पंढरपूरचा परिसरच भगवद्भक्तांच्या पदस्पर्शांनी पावन झालेला आहे. पंढरपूरपासून १५/१६ मैलांवर असलेलं मंगळवेढे हे गाव. या गावाचं नाव ऐकताच चोखामेळ्याची आठवण होते, कान्होपात्रेची आठवण होते. याच मंगळवेढ्यात भक्त दामाजींचा जन्म झाला. वडील नैष्ठिक, ब्राह्मण. त्यांनी दामाजींकडून लहानपणीच गीता, भागवत, उपनिषदे यांचा अभ्यास करून घेतला. ज्ञानदेव - नामदेवांचे अभंग, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, यांचंही वाचन त्यांनी लहाणपणीच केलं. ऐन तारुण्यात दामाजींनी विठ्ठलभक्तीत स्वतःला लोटून दिलं. मुसलमानी राजवट. सर्व बाजींनी जनतेची राळचेपी. देवालये पाडून त्या जागी मश्जिदी, पीर, दर्गे बांधले जात होते. हिंदू सरदार वतनविस्तारासाठी व प्रजा नाईलाज म्हणून हे सहन करीत होती. आर्थिकदृष्ट्या वतनदार शिरजोर व बहुजन समाज सदा दारिद्र्याच्या खाईत लोटलेला. चातुर्वर्ण्यव्यवस्था समाजात भिनलेली होती. अशा परिस्थितीत दामाजी सर्वांची आस्थेने चौकशी करीत. नडलेल्यांना स्त्रीं - शूद्रं न पाहता मदत करीत. विठोबा महार त्यांच्या जिवाभावाचा. पांतस्थांना जेऊ घालत. दुर्गा देवीच्या दुष्काळानं तर कहर मांडला होता. खायल आन्न मिळत नव्हतं. कष्टाला दाम मिळाले तर दाम देऊन धान्य मिळेनासं झालं होतं. अशा परिस्थितीत दामाजी येईल त्याला मद करून त्याचे अश्रू पुशीत. एकदा पंत देवळात असेच ध्यानस्थ बसले होते. समाधी लागली होती. विठोबानं हाकामारून त्यांना जागृत केलं. समाधी अवस्थेत त्यांना ‘ जनी जनार्दन ’ दिसला आणि त्यांनी एकच निर्णय घेतला, सरकारी धान्याचं कोठार लुटायला लोकांना सांगायचं. हे ऐकून विठोबाची बोबडीच बळली. पण पंतांच्या आग्रहावरून त्यानं तशी दिवंडी पिटली. लोक भराभर आले, पंतांचे पाय धरले. आणि लोकांनी धान्याचं सरकारी कोठार लुटलं. उपाशीपोटी दिवस काढणार्यांनी पंतांना तोंड भरून दुवा दिला; तर सरकारी कचेरीत राहून माज आलेले लोक बादशहा पंतांना कोणती शिक्षा सुनावणार याची उत्कंठेने वाट पाहत राहिले. कृतज्ञताबुद्धी माणसाला मोठं करते; द्वेष, मत्सर यापोटी निर्माण होणारी कृतघन्ता माणसाला अधोगतीला नेते. असे अधोगत लोक समाजात कमी नसतात. त्यातल्याच एकानं ही घटना बादशहाला पत्र पाठवून कळवली ! आपल्या जिवावर औदार्य दाखवून हा लोकांकडून दुवा मिळवीत आहे, ही त्यातील खरी गोम होती. बादशहा संतापला त्यानं त्यांना गिरफ्तार करण्यासाठी आपले शिपाई पाठवले. पंत बेदरला निघाले. जाताना विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकवून अश्रूंनी त्याचे समचरण प्रक्षाळले, तोच त्यांना तारू शकत होता. जनता जनार्दनाचे आशीर्वाद पाठीशी घेतले आणि पंत बेदरला निघाले.
