रुक्मी ह्मणे हें तुज काय झालें ? । कुलास या दूषण थोर आलें. ॥
विचार तूझा मज हा न माने, । किंवा इचें प्राक्तन कोण जाणें. ॥१॥
विवाहकार्यीं स्थिरता धरावी, । त्वां आपुली तांतडि आंवरावी. ॥
जें येकदां कृत्य घडोन येतें । विचारळ्यावीण करूं नये तें. ॥२॥
हिमालयें जो अविवेक केला । तसाच त्याचा परिपाक झाला. ॥
ये पार्वतीचे पडला कपाळीं । अद्यापि पाहे न चुके कपाळी ॥३॥
त्याचेंच त्वां हें मत आदरीलें । कां आपलें परुष आंवरीलें ॥
मला अभिप्राय कळों न देशी, । त्या यादवांचे गुण नित्य घेशी. ॥४॥
मुखांबुजीं संतत वेणु वाहे, । गोपांगनाचंचे अपशब्द साहे, ॥
धरी शिरीं केवळ मोरपीसें । तें देवकीचें तरि पोर पीसें. ॥५॥
जो हा गुणग्राहक रानटांचा, । शोभे सदा वेष बरा नटाचा; ॥
असे जया संगति गोवृषांची । तो काय जाणे स्थिति मानुषांची ! ॥६॥
जेणें सखा मातुल हा वधावा । संबंध त्यासीं तुजशीं बधावा, ॥
त्या मावशीच्या तरि घातक्याला । कन्या कशी देशिल पातक्याला ! ॥७॥
जो गोकुळीं गोवळ मातलाहे, । वक्षस्थळीं जो हरि लात लाहे, ॥
तो ईजला वल्लभ मी करीना । ज्याचा मला हा कळला करीणा ॥८॥
असेत उझी मूलि महागुणांची, । पत्नी कशी होईल निगुर्णाची ? ॥
ज्याकारणें हे विलपे वराकी । तो काय ईला समजे गुराखी ? ॥९॥
नृपा तुला उत्तम क्कारि जाली । दैवें निघाली परि हेरि जाली, ॥
जे भाळली केवळ गोवळाला । कलंक लावी विमळा कुळाला. ॥१०॥
जाणों नको यास मनुष्य देही. । असे सदांचा हरि हा विदेही. ॥
निर्द्वंद्व, निःसंग, महा अकर्मी, । याची नसे दृष्टि मनुष्यधर्मी. ॥११॥
लज्जा न पावे हरि अग्रजाची, । जो गोकुलग्राम समग्र जाची, ॥
जो नित्य वृंदावनभू विहारी, । जो गोपकन्या वसनांस हारी, ॥१२॥
सबाह्य अभ्यंतर कृष्णकाळा, । कदापि नाहीं वचनास ताळा. ॥
कदापि जो धर्म, अधर्म नेणे, । हा येक पाटश्चर वृत्ति जाणे. ॥१३॥
हा ऐक जाणे विधि बा हल्याचा । विचारितां केवळ बाहल्याचा ॥
हा हुंबरी घालुन रे शहाणा, । घेऊन काठी, चढवी वहाणा. ॥१४॥
न आडलें हे कुळगोत कांहीं, । विचारितां यास ठिकाण नाहीं. ॥
देऊं नको मूलि, लहान राया । जाणो नको गोष्ठि अहा वराया ॥१५॥
ज्यांचा महा कुत्सित नांदणूका, । सुनांस नाहीं तरि कामणूका, ॥
ज्या भक्षिती केवळ ताकघाटा, । विकावया गोरस नेति हाटा. ॥१६॥
जो गोरसें गोवळ नित्य घाणे, । तो काय या कामरसास जाणें ॥
मायाबळें केवळ विश्व मोही, । जाला तुला वल्लभ आजि तोही. ॥१७॥
भूतांस जें होउन भूत लागे, । तें हें महद्भूत जगांत जागे. ॥
जळीं स्थळीं व्यापक रूप ज्याचें । न मानिसी तूं भय आजि त्याचें ॥१८॥
जाला असे जो उदकांत मासा, । तसाच हा कांसवही अमासा, ॥
त्यानंतरें सूकर घोररूपी, । नृसिंह तो त्याहुनही विरूपी. ॥१९॥
तसाच हा वामन निर्विकारी । झाला बळीछे घरिंचा भिकारी. ॥
जो आपली भार्गव माय मारी, । तुह्मांस तो निर्दय काय तारी ? ॥२०॥
