( रमावृत्त )
अथ भरतप्रभृतिनिजानुजांसि सारें कळवितसे निशि कथिलें, जसें स्वचारें. ।
चरणरजेंकरुनचि नाशिता अघातें, स्वमत असें कथित असे तदा तिघांतें. ॥१॥
( अनुष्टुप् )
‘ श्रुतीतें निंदितो जैसा पाखांडी पापभाजन, ।
रक्षोगृहीता यासाठीं मैथिलीतें तसा जन ॥२॥
( गीतिछंद )
योगी जैसा त्यजितो संसारभयास्तव स्वममतेला, ।
अपवादभयास्तव मी कीर्तिप्रतिपालनार्थ सीतेला ’ ॥३॥
( अनुष्टुप् )
असें आकर्णितां, त्यांच्या नीर नेत्रांतूनी गळे; ।
रोमांच उठले देहीं, दुःखानें दाटले गळे. ॥४॥
पुसूनियां शोकपाणी, पाणी जोडूनियां नयें, ।
रामापुढें दीनवाणी वाणी भरत हें स्वयें. ॥५॥
( गीतिवृत्त )
“ अंत्यजसदनापासुनि पूर्वीं जे आणिली बळें गाय, ।
संसर्गपातकास्तव पुनरपि ते धेनु टाकीजे काय ? ॥६॥
शुद्धि दिली वन्हिमुखीं, प्रविशवुनीयां विशंक निज काय: ।
त्या दिव्याचें रामा ! स्मरण नसे सांग, आज तुज काय ? ॥७॥
( स्रग्धरा )
‘ जाला ज्या मानवाला मरणद वनिताप[उत्रवित्तादिशोक,
त्याला नाहींच कांहीं बुधजन म्हणती, पुण्यलभ्योच्चलोक. ’ ।
‘ सीता हे सून माझी, सुविमळचरिता; यामुळें देवलोकीं,
रे वत्सा ! वर्ततों मी प्रमुदित, मजला ऊर्ध्वनेत्रें विलोकीं. ’ ॥८॥
( गीतिवृत्त )
एवं तदैव गननीं विमानगत तात बोलिला वदनें, ।
त्याचें स्मरण करावें रामा ! त्वां ज्ञानिलोकहृत्सदनें ॥९॥
स्मरण करीं, पूर्वीं जें वदला व्योमस्थ देवसंघात. ।
करुणाब्धे ! सीतेसह न करावा आत्मकीर्तिचा घात. ” ॥१०॥
( अनुष्टुप् )
एवं वदोनि, भरतें केलें रामासि वंदन, ।
जाला अश्रुजलभ्रष्टहृदयालिप्तचंदन. ॥११॥
( सारंगवृत्त )
ऐकोनि ऐसें, वदे जानकीजानि; ‘ लोकापवादेचि होते यशोहानि. ।
ज्याच्या नसे कीर्तिचा जाहला नाश, त्याला न मारावया दक्ष कीनाश. ॥१२॥
मेले हरिश्चंद्रवैन्यादि जे संत, ते या जनामाजि आहेत जीवंत. ।
ज्या बंधुगोषित्सुताहीं यशोभंग, स्वप्नांतरींही तयासी नसो संग. ॥१३॥
( अनुष्टुप् )
कित्येकांहीं देहदानें रक्षिलें स्वयशोधन, ।
म्हणोनि सीतात्यागें मी करितों कीर्तिशोधन. ॥१४॥
म्यां वांचावें असें चित्तीं असेल तुझिया जरी,
सीतात्यागनिषेधार्थ शब्द बोलों नको तरी ’ ॥१५॥
( स्रग्धरा )
सौमित्रि क्रोधतप्त क्षितिप्रतिसि म्हणे, ‘ प्रार्थना ऐक, रामा !
मिथ्या लोकापवादें करुनि विकलुषा त्वां त्यजावी न रामा; ।
म्लेच्छांहीं निंदिजेते श्रुति म्हणउनियां काय ते विप्रलोकीं.
टाकावी ? हें विचारें करुनि बुधपते ! शास्त्रनेत्रें विलोकीं ॥१६॥
( दोहावृत्त )
सांग मला हें सत्य तूं दोषज्ञांचा राय ।
स्त्रीकलहास्तव पंडितें माय त्यजावी काय ? ’ ॥१७॥
( मंदाक्रांता )
शत्रुघ्नेंही बहु विनविला राम सामप्रकारें, ।
तेंही जालें विपिनरुदितासारखें व्यर्थ सारें; ।
अप्रस्तावीं विफळचि असे का, ऐसेंचि आहे;
मेघापायीं न तिळभरिही नीर सारंग लाहे ॥१८॥
सीतात्यगद्विजपजननीं वाढला दुःखसिंधू;
शोकाश्रूंहीं भिजविति तदा भूमितें रामबंधू; ।
कन्यात्यागश्रवणजनितक्लेशमूर्च्छेसि गेली,
शिंपोनीयां म्हणउनि जणों जीवनें शांत केली ॥१९॥
( पृथ्वीवृत्त )
स्वबंधु करिताति हे करुण मंजु शब्दें स्तव,
कलंक परि लागतो निजकुळासि सीतेस्तव
असा करुनियां बरा दृढ विचार लंकापति -
कुळांतक असें वदे कठिन, कीं श्रुती कांपती; ॥२०॥
( गीतिवृत्त )
अपवादभयास्तव मी स्ततनूतेंही तुम्हांसवें, देखा, ।
त्यागिन सहसा, मग या सीतेचा कायसा असे लेखा ? ॥२१॥
( हरिणी )
रघुपतिमुखें कैकेयीचा सुत, श्रवणीं अशीं
कठिन वचनें स्वांतोद्वेगप्रदें शिरलीं जशीं, ।
हळु हळु रडे; गेलें सर्व स्वधैर्य तदा लया;
अनुजयुत तो जाला जाला त्यजूनि तदालया. ॥२२॥
( अमृतध्वनि )
दुःखाभिभूत नृप जाणोनि शिंपित धरेतें स्वनेत्रकमळें,
होता निबद्धकर सौमित्रि, पूजित दृगब्जें तदंध्रिकमळें. ।
जो न स्वनामरसपानाभिलाषपरलोकव्रजासि भव दे,
तो, लक्ष्मणासि नयनांहीं विलोकुनि, असें भूमिवल्लभ वदे. ॥२३॥
( माल्यभारा )
‘ मम शब्द करूनि मान्य, टाकीं, क्षितिकन्येप्रति जान्हवीतटाकीं ।
अथवा स्वकरेंचि मार मातें, जरि सीतेस्तव पावसे श्रमाते. ॥२४॥
( उपजाति )
भागीरथीच्याचि तटाकरानीं टाकीं, तुला मी नमितों करांनीं. ।
सीतापरित्यगज दोष मातें असो, नसो तूज गुणोत्तमातें ’ ॥२५॥
( मालिनी )
अशि परिसुनि वाणी, बंधुला हात जोडी;
अवनतमुखपद्में दीर्घ निःश्वास सोडी. ।
तुरगसह रथातें आणवी सूतहातें;
पुसुनि गुरुसि, गेला क्षिप्र सीतागृहातें. ॥२६॥
( माल्यभारा )
उतरूनि रथावरूनि, जाला विनत क्ष्मातनयापदांबुजाला. ।
मग तोषविलें तयास तीनें, पुसुनि स्वागत आदरें, सतीनें ॥२७॥
( रथोद्धता )
लक्ष्मणागमनकारणास ती तत्क्षणींच समजे महासती. ।
रावणप्रमुखराक्षसांतदा देवरासह असें वदे तदा. ॥२८॥
( स्रग्धरा )
सौमित्रे ! म्यां विनोदेंकरुनि निशि जगत्कामकल्पद्रुमातें
रामातें याचिलें जें, रघुकुलतिलकें अर्पिलें तेंचि मातें; ।
ऐसें मानीत होतें परि निज हृदयीं, कीं खरें होत नाहीं,
