रुक्मी पित्यासन्मुख नीट बैसे, । निघेत वक्रांतुन शब्द तैसे ॥
स्फुल्लिंग जे केवळ पावकाचें । उठेति किंवा गण सायकांचे. ॥१॥
“ लग्नप्रसंगीं, जगदेकपाळा, । हें वोड ये काय यिच्या कपाळा ? ॥
देवी स्वदेशांतुन आजि जाते, । किंवा पुढें दर्शनही न देते ? ॥२॥
या ब्राह्मणां आणिक काय धंदा ? । म्हणेत हो या दमडीस वंदा. ॥
वाढे तपस्या बहु फार यांची, । हातांकडे केवळ दृष्टि ज्यांची. ॥३॥
हे आमचे वेद समस्त वेडे । पदोपदीं लाविती कर्म चेडें. ॥
हे धर्मशास्त्रें अवघींच बाटें । परस्परें घेति महा हिलाटें. ॥४॥
देवी कशाची ? कुळधर्म कैंचा ? । विचार आधीं पडला जिवाचा. ॥
येकीकडे वृद्ध उभा रहाशी, । माझा जिवाचा बळि आजि देशी. ॥५॥
हा कृष्ण काळा अति कूडमंत्री । आसक्त जाली नरवीरपुत्री. ॥
बोला फुला गांठि पडेल जेव्हां, । तूं काय तेथें करिसील तेव्हां ? ॥६॥
जळामध्यें लोटुनि कां न द्यावी ? । हुताशनीं आहुति वा करावी. ॥
ज्परंतु बाहेर न पाठवावी, । हे गोष्टि माझी यक आयकावी. ॥७॥
बोलाविल्यावांचुन येय पाहे, । कसा बकध्यान धरून राहे; ॥
कदापि यांचें मत हें कळेना; । अंबालयापासुनि हा ढळेना. ॥८॥
व्याघ्रापुढें आपण गाय जाते, । ते मागुती काय फिरोन येते ? ॥
जे सांपडे व्याधकरीं कुरंगी, । मिळे कशी ते निजयूथसंगीं ? ॥९॥
कदापि हे होरडि हो न घ्यावी ? । मागें पुढें दृष्टि बहूत द्यावी. ॥
तूं नेदिसी जीव मला फुकाचा । कळेल आतां परिपाक याचा. ॥१०॥
पूर्वीं मसीं बोलून काय जासी । कृष्णाकडे सांप्रत डोल देसी ? ॥
निर्वाह तूझ्या वचनास नाहीं; । या स्त्रीजिता नित्य विटाळ पाहीं. ॥११॥
स्त्रीबुद्धियोगें मजसी पडेना, । आरंभिलें कार्य सिरां चढेना. ॥
स्त्रीबुद्धि हे नित्य अनर्थकारी, । गवाविसी कां उगलीच क्कारी ? ॥१२॥
हा आजि तूझे नगरीं न राहो, । आला असे केवळ तूज राहो. ॥
कशास हा दाड तुह्मांस व्हावा ? । संमार्जनींचा गुण हा पहावा. ॥१३॥
खिरीमधें हा नसता सराटा, । हा पांडवांचे घरिंचा घराटा. ॥
संपत्ति हे झाडुन सर्व नेली, । त्या पांडवांला भिक लावियेली. ” ॥१४॥
वाचाट हा चात वदोन राहे; । औद्धत्य राजा सहसा न साहे. ॥
सानंद निंदा करिजे पित्याची, । होईल येणें गति काय त्याची ? ॥१५॥
राजा म्हणे “ निंदिसि आदिदेवा । जळो तुझी पातकरूप जिव्हा. ।
उगाच तूं जासिल नित्य गर्वें, । कर्में तुझीं हे विपरीत सर्वें ॥१६॥
तूं काढिसी या नसत्या कुसृष्टी, । हा कोण पाहेहि सवक्र दृष्टीं ? ॥
घालीन पृथ्वीतळ पालथें मी । जाणेस कैसें मज आजि, रुक्मी ? ॥१७॥
विकत्थना कां करिसील गेहीं ? । न आडले हा पुरुषार्थ देहीं. ॥
तूं व्यर्थ माझ्या उदरास येसी, । वीरामधें क्लीब म्हणोन घेसी ! ॥१८॥
असेस तूं तो पितृमातृहंता, । अद्यापि तूझी न जळे अहंता. ॥
दाऊं नको तोंड कदापि आतां, । लज्जा न वाटे मज जाब देतां ? ॥१९॥
तूं देवतादर्शनविघ्नकारी । होसी कसा पैत्र्यपदाधिकारी ? ॥
ये पुत्रहत्येस कदा न भीतों, । राज्ञीकडे केवळ, रे, पहातों ” ॥२०॥
वैदर्भ निर्भर्त्सुन बोलियेला, । तों अंतरीं पुत्र जळोन गेला; ॥
निघे मुखाबाहिर काय वाणी. । जो विंधिला केवळ शब्दबाणीं ? ॥२१॥
उठोन तो जाय, पडे विचारीं, । पाचारिले स्वीय मतानुसारी. ॥
मुख्यप्रधानाप्रति काय बोलेः । “ हे आप्तही लोक अनाप्त जाले. ॥२२॥
बलिष्ठ हे प्राक्तनकर्मरेखा; । आरंभिलें हे विपरीत देखा. ॥
हे गोवळी कोठुन आजि आले ? । येकायकीं चक्र फिरोन गेलें ! ॥२३॥
घरामधें हा गृहभेद जाला, । प्रयत्न हा वाहत सर्व गेला. ॥
जेथें घरांतूनच आगि लागे । कोणापसीं जाउन कोण सांगे ? ॥२४॥
दावा मसीं साधिति मायबापें, । कृष्णाकडे वोढति पापरूपें. ॥