गमाविलें पौरुष रामरूपें । तें मर्कटें मेळविलीं अमूपें. ॥
रानामधें टाकुन जाय राणी, । असा नसे आणिक तो अडाणी. ॥२१॥
हा आठवा चालक कृष्ण मोठा, । संबंध त्यासीं तुज आजि खोटा; ॥
यालागीं जे जे जन आठवीती, । ते सर्व संसारसुखा मुकेती. ॥२२॥
उत्पन्न जो होय चहूं भुजांचा । विटंबिला अन्वय भूभुजांचा ।
उरीं जयाचे मिरवे, लहांसें । या सोयर्यांचें करिशील हांसें ॥२३॥
पडे पहा हे अकुळीं कुलीना, । शची दिसे जीजपुढें मलीना. ॥
वरी जयीं हे वरदा विपरा । जाईल हे कीर्ति समुद्रपारा. ॥२४॥
हे गोष्टि माझी हृदयीं धरावी, । वार्ता हरीची सहसा त्यजावी. ॥
वसुंधरा उद्वस आजि झाली ? । पुंसृष्टि किंवा अवघी बुडावी ? ॥२५॥
जो चैद्यदेशीं मदघोष आहे, । विख्यात ज्याचें कुल, शील पाहे, ॥
आहेच पूर्वींहुन सोयरा जो । संबंध त्यासीं तुजसीं विराजो. ॥२६॥
कुमार त्याचा शिशुपाल नामा । उत्कृष्ट सर्वांहुन, सर्वभौमा. ॥
उदार, गंभीर, महाभिमानी, । या यादवांला तृणतुल्य मानी. ॥२७॥
विचारिलीं राजकुलें अशेषें । हा श्लाघ्यसंबंध दिसे विशेषें. ॥
ये भीमकीनें तप काय केलें ? । दैवें इच्या हेंच घडोन आलें. ॥२८॥
अत्यंत अहा आग्रह देखियेला; । पुत्रास तो भीमक वश्य झाला; ॥
कर्तव्य दुष्टाप्रति काय चाले ? । नेत्रीं विषादें जलबिंदु आले. ॥२९॥
पाचारवी पुत्र समस्त जोशी, । प्रत्युत्तराची न धरीच गोसी. ॥
जसें तसें केवळ लग्न काढी, । चैद्येश्वरा सत्वर मूळ धाडी. ॥३०॥
कोठ्या थट्यां मुक्त समस्त केल्या, । प्रमाणग्या आपण देववील्या. ॥
सभोंवते भोंवति सर्व सेटे, । राबेत तेथें कितियेक वेंठे. ॥३१॥
स्थळीं स्थळीं मंडप घालवीले, । प्रासाद अत्युत्तम झादवीले, ॥
सवारिल्या राजसभा प्रशस्ता, । वारंगना आणविल्या समस्ता. ॥३२॥
त्वरित मुळचिठ्या त्या सोयर्यांला लिहील्या,
रथ, तुरग, तुरंगी, पालख्या पाठवील्या. ।
सहज रिपुपणें जो श्रीपतीचा विरोधी,
ह्मणवुन मग मार्ग द्वारकेचा निरोधी. ॥३३॥
न पुरत जनकाला चालवी हातरोखें,
तदुपरि सचिवांची बुद्धि सर्वत्र रोखे. ।
तटति सकल कार्यें, हा पडे हे प्रवाहीं,
बहुतच मन घाली सोदरीचे विवाही. ॥३४॥
द्विपवर अवलोकी आदरें आंदणाचे,
क्षितिधर अथवा जो भारती अंजनाचे. ।
निवडुनि मग घोडे काढिले फार यानें,
जवन पवन जीहीं जिंकिलासे रयानें ॥३५॥
अति रुचिर रथांच्या आणवी संचयांला
हयनिवह नियोजी जे महासंच यांला ।
मणिखचित अपारा पालख्या, तख्तरावे
घडिघडि अवलोकी; हा भरे येच हांवे. ॥३६॥
पडु पटह, पताका, आतपत्रें उदंडें,
शशिकरविशदें तें चामरें हेमदंडें, ।
कनकमय कमाना, त्या वदा दुर्निवारा,
सित शर, तरवारा तीक्ष्णधारा अपारा, ॥३७॥
मग जडित कडीं तें, मुद्रिका, कर्णभूषा,
पदकयुत गळांच्या सांखळ्याही विशेषा, ।
कनकघटित माळा, हार मुक्ताफळांचे,
अति तरल विलोकी घाट ते मेखळांचे. ॥३८॥
तदुपरि जरतारी मंदिलें उंच बोली,
पदुतर पटकेंही जें अमोलीक मोलीं. ।
निवडुन डगल्यांला नीलखा बेतवील्या.
निवडुन डगल्यांला नीलखा बेतवील्या. ॥३९॥
मखमल, सखलादा, सोपशाला अपारा,
मृदुतर थिरमे, त्या कोंचक्या कोरदारा, ।
अतळस कुतन्याहीं साहिव्या रुंद बोली,
बहुत सखर सेले चांगले आठ गोली. ॥४०॥
पाटाऊं म्यानबंधा, तडप आणि धट्या, भेद खंबायितांचे,
लाखी, माची, दुरंगी, बहुत ढिगतसे ताफत्या बाफत्यांचे, ।
साड्याही नौपटीच्या, कतिपय लुगडीं, जें नवें पांजणीचीं
पीतें, शोणें, बनोसें, भरजर अवघीं पातळें पैठणींचीं. ॥४१॥
मुक्ताशेखर, पोंहच्या धुकधुक्या, हीरांगदें उज्वलें,
पाची, हीरक, पद्मराग, लसणें, गोमेद, मुक्ताफळें. ।
सत्कृष्णा गरुनिर्मिता उदबत्या, काश्मीर कस्तूरिका,
चोवा, चंदन, भोगरेल अत्तर, श्रीखंड खंडे, बुका. ॥४२॥
हांडे, कुंब, बळ्या, परात, तवल्या, गुंडे, तपेलीं धडे,
गंगाळें, चरव्या अनेक निवडीं सोन्यारुप्यांची जडें ।
तांबे, जांब, खुजे, प्रशस्त तिवया, ताटें, नवी तासकें,
वाट्या लाहनशा, तशा तबकड्या, केल्या महाशासके ॥४३॥
चौक्या सुंदर, हेममंचक, तसे चौरंग, त्या न्याहल्या,
नीशारादि पलंगपोस, पडदे, गाद्या, उशा, पाहिल्या. ।
प्रस्तावे, समया, रुमाल, तबकें, प्याले, डबे आरसे,
पंखे, मोरछलें, कितेक निवडीं, तस्तें प्रशस्तें पुसे. ॥४४॥
सर्जे, तोडर, पाखरा, सजहुमे कंडे, पटे चांगले,
सीले टोप अनेक हा निवडितां ते लोकही भागले. ।
डेरे, खांबजडीत उंच अवघे, भारी छमीने जरीं,
बाडें सुंदर खाबगे नवल ज्या सिद्धाच होत्या घरीं. ॥४५॥
तक्क्यांना मदगर्द पोश, सुजन्या, लोडें दुलीचे नवे,
सत्रंज्या अति विस्तृता, बचकण्या, आलोकिले चांदवे. ।
गंजीफा, सतरंज चोपड नवें तें नर्दही सांग जे,
खाशांच्या पिलसो नसोत ह्मणती त्याला बहू रागिजे. ॥४६॥
दासी, दास, सवत्स धेनु, महिषी, दासेरकें, बेसरें,
रेडे, बोकड, येडके, वृषदुमे, सौगंधिकें मांजरें, ।
चित्ते, बाजजुरे, विहंगम तुरे, जें हे ससाणे बरे,
लावे, तित्तिर, मोर, थोर बदकें, रावे महासाजिरे. ॥४७॥
येला कंकोल, पूगीफल, खदिर, शशी,जायपत्री, लवंगा.
बादामें, आकरोडें, खिसमिस, उतत्या आणवील्या सवंगा. ।
गोडंब्या, नारिकेलें, खजुर आणि खडीशर्करा, शुद्ध चींनी.
जीरें शुंठी, मरीचें, हळदि बहुतशी, हींगही, दारचीनी. ॥४८॥
दाळिंबें, सोनकेळें, पनस, अननसें, जांबळें, मातुलिंगें,
अंबे, लिंबें, सुरंगें, टरबुज, पपये, अंजिरें, हें कलिंगें, ।
शेपें, शीताफळेंही, खरबुज, खिरणी, सुंदरें, तूत बोरें,
सत्पाळें, ऊंस, पुंडे, कविठ, कमरखें, वाळकें सूक्ष्म, थोरें. ॥४९॥
गोधूम, तांदुळ, तुरी, मुग, माष, शाली,
तीळें, तुपें, गुळ, चणे, तिळ येति काळीं. ।
पानें नवीं, दळदरें, रुचिरें विड्याचीं.
आसेति दिव्य कुसुमें बहु केवड्याचीं. ॥५०॥
सकल संपति यद्यपि आयती, । तदपि होति समस्तहि आयती. ॥
चहुंकडे फिरती परिचारीका । बहुत भीति तया अविचारिका. ॥५१॥
दळण, कांडण, पेषण, चाळणें । वइंचणें, निसणें आणि गाळणें, ॥
कणिक, शुद्ध पिठी, सपिठें रवा, । ह्मणति त्या गहुं आणिक ओलवा. ॥५२॥
सहज सुंदरसूद, कुटुंबीनी । हळुच त्या मग येति नितंबिनी. ॥
वळवटें वळिती, जिव आटिती, । बहुत पातळ पापड लाटिती. ॥५३॥
विविध त्या मग घालिति लोणचीं, । तिरकुटें नसती अति वाणिचीं. ॥
सहज लग्न निघे बहु तांतडी । म्हणुनि होय पुढें अति तांतडी. ॥५४॥
अपरिमित वडे हे वाळती कोहळ्यांचे.
दिवस जवळ आले बोलती सोहळ्याचे. ।
दृढतर तिळवे हे, गोड अत्यंत लाडू,
प्रिय परम जसे हो सोयर्यां माजि साडू. ॥५५॥
निवडुनि शिशुपाला कारणें हा मुकासे.
अगणित भरती हे नित्य जेथें नकासे. ।
तदुपरि वरपक्षी लेहवी लोक खासे,
घडि घडि जनकाच्या जो विचारास हांसे. ॥५६॥
अविनय तनयाचा देखिला स्पष्ट भारी.
नरपतिरमणी ते खोंचलीसे जिव्हारी. ।
मुखकमल तियेचें स्वच्छ विच्छाय झालें.
तदुपरि अविलंबें आंग मोडून आलें. ॥५७॥
न कळत हृदयेशा स्वीय गेहास गेली.
निजकनकपलंगीं भामिनी ते निजेली. ।
वचन परिजनांसी चंद्रवक्रा वदेना.
तनयकृत विचारा व्यक्त होऊंच देना. ॥५८॥
नरपतिदुहितेला माय येतां दिसेना,
तदुपरि मग तीचें चित्त कोठें बसेना. ।
घदि घडि निजगेहा आंत बाहेर येते,
अनिमिष जननीची वात बाला पहाते. ॥५९॥
त्वरित बहुत घाई होतसे आपतीची.
क्षणहि मन न घाली सर्वथा माय तीची. ।
तदपि परिजनांला हेतु याचा पुसेना,
सुलज बहुगुणांची मायसीं जे रुसेना. ॥६०॥
कुचकुच सखयांची अन्यथा देखियेली;
मग परम शहाणी तत्व जाणोन गेली. ।
नरपतितनयेचा सर्व उत्साह आटे;
प्रलयजलधि किंवा लोटला तीस वाटे. ॥६१॥
स्थगित मग मृगाशी ते घडी येक राहे,
अति चकित दहाही शून्य दिग्भाग पाहे. ।
विसर तिस पडे हा, कांहिंही आठवेना.
हृदयकमलकोशीं दुःख हें सांठवेना. ॥६२॥
अनभिमत विचारें तें तिचें चेत लासे,
विरहदहन आंगीं मागुतीं चेतलासे. ।
अपरिमित तियेला येति तेणें उमासे.
धडिक म्हणति जाऊं प्राणही हे अमासे. ॥६३॥
क्षितिपतितनया जे मन्मथाधीन झाली,
बहुत सबल तेव्हां मूर्च्छाना तीस आली. ।
परम विकल बाला नावरी जे शरीरा,
धरणिवर पडे निश्चेतना ते अधीरा. ॥६४॥
तदुपरि सखिया त्या सर्व धांवोनि येती.
नवकिसलयतल्पीं तीजला नीजवीती. ।
घडि घडि करिते हे भीमकी घालफेडी,
अगणित ऋण किंवा मन्मथाचेंच फेडी. ॥६५॥
अनुपद तिस कोणी विंजणे जाणवीती.
कितियक मग तेथें चंदनें आणवीती. ।
कितियक नलिनीचीं तें दलें कोमलेंसीं.
धरिति हृदयदेशीं संगतें शैवलेंसीं. ॥६६॥
तिजजवळि सख्यांचा बैसला थोर पाळा.
कितियक रचिती त्या दिव्य कर्पूरमाळा. ।
कितियक मणिबंधीं बांधिती त्या मृणालें.
म्हणतिच ‘ शिशुपाला, हो तुझें तोंड काळें. ’ ॥६७॥
परम विकल तन्वी, हालवील्या न हाले.
सशपथ सखियांनीं बोलवील्या न बोले. ।
सहज यदुपतीचें नाम जे घेत आहे,
उघडुन मग डोळे तीकडे मात्र पाहे. ॥६८॥
मुखरणि सखियांची सर्व संमर्द वारी.
बहुत जवळि केली भूपतीची कुमारी. ।
हळुहळु मग काढी श्रीपतीचीच वार्ता,
न वदत तिजशीं हे बोलती तीस धूर्ता. ॥६९॥
यदुपतिपदवार्ता तन्मुखांतून येतां,
लगबग बहु झाली मूर्च्छयेलागिं जातां, ।
सकरुण सखयेसी भीमकी वाक्य बोले
सहज मृदु, जयाशीं काय पीयूष तोले ? ॥७०॥
कळत कळत होशी आजि कां तूं अजाणा ?
अझुणवरि कशी या नेणसी पंचबाणा ? ।
अति कठिण, सये, हें चाप याचें जळेना !
त्वरित बहुत याची कां चिता पाजळेना ! ॥७१॥
व्यजनपवनयोगें होतसे हा उबारा;
अनिश तपति किंवा सूर्य येकत्र बारा. ।
खुपति मज शरीरीं सर्व तल्पप्रसूनें.
निपटच, सखि, डोळेझांक केली प्रसूनें. ॥७२॥
किति दिस करपत्रीं आपला जीव घालूं ?
निशिदिन मदनाला कोठपर्यंत डालूं ? ।
हळहळ बहु झाली होय संसार वारा.
मजवरि फिरली हे दैवदुर्वारधारा. ॥७३॥
रतिपति मज पाठीं कां, सये, लागला, गे ?
यदुकुलतिलकाचा हा कसा लाग लागे ? ।
दिवस कठिण कंठीं मी पराधीन बाला.
मुररिपुकरुणेचा नाढळे हा जिव्हाळा. ॥७४॥
जिव बहु उबगे हा, गोष्टि कांहीं रुचेना.
निजहित मज आतां सर्वथा हें सुचेना.
घडिघडि बहु, बाई, वोढती सर्व सांवा.
यदुपति मज भेटे कैं जिवाचा विसांवा ? ॥७५॥
अघटित घटना हे मांडिली या विधीनें.
कठिण हृदय केलें कां कृपेच्या निधीनें ? ।
झडकरि जरि माझा येकदां जीव जाता
निजकुलपुरुषार्थी बंधु निश्चित होता. ॥७६॥
कनक, रजत वेंचें नित्य खंडीच खंडी,
परि मन जननींचें पातकी हा विखंडी. ।
न पुसत परभारीं चालवी राजकार्यें,
नरपतिपरिपाटी टाकिली या अनार्यें. ॥७७॥
परम अधम रुक्मी हा महा तोंडखोडी,
नियतच वडिलांच्या जी विचारास मोडी. ।
विकत कळि जयानें घेतली आजि मोलें.
अनुदिन बहुला, गे, बाप याच्याच बोलें. ॥७८॥
श्रुतिनिवह जयाला बोलती ‘ नेति नेति ’
निजहृदयनिकेतीं नित्य योगींद्र नेती, ।
निशिदिन शितिकंठा हा जयाचाच धंदा,
घडि घडि बहु त्याची हे घरीं होय निंदा. ॥७९॥
निजहित समजेना, लिप्त हा होय दोषें.
तरुन कितिक गेले पातकी नामघोषें. ।
निजपदभजकांची हेलना ह्य जेथें,
त्वरित बहुत धांवे द्वारकानाथ तेथें. ॥८०॥
सकरुण भगवंता, जाशि तूं आज कोठें ?
तुजविण पडलें हें जाण संकष्ट मोठें. ।
मजच वर न माने लग्न वांयां बधावें,
झडकरि बहु माझ्या धांवण्या आजि धांवें. ॥८१॥
विविधविषयतृष्णादुर्निवारप्रवाहीं
पडति जन, तयांला नाठवे आजि कांहीं. ।
निजगुणसमुदायें यांस वोढून काढीं,
झडकरि अथवा ये नाम नौकेस धाडीं. ॥८२॥
सहज घडुन आलें ये विदेशीं रहाणें.
तुजविण उगवी हे कोण माझीं रहाणें ? ।
त्वरित बहुत आतां येकदां भेटि द्यावी,
उचलुन अथवा हे आपुली दासि न्यावी. ॥८३॥
स्मरण तुज, मुकुंदा, कां नव्हे आजि माझें ?
तुजविण मज माझा देह हा होय ओझें. ।
झडकीर अथवा हा नेशिना जीव देवा !
रवितनयलुलायारूढ देखेन केव्हां ? ॥८४॥
कृपादृष्टीं पाहें, मज कवण आहे यदुपती ?
मला या दुष्टांचीं तिखट वचनें नित्य खुपती. ।
सुखें या प्राणेशीं नियतच पडो आजि विघडो,
भवन्निंदालेशश्रवण परि हें येक न घडो. ॥८५॥
महादैत्यश्रेणी अनुदिन असंख्यात वधिशी.
प्रसंगीं ये कैसें अतिशयित ताटस्थ धरिशी ? ।
जया सिंहा मत्तद्विरदकरटस्फोटन घडे,
तयाला जंबूकापसददमनीं संकत पडे ! ॥८६॥
गजेंद्रासाठीं तूं झडकरि कशी टाकिशि उडी ?
परामर्शा येशी द्रुपदतनयेच्या घडिघडी. ।
ध्रुवप्रल्हादादी प्रियतम महा होति तुजला;
तयांपेक्षां कैसें निपट धरिशी दूर मजला ? ॥८७॥
अनेकां जन्मांचा परिचय जयासीं बहु असे,
तया तूझें, कृष्णा, कठिण मन सर्वांहुन दिसे. ।
जगज्जीवा, किंवा दुरितचय माझा बहुतसा
अकारुण्यें तूझ्या परिणत असा होय सहसा. ॥८८॥
सुराराध्या देवी मजवरि उदासीन सकला
कशी जाली ? मी तों निपटच पडें आजि विकला. ।
सहाकारी माझा यदुपति पहा आजिच अडे,
कसा येकायेकीं मजवरि महापर्वत पडे ! ॥८९॥
अवो बाळे, वाळे जडित तुज वाहेन बरवे.
तिहीं लोकीं तूझें अतिशयित सामर्थ्य मिरवे. ।
मला तूं ये वेळे त्वरित जरि पावेसि जननी,
मनोभावें तूझें अनिश यश गाईन वदनीं. ॥९०॥
यथाकाळीं, काली, करिन भवदाराधन बरें;
महाकल्पांतींही उपकृति तुझी हे न विसरें. ।
महेशे, कृष्णाचें त्वरित बहु आकर्षण करीं;
करीं, माते, आतां झडकरि मला येऊनि धरीं. ॥९१॥
अनाथांचे नाथे, सुमुखि, विमुखी होसि मजशीं.
अवस्था माझी हे समजशि; वदों काय तुजशीं ? ।
प्रपंचीं ये होता बहुत मज तूझा भरंवसा;
जगन्माते, कैशी न पवसिच अद्यापि नवसा ? ॥९२॥
मला, माते, तूझा कवण महदन्याय घडला ?
तुला जेणें माजा विसर, गिरिजे, आजि पडला. ।
करावा बंधूचा त्वरित वदनस्तंभ बगले
तुझें कांहीं केल्या, जननि, मन अद्यापि नुगले. ॥९३॥
अडे बंधुश्रेणी, सकल सचिवां मोहन पडे,
धुडावे दुर्वृत्त, प्रबळ, शिशुपाला ज्वर जडे, ।
प्रभावें हें तूझ्या, जननि, जरि अद्यापिहि घडे,
महाविद्ये, वंद्ये, तरिच घडलें कार्य विघडे. ॥९४॥
वसति करिशि, माते, नित्य मातंकवाटीं,
परि भजक तुझा हा मत्त मातंक वांटी. ।
अमृतमय कृपेची दृष्टि हे पावलीसे
तइऍंहुन सुरवाडें सिद्ध फोंफावलीसे. ॥९५॥
त्वरित तूं, त्वरिते, जरि पावशी, । तरिच दैवतशी मज भावशी. ॥
विनवितें तुळजापुरवासिनी, । अभयदायिनि, शंभुसुवासिनी. ॥९६॥
वचन आइक, कर्णपिशाचिके, । अतिनिगूढपराशयसूचिके. ॥
तुजच सांप्रत हे यक मागणें । मदभिलाष हरीप्रति सांगणें ॥९७॥
फिरसि लोक तिन्ही वरयक्षिणी, । परम सावध हो हरिरक्षणी. ॥
झडपिशी दमघोषसुता जयीं । पुरति सर्व मनोरथ हे तयीं. ॥९८॥
वदत वदत ऐसें सांज होयास आली,
दिनकरकरलक्ष्मी सर्व संक्षीण झाली. ।
मुखकमल तयेचें म्लान अत्यंत देखे,
म्हणवुनि कमलांचा बंधु बांधव्य राखे. ॥९९॥
सहज दिनमणी हा अस्त होतांच, एकी
प्रियतमविरहानें कंदती चक्रबाकी. ।
विभिविहितनियोगें वारूणी आदरीली,
म्हणुनि चरम संध्या काय आरक्त झाली ? ॥१००॥
तदुपरि उगवे हा चंद्रमा पौर्णिमेचा,
अनभिलषित अर्थी होय ये उत्तमेचा; ।
द्विजपति विसरेना सर्वथा स्वीय दीक्षा,
कर पसरुन मागे वक्रलावण्यभीक्षा. ॥१०१॥
हिमकरकर जैसे कांतिपूर स्रवेती,
हळुच तसतसे ते चंद्रकांत द्रवेती. ।
क्षुधिततर चकोरां पारणें थोर जालें,
मुकुलित कुमुदांला जन्मसाफल्य आलें. ॥१०२॥
विलसित अवघें हें भीमकीला न सोसे.
