत या. जाऊ नका ! ( वसंतरावास ) हे पाहिलेत ? ( कृष्णाबाई दाराशीच तोंड फिरवून व शांतेला जवळ घेऊन उभी राहते. )
वसंतराव : ( कृष्णाबाईस व शांतेस पाहून लागलीच दोन्ही हातानी तोंड झाकून डोके टेबलावर ठेवतो. )
इंदिराबाई : बोलावे आता ? घरातून - चालते व्हायचे न ? कोणी ? शांते ! ये बाळ ! ( शांता वसंतरावाकडे व कृष्णाबाईकडे पाहत पाहत इंदिराबाईजवळ येते. ) ये बाळ ! ( शांतेला दोन्ही हातांनी घट्ट कवटाळून तिचे चुंबन घेते व थरथर कापत तिच्यावर अश्रु ढाळते. )
वसंतराव : ( गदगदलेल्या स्वराने ) इंदिरे - !!

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP