( उपजाति )
समीप येऊनि कळेवराशी पाहे, तदा त्यासि कळे वरांशी. ।
जेणें न राहे श्रमभार तीचा, केला मृद्पक्रम भारतीचा ॥१॥
( शार्दूलविक्रीडित )
‘ वत्से ! काय तवाभिधान ? रडासी कां काननीं निर्जनीं ?
कोणाच्या सुकृत्तैकनीरनिधिच्या वंशांत झाली जनी ? ।
कोण त्वत्पति ? टाकिलें अकरुणें आणोनि येथें तुला
कोणीं ? सर्वहि सांग तूं मज निज क्लेशाचिया हेतुला. ’ ॥२॥
( अनुष्टुप् )
वाणीतें ऐकतां, तीचें चित्त संतोष पावलें. ।
बोले, वंदूनि शिरसा मुनिचीं दिव्य पावलें. ॥३॥
( उपजाति )
महामुने ! मैथिल तात माझा; मन्नाम सीता; पति रामराजा; ।
भूवल्लभाज्ञाप्रियमंदिरानें आणूनि येथें, त्यजिलें दिरानें. ’ ॥४॥
( अनुष्टूप् )
ऐसें ऐकूनि, वाल्मीकि वदता जाहला मुखें. ।
आकर्णावें रसज्ञांहीं स्वस्थ होऊनिया सुखें. ॥५॥
( शार्दूलविक्रीडित )
‘ सर्वज्ञानिजनासि संमत असा श्रामैथिल त्वत्पिता,
वत्से ! तूंही पतिव्रताजनशिरोभूता जगत्पूजिता, ।
माझा केवळ तो सखा दशरथ क्षोणीशचूडामणी,
या वेळेसि कशी न होशील दयापात्र, क्षितिस्वामिणी ! ॥६॥
केलें दुष्कर देवकार्य सकल क्ष्मादेव केले सुखी;
न्यायें भूपती पाळितो निजजनकेशाटवीचा शिखी; ।
माझा क्रोध तथापि मैथिलसुते ! आहेचि रामावरी,
दोषावांचुनि टाकिली अकरुणेम सत्वोदरी सुंदरी. ॥७॥
( मालिनी )
रिपुयमयमपुत्रप्राप्तिला पावसी, ते
करितिल सुख तूतें; टाकिं चिंतेसि, सीते ! ।
मुलि ! उठ चल माझ्या पुण्यपुंजाश्रमाला;
शिव ! शिव ! बहु रानीं पावलीस श्रमाला. ॥८॥
( पृथ्वी )
मदाश्रमपदाश्रितस्थिरचरासहि व्यापदा
कदापि न शिवे, सुखी विगतवैर सारे सदा. ।
उदास हृदयीं न हो, द्विजवधूसुता शर्मदा
न दावितिल भिन्नता तुज महानुकंपास्पदा. ॥९॥
( गीतिवृत्त )
होइल सुखप्रसूती, अपत्यसंस्कारविधिहि भूतनये ! ।
वत्से ! मदाश्रमाला मानुनियां स्वगुरुचें निकेतन, ये. ’ ॥१०॥
( सारंग )
एवं तदा ऐकता विप्रवाणीस, झाला महातोष काकुत्स्थराणीस. ।
चित्तीं म्हणे, ‘ हा मुनि स्तुत्य विश्वास, ठेवी तयाच्या पदीं घट्ट विश्वास. ’ ॥११॥
( जलोद्धतगति )
पुशी अवनिजा निजाश्रुसलिलालिला सुविकला कलानिधिमुखी. ।
उठूनि, नमुनी मुनीस, मग ती गती करि तदा तदाश्रमपदा. ॥१२॥
( स्रग्धरा )
सद्विद्यासक्तशिष्यव्रजतनयसुतास्त्रीयुत ब्रम्हमाला
सामोर्या तीस आल्या परिसुनि सहसा रामरामागमला.