अविरत मग टाकी निःसहांगी उसासे. ।
क्षणभरि सखियेचा हात घेऊन हातीं
ससलिल बहु केलीं बोलतां नेत्रपातीं. ॥१०३॥
अमृतमय शरीरी, बोलती लोक सारे,
तदपि, कुमुदबंधू, वर्तसी तूं कसा, रे, ? ।
सहज विमल तूं तों बाल रत्नाकराचें
असुनि, धरिसि कैसें नाम दोषाकराचें ? ॥१०४॥
असेस चंद्रा गुरुदारगामी । प्राणास झालेंच उदार, गा, मी. ॥
या पातकें होउन राजयक्ष्मी । गमाविली तां द्विजराजलक्ष्मी. ॥१०५॥
जिवलग सखये, तूं होसि सर्वां अपेक्षा;
तदपि करिसि कैशी आजि माझी उपेक्षा ? ।
कळत कळत तां हीं हातिंचें सोडिजेतें,
नियतच तरि काळें या मला वोढिजेतें. ॥१०६॥
तुहिनकर नव्हे, हें बीज चिंतालतेचें;
विकसित अथवा हें पुष्प उद्वेगतेचें, ।
अभिनव मदनाचें छत्र किंवा उभारे,
युअतिजन जयाच्या दर्शनेंमात्र भारे. ॥१०७॥
नभ धवलित केलें, विश्व आनंदवीलें,
परि विरहिजनाचें चित्त उन्मादवीलें. ।
क्षणभरि मज, बाई, याकडे पाहवेना,
प्रलयदहजकल्पस्पर्श हा साहवेना. ॥१०८॥
मज निज नलगे, हे वैरिणी शेज झाली,
तगमग सुटलीसे, राति मध्यास आली; ।
क्षणभरि सपनींही कृष्ण दृष्टी पडेना,
नयनसलिलयोगें चित्रिंचा सांपडेना. ॥१०९॥
अवसर समजेना, सारिका फार बोले.
शुकवचनविलासें चित्त अत्यंत सोले. ।
अझुणिहि न वचे हा चंद्र अस्ताचलासी,
यदुपतिविरहाची बैसवीली कळाशी. ॥११०॥
चंद्र सोदर सये गरलाचा, । भाव काय समजे दुरळाचा ? ॥
ये शशांक मदनास सहाया, । मी अशक्य परि यास सहाया. ॥१११॥
दुःख दारुण सये विषयाचें । नित्य नूतन चढे विष याचें. ॥
लग्न निश्चित असे परवांचें, । मी कशी परि अतःपर वांचें ? ॥११२॥
बंधु देइन म्हणे शिशुपाला; । कां कृपा तुज नयेच कृपाला ? ॥
दीनवत्सल, दयानिधि, ऐशीं । बीरुदें हरि गमाविशि कैशीं ? ॥११३॥
सांवळ्या, सगुण, नंदकुमारा । राजसा, त्वरित ये सुकुमारा. ॥
मन्मथें झडपिलें मन माझें, । झाडणी करिल पाउल तूझें. ॥११४॥
जन्म घेशि हरि यादववंशीं, । देवही उतरती निजअंशीं. ॥
अंगनेस मज येव करावें; । हें जगांत बहु नांव करावें. ॥११५॥
पाव तूं त्वरित, नंदकिशोरा, । राधिकावदनचंद्रचकोरा. ॥
रातलें मन तुझे पदपद्मीं, । नित्य वीट उपजे निजसद्मीं. ॥११६॥
नंदगोपतनया, अनयारे, । या कसा विसरसी विनया, रे ? ॥
व्यापिले मज, मनोहरवेषा, । देवकीसुकृतसारविशेषा. ॥११७॥
अंतरीं सुख तुझें बहु दाटे, । हें वृथा सकल वैभव वाटे. ॥
एक वेळ मज सन्मुख यावें, । श्रीहरीं चरणदर्शन द्यावें, ॥११८॥
गोपिकांसि, हरि, दर्शन देसी, । भावपूर्वक अपूर्व वदेसी. ॥
घाणती घुरट ज्या कुलटा, रे, । पंथ हा, हरि, तुझा उलटा, रे. ॥११९॥
