अध्याय १ ला - श्लोक ४१ ते ४३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


व्रजंस्तिष्ठन्पदैकेन यथैवैकेन गच्छति । यथा तृणजलूकैवं देही कर्मगतिं गतः ॥४१॥

जैसा पुरुष पंथीं चाले । भूमि धरूनि पुढील पाउलें । मग उचली जैसा मागिलें । तैसें घडे देहांतीं ॥७३॥
अथवा तृणावरील आळी । अन्यतृणातें कवटाळी । मग सोडूनि होय वेगळी । जेवीं मागील तृणशाखा ॥७४॥
पूर्वकर्मजनित संस्कार । तो अधिष्टूनि अहंकार । सोडी प्राक्तनशरीर । हा विचार मीमांसा ॥६७५॥
ऐकें राया भोजपति । ऐसें सांख्याचिया मतीं । त्याग स्वीकार देहाप्रति । आत्मनिश्चिति ती अविनाश ॥७६॥

स्वप्ने यथा पश्यति देहमीदृशं मनोरथेनाभिनिविष्टचेतनः ।
दृष्टश्रुताभ्यां मनसाऽनुचिंतयन्प्रपद्यते तत्कमपि ह्यपस्मृतिः ॥४२॥

हेंचि स्वप्नदृष्टांतरीती । विचारूनि पाहें चित्तीं । तरी मनेंच देह धरिजेति । कोणें रीतीं तें ऐक ॥७७॥
मनें कल्पिलें चराचर । देखे ऐके सुरासुर । रायरंक लहानथोर । हा संस्कार ठसावे ॥७८॥
पूर्वीं अत्यंत देखिलें दुःख । श्रवणीं ऐकिले नाना नरक । तोचि अंतरीं बैसला धाक । भोगी पातक संस्कारें ॥७९॥
स्वप्नीं चोर व्याघ्र विखार । घोर नरक यमकिंकर । देखे आपुलेंही शरीर । ग्लानिपर महादुःखी ॥६८०॥
रडे पडे आणि ओरडे । पळे आरंबळे आणि दडे । स्थूल देह येरीकडे । सुखें पहुडे मंचकीं ॥८१॥
परि तयाचा पडे विसर । जैसा पापें दुःखसंस्कार । सत्यस्वप्नीं तें शरीर ।  मानूनि थोर वोसणे ॥८२॥
पूर्वदेहाच्या विसरें । स्वप्नींचें देह होय खरें । पूर्वील भेटविजे जागरें । तेव्हां तेंचि खरें स्वप्न मिथ्या ॥८३॥
तैसाचि पुण्याच्या संस्कारें । लाहे सुरनरपुण्यशरीरें । सुखोल्हासें आनंदभरें । हास्य गजरें वोसणे ॥८४॥
जरी पूर्वदेहाची नोहे स्मृति । तरी कोण म्हणेल ती सुषुप्ति । मृत्यु अत्यंत विस्मृति । हें श्रुतिस्मृतिसंमत ॥६८५॥
कर्मसंस्कारजनित देह । अधिष्ठूनि देही राहे । पूर्वदेहस्मृति न लाहे । मृत्यु पाहें या नांव ॥८६॥
प्रारब्धभोगाची समाप्ति । तेचि आयुष्याची शांति । चैतन्य न थरे नाशवंती । पंचभूतीं उपरम ॥८७॥
भौतिकाचा होय लय । महाभूतीं तें समाये । केव्हां कोठें होतें काय । हा अन्वय मग कैंचा ॥८८॥
जें जाणतें चराचरा । तेणें मानिलें अन्य शरीरा । पूर्वदेहाचिया विसरा - । माजीं पसारा तो लोपे ॥८९॥
न होतां सुषुप्तिगर्भींचें स्वप्न । कोणी कल्पना करी ध्यान । दृढ लागतां अनुसंधान । होय विस्मरण देहाचें ॥६९०॥
पुण्यसंस्कारें देवताध्यान । पापसंस्कारें विषयचिंतन । मोक्षप्राप्तीसि आत्मज्ञान । निरावलंबन स्वस्वरूप ॥९१॥
स्वसुखानुभवाचा अवलंब । तोंवरी द्वैताचें थावे थोंव । पुन्हा फुटे प्रपंचकोंभ । स्वसुखलाभ अंतरे ॥९२॥
पूर्वकर्माचे संस्कार । तैसे मनाचे विकार । तेणें इंद्रियां व्यापार । तो प्रकार क्रियमाण ॥९३॥
क्रियमाणाचें होय संचित । संचितें पुन्हा प्रारब्ध घदत । ऐसे देह होत जात । अकस्मात न मागतां ॥९४॥
देही कर्मापाठीं लागे । जैसें वत्स धेनूमागें । सदा कर्माधीन वागे । कदा वाउगें न करावें ॥६९५॥
म्हणोनि जाणोनि पुरुषें । पुण्य जोडावें भूततोषें । पाप जोडेव भूतद्वेषें । कदा ऐसें न करावें ॥९६॥
निरपराध आणि कामिनी । भगिनी विवाहपर्वणि । वधितां देहाचिये रक्षणीं । पापकरणी हे राया ॥९७॥
केलें अवश्य भोगावें । तरी कां आचरणीं चुकावें । पातक सहसा नाचरावें । जीवें भावें भोजपा ॥९८॥
म्हणसी नानाविधें कर्में करिती । तरी नाना देहाची घडावी प्राप्ति । कोणी एक देहप्राप्ति । कोण रीतीं तें ऐका ॥९९॥

यतो यतो धावति दैवचोदितं मनो विकारात्मकमाप पंचसु ।
गुणेषु मायारचितेषु देह्यसौ प्रपद्यमानः सह तेन जायते ॥४३॥

देहासि येतां मरण । मायारचित जे कां गुण । फलाभिमुखें दैवें जाण । विकारीं मन प्रेरिती ॥७००॥
स्वस्वरूपीं अनवधान हेंचि मायेचें लक्षण । विसरामाजीं विपरीत ज्ञान । तेथ पंच गुण उपजती ॥१॥
शब्द स्पर्श रूप रस गंध । हा गुणसमूह पंचविध । इहीं गुणीं चैतन्य बद्ध । असावध नुमजेची ॥२॥
घनावली गुणाची भ्रांति । तेच पंचभूतांची व्यक्ति । पुढें अनेक देहाकृति । होती पंच भौतिकें ॥३॥
नरदेहाच्या परिसमाप्ती - । पर्यंत अनेक कर्में घडती । त्यांमाजीं आरंभकाची गति । करी उत्पत्ति प्रारब्धा ॥४॥
जैसें कार्तिकीं कृत्तिकायोगें । स्कंददर्शनप्रसंगें । विप्रदेह धरणे लागे । सप्तजन्म अभंग ॥७०५॥
शूद्रासि विप्रयोनीच प्राप्त । वैश्य विप्र होऊनि धनवंत । क्षत्रिय वेदपारंगत । ब्राह्मण विरक्त मुमुक्षु ॥६॥
सप्तजन्मांचें कारण । पुण्य स्वामीचें दर्शन । तैसें पापें उदाहरण । कैसें कोण परिसावें ॥७॥
अल्प करितां गुरुहेलन । सहस्र जन्म होईजे श्वान । पुढें होणें चांडाळपण । कोटी जन्म अचूक ॥८॥
एका कर्माचिया पोटीं । इतुक्या जन्मांची असे गांठी । ते न लगतां शेवटीं । कैंची गोठी सुटिकेचि ॥९॥
ऐशीं अनेक कर्मबीजें । भोगीं आरंभिलें तें आरंभक म्हणिजे । तितुकीं भोगिलियाविण दुजें । कदा न कीजे अन्यथा ॥७१०॥
म्हणुनि देहाच्या निर्याणीं । आरंभकाची अनुक्रमणी । देवतिर्यगादि नाना योनी । तेचि होऊनि परिणमे ॥११॥
दैव म्हणजे कर्मसंस्कार । तेणें मानस सविकार । प्रेरिलें होत्सातें अनिवार । वेगवत्तरें धांवतें ॥१२॥
मायारचित जे कां गुण । भ्रमे तयांसि देखोन । आरंभकाच्या क्रमे जाण । देहाभिमान ठसावे ॥१३॥
तेचि कोणीएक देह । पावोनि योनि जन्म लाहे । प्रारब्धक्षयें होय लय । पूर्वदेहस्मृतीचा ॥१४॥
ऐसें जेथ जेथ धांवे मन । तें तें होऊनि पावे जनन । आत्मा निर्लेप निर्गुण । अहंबंधन त्या नाहीं ॥७१५॥
लिंगदेहावच्छिन्न जीव । प्रारब्धसंस्कारसंभव । मनोविकार अहंभाव । भोगी भव तत्संगें ॥१६॥
म्हणसी देह मात्र होईल प्राप्त । परि हा राजदेह दुर्लभ बहुत । याच्या रक्षणें घडो दुष्कृत । प्रेम बहुत मज याचें ॥१७॥
येचि अर्थीं ऐकें राया । ऐशी अगाध दैवी माया । प्राणिमात्रीं प्रियतम काया । विवेकिया हें उमजे ॥१८॥
आत्मा अविनाश उदास । नेणे कर्म ना अध्यास । त्यासि कैंचा गर्भवास । रागद्वेश तो नेणे ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP