पदे १ ते ५०

ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.


जरि शिरी गणराज विराजतो,
तरिच होय महाकविराज तो. ।
मतिस दे जरि हेच सरस्वती
रसवती तरि होय सरस्वती ॥१॥
वंदूनियां पाय गजाननाचे,
दृष्टीपुढे काव्यनिधान नाचे. ।
प्रभाव वर्णी मति भारतीचे
मुखांबुर्जी चालति भार तीचे ॥२॥
दावितो बहुत भाव रदाने,
गंडयुग्म गळती वर दाने ।
देत जो निजजनां वरदाने,
दीधली मति तया वरदाने ॥३॥
प्रसन्न झाली जरि हे तुकाई,
मला जनेसी तरि हेतु काई ? ।
पाहील दृष्टी जरि कांसवाची,
संपत्ति काई तरि वासवाची? ॥४॥
त्यानंतरे वंदिन रेणुकेशी;
झाडीन तीचे पदरेणु केशी ।
जीणे जनांला बहु लाभ केला,
तीचे कृपेचा कवि हा भुकेला ॥५॥
होईल तेथे गुरुलाभ जावे.
महादरे सद्गुरुला भजावे ।
तत्संगमे राघवठाव पावे,
याकारणे या विषयी रमावे ॥६॥
गुरु स्वचित्तप्रति भाविलासे
त्याचे प्रसादें प्रतिभा विलासे ।
मी वंदितों आजि कवीस माने,
ज्यांची कवित्वे अमृतासमाने ॥७॥
वंदीन पादांबुज सज्जनाचे
तयापुढे मी मग सज्ज नाचे ।
तत्संगती राघवगीत वाची,
बेडी तुटे हे जड ह्रद्भवाची. ॥८॥
प्रार्थीन आतां निजभारतीला.
केला असे म्यां निज भार तीला. ।
त्याच्या गुणे अर्जित मी धनासी.
ते होतसे साधन बंधनासी. ॥९॥
वाग्देवते मी श्रम दे तुला हे;
खळापुढे नाचविले तुला हे ।
संकष्टिलें पोटदरीस मावे;
ममापराधा उदरी समावे ॥१०॥
जिव्हे तुवां दृश्य रसा त्यजावे
श्रीरामनामामृत पीत जावे. ।
अपार संसार तरी तराया;
त्वरे यमाचे गति सीतराया ॥११॥
प्रार्थितो बहुत मी रसनेला,
व्यर्थ वर्णनि तुझ्या रस नेला ।
सांडि सर्व विषयां निज, पावे;
राम राम आयसेंचि जपावे ॥१२॥
तूं काय रे, चिंतिसि गेह रामा ?
दु:खास्पद द्रव्य, मना हरामा ।
तूं पार सांडी ममता मनाची.
सेवा करीं फार रघूत्तमाची. ॥१३॥
मना तुला हे भुलि कां मदाने ?
नानांगना मागसि कामदाने ।
नको मना हांव धरुं धनाची,
जी होतसे साधन बंधनाची ॥१४॥
मना त्यजीं दुर्जनवासनेला
इणे तुझा तो रहिवास नेला ।
जे चिंतवी तूज अनेक रामा,
सांडोनिया ते भज एक रामा ॥१५॥
पिसे तुला काय, अगा धनाचे ?
त्वां देखिल्या काय अगाध नाचे ।
श्रीरामनाणे जरि ये करासी,
भेदून जाशील विभाकरासी ॥१६॥
जाणशील मजला निजला हे,
धांवशील झणि ये निजलाहे ।
सांगतो तरि खरे तुजला हे
मी सदा गुरुकृपे निज लाहे ॥१७॥
दृष्टीत आत्मा रमणीय माला.
कदापि भीना तरि मी यमाला ।
नेणे क्रिया बंधन आसनाचे.
संकीर्तनी दास उदास नाचे ॥१८॥
जो कीर्तनी वाजविनाच टाळी
जो नाम उच्चारि न फार टाळी ।
जो सज्जनांची करितो कुटाळी
त्यालागि वेगी यम दे उटाळी ॥१९॥
सर्वकाळ तप हेंच तपावें
राम राम आइसेंचि जपावे ।
साधुच्या पदरजांत लपावे;
मोक्षलक्षणसुधेस टिपावे ॥२०॥
तपी फळांलागि अपार खावे,
श्रीरामनाणे मग पारखावे ।
करीन मी या ह्रदयास पेटी
ठेवीन रामा मग मी सपेटी ॥२१॥
ज्यास हार मिरवे भुजगाचा,
जो पिता म्हणवि शंभु जगाचा ।
राम राम रुचि तो धरिताहे
तो ससार जप मी करिताहे. ॥२२॥
राम वंशज असे तरणीचा;
जानकी प्रभव तो धरणीचा ।
कोण वर्णन करी उभयांचे ?
स्थान मी बहुत होत भयांचे ॥२३॥
कन्यका ललित ते जनकाची.