ते पोहोचण्याआधीच ‘ विठ्यामहारा ’ च्या रूपात पांडुरंगानं हाता काठी घेतली, एक मळकट चिंधोटी गुंडाळली. फाटकी बंडी घातली. डोईवर फाटकं पागोटं ठेवलं आणि बेदरची वाट धरली. हातात एक मळकं गाठोड. दरबारात येऊन ‘ होहार मायबाप, मी विठ्या महार ’ म्हणून ओळख दिली. ‘ पंतांना गिरफ्दार करायचं काहीच कारण नाही, हे घ्या लुटलेल्या धान्याचं दाम ’ म्हणून गाठोड्यातल्या मोहरा खळखळा ओतल्या. बादशाचे डोळे ते पाहून विस्फाटले. ‘ खाविन्द, मोजून घ्या अन् पावती करा ’ म्हणून विठ्यानं सांगितले. बादशहानं विचारलं, ‘ तू स्वतःला विठ्या महार म्हणवतोस, पण खरे सांग तू खरा कोण आहेस ? ’ विठ्या म्हणाला, ‘ खाविंद, मी विठ्यामहारच आहे. मंगळवेढ्याचा राबता महार दामाजी पंतांचा. ’ विठ्या महाराच्या रूपात साक्षात पंढरीनाथ बादशहासमोर उभा होता. नंदाघरी गायी राखणारा, गुराखी, अर्जुनाचा रथ हाकणारा, घोडी धुणारा, नाथांघरी कावडी वाहणारा तो हाच; पंढरीचा पांडुरंग. ’
विठ्या महारानं बादशहासमोर कागद ठेवला. अक्षर दामाजींचंच. मजकूर होता, ‘ राजाधिराज, भूपती, सेवेसी दामाजीपंत विनंती अर्ज ऐसा जे, आपल्या देशात दुष्काळ पडला. अन्न महाग झालं. आपल्या कोठारातील सातशे खंडी धान्य मी विकलं,ए रूपयाला एक पायली या दरानं. त्याचे दाम या विठू महाराबरोबर पाठवीत आहे. विठू नाईक हा आमचा कुलअख्त्यार राबता आहे. तो तुम्हांस सर्व हिशेब देईलच कळावे, ही खाविंदचरणी विनंती. ’ बादशहा हिशेबनिसाकरवी हिशेब करून दाम मोजायला लागला तो दाम संपेनातच ! बादशहाला सर्व समजले. त्यानं विठ्या महाराचे पाय धरले, क्षमा मागितली, बादशहानं पोच पावती दिली. विठ्यामहार निघून गेला.
तेवढ्यात पंत अपराधी मनानं बादशहाच्या दरबारात आले. बादशहानं सन्मानानं त्यांना वागवले. दोघांचे संभाषण झाले. कोठारातील धान्याचं दाम मिळालं, आत्ताच विठ्या महार देऊन गेला असं बादशहानं सांगितलं. पंतांच्या ध्यानात काहीच येईना. ‘ मी कधीच विठ्यामहाराला पाठवलं नाही ’, म्हणून त्यांनी बादशहाला सांगितलं. शेवटी बादशहानं खरी हकीगत सांगितली व पंतांना नमस्कार केला. देव भक्ताच्या हाकेला धावून आला होता व देवदूत पंतांच्या रूपानं जनताजनार्दनाची काळजी वाहत होता.
इतिहासाचार्य राजवाडे एका जुन्या महजरावरून विठ्या महाराची ही घटना सत्य असल्याचे सांगतात. या महजरात असे नमू केले आहे की, ‘ हकदर उपकार पोटास भाकरी व बसावयास जागा करून दिली. धडुत, पांघरूण कृपा करून दिले. ’ हा हुकूम बादशहाचाच होता. या हुकुमाच्या एका नकलीत पुढे म्हटले आहे, ‘ देणे पाछायचे व दामाजीपंत यांचे हातचा कागद असे. विठ्यामहार मंगळवेढ्याचा पाछायचे कामी पडला म्हणून बादशहाणी विठ्या महारास हाक्मारून दिल्हे. ’ बेदरच्या किल्ल्यात आणि गावाच्या वेशीत आजही विठ्या महाराच्या पाऊलखुणा दाखवितात. कोठार लुटलेल्या घटनेची स्मृती म्हणून प्रतिवर्षी वैशाखी पौर्णिमेस दामाजींची पुण्यतिथी साजिरी होते.
राजवाडे यांचे म्हणणे खरे असले तर इतिहासाचे पुराणीकरण होऊन वरील चमत्कारपूर्ण घटना लोकमानसात रूढ झाली असावी व एकप्रकारे इतिहासाचे हे दिव्यीकरण झाले असावे, असे म्हणता येईल.