द्वारकानगरनीरजनेत्रा, । काय होति मजहून पवित्रा ? ॥
सुंदरा तरि, हरी, अथवा, रे । हा विवेक अवघाच निवारे. ॥१२०॥
श्यामसुंदर सखा वनमाळी । आणीं सत्वर, सये, गुणशाली. ॥
चाळितां सकल विश्वविसावा । आठवे पुरुष पंचविसावा. ॥१२१॥
होय जें प्रकट गोवळवंशीं, । वाजवी मदनमोहन वंशी, ॥
वागवी निज सिदोरिस अंसीं, । ब्रह्म तें, सखि, सनातन गंसीं. ॥१२२॥
नीलनीरजदलद्युति भासे, । देवढें चरण नित्य उभासे. ॥
आणि त्यास, सखि, लागुन पायां, । जाय हें वयमोलिक वांया. ॥१२३॥
हा मनोगज अनावर मातें; । नांवरे मज, चराचरमाते, ॥
सिंहवाहिनि, शिवे, जगदंबे, । रक्षिं तूं, प्रणयभक्तकदंबे. ॥१२४॥
हे राति आली अति अंधकारी, । तूं रक्षि येथें मज, अंधकारि. ॥
वृषध्वजा, विश्वपते, पुरारे, । केला नसे मन्मथ तां पुरा, रे. ” ॥१२५॥
वाक्यें इच्या दुःखित फार झाली; । सखी तिशीं स्पष्ट वदों निघाली. ॥
करद्वयें ते उठवी तयेला, । जीणें असे उत्कट शोक केला. ॥१२६॥
“ मी काय नेणें, सखि, मन्मथातें ? । आयकितां या श्रमशी कथांतें. ॥
हे वेदना काय तुलाच व्हावीं, । लोकत्रया सन्मथ आगि लागी. ॥१२७॥
पतिव्रता गौतमधर्मपत्नी । ते वंचवेली परम प्रयत्नीं; ॥
ज्याच्या प्रसादें द्विजराज रोगी, । ज्याच्या भयें होय कुमार जोगी. ॥१२८॥
हें घेतलेंसे व्रत सौनिकाचें, । नसे जयाला भय लौकिकाचें. ॥
जो बायकांचा अति घात केला, । त्याचा तसा प्रत्यय यास आला. ॥१२९॥
निदान तूं जे सकला सुखाची, । ते वल्लरी होशि महाविखाची; ॥
अशी निरुद्योग कशी बसेसी ? । पडेसि यत्नेविण तूं भसेंसी ? ॥१३०॥
लज्जा तुझी हे परती सरेना, । पंचेषु तो हा तु वीसरेना. ॥
डसे तुला कृष्णभुजंग, बाई. । उपाय येथें करिजेल काई ? ॥१३१॥
क्षणेक आतां तकवा धरावा, । स्वपत्रिकालेख तथा करावा. ॥
मदीय शिक्षापन तूज तैसें, । नटापुढें नर्तन होय जैसें. ” ॥१३२॥
हें आयके वचन कुंडिननाथ पुत्री.
ते काय होय विदुषी मग दीर्घसूत्री ? ।
जे आणवी त्वरित रत्नजडीत दौती;
ते लेखणी, रुचिर कागद घेय हातीं. ॥१३३॥
बाला, भीमकसार्वभौमदुहिता, जे गांजिली सोदरें,
पूर्वीं पूर्वक पत्रलेखरचना केली तिणें आदरें. ।
स्वीयोदंतनिवेदनोक्तिपटनी, अत्यंत अध्यापिली
श्रीकृष्णानयनार्थ हे निजमखी किंवा असे योजिली. ॥१३४॥
कथा हे कृष्नाची सकल जगदानंदजननीं,
मनोभावें ईचें श्रवण करिजे नित्य सुजनीं. ।
प्रसंगीं श्रोत्यांचे सकलहि महादोष हस्ती;
यदूत्तंसप्रेमें विषयरसगोडी विसरती. ॥१३५॥
इति श्रीमद्भगवद्गक्तप्रदानुर्क्तकविसमरजेविरचिते रुक्मिणीहरणाकाव्ये पत्रिकालेखो नाम तृतीयः सर्गः ॥