ओतली पुतळि का कनकाची ।
वर्णितां मति खुटे सनकाची,
काय होइल गती गणकाची ? ॥२४॥
जे मानसीं राघवभाव दावी
ते उक्ति माझ्या वदने वदावी ।
मला असे हे मति लाघवाची,
तेथे बलिष्ठा कृति राघवाची. ॥२५॥
माझा असे राम निधानसा हे,
कर्ता अहंभाव तया न साहे ।
रामें मनीं जे रिति संचरावें
ते ते परी म्यां तरि आचरावें ॥२६॥
हें काव्य तों रामकथेस वानी
त्यामाजिही नागकवीस वानी ।
वोपा जशी भासत सोनियाची,
कर्णास भूषा परिसोनि याची ॥२७॥
आयकाल रचना यमकांनी
नायकाल मग तो यम कानी ।
भूतकाळी कृति एक विराजे,
जीस मानिति महाकविराजे ॥२८॥
स्वयंवराची रचना वदावी
श्रीराम चित्ती निजभाव दावी ।
नणो स्वये सैवरवर्णनेसी
वर्णी नमी तूजशि पूर्णतेसी ॥२९॥
वर्णावया जानकिच्या विवाहा
लंबोदरा दे मति, जेंवि वाहा ।
रामे मनामाजि बरें बसावें
वाग्देवते त्वां वदनीं वसावें ॥३०॥
सीतास्वयंवर बरे अति आदराने
हे वर्णिजे नवरसी कविसुंदराने ।
वाकजाळसिंधु मथिला मतिमंदराने
वाक्यामृता न गणवेचि पुरंदराने ॥३१॥
जो मानितो दु:खसुखा समान
ब्रह्मीष्ठ जो मान्य जनास मान्य ।
जो नित्य दानें परिभावि देही,
वर्तून देही म्हणवी विदेही ॥३२॥
भूतळी जनक एक मोहरा,
जो रणी फिरवि शत्रुमोहरा ।
जो अहर्निशि करी नमो हरा
देत जो बहु बुधांस मोहरा ॥३३॥
भूतळी जनक एक विराजे
ज्या गृही वसत एक विराजे ।
जो खळास बहुधारक विराजे
ज्यास वर्णिति सुधा कविराजे ॥३४॥
पाहिल्या विभव तें जनकाचे
अंतरी बहुत दुर्जन कांचे ।
सौख्य फार मग सज्जन लाहे
तोष तो मुनिजनां जनलाहे ॥३५॥
ज्याचिया संगती संत आसंगती
देवही रंगती, दोषही भंगती ।
ज्ञान आज्ञनियां सांग जो शीकवी ।
काय वर्णी तया नागजाशी कवी ॥३६॥
वर्णिता यश असें जनकाचे
त्यापुढे अमृतभोजन काचे ।
तदगृही अवनिजा नवरी ते ।
कोणता वर निधान वरीते ? ॥३७॥
कलिविशारद्र नारद चालिला,
परशुरामविभूप्रति बोलिला ।
मनिं विचार बरा करि आपला
परि तुझा अवतार समापला ॥३८॥
पदा गेलिया काय तेथे रहाणे ।
हुदा फीरल्या होय लाजीरवाणे ।
पदीं पूज्यता दंतकेशां नखांला
नरालागिंही ठाउके हे तुम्हांला ॥३९॥
मही राक्षसे भार हा फार झाला,
तदुच्छेदनी राम जन्मास आला ।
जया नाममात्रे जळे पंकराशी
जयाच्या जपे मुक्ति येते करासी ॥४०॥
शक्ति ते निवसते मजपाशी
काय तूं विसरलास जपाशीं ? ।
जीचिया निजबळे अवतारा
होतसे बहुरणी नवतारा ॥४१॥
जे भक्ति आद्या, अविनाशि माया,
थोडी मही रुप जिचे समाया ।
ते शक्ति आली जनकालयाला
जे राक्षसांच्या जनली लयाला ॥४२॥
स्वयंवरी शक्ति वरील ज्याला
वेगीं वदावे अवतार त्याला ।
असत्य हे भाषित भासताहे
विदेहगेहाप्रति जाय, पाहे ॥४३॥
जो ख्यात झाला सुत रणुकेला, जेणे रणी क्षत्रियरेणु केला ।
विशेष भीतो जन काल याते, तो राम आला जनकालयाते ॥४४॥
द्वारीच कोदंड कराल ज्याचे
प्रवेशला मंदिरि राजयाचे ।
प्रधान विज्ञापि विदेहराजा,
आला गृहा भार्गव जोहरा जा. ॥४५॥
त्रिसप्तवेळा धरणी जयानें,
नि:क्षत्रिया सांवरिली जयाने ।
सहस्त्रबाहो वधुनी अशाने
जेणे मही गाजविली निशाणे ॥४६॥
तो रामु आला तुझिया घरासी,
हा तों असे पुण्यामोघराशी ।
ऐकोनि वाचा निजवर्गवाचे
तो पाय वंदी मग भार्गवाचे ॥४७॥
करोनि पूजा विधियुक्त राजा,
म्हणे तुम्हां आगम कोण काजा ।
वदे तदा भार्गव वाक्य वोजा
कन्या तुझी दाखविं राजराजा ॥४८॥
बाहीर येती मग थोर कोडे
ते कार्मुकालागिं करोनि घोडे ।
बैसोनिया नाचवि त्यास बाळा
सीता सखीसंगति खेळखेळा ॥४९॥
देखोनि ते दुर्घट कर्म पोळे
सविस्मये भार्गव बोल बोले ।
अखर्व तोही मम गर्व गेला
महाभिमाने उगलाच ठेला ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP