( पृथ्वीवृत्त )
वनाप्रति विनागसा दवडिली धरानंदिनी,
म्हणूनि बहु दुःखिता स्वपटहस्वनाक्रंदिनी, ।
निवारित असे तदा सकरुणा अयोध्या सती
समीरणचलांकुशध्वजकरें जणों तीस ती. ॥१॥
( गीतिवृत्त )
मार्गी चालत असतां, दीरासह ते बसोनि रम्य रथीं, ।
ऐशा दुश्चिन्हातें पाहे क्षितिकन्यका अरण्यपथीं. ॥२॥
( अनुष्टुप्छंद )
पुढें येउनियां भीमा बोले वागशिवा शिवा; ।
धांवती, मार्ग लंघूनी, मृगांची व्याकुळें कुळें. ।
पाहुनी दुर्निमित्तांतें, म्हणे दीरास ती सती. ॥४॥
‘ दुश्चिन्हातें स्वनेत्रांहीं रक्षोवृंदापहा ! पहा, ।
भयसंसूचका भल्लू रडते भैरवें रवें. ॥५॥
( वसंततिलका )
गोमायु आणिक मृगें रडताति वाटे
व्यापूनि, वास्तव मला भय फार वाटे. ।
लोकैकपालक मदीय मनोविसावा,
श्रीराम बंधुसह नित्य सुखी असावा. ॥६॥
( शिखरिणी )
जनस्थानीं आले खरमुखमहाराक्षस रणीं,
तयांतें दावी जो शमननगरद्वारसरणी; ।
उदार प्रत्यर्थीप्रति शरघनाच्या वितरणीं,
असो तद्वाहूंचें बळ खळबळध्वांततरणी. ॥७॥
( शार्दूलविक्रीडित )
साक्षात्पातकमूर्ति रावण जगत्तोषांबुजाचा करी,
पाषाणीं जलराशि बांधुनि तया काळातिथी जो करी. ।
विद्याश्रीमदमद्यमूढहृदयस्वर्द्विमरुद्वासुकी,
माझा प्राणसखा, निरंतर असो श्रीरामराजा सुखी. ’ ॥८॥
एवं गौतमदारतारणधनुर्भंगादिलीलांस ती,
मार्गातें क्रमितां, स्मरोनि पतिला कल्याण भाकी सती. ।
सर्वांचाहि असाच दंडक असे, प्रीतिप्रकर्षास्तव
होतो व्यर्थचि नित्य इष्ट विरहें चित्तांत चिंतोद्भव. ॥९॥
नेत्रांहीं अवलोकुनी स्मृतिभवद्विण्मौलिमालाकृति,
चिंताकुंचितचित्तवृत्तिस ‘ पहा माते ! ’ म्हणे तो कृती; ।
‘ हे हंसस्वरभाषिणी तुजकडे पद्मेषणें पाहते
स्वर्गंगा लहरीभुजा उचलुनी भेटावया वाहते. ॥१०॥
( प्रमिताक्षरावृत्त )
फलपुष्पपल्लवभरें लवले तरुराज तूज करिती नमनें; ।
विहगारवें कुशल हे पुसती; सुख फार यांसहि तवागमनें. ॥११॥
( पुष्पिताग्रा )
सकरुणहृदयें पवित्र केलें, अवचित देउनि दर्शन स्वरानीं, ।
म्हणउनि मधुपांगना प्रहर्षें, तव गुण वर्णिति मंजुळ स्वरांनीं. ॥१२॥
( प्रहर्षिणी )
आली की बहु दिवसीं स्वकाननातें, देखाया दशमुखजिन्मनोभिरामा, ।
या येती क्षितिपति [ पत्नि ! ] शुभ्रवर्णा, सामोर्या म्हणुनि तुला मराळरामा. ॥१३॥
( उपजाति )
ऐकोनियां देवरभारतीतें, संतोष झाला मग फार तीतें.
विलोकितां त्या अमरापगेला, संताप तीचा विलयास गेला. ॥१४॥
( अनुष्टुप्छंद )
सीतेसि पाहतां हर्षे देवी गौरपयोधरा; ।
गंगावलोकनें तोषे देवी गौरपयोधरा. ॥१५॥
( गीतिवृत्त )
तरणिवर बसुनि, झडकर तरणिकुलवरक्षमाभृदनुकूला, ।
देवरतिकरनदीच्या देवरसह जाय शीघ्र परकूला. ॥१६॥
( वंशस्थ )
करूनिया मज्जन विश्वपावनीं वनीं, प्रवेशे मग जानकी वनीं. ।
सचिंत पाहे मग देवरास ती सती, म्हणे ‘ आश्रम कां न दीसती ? ॥१७॥
( वसंततिलका )
शार्दूल पंचमुखऋक्षवृकादिसेना
पादोत्थधूलिपटलें दिनकृत् दिसेना. ।
पंचास्यदारितगजेंद्र शिरोविमुक्ता
सर्वत्र भूमिवर त्या दिसताति मुक्ता. ॥१८॥
सिंहाहतद्विरदशोणितसिक्त पृथ्वी,
तद्दंतसंघपटला बहुसाल वाटे, ।
शुभ्रप्रसूनमयदमविभूषितांगी
स्त्री रक्तचंदनविलेपितमूर्ति वाटे. ॥१९॥
शार्दूलहस्तगतकंठमृगांगनांची
वाणी भयास्तव जणों शिरते स्वकानीं, ।
निर्दग्धभूमिरूह हे नयनीं विलोकीं,
क्रूरद्विजिव्हगणफूत्कृतिपावकांनीं. ॥२०॥
( द्रुतविलंबित )
घनरवांतकरा ! खणतो पहा, वनबिडाल महीस कसे वनीं,
बहु भयंकर कर्कश हे महा, परम सस्पृह मूषकसेवनीं. ॥२१॥
( शार्दूलविक्रीडित )
दावग्रस्तवनोत्थधूमनिकरीं पक्षी न ते दीसती;
निर्दग्धांडशिशुप्रलापनरवें आहेतसे भासती. ।
पंचास्याहतसांद्रकज्जलनिभस्तबेरमांची शवें,
मातें दूरुनि गंडशैल गमती संदेहबुद्ध्युद्भवें ॥२२॥
क्षमासमाना क्षांत्यर्थीं, रूपीं प्रत्यक्ष मासमा, ।
न दीसती कां आजूनि पुण्यनीरनदी सती ? ॥२३॥
होमधूमारुणाकर्णशोणाब्जच्छदलोचना, ।
न दीसती आजुनी कां साध्वी संतापमोचना. ॥२४॥
ब्रह्मचारी, दंडमौजीहरिणाजिनमंडित, ।
न दीसती कां अद्यापि सद्विद्यासक्त पंडित. ॥२५॥
( शार्दूलविक्रीडित )
आम्नायप्रतिपाद्यधर्मसरणिपांथ, प्रसन्नाकृती,
संसारांबुनिधानपानकरणीं कुंभात्मजन्मे, कृती, ।
शापानुग्रहदक्ष, कां न दिसती भूदेव अद्यापि ते,
चिंता लक्ष्मण ! सर्पणी म्हणुनियां, तोषामृतातें पिते. ॥२६॥
( माल्यभारा )
रघुवीरपदाब्जसेवनातें करुनी अंतर, धावले वनातें.
अशि मी अविवेकलब्धपापा; सुकृती लोक कसा दिसेल बापा ? ॥२७॥
( अनुष्टुप्छंद )
पवित्राश्रमवासी ते पवित्रासिच दीसती, ।
लक्षीजे तो न नेत्रांहीं कौशिकीं पद्मिनीपती. ’ ॥२८॥
( उपजाति )
प्रजावतीची अशि दीन वाणी आणी दिराच्या नयनांसि पाणी,
असें वदे रावणपुत्रहंता, संतापसंतप्तमनोनियंता. ॥२९॥
( वसंततिलका )
‘ ते पावनाश्रम पहा दिसताति दूर,
व्योमासि चुंबित असे द्विजहोममधूर, ।
जावें इतःपत हळूहळु धूमराजी
लक्षी करूनि, दिसते विजितांबरा जी. ॥३०॥
( उपजाति )
लोकप्रवादें त्यजिलें वनांतीं तुला जगद्वंद्यपदें वरानें. ’ ।
प्रशोकबाष्पाकुलकंधरानें, सांगीतलें हें तिस देवरानें. ॥३१॥
( सारंगवृत्त )
‘ मातर्नमस्ते क्षमस्वापराधी न, मानी मला, सर्वथा मी पराधीन. ’ ।
बोलोनि हें नम्र झाला रडे फार; अस्त्रालि ते मौक्तिकांचा जणों हार. ॥३२॥
( अनुष्टुप् )
ऐसें ऐकोनि वाणीतें शोकें दीर्घ स्वरें रडे. ।
मूर्च्छावातविनिर्धूता सीतारंभा धरे पडे. ॥३३॥
करूनि वामहस्ताचें छत्र शक्रजिदंतक, ।
सांशुकातें दक्षिणातें करी सत्तालवृंतक. ॥३४॥
( पृथ्वी )
तिच्या तनुसि शिंपुनी स्वनयनोदकें, ‘ लेखनी, ’
म्हणे ‘ तव जळो विधे ! सुविषमाक्षरांची खनी. ।
असेल घडली जरी रघुवरांघ्रिसेवा मला,
प्रशोकभरमूर्च्छिता त्वरित हे उठो कोमला. ’ ॥३५॥
( वसंततिलका )
अंतर्बहिस्थित रघूत्तमसूनुधाकें,
प्राणासि धैर्य तिळमात्र न होय जाया. ।
मोहांधकारपतिता विधिच्या विपाकें,
नेत्रें हळूच उघडी रघुवीरजाया ॥३६॥
( इंद्रवंशा )
निघूनियां कश्मलसिंधुच्या कडे, पाहे दिराच्या मुखनिरजाकडे; ।
बोले, ‘ मला त्यागुनि काननीं कसा जाशील वत्सा ! स्वपुरासि लोकसा ? ॥३७॥
( शिखरिणी )
मदर्थ स्नेहानें सदयहृदया ! त्वां निजकरें
जनस्थानीं केलीं छदनसदनें हृत्सुखकरें,
फलें पुष्पें मूळें प्रतिदिवस आणूनी सुरसें,
वनातेंही केलें श्रम न गणुनी, स्वात्मघरसें. ॥३८॥
( वसंततिलका )
आतां मदर्थ वद, कोण तशा विशाळा,
येथें करील तुजवांचुनि पर्णशाळा ? ।
जातोसि टाकुनि कसा मज एकलीला ?
हा ! दारुणा परमपापविपाकलीला. ॥३९॥
पूर्वीं पुढें सतत रक्षित राम होता,
काळानळीं सुरसपत्नघृतासि होता. ।
मागें तयाची, मज मानुनियां सुमित्रा,
केलेंचि रक्षण सदैवहि तूं सुमित्रा ! ॥४०॥
( शार्दूलविक्रीडित )
माथां रत्नकिरीट, कुंडलयुग श्रोत्रीं विराजे बरें,
बाहू अंगदभूषणें विलसती, सन्मध्य पीतांबरें; ।
कंठीं मौक्तिकहार, चंदनउटी अंगीं, घनश्यामला
ऐशी राघवमूर्ति यावर कधीं भेटेल वत्सा ! मला ? ॥४१॥
सांद्रानंदसुधानिधि, स्मितजितप्रद्युम्नराकापती, ।
ज्यातें पाहुनि देवलोकवनिता कामज्वरें कांपती; ।
कस्तूतीतिलकाभिराम ममहृन्नैत्रैकविश्राम तें,
रम्य श्मश्रुल राघवानन कधीं भेटेल वत्सा ! मतें ॥४२॥
( वसंततिलका )
अंतर्बहिर् भवरवि स्वकरें सदाही
मिथ्याप्रपंचपथिकास नरास दाही. ।
तत्तापसंततिस जो स्मरणेंच नाशी,
रामांघ्रि देईल कधीं सुख लोचनांशीं ? ॥४३॥
( मंदाक्रांता )
‘ सीते ! सीते ! ’ म्हणवुनि वनीं शोधितां नित्य मातें,
जो आलिंगी निजभुजयुगीं घट्ट वल्लीद्रुमातें, ।
मत्प्राप्त्यर्थ द्विजवरसखा, मुख्य भर्ता जगाचा,
पूर्वीं झाला विरहविमना मित्र शाखामृगांचा ॥४४॥
( उपजाति )
जाणोनियां क्षिप्र मदाशयाला, म्हणें धरावें प्रमदाशयाला; ।
येऊनि पूर्वीं मम तातपूतें, केला धनुर्भंग नितांत पूतें. ॥४५॥
( गीतिछंद )
मद्विधिकलशभवानें रामकृपासिंधु शोषिला सारा; ।
आतां मज शफरीला कैंचा अन्यत्र वांसरा ! थारा ? ॥४६॥
( उपजाति )
स्वभ्रातृघातोद्यमभीषणातें, व्यापार हा योग्य बिभीषणातें; ।
वत्सा ! तुझी केवळ नम्र मुद्रा; कां धाडिलें तूज दयासमुद्रा ? ॥४७॥
( रुक्मिणीवृत्त )
त्यजावया मज जनहीन काननातें, प्रयोजिला अदय सुकंठ का न नाथें ? ।
कुकर्म हें विहित तया वलीमुखाला, तुझ्या मलीमसरुचि पावली मुखाला. ॥४८॥
( गीतिवृत्त )
श्वश्रूजनासि माझें नमन निवेदूनि, सर्वविदितनया ! ।
स्मरण धरुनि, सांगावा निरोप हा त्यास पंक्तिरथतनया. ॥४९॥
सांगुनि असें दिराला, निरोप हा पाठवी क्षितिवराला.
दृढ करुनि हृदय, कानें तो ऐकावा समस्त रसिकानें. ॥५०॥
( वसंततिलका )
ध्यानेक्षणेंकरुनिया हृदयाख्यधामीं
पायासि लक्षित असें तुमच्या सदा मी. ।
प्रत्यक्ष लागुनि परी मम मस्तकाला,
देतील यावर कधीं न कळे सुखाला. ॥५१॥
( उपजाति )
हृत्कायवाक्कर्मजदोष मातें नसे, कसें हें न कळे वराला ? ।
सत्वक्षयें पातक; अन्यथा मी, न वाहतें हीन कलेवराला. ॥५२॥
( अनुष्टुप् )
आहे मी सत्वसंपन्ना, कृपात्याग नका करूं;
असाधु अथवा साधु परंत्वत्याज्य लेंकरूं. ॥५३॥
( गीतिवृत्त )
अपराधवियुक्ता मी, परि मज त्यजिलें वनांत भूमिवरें. ।
बुध म्हणति, ‘ दैव दुस्त्यज ’ तें आलें प्रत्ययासि आजि बरें. ॥५४॥
( वसंततिलका )
दोषज्ञ ! सेव्य ! सुचरित्रसुधैकसिंधो !
सर्वैकवंद्य ! नृपसत्तम ! दीनबंधो !
कां त्यागिलें मज वनीं ? करुणांबुवाहा !
