हे स्थान उध्वस तरी निजभाव सांगा ॥१००॥
विश्वामित्र ह्मणे ’ रघोत्तमवरा जाणोनिया नेणता
होसी तूं तरि आइकें बहु बरा वृत्तांत हा तत्त्वता ।
ब्रह्म्याची तनया विशेष विनया नामें अहिल्या बरी
जाणोनी विधिनें स्वयंवर तिचे आरंभिले सत्वरी ॥१०१॥
आले सर्व सुरासुरादिक मुनी गंधर्व ते दिक्पती,
तद्रूपें परिमोहिलें मग ह्मणे ब्रह्मा तया भारती ।
जो एका दिवसांत शीघ्र पुरती पृथ्वीस सव्ये करी
आधी येइल त्यासि देइन महाधन्या स्वकन्या बरी ॥१०२॥
हळूच हा इंद्र वदे सुरांला, ऐरावताला तरि रोग आला ।
वदे तदा वाक्यहि वन्हि कानी, नेले पहा मेंढरु त्या वृकांनी ॥१०३॥
यम स्वये बोलत दिक्पतीते, ह्मौसा कसा तो पडला रुतीते ।
नैऋत्यनाथ स्थिति बोलताहे, उलूक पाहे दिवसा न साहे ॥१०४॥
बोले जळस्वामि पहा तमासा,
पळोनि गेला उदकांत मासा ।
लावी महा मारुत लोक झासा
गुंतोनि गेला मृगकाय फासा ॥१०५॥
कुबेर बोले नरवाह मेले
विमान तें काय फुटोनि गेले ।
ईशान तोही वदतो सुरांला
हा बैल पाहा बरगें निमाला ॥१०६॥
गणेश बोले मग आदराने
नेला असे उंदिर मांजराने ।
आह्मी असो दोंदिल फार पाहे
हे कार्य तो दुर्घट फार आहे ॥१०७॥
देखोनि धेनू प्रसवोन्मुखी ते,
दोहीकडे वक्त्र दिसे तये ते ।
धावोनिया गौतम आदरेसी
प्रदक्षिणा सप्तक मेदिनीसी ॥१०८॥
प्रदक्षिणा सप्तक मेदिनीते
ते पुण्य आलें मग त्या मुनीतें ।
तों गौतमालागुनिया विधीने
त्या कन्यकेते दिधले विधीने ॥१०९॥
युवति घेउनि गौतम चालिला
बहुसुखे निज आश्रम पावला ।
मग सकोपक वासव बोलिला
कपटकामुक भोगिन मी तुला ॥११०॥
उभयतां वसती मग दंपती
रतिसुखे जशि शंकरपार्वती ।
बहुतपोनिधि तो परमव्रती
पतिपरायण तेहि महासती ॥१११॥
कोणी एक दिनी सती बसवुनी स्नानासि गेला मुनी
तो इंद्रे त्यजुनी स्ववेश सदनी प्रत्यक्ष जाला मुनी ।
कामे पीडित होवुनी सुवसनी ओढी तियेलागुनी
बोले तै मृगलोचनी स्ववचनी हे काय आले मनी ॥११२॥
सुंदरे परतुनी मज पाहे
आदरे पदर वोढित आहे ।
संचली दचकली मग बाळी
आजि काय दिवसाचि टवाळी ॥११३॥
झणी तपालागुनि काम नासी,
हे काय आले तुमच्या मनासी ।
झाला नसे काळहि यावयाचा,
रात्रीस घ्यावा रस या वयाचा ॥११४॥
सोडा तुह्मी हे तरि अतिताई
दिवा नवा हा रतिरंग काई ।
देवार्चना सांडुनि या रतीची
हे काय पूजा सुरतीं रतीची ? ॥११५॥
हा मार मारी, शरघात पाहे,
त्यामाजि हा आग्रह होत आहे ।
मनोविलापे परि होत जावे
की आपुले जीवित म्यां त्यजावें ॥११६॥
मदन दहनजाळे जाळिले आजिपाळी
मदन सदन तूझें ध्यातसे अंतराळी ।
पतिवचन न पाळी बोलती ते अधर्मा
ह्मणवुनि न ह्मणावी ते कुलस्त्री स्वधर्मा ॥११७॥
दोघा जणांचा रति रंग साजे,
मंजीर भूषारवकार वाजे ।
कांची विपंची झणकार तीचा
पहा महाशब्दहि हंकृतीचा ॥११८॥
खळखळा करकंकण वाजती,
झणझणा कळकिंकिणि गाजती ।
मुनिहि बाहिर येउनि आयके,
मग सरोष वदे निजनायके ॥११९॥
हे कोण चांडाळिणि कर्म होते ?
पतिव्रतालागुनि जे न होते ।
ऐकोनि तीन्हे चरणेघाते
संताडिला तो मघवा निघाते ॥१२०॥
दर पुरंदर तो मग पावला,
मुनिवरे निकुरे रहि शापिला ।
विहरसी सहसा भगहेतुला
तरि पडोत सहस्त्र भगें तुला ॥१२१॥
चळचळा मग कांपतसे सती,
वदत शाप तियेस महामती ।
पतिस टाकुनि रातसि तूं खळा
उपवनांतिल होशिल गे शिळा ॥१२२॥
धरुनि रुपा तुमच्या छळाने
प्रचारिलेसे मजला खळाने ।
अन्याय नाही मज हा पहातां
उच्छ्राप द्यावा मज हा पहाता ॥१२३॥
सदाम राम येउनी रसे बसेल ये वनी ।
तदीय पाय लागता, स्वरुप पाव तत्त्वतां ॥११४॥
असा प्रशाप देउनी चळे स्थळीहुनी मुनी ।
शिळा असे हि ये वनी, पुढे दिसे स्वलोचनी ॥१२५॥
तुझीच वाट पाहते, जडत्व भार साहते ।
पदासि लावि राघवा, करी स्वकीय लाघवा ॥१२६॥
बरी करी नमस्किया शिळेसि राम सक्रिया ।
करासि जोडुनी स्तुती, करीत थोर सन्नती ॥१२७॥
पतिव्रता महासती कसी करुं पदाहती ।
स्वकीय देह कापती परंतु हे निरोपिती ॥१२८॥
हळूहळूं पदपंकज लाविले,
तंव शिळांतर थोर तडाडिलें ।
चमकते चपला जशि अंबरी
तशि दिसे अबला स्वशिळांतरी ॥१२९॥
नमन ते करिते अमरोत्तमा
दिधलिसे युवती मम गौतमा ।
उभययोग तुवां जडिला जसा,
रघुविरा तुंहि पावसिरे असा ॥१३०॥
उभयतां मग दंपति साजती,
उपरि त्या सुरदुंदुभि वाजती ।
कुसुमवृष्टिहि होत विमानिच्या
द्विज कथा कथिती अभिमानिच्या ॥१३१॥
अदृष्टयोगें रघुराज आला,
आतां स्त्रियांलागि सुकाळ जाला ।
चाला शिळा सर्वहि पर्वतीच्या
होतील रुपें सम सर्व तीच्या ॥१३२॥ते
१३३ ते २५० पर्यंत काव्य उपलब्ध नाही.