उत्पत्ति हे आयिक भीमकीची, । श्रीकृष्णपादांबुजकामुकीची; ॥
दौश्चित्य जीच्या श्रवणेंच मोडे, । लक्ष्मीपतीची घर थोर जोडे. ॥१॥
विदर्भदेशाधिप भीमनामा । राजा असे येक उदारधामा, ॥
जो धीर, गंभीर, महाप्रतापी, । जो लोकपालांसहि नित्य दापी. ॥२॥
करीतसे पालन ये मद्दीचें; । नयेंच घे उत्तम हेम ईचें. ॥
प्रजांपरी पालितसे प्रजांला, । निजान्वयीं जो कुलदीप झाला. ॥३॥
असे तयाची मग मुख्य जाया, । त्याला असे तत्पर ते भजावा. ॥
विनीत अत्यंत, महाकुलीना, । कसें पतीचें मन आंकळीना ? ॥४॥
मूर्धन्य जे होय पतिव्रतांची, । जिला महा आवडि ही व्रतांची, ॥
तिच्या गुणांची बहु त्यास गोडी; । तेही तयाचीं वचनें न मोडी. ॥५॥
विरक्त त्यांचीं दिसती स्वरूपें, । असेंच चित्तें परि येकरूपें. ॥
तीं होति येकेविण येक अंधें, । चाले महाप्रेम ऋणानुबंधें. ॥६॥
जें पाळिती नित्य अनेक इष्टें, । यथाविधीनें करिताति इष्टें, ॥
जें सर्वकालीं करवीत पूर्तें, । नसे तयांचे तप हें अपुर्तें. ॥७॥
क्रमेंच त्यांला सुत पांच झाले. । कनिष्ठ हो चारि भले निघाले. ॥
रुक्मी असे अग्रज दुष्टबुद्धी, । कदापि कांहीं न धरीच बुद्धी. ॥८॥
घाली पिता नित्य तया पढाया, । पदोपदीं लागतसे अडाया. ॥
न जाय तो पुत्र कदापि साळे, । न आयके वाक्य, सदा पिसाळे. ॥९॥
टाकून दे सुंदर गद्यपद्यें, । त्या यादवांचींच वदे अवद्यें. ॥
म्हणे गुरू शिष्य नसे भलासा. ॥ याची तुम्ही सत्वर जीभ लासा. ॥१०॥
हळू हळू तो बहु होय मोठा. । आला असे काय कलंक पोटा ? ॥
करी अवज्ञाच सदा पित्याची, । न पालटे रीति कदापि त्याची. ॥११॥
निघे जरी त्यास बहूत दाढी । तथापि ते बुद्धि न येचि गाढी. ॥
विवेक त्याचे हृदयीं वसेना, । अंधास आदर्श जसा दिसेना. ॥१२॥
पित्यास पोटांतुनि दुःख वाटे, । तथापि त्याचे नव जाय वाटे. ॥
संबंध त्यासीं बहुसा न पाडी । त्याच्या विचारांतुनि चित्त काढी. ॥१३॥
चिंतावली माय तशीच त्याची । हा नायके बुद्धि तशीच तीची. ॥
पदोपदीं येऊनि शीकवीला, । तथापि तेणें उर पीकवीला. ॥१४॥
ते त्रासलीसे सुतसंततीला, । कदापि नाहींच उसंत तीला. ॥
अपुत्र संसार म्हणे असावा, । कुपुत्र पोटीं सहसा नसावा. ॥१५॥
निजोदरीं जे नवमास वाहे, । ते माय त्याचें मुखही न पाहे ॥
कुलास जेणें अधमत्व येतें, । संतान तें शल्य कर्सें न हो तें ? ॥१६॥
ते त्या दिसापासुनि नित्य देवी । अनन्यभावें कमलेस सेवी. ॥
असे सुतेचीच तिला असोशी. ॥ त्या आत्मजाचें अति दुःख सोशी. ॥१७॥
न सेविती हे जरी लोकमाता, । कोठें इचा हा तरि शोक माता ? ॥
येकें दिशीं फार विषण्ण झाली, । प्रत्यक्ष तीशींच वदों निघाली. ॥१८॥
“ महालक्ष्मी, माते, कमलनिलये, हांस मजला;
मला तूझा आतां सकळहि मुदाअ ही समजला. ।
स्वसा तूं धेनूची नियत असशी सिंधुदुहितां.