हा पोटिंचा पुत्रहि दूर जाला । असा पहा कळिधर्म आला ! ॥२५॥
कृशोदरी, सुंदर, सोदरी ते । जे सांवळा गोवळ आदरीते, ॥
सुलोचना कांचन वेदि मध्या । नव्हेल कैसी मज आजि वध्या ? ॥२६॥
अद्यापिही येक उपाय आहे, । मलाच जो हा समजोन राहे; ॥
सोडून हें कार्य कदा न दीजे, । प्रयत्न हा आमरणांत कीजे. ॥२७॥
दैवें पुराबाहिर गोप राहे; । पुरामधें हा शिशुपाळ आहे. ॥
आतां कपाटें अवधींच देऊं, । बळें तिला आणुन लग्न लाऊं. ॥२८॥
हे गोष्टि चित्तावरिती धरावी, । परस्परें फूटि पडों न द्यावी. ॥
हा आडवा येईल कोण पाहो, । युद्धासही नीट उभेच राहो. ॥२९॥
सहाय हा मागध आजि आहे, । आह्माकडे यावरि कोण पाहे ? ॥
जो नित्य खासा तरवार मारी, । तयापुढें काय टिके मुरारी ? ” ॥३०॥
विचार एवंविध काढियेला, । सर्वांसही सम्मत तोच जाला. ॥
करून तेव्हां घरिंच्या अरासी, । ते मूळ जाती अवघे वरासी. ॥३१॥
विचार हा सांगति चार तेथें, । राजा बसे राजसभेस जेथें. ॥
विषाद निःसीम नृपास आला, । सेनापतीसी मग बोलियेला; ॥३२॥
“ सेना सवें हे अवघीच घ्यावी, । अंबालया रुक्मिणि शीघ्र न्यावी. ॥
सेनेमधें सावधरूप राहें, । ईला घरांतीलच शत्रु आहे, ॥३३॥
आज्ञा तयानें बहु वंदियेली, । समग्र सेना मग सिद्ध केली. ॥
चहूंकडे दुंदुभिघोष गाजे, । सेनासमूहें दरबार साजे. ॥३४॥
स्वधर्म भूमीपति हा न सोडी, । तो आपली हे करि हो न मोडी. ॥
दोघांमधें ताळ पडोन गेलें, । ये भीमकीचें परिकार्य जालें. ॥३५॥
राजांगना वात पहात होती, । फिरोन आली तंव तेच दूती. ॥
वृत्तांत जो तेथिल देखियेला, । तो यीजपाशींच निवेदियेला. ॥३६॥
न माय हर्षें, मग माय कोठें । तीच्या सख्यांचें उठऊन जोठें, ॥
येऊन तीच्या श्रवणास लागे, । हळूच बीजाक्षर मंत्र सांगे. ॥३७॥
निजानंदें बाळा थबथबित निःसीम निथळे;
असे जाला तो तों अनुभव तिचा तीसच कळे ।
त्रपेनें मातेसी प्रतिवचन किंचिन्न वदली
स्ववस्त्रप्रांतीं हे त्वरित शकुनग्रंथि दिधली. ॥३८॥
तत्काळ ते राजस सिद्ध जाली, । सुवर्ण वृंदावन सव्य घाली. ॥
सुदेवपत्नीयुत पूजियेला, । प्रणाम मातापितरांस केला. ॥३९॥
दूर्वामयी मंगलपुष्पमाळा, । जे आणवी संवरणार्थ बाळा; ॥
कराबुजीं ते अतिगुप्त घेते, । आगुल्फ माता तिस बुंथि देते. ॥४०॥
स्मरोन विघ्नेश्वरमूर्ति तेथें, । सवत्स गोदान करून हातें, ॥
पायींच विश्वेश्वरि चालियेली, । दौवारिकीं दाटणि वारियेली. ॥४१॥
जांबूनदच्छर शिरीं विराजे, । मुक्ताफळस्तोम जयास साजे. ॥
दोहींकडे चामरधारिणीचा । संचार मध्यें गजगामिनीचा. ॥४२॥
सभोंवतीं वत्सल माय भोंवे, । सवें सख्यांचा परिवार धांवे. ॥
चालेति दासीगण हे दुरस्ता, । होती पुढें वेत्रधरा समस्ता. ॥४३॥
करें सखीचा कर घेय कारी, । समागमें सात सहस्र नारी. ॥
डाबीत डाबेसम हा हत्यारें, । करीत सर्वांहुन युद्ध न्यारें. ॥४४॥
अंतःपुराबाहिर शीघ्र आली, । सिकेत जीच्या कळहंस चाली. ॥
तथापि हे चंचळ दृष्टि पाहे, । अत्यंत दोलाचलवृत्ति आहे. ॥४५॥
तों हा गृहासन्निध चैद्य आला, । होणार आहे मधुपर्क ज्याला, ॥
वार्ता जसी ये मग आयकीली, । तत्काळ बाळा उतरोन गेली. ॥४६॥
हा घाबिरा राजकुमार जाला, । कपाट बंधा विसरोन गेला. ॥
सहाय जेथें भगवंत आहे, । तेथें कदां विघ्न शिरो न लाहे. ॥४७॥
सहस्त्र हस्तीं हरि रक्षिता हा, । तयेकडे कोण अवेक्षिता हा ? ॥
नाकां चुना लाउन जात आहे, । ज्याचें कुडें त्याजपुढेंच राहे. ॥४८॥
त्या पाठिसी चालती राजदारा, । कदापि ज्यांला न लगेच वारा. ॥
अधिष्ठिती सुंदरि पालख्यांला, । न देति वागों जन पारख्यांला ॥४९॥
मधें मधें चालति राजदारा, । कदापि ज्यांला न लगेच वारा. ॥
अधिष्ठिती सुंदरि पालख्यांला । न देति वागों जन पारख्यांला. ॥५०॥
जे लोक खासे जवळील भारी, । आरूढ ते ज्यांवरि शस्त्रधारी. ॥
सभोंवते चालति ते शिपायी, । हे जाललीसे सुकुमार पायीं. ॥५१॥
त्याभोंवता सज्ज पदातिफेरा । त्या भोंवता स्वारसमूहघेरा. ॥
त्याभोंवते हे रथ थाट चाले, । त्याभोंवते मत्त गजेंद्र काळे. ॥५२॥
त्याभोंवतीं केवळ वन्हियंत्रें, । चालेत ज्यांची शकटें स्वतंत्रें. ॥
बसेत साहाकट दाट, पाहीं, । पिपीलिकेला परि मार्ग नाहीं. ॥५३॥
अपार सेनार्णव चालिलासे, । सेनाभरें शेषहि हालिलासे. ॥
महापुरद्वारहि टाकियेलें, । तत्काळ अंबालय पावियेलें. ॥५४॥
मुकुंद पादांबुज ध्यानशीला, । राहे उभी बाहिर गूढलीला. ॥
जे पाणिपादांबुजयुग्म धूते, । गंगोदकें आचमनार्थ घेते. ॥५५॥
देवालयीं दाटणि देखियेली, । ते वारिजे सत्वर सौविदल्ली ॥
प्रवेशली त्यावरि राजपुत्री, । प्रफुल्लपंकेरुहपत्रनेत्री. ॥५६॥
ठेवी तयाचे चरणाब्ज माथां, । आधार जे केवळ या अनाथां, ॥
अपारसंपद्रचना विधात्री, । कटाक्षमात्रें करि मोक्षदात्री. ॥५७॥
माता तिच्या तीजसमीप आल्या, । प्रणाम देवीस करूं निघाल्या. ॥
सुवासिनी दाटति त्या अपारा । करीत दासी बहु वेरझारा ॥५८॥
अगस्तिपत्नी आणि अत्रिपत्नी, । पतिव्रता मुद्गलधर्मपत्नी. ॥
अरुंधती स्त्रीजनवृंदवृद्धा, । पतिव्रतांमाजि अतिप्रबुद्धा. ॥५९॥
पतिव्रतामंडन गौतमाची । जाया अहिल्या मुनिसत्तमाची, ॥
मिळोन इत्यादिक सर्व आल्या, । यथोचित स्वागत बैसवील्या. ॥६०॥
गंधर्वविद्याधरबायकांचे । येती थवे गुह्यकगायकांचे ॥
वाजेत ते ताळ, मृदंग, भेरी, । देवीपुढें नाचति वारनारी. ॥६१॥
शुभासनीं रुक्मिणि बैसलीसे । जे पतिपीतांबर नेसलीसे. ॥
सख्या उभ्या राहति पृष्टभागीं, । कुरंगनेत्रा, कुशला, कृशांगी. ॥६२॥
संभार देवीपदपूजनाचे । आणीत अध्यक्ष वधूजनाचे. ॥
आरंभिजे अर्चन अंबिकेचें; । सौभाग्य मोठें नृप कन्यकेचें. ॥६३॥
सुदेवपत्नी मग बाहवीली, । सर्वांपुढें आणुन बैसवीली; ॥
साडी जरी हे परिधान केली, । सुवर्ण जे हें मण येक ल्याली. ॥६४॥
करीत सत्कार समस्त नारी, । सस्मेर, सापत्रप होय क्कारी. ॥
जाली जिच्या राजगृहीं प्रतिष्ठा, । न होय अन्यत्र कसी वरिष्ठा ? ॥६५॥
देवालय स्त्रीमय सर्व जालें, । स्त्री राज्य एकत्रच बा मिळालें. ॥
पुन्नाम कोठें श्रवणीं पडेना, । कोण्हीकडे मानस वावडेना. ॥६६॥
द्विजांगना पूजन तीस सांगे, । ते अर्चनीं श्रीप्रति मान भागे. ॥
जें जें तिणें आपण मागिजेती, । तें तें सख्याही उपचार देती. ॥६७॥
पदांबुज ध्यान मनांत केलें, । सुवर्ण सिंहासन अर्पियेलें. ॥
सुगंधि पायावरि पाद्य घाली, । अनर्घ्य अर्घ्योदक सिद्धि जाली. ॥६८॥
समर्पिलीं आचमनीय तोयें, । संपादिलीं जे गुरुसंप्रदायें. ॥
मळापकर्षस्नपनीय वारी । निवेदिते त्यावरि राजक्कारी. ॥६९॥
पंचामृतस्नानविधान जालें, । पृथक् पृथक् पूजन त्यास केलें. ॥
विशेष संक्षाळण होय जेव्हां, । परस्परें बिंबुन जाति तेव्हां. ॥७०॥
प्रवाळपीठावरि बैसवीली, । सुगंध तैलें मग माखियेली, ॥
काश्मीरकस्तूरि समान भागे, । उद्वर्तिजे तत्तनु भक्ति योगें. ॥७१॥
सुवर्ण गंगालय आणवींलें, । सुगंधि ऊष्णोदक सारियेलें. ॥
करांगुलीच्या अवकाश मार्गें । त्या तोयधारा पडती निसर्गें. ॥७२॥
अपार येती घट कांचनाचे । जे शुद्ध शीतोदक सेचनाचे. ॥
विधियुक्त तेणें अभिषेक केला, । तत्प्रोच्छनीं हा उपयुक्त सेला. ॥७३॥
तदुपरि तिस अर्पी पीत चंडातकातें,
परम रुचिविशेषें लाजवी हाटकातें. ।
भरजर अवघी हे शाठिका नेसवीली.
धरून करसरोजीं आसनीं बैसवीली. ॥७४॥
झळकति सज जेथें गोठ हे सोनियांचे;
विलसति जंव जाणे हे तसे मोतियांचे. ।
हरित तिस असी हे कुंचकी लेववीली.
मणिखचित नगांची पेटिका आणवीली. ॥७५॥
उघडुन मग काढी जे अळंकार यत्नें,
बसति बहुत जेथें हे अमोलीक रत्नें. ।
तदुपरि तिस अर्पी ते यथास्थानदेशीं
पदयुग जननीचें आदरीजे जिवेंसी. ॥७६॥
सौभाग्यसंसूचक रूपमुद्रा । अर्पीतसे कुंकुम हे हरिद्रा. ॥
घेऊनियां रुक्ममयी शलाका, । नेत्रांबुजीं अंजनलेशलेखा. ॥७७॥
कस्तूरिका, चंदन, सारचोवा, । काश्मीरकर्पूर, बुका वहावा. ॥
सुगंधि नानाविध पुष्पजाती । त्यानंतरें तीस समर्पिजेती. ॥७८॥
तत्काळ काळागरु धूप दावी. । प्रसन्न एकार्तिक दीप लावी. ॥
नैवेद्य विस्तारुन रत्नताटीं । निवेदिला उत्तम तीजसाठीं. ॥७९॥
फळार्पणानंतर अर्पणीये । समर्पिलीं शीत, सुगंधि तोयें. ॥
कर्पूरकंकोळलवंगयेळा - । संमिश्र तांबूल निवेदियेला. ॥८०॥
आदर्श हा रत्नजडीत दावी । पतद्ग्रही तीज समीप ठेवी. ॥
क्षणेक संवीजन ताळवृंते, । तत्पादसंवाहन होय हातें. ॥८१॥
सुवर्णकोटिद्वय दक्षिणा हे । वाहोन, भागें परतोन पाहे. ॥
सख्या तिच्या सर्वहि इंगितज्ञा, । संकेतमात्रें करिताति आज्ञा. ॥८२॥
आंदोलिका उत्तम वाहियेली । मुक्ताफळीं केवळ गुंफियेली. ॥
सुवर्णपर्याणित अश्व चारी, । सपर्पिजेती गजराज भारी. ॥८३॥
सचामरच्छत्र, सुवर्णपादुका, । सुवर्णपर्यंक, सुवर्णदीपिका ॥
मृदूपधानान्वित हंसतूळिका, । समर्पिल्या ज्या उपयुक्त दासिका. ॥८४॥
कर्पूर, नीरांजन होय जेव्हां, । सहस्रघंटाध्वनि होति तेव्हां ॥
सुवर्णपुष्पांजळी वाहियेला. । प्रणाम साष्टांग तयेस केला. ॥८५॥
प्रदक्षिणा तीस करून आली; । पुढें उभी सन्सुख राहियेली. ॥
पुनःप्रणामांजळी जोडियेला. । संपूर्ण पूजाविधि अर्पियेला. ॥८६॥
अहो, लोपामुद्राप्रभृति अनसूयावधि सती
जयेच्या लक्षांशेंकरुन तुळने येत नसती, ।
अशी हे जे बाळा मुनिवरमहामुद्गलवधू
वदे ते अंबेसी घवघवित जीचा मुखविधू ॥८७॥
“ अपर्णे शर्वाणि, त्रिनयनगृहस्वामिनि, उमे,
कृपापांगें तूझ्या प्रणतजनचिंतानळ शमे. ।
मृदुस्वांते, शांते, जननि जगदंबे, भगवती,
करावें तां ऐसें शुभ अशुभ कर्में जुगवती. ” ॥८८॥
नृपाची हे कन्या पदयुग नमस्कारित असे.
मनीं हा आनर्ताधिप हरि इचे येउनि बसे. ।
भवानी, हा अस्मद्विधहृदयसंदेह नुरवीं
जगन्माते आतां झडकरिं इचा हेतु पुरवीं ॥८९॥
विनंतीनें जाली किमपि जगदंबा स्मितमुखी,
स्मितज्योत्स्नाजाळें निजनिलय जीचें लखलखी. ।
ऋषीचे पत्नीला नियत तदभिप्राय कळला.
म्हणे, “ बाळे, तूझा सकळ मनिंचा हेतु फळला. ” ॥९०॥
भवानीचे कंठींहुन बकुलमाळा उचलिली.
इचे कंठीं घाली अतिमृदुळ जे हे मिरवली. ।
बहाती तन्माता त्वरित जंव घेऊन अभिधा,
जनुज्ञा अंबेची झडकरि निघे घेउनि तदा. ॥९१॥
पुरोभागीं जो हा अतितत सभामंडप असे,
अहो, बाळा तेथें हळुच मग हे येउनि बसे. ।
चिरंटीचा नानाविधनिवह तेथें घनवटे.