आशीर्वादामृतानें मुनिवरघन ते तीवरी वर्षती; तें ।
पाहूनि ब्राह्मणांचें सदयपण, महा जाहला हर्ष तीतें. ॥१३॥
( गीतिवृत्त )
म्हणति ऋषिस्त्री, हातें स्पर्श करुनियां तदीय देहातें ।
‘ आम्हीं सर्व तवाश्रित, आलिस तूं आपुल्याचि गेहातें. ॥१४॥
( विबुधप्रिया )
फार तूं श्रमलीस हिंस्रगणाचिया भवनीं वनीं,
दुःखभीतिस यावरि क्षितिकन्यके न ! मनीं मनीं. ’ ।
प्रार्थिली असि, पूजिली मग तापसीनिकरें करें,
अर्पिलीं तिस कंदमूळफळें मुनिप्रवरें वरें. ॥१५॥
( गीतिवृत्त )
मग शिष्यप्रकरानें, पावुनि वाल्मीकिच्या निदेशाला, ।
निर्मुनियां स्वकरानें दिधली भूनंदिनीस दलशाला. ॥१६॥
( शार्दूलविक्रीडित )
पूजी राघवपादुकांप्रति; नमी वाल्मीकिला ते सती;
सेवी तद्वदनोद्गतोत्तमकथापीयूषधारेस ती; ।
सिंपी श्रीतुलसीवनासि तमसाविश्वंभराकारणें,
अर्पी वेंचुनियां सुमांसि मुनिच्या देवार्चनाकारणें. ॥!७॥
वन्याहारपरा, कृशा, सुमलिना, संवीतवल्कांबरा,
कांतध्यानधरा, सदैव तमसास्नानैकबद्धादरा, ।
ऐसी रामवियोगतप्तहृदया सीता मुनींद्राश्रमीं,
कल्पव्यायतवासरांसि परम क्लेशेंकरूनि क्रमी. ॥१८॥
गर्भाचे नवमास पुण्यविपिनीं संपूर्ण झाल्यावरी
वृद्धस्त्रीसमुपासिता, जसि महासिध्द्यासिता शांकरी, ।
सल्लग्नग्रहयुङ्ग्निशीथसमयीं पुत्रद्वयातें सुखें
वैदेही प्रसवे, सती प्रमुदिता गीतासि गाती मुखें. ॥१९॥
( गीतिवृत्त )
शोभे प्रदक्षिणार्चि स्वधेश, होतां सती प्रसूता हे, ।
झाल्या विमला काष्ठा, शीतळ सौरभ सदागती वाहे. ॥२०॥
द्युतिकरपुत्रयुगाला तदा प्रसवली विदेहकुलभूषा, ।
मुग्धांस पर्णशाळा वाटे तेजःसमूहमंजूषा. ॥२१॥
ज्या दलशालेमध्यें होता श्रुतिशास्त्रतत्वलीन मुने, ।
तेथें धांवत जाउनि बद्धांजलि शिष्य बोलती नमुनी. ॥२२॥
‘ ब्रह्मन् ! भवत्प्रसादें सीता व्याली किशोरयुगळाला, ।
त्याच्या तेजःप्रसरें दीपाचा गर्व सर्वहि गळाला. ॥२३॥
भास्करविधू म्हणावें, तरि तापकलंकसंवियोजित कीं; ।
दिसताति साधुचिन्हें, सामुद्रिकशास्त्रसंमतें जितकीं. ॥२४॥
( पुष्पिताग्रा )
कुशल वचन ऐकतांचि ऐसें, कुशलवमुष्टिधर द्विजेंद्र गेला; ।
रुचिरवदनबालकद्वयाच्या रुचिरवसंग्रहणें प्रहृष्ट झाला. ॥२५॥
( शार्दूलविक्रीडित )
होते जे करपंकजीं कुशलव क्ष्मानिर्जरें रक्षिले,
त्यांहीं ते शिशु मंत्रपूततमसापाथःकणें प्रोक्षिले. ।
नामें तींच सुजातकर्मसमयीं चित्तांतरी भाविलीं,
बाराव्या दिवसांत नामकरणीं अत्यादरें ठेविलीं. ॥२६॥
( अनुष्ठुप् )
द्वादशाब्दीं कुमारांचीं केलीं मौंजीनिबंधनें, ।
तपःशिखिमुखक्षिप्तस्वपूतवपुरिंधनें. ॥२७॥
( अमृतध्वनि )
मागोन आणवि तदा जो वसिष्टमुनिच्या नंदिनीप्रति मुनी
प्रार्थी कवींद्र तिस पूजूनि विप्रजनसंभोजनार्थ नमुनी. ।
त्या कामधेनुतनुपासून दिव्य विविधान्नें बहु प्रकटलीं;
तत्सेवनें विपिनवासिद्विजेंन्द्ररसनाग्रें मुखांत नटलीं. ॥२८॥
( गीतिवृत्त )
विधृतचतुःषष्टिकला, मुक्ताहारा, मनोहरा, विमळा, ।
वरिति चतुर्दश विद्यावयंवरवधू तयास मग सकळा. ॥२९॥
अध्यापिली मुनीनें त्यातें रामायणाभिधा स्वकृती, ।
गाती वीणातालस्वरमिश्रितमंजु ते कुमार कृती. ॥३०॥
कुशलवगानावसरीं गीतरसें मृगकुळें न तीं चरती, ।
अष्टौ सात्विक भाव श्रोतृगणीं एकदाची संचरती. ॥३१॥
कुशलवगानावसरीं तच्छ्रवणें भुजगलोचनें निवती, ।
शून्या होय सुधर्मा, पवनाचे दार फार मानवती. ॥३२॥
कोणीं कृपाण, कोणीं सुचर्म, कोणीं समर्पिलें बाण; ।
कोणीं किरीट, कोणीं कार्मुक, कोणीं दिलें तनुत्राण. ॥३३॥
एवं त्यांच्या गानें झाला नाहीं कधीं चमत्कार ? ॥३४॥
( अनुष्टुप् )
दुष्टहृत्पद्मसारातें पीती त्यांचे शिलीमुख, ।
सज्जनांच्या पदांभोजीं हेचि होती शिलीमुख. ॥३५॥
( स्रग्धरा )
एवं वाल्मीकिसेवानिरत कुशलव स्वप्रसूच्या सतीच्या
आज्ञेतें सेवनातें क्षणहि न चळती, साधु जैसे श्रुतीच्या. ।
वन्याहारी, परंतु प्रमुदितचि सदा ते महाधैर्यसिंधू
भिन्ना मूर्तीच त्यांच्या, न मन, निवसती यापरी दोघ बंधू. ॥३६॥
( उद्गीतिवृत्त )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं ।
अध्याय पांचवा हा श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं ॥३७॥