अध्याय १ ला - श्लोक ५१ ते ५५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


विपर्ययो वा किं न स्याद्गतिर्धातुर्दुरत्यया । उपस्थितो निवर्तेत निवृत्तः पुनरापतेत् ॥५१॥

जरी अदृषटचि बलिष्ठ । तरी पुत्रहस्तें हा पापिष्ट । होईल मृत्युमुखीं प्रविष्ट । सर्व कष्ट हरतील ॥१२॥
बालकहस्तें मरेल दैत्य । कैसें घडेल हें विपरीत । तरी दैवरेखेचें हें कृत्य । कोण असत्य करील ॥१३॥
म्हणोनि आजिचिये आघातीं । पुत्रार्पणाचि बलिष्ठ युक्ति । चुकविलाही ग्रासील पुढती । तैं दोष मजप्रति असेना ॥१४॥
देवकी सुटल्या आयुष्मती । वर्तों आनंदें दंपती । कालांतरें मृत्युप्राप्ति । सर्वांप्रति अलोट ॥८१५॥
कालांतरीं ब्रह्मादिक । मृत्यु पावती आवश्यक । त्या मरणाचा घेती धाक । परम मूर्ख अविवेकीं ॥१६॥
आजिचा चुकविल्या अनर्थ । काळांतरीं करील घात । माझा अपराध काय एथ । श्रीभगवंत जाणता ॥१७॥
अथवा देवकीमरणें कंसासुर । वांचलाचि हा निर्धार । त्यासि माझाच हा विचार । जरि रुचिकर लागला ॥१८॥
तरी देवकीचे उदरीं । अवंश्य जन्मेल कंसवैरी । आजि चुकलाही काळांतरीं । यासि संहारी अदृष्टें ॥१९॥
अथवा अलोट अदृष्टगति । म्हणूनि मज हे स्फुरली मति । येणें बोधेल जरी दुर्मति । तरी गगनोक्ति यथार्थ ॥८२०॥
ऐसा करूनि विचार । अदृष्टवितर्कोपसंहार । वसुदेव करे तो प्रकार । ऐक साचार परीक्षिति ॥२१॥
प्राणियांच्या अनेक जाती । त्यांच्या अदृष्टाच्या गति । तर्कें जाणेल आपुल्या चित्तीं । ऐसा त्रिजगतीं असेना ॥२२॥
तेचि सदृष्टांत मात । वसुदेव पुढिलिया श्लोकांत । हृदयीं चिंतील तो वृत्तांत । शुक सांगत रायासी ॥२३॥

अग्नेर्यथा दारुवियोगयोगयोरदृष्टतोऽन्यन्न निमित्तमस्ति ।
एवं हि जन्तोरपि दुर्विभाव्यः शरीरसंयोगवियोगहेतुः ॥५२॥

काष्ठें म्हणिजे स्थूलशरीरें । योनिभेदें देहांतरें । पावकजीव चैतन्याकारें । तेथ अवतरे अदृष्टें ॥२४॥
वनीं चेतोन अंगार । व्यक्त होय काष्ठाकार । निकटें चुकती पेटती दूर । हें विचित्र अदृष्टें ॥८२५॥
एक काष्ट जुनाट मोठें । त्यासि जाळी काष्ट धाकुटें । तैसा मत्पुत्रें कंस निवटे । हें उफराटें न म्हणावें ॥२६॥
नाना योनि पावें जंतु । शरीरसंयोगवियोगहेतु । यासि अदृष्टाविण तंतु । हा वृत्तांतु अतर्क्य ॥२७॥
ऐशी दुर्विभाय्व ब्रह्मरेखा । कोण करूं शके तर्का । आतां मंत्र हाचि निका । या अंतका टाळावया ॥२८॥

एवं विमृश्य तं पापं यावदात्मनिदर्शनम् । पूजयामास वै शौरिर्बहुमानपुरःसरम् ॥५३॥
प्रसन्नवदनाम्भोजो नृशंसं निरपत्रपम् । मनसा दूयमानेन प्रहसन्निदमब्रवीत् ॥५४॥

