जोगा परमानंद
संतांची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात.
जोगा परमानंद यांची जन्मतिथी उपलब्ध होत नाही. त्यांचा समाधिकाळ मात्र शके १२६० / इ. स. १३३८ असा सांगितला जातो. मार्गशीर्ष वद्य ४ ही त्यांची पुण्यतिथी. महीपतींनी ‘ भक्तविजया ’त त्यांची माहिती दिली आहे. त्यानुसार हे जातीने शूद्र होते. काही ठिकाणी ते तेली असल्याचे सांगण्यत येते. ‘ परमानंद ’ हे त्यांचे गुरू होते. बार्शीचे ते राहणारे. बार्शीच्या भगवंताचे आणि पंढरपूरच्या पांडूरंगाचे ते निःस्सीम भक्त होते. महीपती त्यांच्याविषयी म्हणतात, ‘ जोगा परमानंद भक्त । बारस्त ग्रामात होता राहात । अखंड आणि विरक्त । वैराग्य भरित सर्वदा ॥ ’ त्यांच्या साधूवृत्तीमुळे आणि कडकडीत वैराग्यामुळे ते लोकादरास पात्र झाले होते. बार्शी येथे त्यांची समाधी आहे. मार्गशीर्ष व. चतुर्थीस त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव अजूनही साजरा होत असतो.
त्यांचे कवित्व भक्तिभावसंपन्न आहे. त्यांनी काही अभंग, पदे आणि आरत्या रचल्या आहेत. ‘ बैसोनी संतांघरी हो । घेतला गुरगुडी हो ’ हे त्यांचे ‘ गुरगुडी ’ नावाचे पद रूपकात्मक असून ते लोकप्रिय झाले आहे.
रोज भगवंताच्या दर्शनास जात असताना तोंडाने एकेक गीतेचा श्लोक म्हणायचा आणि एकेक दंडवत घालायचा असा त्यांचा नित्यनेम असे. त्यात एक दिवस नेसत्या पितांबराचा मोह पडल्याने आरतीची वेळ चुकली. या प्रसंगाने त्यांच्या मनाने कायमची विरक्ती घेतली. त्यांची ‘ गुरगुंडी ’ वाचण्यासारखी आहे -
बैसोनी संताघरीं हो । घेतली गुरगुडी ॥धृ०॥
आधी ब्रह्मांड नारळ । मेरू सत्त्व तो अढळ । निर्मळ सत्रावीचे जळ । सोहे गुरगुडी, गुरू गोडी ॥१॥
चिलमी त्रिगुण त्रिविध । वैराग्य विरळ धडधडीत ॥२॥
सावधान लागुनिया नळी । मीपण झुरका विरळा गिळी । जन्म मरणाची मुरकुंडी सांभाळी । धूर विषयाचा सोडी ॥३॥
लागला गुरूगोडीचा छंद । त्याला प्रसन्न परमानंद । जोगा स्वामी तो अभंग । गुरूचरण न सोडी ॥४॥
आपल्या व्यवसायावर रचलेली आध्यात्मिक रूपके आतापर्यंत पाहिली; पण व्यसनावर रूपक रचणारा हा पहिलाच संतकवी. !
N/A
References : N/A
Last Updated : March 08, 2017
TOP