यावत् सस्यंदनातें तुज न निरखिलें आपुल्या लोचनाहीं ॥२९॥
( स्वागता )
जाहलासि हरिजिच्छमना ! तूं रामशब्दसहकारवसंत, ।
बोलिलें वचन सिद्धिसि नेती सत्यसंध, मनुसंभव, संत. ’ ॥३०॥
( उपजाति )
बोलोनि ऐसें द्रविणें दुकूलें घे देवराच्या स्वमतानुकूलें. ।
‘ श्रेयोभिवृद्धयर्थ ’ म्हणे अजा ती, ‘ पूजीन हस्तें सवधू द्विजाती ’ ॥३१॥
( शार्दूलविक्रीडित )
स्वर्णाच्या मणिचित्रिता स्वपतिच्या वंदूनिया पादुका,
सीता ठेवितसे रथीं मुनिमनोरत्नांचिया संदुका ।
तो धन्य क्षितिपाल मैथिल जनीं, लोकत्रयाल्हादिनी
ऐशी कांतपदांबुजैकनिरता ज्याची सती नंदिनी, ॥३२॥
( पृथ्वीवृत्त )
सुरद्विरदगामिनी जनकनंदिनी क्षिप्र ती,
निघे मग पुसावयाहृदयनाथमतेप्रती ।
स्वभालगतकुंकुमांकित करूनि तीचीं पदें
असें वदतसें मुखें निजवरप्रमोदास्पदें ॥३३॥
( माल्याभारा )
‘ मज दोहद जाहला असे कीं, निरखावें नयनें सुरापगेला. ।
सगरात्मजदोषपंक जीच्या जलयोगें सकल क्षयासि गेला ॥३४॥
सुरमानवनागलोककांता बहु माहात्म्य जिचें सदैव गाती, ।
जरि होइल आपुली अनुज्ञा, तरि पाहीन सुखें सुरापना ती. ॥३५॥
( उपजातिवृत्त )
नेला जयानें हरिजित् क्षयाला, तो अग्रजाज्ञेस्तव मत्क्षयाला, ।
करावया पूर्ण मनोरथातें, आला असे घेउनियां रथातें ’ ॥३६॥
( विबुधप्रिया )
ते म्हणे तिजला, नवीनशिरीषपुष्पसुकोमले !
[ मृद् ] गृहागमनेंचि हे पादपल्लव कोमले; ।
जासि सांग कशी वनाप्रति ? वृक्ष कंटक तीव्र ते.
वक्त्रकांति सुकेल, होइल ओष्ट शुष्क; पतिव्रते ! ’ ॥३७॥
( शालिनी )
कौसल्येची स्नेहसद्रत्नखाणी वाणी - ऐशी आयके रामराणी. ।
पाणी तीतें जोडुनी, लोकगीता सीता बोले भारती हे विनीता. ॥३८॥
( मालिनी )
‘ मम वर वनवासीं कंटकध्वंसकारी,
मरणजलधिमग्न स्वप्लवंगासि तारी, ।
विमलगुणसुधेचा सिंधु हा रामराजा,
अनुदिन जपतां, कां ओष्ट वाळेल माजा ? ॥३९॥
( अनुष्टुप् )
असे भवत्कृपाछत्रच्छाया मन्मस्तकीं सदा; ।
कसे क्लेशार्ककिरण स्पर्शतील मला वदा ? ’ ॥४०॥
पीती स्वकर्णांजलिंहीं एवं वागमृता सत्या, ।
देती आशीर्वादयुक्त आज्ञापाथेय तीस त्या. ॥४१॥
कैकेयी, रामजननी, सुमित्रा, या तीघींस ती, ।
कृतप्रदक्षिणा वंदी, पुसे, मग निघे सती. ॥४२॥
( प्रमाणिका )
रघूत्तमांघ्रिसारसा, स्मरे प्रहृष्टमानसा, ।
बसोनियां रथावरी, प्रयाण तूर्ण ते करी. ॥४३॥
( उद्गीतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं, ।
हा तिसरा अध्याय श्रवण करा रसज्ञमुख्यांनीं. ॥४४॥