कुमारींचाअ कोळाहळ बहळ तैसा मग उठे. ॥९२॥
सुवासिनी सन्निध आणवील्या; । पदांबुजें क्षाळुन बैसवील्या. ॥
वेण्या तयांच्या सज घालवील्या; । साड्या सकूर्पासक अर्पियेल्या. ॥९३॥
स्वयेंच ते देत असे हरिद्रा. । उद्वर्तिती त्या निज वक्त्रचंद्रा. ॥
ते कुंकुमे उत्तम लाववीलीं. । हे पाउलें सुंदर राववीलीं. ॥९४॥
त्या कंठसूत्रांत अनेक भूषा । समर्पिते ते स्पृहणियवेषा. ॥
फळेक्षु तांबूल सुवर्णपूर्णें । शूर्पें करी सिद्ध सुवर्णवर्णें. ॥९५॥
समर्पिते जे मग लक्ष वाणें. । करीत नारी तिस अक्षवाणें. ॥
असीच तेही तिहिं पूजियेली. । वोटी तिची हे परिपूर्ण केली. ॥९६॥
माता समस्ता मग पूजियेल्या, । माथा पदीं ठेउनि वंदियेल्या. ॥
त्या तीस आशीर्वचनास देती. । म्हणेति, “ तूं होसिल पुत्रवंती. ” ॥९७॥
जाली पुढें सोदरमुख्यजाया । ईच्या मनांतील विषाद जाया. ॥
भाळीं तिचे कुकुंमबिंदु लावी. । म्हणे तिला, “ तूं अससी दुलावी. ” ॥९८॥
त्या देवकन्या आणि राजकन्या । पहावया कौतुक येति धन्या. ॥
त्या मेनकाआदिकरून मुख्य । करीत सेवा सुरवारमुख्या ॥९९॥
घालून मल्लीकुसुमें स्वकेशीं । तत्केशसंस्कार करी सुकेशी. ॥
धरून मौनव्रत मंजुघोषा । ते लेववीते तिजला विभूषा. ॥१००॥
तिलोत्तमा उत्तम पाय ऊटी. । अधोमुखी तीस न देय ऊटी. ॥
रंभा स्वदभांस धरूं न लाहे, । आदर्श घेऊन उभीच राहे. ॥१०१॥
उपासना सन्निध उर्वशीला, । असे जिला वासव हा वसीला. ॥
वरिष्ठ सर्वांहून हे घृताची । ते वाट पाहे वचनामृताची. ॥२॥
होऊन हा संभ्रम जाय जेव्हां । बाहेर कोलाहळ होय तेव्हां. ॥
तेणें तिचें व्याकुळ चित्त जालें; । संदेहसोपान चढों निघालें. ॥३॥
उठे त्यव्हां तेथुन ते शहाणी, । शिकेत जीच्या हरिणी पहाणी. ॥
पुसोन सर्वांस असे निघाली, । देवालयाबाहिर चालियेली. ॥४॥
तो घाबिरा होय भरोन धापे, । महाभयें ब्राह्मण फार कांपे. ॥
तो तांतडी धांवत वृद्ध आला. । म्हणे, “ मुली, काय विलंब केला. ॥५॥
प्रसंग जाणोन न वर्तसी, गे. । असार कर्मींच प्रवर्तसी, गे. ॥
टाकून गोविंदपदारविंदा । आरंभिला हा नसताच धंदा. ॥६॥
अद्यापि चित्तावरि गोष्टि घ्यावी, । माया तुवां सोडुनि सर्व द्यावी. ॥
हे लाविल्यानें लिगटोन येते; । हे सोडिल्या दूर सुटोन जाते. ॥७॥
जे आप्तवर्गें म्हणशील माझीं, । ते सर्वथाही नव्हतील तूझीं. ॥
आलीकडे हा जन सर्व राहे; । आत्मीय तो याहुनि भिन्न आहे ॥८॥
तूं गुंतसी, गोंविसी कां निसांसी ? । या अंतरंगा विसरोन जासी ॥
हे कोण आहे भवदीय दीक्षा ? । करी परब्रह्म तुझी प्रतीक्षा ॥९॥
स्वभाव तूझा बहु फार भोळा. । बाळे, विवेकांजन घालि डोळां. ॥
येथें उदासीनपणें रहातां । चढेल अद्वैत निधान हाता. ॥११०॥
पडेल पायांवरि दृष्टि जेव्हां, । कृतार्थ तूं होसिल जाण तेव्हां. ॥
भाग्यास तुझ्या तरि पार नाहीं, । फिटेल हे लोचन पारणाही. ॥११॥
हे क्रोध, लोभ, मद, मत्सर बोळवावे. । वाचेकरून भगवद्गुण बोलवावे. ॥
आशादिकां सहचरींस त्यजून, बाई, । तूं येकली त्वरित जाउनि लाग पायीं. ॥१२॥
आणीकही परम विस्मय थोर जाला । तो क्षत्रियाधम नरेंद्रगृहास आला. ॥
रुक्मी तयास मधुपर्क करीत आहे. । चाटीत तो दधि हताश तसाच राहे. ॥१३॥
पूर्वेकडील आणि दक्षिण पश्चिमेचे । राजे, कितेक अति उद्धत उत्तरेचे ॥
सन्नद्धशस्त्रबळवाहनयुक्त होती. । अंबालयाप्रति मिळोन समस्त येती ॥१४॥
ते आपले विविधभार रचीत राजे, । जे, भीमकी, तुज निमित्त पडेत लाजे. ॥
अत्याहित प्रकट उत्कट मांडियेले. । हें अंबिकानिलय येऊनि वेढियेलें. ॥१५॥
हा द्वारकारमण, कृष्ण सहाय जेथें, । कोणापसून उपजे भय तूज तेथें ? ॥
बाहेर तूं त्वरित येथुन जाय, बाई. । हे त्य पुढें नृपति केवळ जाण गाई. ॥१६॥
नरपतिसमुदायीं नेणसी श्रीपतीला. । त्वरित करुन जासी आपले व्युत्पतीला. ॥
सहज नृप समाजामाजि जो देखणा, गे; । तदपि तुज तयाच्या सांगतों या खुणा, गे. ॥१७॥
अभिनव वनमाळा शोभते नित्य कंठीं,
अविरळ कुरळांची मस्तकीं वीरगुंठी, ।
वदननिहित वंशी, देवढें ठाण ज्याचें,
दृढतर तुज लागो सर्वदा ध्यान त्याचें ॥१८॥
मुररिप्य वळखें जो कंद नीळ्या नभाचा,
उदय हृदयदेशीं होय कौस्तुभाचा, ।
परम विमळ जेथें वैजयंती विराजे,
त्वरित वरि तयातें, सर्व टाकूनि राजे. ॥१९॥
ध्वजस्तंभीं ज्याचे खगपति सदा राहत असे,
भुजद्वंद्वीं तैसें अविरत गदा, चक्र विलसे, ।
शिरीं पिच्छे वाहे, कटितटिस पीतांबर धरीं,
जसा हा लक्षावा यदुपति, जगन्नायक हरी. ॥१२०॥
न लक्षे योग्यांला अति तरळ ते लक्षिति कसें ?