वराकी जाणें मे, जननि,तुजला काय दुहिता ? ॥१९॥
नवांभोधीमध्यें असशि जननिर्वाणलहरी.
परब्रह्माची, वो, नियत असशी तूं सहचरी. ।
महापापें, माते, न घडति मला काय अनयें ?
तुझीं आतां येथें प्रगट मजला होत अभयें. ॥२०॥
परब्रह्मच्छाये, कपटवनिते, होसि कमला.
प्रपंचामध्येंही जरि दिसशि आकस्मित नला. ।
करीतें विज्ञप्ती सभय तुज, वैकुंठवनिते,
कटाक्षप्रक्षेपें मज जिवविं, रत्नाकरसुते. ॥२१॥
नसे हें निर्वाहें, जननि, मज सामर्थ्य भजनीं,
कृपाशीले, हेला म्हणुन न करीं मद्विधजनीं. ।
जगन्माते, येथें बहुत असती बाल तुजला;
विचारें पाहातां तुजविण नसे माया मजला. ॥२२॥
प्रसंगें हे झाली, जननि, मजला बोळखि तुझी.
मनोवाक्कायें मी नियत न करीं स्वामिनि दुजी. ।
तुझ्याही भक्ताला प्रतिपद पडे संकट जयीं,
जगन्माते, तूझा अविहित दिसे लौकिक तयीं. ॥२३॥
असो चिंता माझी, जननि, पुरती येथुनि तुला.
नसे माझा कैसा अझुणि पुरता भोग सरला ? ।
असारीं संसारीं बहुत भवदाधार धरिला. ।
कृपाभिक्षा घालीं पदर तुज म्यां हा पसरिला. ” ॥२४॥
अशी इची हे स्तुति आयकीली. । प्रसन्न तेही मग तीस झाली. ॥
स्वप्नीं तिला दर्शन दीधलें कीं । म्हणे, ‘ तुझी होइन मीच लेंकी. ’ ॥२५॥
त्यानंतरें जो तिस गभ्र राहे, । तें तेज ते शीतल कां न साहे ? ॥
क्लेशी करी तीस बहूत रुक्मी, । म्हणोनि आली उदरास लक्ष्मी. ॥२६॥
तत्काल आली तिस गर्भछाया, । प्रवेशली येउनि आदिमाया. ॥
आली तिच्या पांडुरता मुखाला, । ते काळिमाही कुचचूचुकांला. ॥२७॥
गजगति गमनीं ते पाउलें मंद टाकी,
प्रतिदिनिं उठतां हे हात भूमीस टेंकी, ।
त्रिवळि मग तयेची स्पष्ट मोडोनि गेली,
अनुदिन दिननिद्रा तीस येऊं निघाली ॥२८॥
जयिंहुनि उदरीं हे गर्भ वाहों निघाली,
तयिंहुनि कमलांची प्रीति उत्पन्न झाली, ।
यदुपतिभजनाचे डोहळे ती व्हावे,
प्रतिदिन मन तीचें द्वारकेमाजि धांवे. ॥२९॥
तों कांत आला सदनास तीच्या. । पाहातसे हो वदना सतीच्या. ॥
तें वक्र तेथें सुमुखी फिरावी; । दोघांत लज्जा तिसरी शिरावी. ॥३०॥
तथापि तीची धरिली हनोटी, । तेही तयाचा मग हात लोटी. ॥
प्राणेश आंगावरी हात टाकी, । ते आपुलें सर्व शरीर झांकी. ॥३१॥
ते बोलतां त्याजसमक्ष कोडें, । वेणीस जीचे विलसेत गोंडे. ॥
सलज्ज जों जों बहु होय नारी, । तों तों हिच्या हेतुस हा विचारी. ॥३२॥
उच्छून नीवीनिचयास देखे. । तीचें समाधान बहूत राखे. ॥
तेणें तिची आवडि हो पुसावी, । क्षणेक तेणें मग ते रुसावी. ॥३३॥
भूमंडळीं लभ्य तयास नाहीं । अशी नसे वस्तु कदापि कांहीं. ॥
ते कां न पावें मग डोहळ्यांला ? । करी तिच्या वल्लभ सोहळ्यांला. ॥३४॥