त्वद्विप्रयोग बहु दारुण राघवा ! हा. ॥५५॥
त्वत्पादपद्मभजनाविण भारभूतें
या जीवितें करुनि केवळ भार भूतें. ।
टाकूं जरि त्वरित निंद्य कलेवराला,
विघ्नस्वरूप तव वीर्यनिषेक झाला ॥५६॥
( उपजाति )
वियोगभीतिस्तव विग्रहातें न लाविला चंदनलेप हातें;
मध्यें नदीपर्वतवृक्षलक्ष येउनि, झालासि कसा अलक्ष ? ॥५७॥
प्रसूति झाल्यावरि, देहनाथा ! करीन मी तीव्र तपःप्रयोगा; ।
जन्मांतरीं होउनीयां तुझी स्त्री, जेणें न पावे क्षण विप्रयोगा. ॥५८॥
( गीतिवृत्त )
स्वहृदय अशनिहुनि कठिण, हें तथ्यचि या क्षणीं मला कळलें. ।
विरहघनपतनविदलित आजुनि शतचूर्ण होइना जळलें. ॥५९॥
अंतर्वत्नी पत्नी त्यजिली त्वां, जेंवि पांसुला रामा. ।
हें काय विहित तुझिया कुळास, शीळास ? पंडिता ! रामा ! ॥६०॥
( वसंततिलका )
त्वत्पादनीररुहलंपट चित्त माझें;
त्याणेंहि आजि मजला त्यजिलें सखा जें. ।
होतां सदैव विपरीत, निजाप्तमित्रें
होताति, केवळचि हेतुविना, अमित्रें. ’ ॥६१॥
( उपजाति )
निरोप हा सांगुनि देवराला, सीता तयाला मग दे वराला. ।
म्हणे, ‘ तुतें क्षेम असो अशातें; सदा सुबुद्धे ! बहु पाव शातें. ॥६२॥
एवं कथावा रघुनंदनातें, निरोप हा, सांगुनि वंदनातें. ।
कळेल जैसें तुजला, कृपाळा ! जाऊनि तैसें विनवीं, नृपाळा. ’ ॥६३॥
( अनुष्टुप् )
ओकआत्मधनस्त्रीतें, ओक मानूनि मानसें, ।
तोकवद् रोदन तदा तो करी, ऐकतां असें. ॥६४॥
( वियोगिनी )
‘ विपिनीं वनदेवता सदा तुज रक्षूत, न दुःख हो कदा. ’ ।
मृदु बोलुनियां असें, तिला नमुनी, लक्ष्मण वीर चालीला. ॥६५॥
( शिखराणी )
अयोध्येला जातां, त्यजुनि तिजला तो बहु रडे,
तनू नेली कष्टें, परि मन तयाचें न मुरडे. ।
जसा वत्स स्वांबाविरहभवतापें तळमळे,
तसा हाही ज्याचें वदन रडतां केवळ मळे. ॥६६॥
( गीतिवृत्त )
नयनागोचर देवर झाल्यावर, ती पडे धरेवरती. ।
तळमळ करि, पळभरि कळ न पडे, करपद तिला न आंवरती ॥६७॥
( अनुष्टुप् )
जनहीन वनस्थानीं दीना, जनकनंदिनी, ।
राजरामा, रजोरिक्ता, रुचिराक्षी रवें रडे ॥६८॥
( सारंगवृत्त )
झाला दिसेना असा जे क्षणीं दीर, गेला तिचा तीस सोडूनियां धीर; ।
हृच्छोकवल्मीकभूकश्मलव्याळ चावे, धरी घट्ट मातेसि तत्काळ. ॥६९॥
( प्रमिताक्षरावृत्त )
गळतीसमान नयनें गळती; लपनें न येति धड आलपनें; ।
निजविग्रहासि उठवी निजवी; जनकात्मजा स्मरतसे जनका. ॥७०॥
( विबुधप्रिया )
शोक ल्यास्य करी हृदंगणिं कंथ केवल शोकला
कोमलाननपूर्णचंद्र तिचा तदा बहु कोमला ।
‘ कां पती रुसला ? म्हणे, सकळेंद्रियें बहु कांपती ।
भार तीस निजांग होय; वदे अशी मग भारती ॥७१॥
( गीतिवृत्त )
‘ जनकाची मी कन्या, रघुपतिची स्त्री, त्रिविष्टपीं मान्या,
तदपि अशी मदवस्था; शिव ! शिव ! लिहिलेंसि काय कमळस्था ! ॥७२॥
( वसंततिलका )
येईल लक्ष्मण फिरोनि न दूर गेला,
मद्धैर्यलोकविषयींच विनोद केला ।
कीं स्वप्न हा क्षणिक दुःखसुखप्रदाता ?
किंवा स्वकर्मफळ भोंगवितो विधाता ? ॥७३॥
( चंद्रिका )
रघुकुळतिळका ! मेदिनीपाळका !
