अध्याय सहावा
श्रीनित्यानंदतीर्थविरचित श्रीमार्कण्डेयपुराणांतर्गत श्रीदेवीविजय.
॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऋषी म्हणे देवी वचन ऐकून ॥ दूत झाला क्रोधायमान ॥ शुंभ दैत्यापाशी जाऊन ॥ विस्तारें वर्तमान सांगितलें ॥१॥
त्या दूतमुखें वाक्यशर ॥ ऐकूनि हृदयीं खोंचला असुर ॥ क्रोधें खवळला दैत्येश्वर ॥ धूम्रलोचना असुर काय बोले ॥२॥
धूम्रलोचना तूं लौकर ॥ स्वसैन्य घेऊनिया समग्र ॥ तीचे केश धरूनि फरफर ॥ वोढीत सत्वर आणि तिसी ॥३॥
तीचा कोण्ही असेल रक्षक ॥ जरी झाला उभा देख ॥ देव हो कां किंवा आणीक ॥ यक्षराक्षसप्रमुख जरी मारावें ॥४॥
ऋषी म्हणे त्याच्या आज्ञेनें ॥ दैत्य जो कां धूम्रलोचन ॥ साठिसहस्न असुर सैन्य ॥ घेऊनि आपण निघाला ॥५॥
त्यानें ते देवी पाहिली ॥ हिमाचळी होती बैसली ॥ चाल म्हणोनि मारी मोठी आरोळी ॥ शुंभनिशुंभाजवळी वेगेसी ॥६॥
तूं प्रीतीनें जरी न येसी ॥ आमुच्या दैत्येश्वरापासी ॥ फरफरा बळें धरूनि केशीं ॥ वोढीत त्यापाशी नेईन मी ॥७॥
देवी म्हणे शुंभे तुज धाडिलें ॥ तुझें बळसैन्यही आगळें ॥ मज नेशीलचि तूं बळें ॥ माझे काय चाले तुझ्यापुढें ॥८॥
ऋषी म्हणे ऐसे भाषण ॥ ऐकूनि धांवला धूम्रलोचन ॥ हुंकारेचि भस्म जाण ॥ केलें अंबेनें तयासी ॥९॥
महासैन्य क्रोध पावले ॥ असुराचें देवीनें पाहिलें ॥ तीक्ष्ण शरवृष्टी ते वेळें ॥ आणीकही जाज्वल्य शक्ती परस्वध ॥१०॥
तेव्हां कोपें केश पिंजारून ॥ भयंकर गर्जना करूनि जाण ॥ लोटला सैन्यावरी आपण ॥ देवीवाहन सिंह तो ॥११॥
कोणासी करी करप्रहार ॥ मुखें करूनचि थोरथोर ॥ अधरें करूनि अन्य वीर ॥ मारिले अपार महासुर ॥१२॥
कोणासी टाकिलें फाडून ॥ सिंहनखें कोठा टाकी फोडून ॥ तैसेंचि करें हाणून ॥ शिर सिंहानें तोडिलें ॥१३॥
छिन्न बाहू छिन्न शिर ॥ करूनि टाकिलें असुर ॥ आणिकाचे पान करी रुधिर ॥ कोठा फोडूनि अपार सिंह तो ॥१४॥
क्षण न लागतां दैत्यसैन्य ॥ मृत्यूशी केलें बळिदान ॥ सिंह तो देवीचे वाहन ॥ कोप दारुण तयाचा ॥१५॥
देवीनें धूम्रलोचना मारिलें ॥ ऐसें त्या असुरानें ऐकिलें ॥ सैन्यही समग्र नाशिलें ॥ सिंहे तत्काळ देवीच्या ॥१६॥
दैत्यपतीशी कोप आला ॥ शुंभ ओंठ चावूं लागला ॥ महाअसुरा चंदमुंडाला ॥ बोलतां झाला ते काळीं ॥१७॥
चंडमुंडहो तुम्ही दोघें ॥ स्वसैन्यही घेऊनि अवघें ॥ तेथें जाऊनिया वेगें ॥ आणा शीघ्र तिजलागीं ॥१८॥
केश धरून अथवा बांधून ॥ युद्धीं संशय पावेल मनें ॥ तुम्ही सर्व आयुधें घेऊन ॥ टाका मारून तयासी ॥१९॥
तया सिंहाही मारिल्यावरी ॥ हतवहान दुष्ट स्त्री ॥ बांधूनि आणा लौकरी ॥ अथवा धरूनि करी केशासी ॥२०॥
ऐसी कथा सुमेधा ऋषी ॥ सांगितली सुरथ राजासी ॥ तेचि कथा मार्कंडेय ऋषी ॥ भागोरी ऋषीसी सांगत ॥२१॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराणसंमत ॥ नित्यानंद श्रोत्या विनीत ॥ होऊनि सांगे षष्ठाध्याय ॥२२॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ षष्ठाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय षष्ठाध्याय समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2017
TOP