धरीतसे थोर निधान पोटीं । म्हणोनि तीची भरितात वोटी. ॥
औदुंबरी माळ गळां न घाली, । जे पुत्रजन्मास बहूत भ्याली. ॥३५॥
असेपरी हे नवमास गेले. । प्रसूतिचे सन्निध दीस आले. ॥
येके दिशीं मध्यम राति गेली, । कन्या तिला उत्तम येक झाली. ॥३६॥
जे जन्मल्या माय कृतार्थ झाली, । तें स्वप्न देवी विसरोनि गेली. ॥
अनिंद्य हें सर्व शरीर तीचें, । न आढळे दूषण हें रतीचें. ॥३७॥
प्रवीण सर्वांहुनि हा विधाता, । कदापि याच्या न कळेंत धाता. ॥
सर्वोपमा मेळविजे अहो ते । तरीच हे सुंदर मूस वोते. ॥३८॥
चातुर्य वेंचे चतुराननाचें, । घडीत आलें तंव आननाचें. ॥
आकारलें रूप असेल जेव्हां, । तो भूलला काय नसेल तेव्हां ? ॥३९॥
वृत्तांत बापें मग आयकीला । तेणें तिचा उत्सव थोर केला. ॥
द्वारप्रवेशीं बहु होय दाटी, । द्विजांस नाहीं परी आडकाठी. ॥४०॥
देती विप्रां कांचनें युक्त गाई; । वादित्रांची होतसे थोर घाई. ॥
जे जे कोणी मागते लोक येती । त्यांच्या तेथें कामना पूर्ण होती. ॥४१॥
करी तिच्या उत्तम बारशाला. । दे राव वर्ग्यांस अपार शाला. ॥
ठेऊनि हें रुक्मिणि नाम तीचें, । म्हणे पहा बालक हें मतीचें. ॥४२॥
नियोजिलीसे तिस येक दायी, । जे भूपतीनें करिजे निधायी. ॥
तथापि ते वत्सल राजपत्नी । तें वाढवीलें किं अनेक यत्नीं. ॥४३॥
तिणेच हे प्रत्यह खेळवावी, । ते पाळणां सुंदरि हालवावी, ॥
कडेसही घे बहु धाकटीला, । जे शोभवीते बहुधा कटीला. ॥४४॥
जे नित्य शोभे बहु लक्षणांनीं । ते वाढलीसे बहुल क्षणांनीं. ॥
आज्ञा करी हे मग पट्टराणी । धात्री नृपासन्निध तीस आणी. ॥४५॥
पित्यास जों जों बहु आवडावी, । तों तों तयासन्निध हे भिडावी. ॥
त्याभोंवती येउनि नित्य खेळे, । त्याचेच मांडीवर नित्य लोळे. ॥४६॥
जे बोबडे बोल तिला सुचावे, । तसेच त्याला बरवे रुचावे. ॥
जे क्लेश पुत्रें करिं फार पावे, । ईच्या गुंणीं ते मग फार पावे. ॥४७॥
ते लाडकी होउनियां गुणांची । बहीण झाली परि दारुणाची. ॥
वेधा जिचें दूषणमात्र खोडी, । ते कन्यका काय करील खोडी ? ॥४८॥
रुक्मी तिला बोल विरुद्ध बोले, । बसेत तीच्या हृदयांत भाले; ॥
तथापि ते राजसुता शहाणी । विरुद्ध वाचेस कदा न आणी. ॥४९॥
मुहुर्त केले तिस पर्करांला । घरोघरीं वाटिति शर्करांला. ॥
केले अलंकार तिला नृपानें, । तें लेववीलीं श्रवणास पानें. ॥५०॥
नये शुकाची तुलनेस चोंची । ती नासिकाही मग माय टोंचीं. ॥
आणीक कांहीं तरि मायना कीं । म्हणोन घाली नथ माय नाकीं. ॥५१॥
तदुपरि नितळे हे भीमकाची कुमारी.
मदननृपति जाला यौबराज्याधिकारी. ।
तदवविभग किंचिद्वालभावासि टाकी.