करावेना बारी क्षणभरि मनीं चिंतन असें. ।
तयाची तूं सत्ता; तुजविण तया स्पंदन नसे;
तथापि प्रारब्धें सहज तुज हें ब्रह्म गंवसे. ” ॥२१॥
बोलोन हें वचन विप्र सुदेवनामा
“ स्वस्त्यस्तु ते ” म्हणुन जात असे स्वधामा. ।
तेथेंच राहति उभ्या नरनाथनारी
रक्षीत जाति तिजला बहु वेत्रधारी. ॥२२॥
माता म्हणे, “ नृपसुते, परतोन पाहें. ।
लोकांत हा विधि पुरातन, उक्त आहे. ॥
धाडीन मी मुळ दिवाळिस तूज, बाई. ।
हा प्राण होय मजला तुजवीण कायी ? ॥२३॥
तो तों करील तुजला तळहातछाया.
माझी कसी मज सुटे परि आजि माया ? ।
वृत्तांत दूरिल कसा मजला कळे, गे ?
याकारणें परम हा जिव जाकळे, गे. ॥२४॥
तूं आत्मजे, मज मनांतुन मोकलीसी.
जाऊं कसी स्वसदना परि येकलीसी ? ।
ये कातरींत जिव आजि घडोन राहे.
‘ मातें ’ म्हणोन तुजवांचुन कोण बाहे ? ” ॥२५॥
हें आयकोन पृथिवीपुरुहूतपुत्री
कोमेजली विकचपद्मपलाशनेत्री. ।
बाहेर ये तदपि धीर धरून बाळा.
टाकी पदें हळुच कोमळ चारुशीला. ॥२६॥
दोंहीं करीं सहचरींस धरून चाले.
चालेत वीर अतिदूर धरून भाले. ।
दाटेत त्या निजसमीप अनेक दासी,
ज्या सर्वदा वसति केवल तीजपासीं. ॥२७॥
आज्ञापिती कितियकां परिचारिकांला,
अध्यापिती चतुर ज्या शुकसांरिकांला. ।
वाटेस वांटिति विडे, सगळ्या सुपार्या.
रंभादिका दिसति ज्यांजपुढें विपार्या. ॥२८॥
नाचेत त्या तिजपुढें बहु वारनारी.
दूती फिरेति कितियेक निवारणारी. ।
वंशावळी पढत भाट अनेक जाती.
वाजेति त्या विविध सुंदर वाद्यजाती. ॥२९॥
ते भीमकी सकळलोकमनोभिरामा,
वैकुंठनाथपदपंकजबद्धकामा, ।
सौंदर्यसाररसनिर्मित मूर्ति जीची,
उत्कृष्टता परम याहुन काय तीची ? ॥१३०॥
वक्त्रेंदु हा सहज सिंधु सुधारसाचा.
याचा धरी नियत इंदु उधार साचा. ।
आहे असाच बहुधा अपवाद लोकीं.
हा अन्यथा हरिणलांछन कां कलंकी ? ॥३१॥
अत्यंत निर्मळ, अमोलिक, ज्या अभुक्ता,
सीमंतसीमपदवीस बसेत मुक्ता, ।
साजे बरा बिजवरा तिजला ललाटीं.
येकावळीयुत मनोहर हार कंठीं. ॥३२॥
शोभे तिचें मृदु भुजद्वय बाजुबंदीं.
तें नीळ तेज झळके हृदयारविंदीं. ।
हातीं तिचे सहजरत्नजडीत चूडा.
त्या मुद्रिका सकळ अंगुळिकाधिरूढा. ॥३३॥
आकर्ण विस्तृ तिच्या विलसेत दृष्टी;
तन्मध्य हा सहज सुंदर माय मुष्टी ।
तीचा महा रुचिर नाभि गभीर शोभे.
वक्त्रांबुजीं परम षट्पदवृंद लोभे ॥३४॥
ते भीमकीस सिसफूल शिरीं विराजे.
नाकीं तिचे अति मनोहर मोर साजे. ।
पायीं तिचे जडित नृपुरयुग्म वाजे.
तीचे गतीस गगनीं गजराज लाजे. ॥३५॥
जे देवमाया, वरवीर मोहिनी,
व्यंजत्स्तनीं, जे कळहंसगामिनी, ।
श्यामा, नितंबार्पितरत्नमेखळा,
पायीं जिचे शोभति हेमशृंखळा. ॥३६॥
कृशोदरी, कुंडलमंडितेक्षणा,
शुचिस्मिता, सुंदरि जे सुलक्षणा. ।
जे पक्कबिंबीफळसोदराधरा,
ते होय वीरां मग दृष्टिगोचरा. ॥३७॥
व्रीडावलोकनविमिश्र तदीय हासा
देखोन, ते पडति वीर मनोजफांसा. ।
उत्साह जे बहुत थोर धरून आले
राजन्य ते परम मूर्च्छित सर्व जाले. ॥३८॥
हस्तांबुजींहुन गळोन पडेत शस्त्रें.
चित्रांपरि धरिती भूषण आणि वस्त्रें. ।
यानांवरून कितियेक पडेत खालें.
येकायकीं नृपतिमंडळ मुग्ध झालें. ॥२९॥
जों पावलें सकळ राजक हे अवस्था,
तों चालिली सहज तेथुन पद्महस्ता. ।
कृष्णार्पण प्रकट देह करूनि राहे.
ते भीमकी भगवदाप्तिस इच्छिताहे. ॥१४०॥
वारून वामकरजीं अलकांस, बाळा;
तैसें अपांगविशिखीं अपरां नृपालां; ।
आलोकिते सभय सादर अच्युतातें.