सुहृदयपदका ! पापपंकोदका
सुहृदलिकमला ! नीरदश्यामला !
अतुलभुजबळा ! अग्नरक्षोबळा ! ॥७४॥
( भुजंगप्रयात )
प्रवर्तोनियां सर्वथा आग्रहाए, त्यजावें जरी येक्षणीं विग्रहातें, ।
तरी भ्रूणहत्येमुळें उग्र हातें करील स्वयें धर्म तो विग्रहातें ’ ॥७५॥
( गीतिवृत्त )
तोषधनाचे तस्कर, त्या सीतेचे असे विलाप वनीं ।
शिरले जेव्हां सत्वर दुःखप्रद ते चढोनियां पवनीं; ॥७६॥
शुक पिक सकल कलकलस्वरेंकरुनि भोंवतींच आरडती, ।
विविध पतगनिकररवच्छलेंकरुनि भूमिभूलता रडती ॥७७॥
टाकुनि नाट्यरसातें धांवुनि आले तिच्या समीप शिखी ।
शिंपुनि निज नेत्रजळें म्हणति, ‘ सतीच्या विझो प्रकोपशिखी ’ ॥७८॥
शिंपिति नेत्रजळांहीं स्वल्प शिवति भूमि धांवतां हरिणें; ।
स्वदुहितृशुगग्नितप्ता क्षिति म्हणउनि पोळती जणों चरणें ॥७९॥
शीतळकमळजळांहीं वर्षति तीच्या तनूवरि भ्रमरी. ।
निजवालधिचमरांहीं वीजिति तिस किंकरीपरी चमरी. ॥८०॥
सुमुद्रालसा, जलार्द्रा, ज्यांच्या सजळें करीं, शिरीं कमळें, ।
ऐशा करिणी सेविति तिस कर्णव्यजनमारुतें विमळें. ॥८१॥
उदकस्थखगगणांहीं धांवुनि ते शिंपिली जलकणांहीं. ।
करिति शकुंतद्विजवर पक्षच्छायेसि शीघ्र तीजवर. ॥८२॥
झालें हंसांचें कुळ तें व्याकुळ तेथ जानकीशोकें, ।
ज्यांच्या मुखनयनांहुनि गळति मृणालें जळें तदवलोकें ॥८३॥
( स्रग्धरा )
पंचास्यव्याघ्रऋक्षप्रभृतिवनचरें केवळ क्रूर सत्त्वें,
तींही तत्काळ झालीं सकरुणहृदयें भूसुताशुद्धसत्वें ।
जें सन्मार्गप्रचारेंकरुनचि असतें संग्रहीं पुण्य हो ! तें
सर्वव्यापन्महीध्रप्रशमनविषयीं वज्रवद् दक्ष होतें ॥८४॥
( तोटकवृत्त )
कुश, कंटक, गोक्षुर, संचरणीं चरणीं क्षतद स्वमुखें शिवती, ।
शिव ती परि भूपतिची रमणी रमणीयपदांसि जपे पतिच्या. ॥८५॥
( गीतिवृत्त )
निजजननी क्षिति, हेही क्षितिजा, जाणूनियां असें नातें, ।
आलिंगुनि समजाविति म्हणउनि धूलिस्वसा जणों तीतें. ॥८६॥
हृद्गत मी परि कांहीं इचा श्रमाचा नव्हेचि परिहार, ।
म्हणुनि जणों अश्रूतें गाळी मुक्ताफळच्छळें हार ! ॥८७॥
( शार्दूलविक्रीडित )
संगे घेऊनि वेदशास्त्रनिपुण च्छात्रांसि त्या काननीं
यूपार्थ भ्रमतां, क्रतुस्तव विलापातें तिच्या ऐकुनी
साक्षाद्भस्मजटाभृदीश्वर जणों मूर्ती जगत्पावनी
आला तेथ दयानिधान भगवान् वाल्मीकिनामा मुनी. ॥८८॥
( उद्गीतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं ।
हा चवथा अध्याय श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं. ॥८९॥