सभय हृदयदेशा अंचलें नित्य झांकी. ॥५२॥
क्रमेंच तीचीं उजळेंच अंगें, । हे पाजवीली छुरिका अनंगें. ॥
हळू हळू यौवन हें झळंबे । ईला कसें शैशवही विसंबे ? ॥५३॥
मुखेंदु जों जों बरवा सजावा, । तों तों इचा माज उगा झिजावा. ॥
ईच्या नितंबा गरिमान यावा तथापि यावा इस फार यावा. ॥५४॥
लीलारसें हे सदनांत वागे, । पाठी इचे हंससमूह लागे. ॥
लाजेत ईचे कबरीस मोरें, येती मुखासन्मुख हें चकोरें. ॥५५॥
अत्यंत त्यांची द्युति हे विकासे । सुवर्णपूगीफलयुग्म भासे, ॥
उठेत वक्षोरुह हे उठाणें, । या शैशवाचें उठवीति ठाणें. ॥५६॥
आली तिच्या ते जडता नितंबा. । हांसे तिचें तें मुख चंद्रबिंबा. ॥
शोभे तिचे पाठिस लांब वेणी. । प्रतिक्षणीं फेरुनि लेय लेणीं. ॥५७॥
होतांच हा निर्गम शैशवाचा । प्रवेशलासे गुण केशवाचा. ॥
ब्रह्मादिकांला न कळे तथा, रे, । तें ब्रह्म ईच्या हृदयांत थारे. ॥५८॥
सेवार्थ बंदीजन नित्य येती, । तेंहीं प्रसंगें वर वर्णिजेती. ॥
ज्याचे गुणीं रुक्मिणि कान देते । शरीर त्याला तरि कां न देते ? ॥५९॥
तो द्वारकेचा वर नित्य गाजे । हे भीमकी ही नवरी अगा जे. ॥
मनोज मध्यस्थ करूं निघाला । मनोविपर्यास तयांस जाला. ॥६०॥
परस्परांचे गुण दूत येती । परस्परें हे अनुरक्त होती. ॥
त्याच्या गुणें मन्मथ ईस बाधे । धनुष्य हें सज्ज तयास साधे. ॥६१॥
जें कृष्णरूपें अवतीर्ण झालें, । तें मन्मथें ब्रह्म शरव्य केलें. ॥
हे वेदना दुःसहसी कळावी । म्हणोन किंवा स्मर शीक लावी ? ॥६२॥
जे आदिमाया प्रकृतिस्वभावें । स्मरे तिला ब्रह्म अनन्य भावें. ॥
तेही तदाकार तशीच झाली । स्वदेहभावा विसरोनि गेली. ॥६३॥
यदुपति पदपद्मीं चित्त आसक्ति पावे;
अवसर मदनाला तोच अत्यंत फावे. ।
अगणित मग त्याचेम तीक्ष्ण नाराच येती,
कठिण हृदय तीचें नित्य भेदून जाती. ॥६४॥
परम विकल, येके आसनीं ते बसेना,
क्षणभरि जननीचे संनिधानीं असेना, ।
अनुदिन मन तीचें कोटि संकल्प वेंधे,
हरिविण विषयांचा स्वाद कांहींच नेघे. ॥६५॥
विमल कमल हातीं भीमकी घेत नाहीं,
प्रतिवचन सख्यांला हे नसे देत कांहीं. ।
हरियुत हरितेचा वायुही फार मानी,
हरिविण दुसरा हा नायके शब्द कानीं. ॥६६॥
अशन वसन तीला सर्वथा हें नमाने,
हरिरहित सुखाचा हेतु आणीकं नेणें, ।
निशिदिन तिज लागे ध्यान हें द्वारकेचें
तदितर दुसरं तत्प्रापक द्वार कैंचें ? ॥६७॥
हरिचरणवियोगें रात्रि तीला न लोटे;
युगसम तिजला हे दीसही जाति मोठे ।
कृशतनु तनु झाली, भूक ताहान गेली,
निखिल निजजनांची हे असे सांडि केली. ॥६८॥
त भीमकी हे मग घोण घाली । चिंतासमुद्रीं प्रविशों निघाली. ॥
आंगास तीच्या कडमोड आला, । मुखेंदुही हा उतरोनि गेला. ॥६९॥
तत्काळ तन्मस्तक होय भारी । प्रवेशला येउनि कैटभारी. ॥
सखीजनां सन्निध जे न बाहे, । निजे उसां घालुनियां स्वबाहे. ॥७०॥
विकासली पांडुरता कपोलीं, । गेला असे बोल बहूत खोली. ।
जाळी तिला चंदन, चंद्र, वाळा; । घडी घडी विव्हल होय बाला. ॥७१॥
सरीसृपी होय सरी गळांची. । झाली असे शेजहि इंगळांची. ॥
ते चालतां हे नुचलेत वाळे । शरीर तीचें सुकुमार वालें. ॥७२॥
हा पातकी मन्मथ थोर धन्वी, । हे राजकन्या सुकुमार तन्वी; ।
कर्तव्य ईचें इस ऊसजेना, । कदापि कोठें सुख ऊपजेना. ॥७३॥
ते नित्य हातें मग दीस लोटी. । ते वागवी शोकसमुद्र पोटीं. ॥
शरीरसंताप नसे निवाला, । करीतसे नित्य अपन्हवाला. ॥७४॥
चटपट बहु लागे होय संतप्त बाळा.