सव्रीड साचिवदना, पुरुषोत्तमातें. ॥४१॥
तें सांवळें, सगुण ब्रह्म कृपाकटाक्षीं.
सस्मेर तन्मुखसरोरुह हें अवेक्षी. ।
दृष्टीस दृष्टि जंव नीट मिळोन गेली,
ते भीमकी हळुच त्याजसमीप आली. ॥४२॥
कीं चक्रवारकमणीच वियुक्त जाली
ते चक्रवाक उमगीतच काय आली ? ।
कीं मानसा त्यजुन मानसराजहंसी
आसक्त हे परमहंसकुळावतंसीं ॥४३॥
कल्पद्रमाजवळि जंगम कल्पवल्ली
कीं येय हे हळुच चालत पायचाली. ।
कीं चातकप्रणयिनीच निदाघ तप्ता
धांवोन ये नवघनाभिमुख तृषार्ता; ॥४४॥
किंवा त्यजून विषयांकुरमात्रचारा
मेध्या मृगी अनुसरे निज कृष्णसारा; ।
किंवा महोदधि गवेषित येय गंगा;
कीं भेटली रतिच येऊनि या अनंगा. ॥४५॥
हे भीमकी सहचरींसहित त्रिवेणी;
प्रत्यक्ष हा वटमहीरुह चक्रपाणी. ।
जेणें सुटे सहज हा भवबंध, राया;
तो तीर्थराज प्रकटे जग उद्धराया. ॥४६॥
तत्काळ इंद्रियपराड्मुख वृत्ति जाली.
श्रीकृष्णमूर्ति हृदयीं विवरों निघाली. ।
हारोन जाय मकरध्वज कोटिशोभा.
पाहे न्यहाळुन तया मग पद्मनाभा. ॥४७॥
चतुर्भुज श्यामळरूपधारी,
जो शंखचक्राब्ज गदा उभारी, ।
उभा असे जो रणभूमिंभागीं,
घेऊनियां चंदनऊटि अंगीं. ॥४८॥
कंठस्थळीं कौस्तुभ दिव्य भासे
सुखेंदु सानुग्रह मंद हांसे ।
उत्फुल्लकंजोपमनेच दोन्ही
ते कुंडलें हो झळकेति कानीं. ॥४९॥
ते साजिरी उन्नत नीट नासा.
शोभा महा भ्रूलतिकाविलासां. ।
टिळा ललाटीं निट केशराचा.
तो बिंदु शोभे वीर कस्तुरीचा. ॥१५०॥
धम्मिंल्ल शोभे मृदु कुंडलांचा;
संवेष्टिला हार असे फुलांचा. ।
किरीट माथां जडित प्रकाशे.
रत्नावतंसद्युति हे विकासे. ॥५१॥
हीरांगदें शोभति बाहुदंडि
रत्नीं कडीं हे खचितें उदंडी ।
उद्योत तो उत्कट ऊर्मिकांचा,
प्रकाश जेथें पडला नखांचा. ॥५२॥
श्रीवत्सलक्ष्मीस विशेष शोभा. । वसे विधी नाभिसरोजगाभा. ॥
वक्षस्थळीं उज्वळ वैजयंती. । पदाब्ज सेवी त्रिदिवस्त्रवंती. ॥५३॥
पीतांबराचें परिधान साजे, । कटिप्रदेशीं रशना विराजे, ॥
त्या किंकिणींचा समुदाय वाजे, । वांकी पदीं तोडरयुग्म गाजे. ॥५४॥
आविर्भवे केवळ शंबरारी; । शृंगार किंवा अवतारधारी. ।
जेंजें, अहो, रुक्मिणिअंग पाहे । तेथेंच ते दृष्टि जडोन राहे. ॥५५॥
तथापि ते सस्मित वक्त्रचंद्रा । अमुद्र लावण्य समुद्रमुद्रा ॥
त्या मेचका सेचन काय पायी । सदृष्टि लेवी विविधा उपायीं. ॥५६॥
पहातसे विश्वमनोभिरामा. । कदा न पावेच विरामा रामा. ॥
जो हारि हा दुर्लभ योगियांला । प्रत्यक्ष तो दर्शन लाभ झाला. ॥५७॥
मिळे शळांकास अहो विशाखा; । किंवा अशोका सहकारशाखा: ॥
हे साधकासन्निध सिद्धि आली, । किंवा विरक्तान्वित शांति जाली. ॥५८॥
जाला इला चरणदर्शनलाभ जेव्हां, । प्रेमार्द्र लोचन यदूद्वह होय तेव्हां. ॥
तिर्यड्मुखी सभय लज्जित फार जाली. । कृष्णास ते नमनपूर्वक माळ घाली ॥५९॥
सख्या दोघी तीच्या सहज मग मागें परतती.
निजा सौजन्याचा निरवधिक निर्वाह करिती. ।
अहो, जन्मा आल्या उचित बहुधा हेंच इतुकें.
करावेंहें तेणें नियत उरके ज्यास जितुकें. ॥१६०॥
न देखे वैदर्भी जवळिसखियांतें सुनयना;
न वोढत्वें लाजे, किमपि परते हंसगमना; ।
जयाचें हे ईणें सहज फिरतां चित्त हरिलें,
तया या श्रीरंगें त्वरित पदरीं तीस धरिलें. ॥६१॥
पृथुश्रोणिश्रांता, उदितमदना, स्विन्नवदना,
महाभाग्यें जाली सफळनयना, कुंदरदना, ।
सुशीळा, तन्वंगी पदरिं धरितां जे दचकली
कृपाळें गोपाळें त्वरित चहुं हातीं उचलिली ॥६२॥
रथीं वाहे, बाहे धरुन, जगदाधार जिजला
तयेची ही लज्जा तदपि न विसंबेच तिजला. ।
रथारोढें कृष्णें शिथिल भुजबंधें कवळिली
कृशांगी सत्कारें करुन निजअंकीं बसविली. ॥६३॥
पतिप्रेमाचें ये हृदयकमळीं थोर भरतें;
तयाचें हें देहीं प्रकट उमटें चिन्ह वरतें. ।
प्रकर्षें हर्षाच्या कृशतनु अकस्मातच फुगे,
त्यव्हां त्या सत्वाचे अनुभव कसे राहति उगे ? ॥६४॥
कपोळीं वाळेच्या अपरिचित रोमांच उठती.