प्रतिदिन मदनाचा होतसे हा उबाला. ।
चतुर तिज समाना सर्व तीच्या वयस्या
असति, परि तियेच्या नेणती या रहस्या. ॥७५॥
कुसुमशरचरांनीं जर्जरीभूत झाली,
तदुपरि शरतल्पीं भीमकी हे निजेली; ।
परि इस भगवंतीं थोर निर्वाह आहे,
म्हणवुनि कठिणाही वेदना सर्व साहे. ॥७६॥
निरतिशय इची हे वेदना आयकीली,
त्वरित बहुत तेथें माय धांवोन आली. ।
मग तिस पुसतां हा कंठ अत्यंत दाटे,
नयनयुगिं जलाचा पूरही थोर लोटे. ॥७७॥
न पुसत मज तूं गे चित्रशाळेस जासी,
अनियत अथवा ये गेहवापीस न्हासी, ।
सहज निजशिरीं हे नित्य घालून नाडे
प्रतिदिन फिरसी गे येकली कां अनाडे ? ॥७८॥
नकळत तुज किंवा भूक ताहान मोडे ?
अनियत तुज येती कां उगे आंगमोडे ? ।
निशिदिनिं कवणाचा हा निजध्यास लागे ?
अति कठिण अकालीं योग अभ्यासला गे. ॥७९॥
अझुणवरि न लागे कां तुला हे पिपासा ?
नमनिसि भय कांहीं, कां करीशी उपासा ? ।
झडकरि उठ आतां अल्पसें जेवि, मूली,
नियतच तुज आली हे असे अन्नभूली. ॥८०॥
दिसति मज सख्याही सर्व तूझ्या लबाडा,
तुजच जवळि आतां होय याचा निवाडा. ।
अति परिचय यांसीं येक हा देखिलागे,
अभिनव कवणाची अन्यथा देखि लागे. ॥८१॥
मज तरि समजेना सर्वथा हे अवस्था.
न समजत करावी काय ईची व्यवस्था. ।
अनृत वदत नाहीं सर्वथा नावरेसी.
निशिदिन जगदंबा तूज राखो परेशी. ॥८२॥
प्रतिवचन न येतां, होय हे घाबरीशी,
प्रगट म्हणत आहे गोष्टि नाहीं बरीशी. ।
प्रतिगृहिं नसती या काय लेंकी समा या,
बहुत सबळ माझी हे जळो व्यर्थ माया ! ॥८३॥
सकलहि कुलदेवी, येकदा ईस राखा,
प्रतिदिन इस दृष्टीं कांसवाचेच देखा. ।
नवस नवसिले हे व्यर्थ होऊं न द्यावे,
इस गुण दिधल्यानें सर्व संकल्प घ्यावे. ॥८४॥
घडिधडि तिस दावी पोखत्या बायकांला,
विसरुन मदनाच्या जाति ज्या सायकांला. ।
अतिशयित असे जे राजपत्नी अभिज्ञा,
सकलहि अनाभिज्ञाहून ते होय अज्ञा. ॥८५॥
सचकित म्हणताहे लागि कोठें पहा, गे;
झडकरि तुम्हि येथें वैद्य कोणी बहा, गे. ।
घडिघडि इजला हे झांपडीही पडावी,
म्हणवुन मज वाटे भूतबाधा घडावी. ॥८६॥
कितियक मग तेथें नैपुणें दाखवीती.
अगणित तिज हातीं सांडणीं टाकविती. ।
कितियक इजशीं या बोलती बोलणारी,
नकळत तुज झालें काय हें बोल नारी ! ॥८७॥
क्षणभर मग तेथें पाड त्यांचा पडावा,
दिवस तरि तयांला येक हा सांपडावा. ।
अनभिमत तयांचें वाक्य हें आयकेना,
चतुरपण जयांचें ईपुढें हे विकेना. ॥८८॥
तदुपरिहि पहाती वैद्य तीचीं निदानें;
तदुचित करवीती विश दैवज्ञ दानें. ।
धरुन तिस ललाटीं मंत्रवादी विभूती
करित असति, जीच्या निर्विकल्पा विभूती. ॥८९॥
तदपि न धरवे हा धीर यां पोखत्यांला.
सहज न समजे हो हा इचा रोख त्यांला.
अति विविध चरित्रें हांसिलासे मुरारी.
अधिक मग तियेचें चित्तचैतन्य चोरी. ॥९०॥
अगणित मग बाला दीर्घ निश्वास टाकी,
मुखकमल तियेचें अंचलें माय झांकी, ।
अनिश उभय पार्ध्वीं फरितां हे न भागे,
क्षणभरि इजला हे झोंप तेही न लागे. ॥९१॥
तदुपरि नृपपत्नी फार भेऊं निघाली,
सकरुण दुहितेला आपुली आण घाली. ।
उठवुन निजअंकीं बैसवी तीस माता.
‘ अभिलपित तुझें तूं, भीमकी, बोल आतां. ॥९२॥
तूं खेळतां राजस भागलीशी, । कीं दृष्टि लागे तुज चांगलीशी ? ॥
संपर्ग झाला तुज सापिणीचा, । की लागला पालव पापिणीचा ? ॥९३॥
विकार भासे मज मन्मथाचा, । न सांपडे माग मनोरथाचा. ॥
पडे बहू विस्मृति हे तुला गे, । कोठें तुझा जाउनि हेतु लागे ? ॥९४॥
नसे तुझें हें मन आजि ठांई, । अशा प्रकारें पडशी अपायीं. ॥
होईल शोकें हृदय द्विधा, गे, । हांसेत या तूज भवद्विधा गे ॥९५॥
न लेति जे लोचन अंजनाला, । तथापि हे निंदिति खंजनाला. ॥
दिसेत कर्णे जपजागराचे, । कंरूं नको सोदर सागराचे. ॥९६॥
असीम लावण्य तुझे शरीरीं. । लाधेल हें कोण तर्ही शरीरी ! ॥
यदर्थ चित्तीं अति तापसी, गे, । न आढळे ( तो ) मज तापसी, गे. ॥९७॥
प्रवेशला कोण असे त्रिवेणी ? । प्रसन्न कोणास पिलाकपाणी ? ॥
त्वदर्थ कोणें पडणीं पडावें ? । हुताशनप्राशन वा घडावें ? ॥९८॥
आजन्म कोणें उपवास केला, । ज्याच्या असे काम फळास आला ॥
कीं खड्गधाराव्रत वीर सेवी । त्याचीच तूं होशिल मुख्य देवी. ॥९९॥
किंवा असाधारण हे तपस्या. । तूं अन्यथा होशिल काय वश्या ? ॥
असा महापूरुष कोण आहे । जो आजि तूझा अनुराग लाहे ? ॥१००॥
तूं तो स्वभावें असशी कुमारी, । हा कोपला दारुण शंबरारी. ॥
खचे तुझा उत्कट धैर्यसेतू. । तूं आपुला हा मज संग हेतू. ॥१०१॥
शरीर तूझें मज पाहवेना, । त्वद्वेदनाही मज साहवेना, ’ ॥
बोलोन ऐसें उगलीच राहे. । तटस्थ तीचा मुखचंद्र पाहे. ॥१०२॥
यदुपतिविरहें जे शुष्क होवोनि गेली,
अविदितहृदया जे मन्मथाधीन झाली. ।
निरवधि जननीचा थोर संकोच झाला,
प्रति वचनप्रसंगी प्राण कंठास आला. ॥१०३॥
‘ तुज मज जननी हा सर्वथा भेद नाहीं.