तयेचे चोळीचे सकळ जवदाणें उतरती. ।
गळा दाटे भारी, सहज सलिलें नेत्र भरले,
महर्घाचें घर्मोदकण मुखचंद्रीं उमटले. ॥६५॥
वियोगें कृष्णाच्या अनवरत तापत्रय धरी
हृदीं आनंदाचे अतिशयित ते मज्जन करी. ।
निवाडें स्वामीच्या चरणनलिनातें अनुसरे. ।
तयेच्या क्लेशांचा पृथुतर कसा भार नुतरे ? ॥६६॥
जनाच्या सौभाग्यें प्रकृतिपुरुषां योग घडला.
अनेकां वीरांचा प्रबळतम उन्माद झडला. ।
समस्तां भक्तांचा नयनगत हा पांग फिटला.
प्रपंचाविष्टांचा सह ( ज ? ) हृदयग्रंथि सुटला. ॥६७॥
दमाम्याची घाई तदुपरि उठे हे चहुंकडे.
प्रसादें वाजेत त्रिदशनगरींचे चवघडे. ।
विभोक्ता बंधाचा यदुपति इणें कृष्ण वरिला.
फुलांचा हा माथा सुरतरुफुलांनींच भरला. ॥६८॥
प्रतापें श्रीकृष्णें वरित हरिली प्राणदयिता
मिळाल्या तेथेंही सकल सुर दिक्पालवनिता. ।
तया त्या दोघांतें विविध कुरवंडीस करिती.
प्रणामांतीं ज्याला घडति निज नीराजन रिती. ॥६९॥
विनीतत्वें ब्रह्मादिक सकळ बद्धांजळी उभे.
प्रभावें गर्जेत प्रमुरित महा यादव शुभें ।
पहाया हे येती अगणित वसिष्ठादिक मुनी
जयांची हे जाली अतिशयित दाटी प्रणमनीं. ॥१७०॥
अहो, हाहाहुहूप्रभृति बहु विद्याधरकुलें,
प्रमोदें कृष्णाचीं विविध चरितें गाति विपुलें. ।
महोत्साहें येथें यदुपतिकथा भक्त करिती,
जयेच्या स्वारस्यें अमृतलहरींतें अधरिती. ॥७१॥
तयां सर्वांमध्यें प्रिय परम हा नारद असे,
करीं ज्याचे वीणा, अनियत मुखीं नाम निवसे. ।
निजप्रेमें नाचे, हरिचरण लाभें तरवरी,
शिखा युद्धासाठीं अतिशयित ज्याची थरथरी. ॥७२॥
त्यव्हां त्या श्रीकृष्णें स्वपुरनमनोद्योग धरिजे
पुढें तें सेनेला प्रबळ बळरामास करिजे. ।
प्रयाणप्रारंभीं उठति करनाल ध्वनिमहा
निनादें भेरींच्या दुमदुमित दिग्भागहि दहा. ॥७३॥
न पाहे वैदर्भी अतिवित्फुल्लवदना.
निघाली दैवाची नृपकुमरि, लावण्यसदना ।
मुखश्रीनें जीचे सकळहि दिशा या उजळती,
धरित्रीचे राजे निखिल हृदयामाजि जळती. ॥७४॥
भुकेला भक्तीचा हरुन तिजला होय विजयी.
धरावी हे याची त्वरित बरवी मूर्ति हृदयीं. ।
निजांभक्तांसाठीं यदुपति कसा धांवत असे
त्रिलोकी - मध्यें ये सदय दुसरा याहुन नसे. ॥७५॥
जगामध्यें जेणें अनवरत याचें म्हणविलें,
निजप्राप्तीसाठीं अतिविनय याला विनविलें, ।
मनीं, ध्यानीं, स्वप्नीं, निशिदिवस जेणें निरखिला
तयाचा हा शौरी नियतच अहो होय विकला. ॥७६॥
सखा हा दीनांचा, पतितनिवहोद्धारक महा;
अनाथांचा नाथ, प्रणतजन बंधूत्तम पहा; ।
विसांवा श्रांताचा, जनकजननी हाच भजकां;
करीना हे कैसी यदुतिलक संसारसुटका ? ॥७७॥
कथा हे कृष्णाची सकळ जगदानंदजननी
मनोभावें ईचें श्रवण करिजे नित्य सुजनीं. ।
प्रसंगें श्रोत्यांचे सकळहि महादोष हरती;
यदूत्तंस प्रेमें विषयरसगोडी विसरती. ॥७८॥
वृथा संकल्पाचे अनियत कडे वृत्ति न चढे.
पहातां तों येथें प्रकत सदसद्वस्तु निवडे. ।
चुके यातायात श्रम सकळ; सत्संगति घडे;
अनायासें जेणें सहजसुखसंदूक उघडे. ॥७९॥
इति श्रीमद्भवगद्भक्त पदानुरक्त कविसामराजविरचिते रुक्मिणीहरणकाव्ये रुक्मिणी हरणोन्नाम अष्टमः सर्गः
सर्ग संख्या १७९
स्वस्यंदनीं वाहुन राजकन्या,
तो वाजवी श्रीपति पांचजन्या. ।
त्या वीरवृंदातुन जाय तैसा,
शृगालसंघातुन सिंह जैसा. ॥१८०॥
शके १६६६.