नव्हतिल तुज कैशा मद्गता वेदना ही ? ।
नियमितच असें मी श्वासनिश्वास तूझा,
तुजविण दुसरा हा प्राण नाहींच माझा. ॥१०४॥
परि, जननि, सुतेचा लाभ हा होय ज्यांला,
नियत समजताहें थोर धिक्कार त्याला. ।
परम अधम हें स्त्रीजन्म वाईटवाणे,
उपजत परचित्ताधीन तेणें रहाणें. ॥१०५॥
अनुपद तुझिया मी व्यर्थ पोटास आलें,
परम अनुपयोगें भार भूमीस झालें. ।
अगणित अपराधी मी तुझें लेंकरूं गे,
अनुचित तुजशीं हे वंचना कां करूं गे ? ॥१०६॥
प्रगट ह्मणसि जो हा कोपला शंवरारी,
अविदित तुज कैसा तात त्याचा मुरारी ? ।
वदत वदत ऐसें आडवी लाज आली.
तदुपरि मग बाला खालती मान घाली. ॥१०७॥
अविदित दुहिताभिप्राय विज्ञात झाला.
नरपतिरमणीचा सर्व संदेह गेला. ।
प्रमुदित मग माता कन्यकेला बुझावी,
तदपि परम मुग्धा ईज लाहे बुजावी. ॥१०८॥
तदुपरि जनयित्री फार उद्विग्न झाली,
पतिसमिप मृगाक्षी तेच वेळेस गेली. ।
सविनय मग त्यासी हात जोडोनि बोले,
अपरिमित जलाचे पूर नेत्रांस आले. ॥१०९॥
‘ उपवर मुलि जाली, बोलतां येत नाहीं.
वरविषयक चिंता हे नसे होत कांहीं. ।
यदुवर, अवतारी, पुत्र जो देवकीचा,
गुणनिधि, अवधारीं, प्राण ये भीमकीचा. ॥११०॥
पदयुगुल हरीचें ईस आदान आहे.
तदितर वरवार्ता सर्वथा हे न साहे. ।
ह्मणवुन, पृथिवींद्रा, गोष्टि हे आयकावी,
त्वरित मुलि उदारा केशवा आजि द्यावी. ’ ॥११॥
वचन मग विदर्भाधीश बोलों निघाला.
‘ मजवरि अमृताचा लोट कोठोनि आला ? ।
अगणित परिपाका पुण्य संपूर्ण आलें,
अघटितघटणेनें दैव किंवा उदेलें ? ॥११२॥
तदुपरि मग दोहीं होय निर्वाह केला.
ह्मणति हरिस देऊं आपुले कन्य केला. ।
नरपतिमुखिंची हे गोष्टि बाहेर आली,
हळुहळु तनयेच्या कर्णमूलास गेली. ॥११३॥
परम अधम रुक्मी जो महाशीघ्रकोपी.
प्रकट ह्मणति याचे दोष हे कोण थोपी ? ।
बहुतच अविवेकी होय संक्षुब्ध तैसा,
हुतवहवदनीं हा तैल संपात तैसा. ॥११४॥
उपजत खल जो कीं दुष्टबुद्धि स्वभावें,
अनिश यदुपतीशीं वर्ततो वैरभावें. ।
जनक मग विचाराकारणें त्यास बाहे.
अधम तंव तयातें पुत्र सक्रोध पाहे ॥११५॥
तदुपरि हरि निंदा जे मुखांतून आली,
स्तुतिपर परभागें ते महा पुष्ट जाली. ।
अनृतवचन कांहीं वैखरी हे वदेना
सहज हरिचरित्रा दोष येऊंच देना. ॥११६॥
कथा हे कृष्णाची सकल जगदानंद जननी.
मनोभावें ईचें श्रवण करिजे नित्य सुनमीं. ।
पसंगें श्रोत्याचें सकलहि महा दोष हरती.
यदुत्तंसप्रेमें विषयरसगोडी विसरती. ॥११७॥
इति श्रीमद्भगवद्भक्तपदानुरक्तकविसामराज विरचिते रुक्मिणी - हरण काव्ये द्वितीय सर्गः ।