आपुले प्रज्ञेची पुरे अवधि । तंववरी आलोचिली बुद्धि । मग तो वसुदेव विवेकनिधि । कंसा बोधी गौरवें ॥२९॥
निर्लज्ज जो लोकापवादीं । क्रूर जैसा हाडदंदी । पापात्मा जो विश्व निंदी । हित मानूनि अनुसरता ॥८३०॥
ऐशिया दुष्टा कंसाप्रति । हृदयीं विवंचिली जे युक्ति । गौरवूनि वृष्णिपति । सस्मितोक्ति अनुवादे ॥३१॥
हृदयीं धडकला दावानळ । धैर्यें झाला अविकळ । सुप्रसन्न वदनकमळ । हास्ययुक्त बोलणें ॥३२॥
जैसा क्षीराब्धीच्या मथनीं । बळीतें बोधी भिदुरपाणि । नातरी कचें मृदुभाषणीं । संजीवनी साधिली ॥३३॥
ऐशी कार्यी देऊनि दृष्टि । विषम गिळूनि ठेविलें पोटीं । मग आदरिली स्नेहगोष्टी । जेणें कपटी विश्वासे ॥३४॥
म्हणे ऐकें गा भोजपति । माझे अंतरींची ऐशी मति । कल्याण व्हावें तुजप्रति । आणीक अपकीर्ति न शिवावी ॥८३५॥
देवकी ऐशिया आणिक नारी । प्रस्तुत आहेत माझे घरीं । पुढें तुझिया स्नेहादरीं । हे धरित्री मज वश्य ॥३६॥
देवकीपाणिग्रहणोपाय । हा तंव तुझाचि अभिप्राय । तुज वेगळा लाभ काय । अंगनेचा भोजेंद्रा ॥३७॥
तूं कल्पतरूचें रोप । देवकीपुष्करपादप । तूं गगनगर्भींचा दीप । ग्रावरूप देवकी ॥३८॥
तुज प्राप्त होतां मरण । देवकी वांचोन लाभ कोण । मस्तक देऊन रक्षिजे चरण । शहाणपण हें तैसें ॥३९॥
तरी कां वर्जितोसि म्हणसी अज । कांहीं रहस्य ऐकें गुज । झणें अकीर्ति आतळे तुज । जो तूं भोजकुळमणि ॥८४०॥
अकीर्तीच्या स्पर्शा भेणें । समरंगीं प्राण देणें । राज्यदानाचिये दक्षिणे । सकुटुंब विकणें पैं एकीं ॥४१॥
वामनें त्रिपाद भागोनि धरा । बळी बांधोन केला घाबिरा । तेणें ओपोनि स्वशरीरा । अकीर्तिवारा चुकविला ॥४२॥
ऐशिया अनेक उपपत्ति । तुज सर्वज्ञा सांगो किती । परंतु एक स्फुरली युक्ति । तें तूं सुमति अवधारीं ॥४३॥
अकीर्तीचा न लगे डाग । तव मृत्यूचा होय भंग । देवकीचा स्नेहप्रसंग । तो अव्यंग वाटेल ॥४४॥
मरणा समान रोग हरे । जिव्हे आवडे तें गोडिरे । पथ्य पचक जेथ न सरे । ओखद खरें अमृतचि ॥८४५॥
तैशी योजिली एक गोठी । ते तूं घेई कर्णपुटीं । जरी मानेल तुझ्या पोटीं । ते रहाटी मग करूं ॥४६॥
शुक म्हणे गा परीक्षिती । ऐसा गौरवूनि भोजपति । वसुदेव सांगे युक्ति । जे निजचित्तीं योजिली ॥४७॥

वसुदेव उवाच - न ह्यस्यास्ते भयं सौम्य यद्वै साहाशरीरवाक् पुत्रान्समर्पयिष्येऽस्या यतस्ते भयमुत्थितम् ॥५५॥

जे बोलिली गगनवाणी । ते तूं पाहें विचारूनि । सहसा भय इजपासोनि । तुजलागोनि असेना ॥४८॥
तूं भगिनीचा स्नेहाळ । चंद्राहूनि सुशीतळ । सोमवंशींचा भूपाळ । सुमंगल स्वभावें ॥४९॥
देवकी प्रत्यक्ष लेंकरूं । तुजशीं न करी वैराकारू । माझे अंतरींचा निर्धारू । तो प्रकार अवधारीं ॥८५०॥
गर्भ अष्टम इच्या पोटीं । होऊनि तूतें जरी निवटी । ऐशी गगनवाणीची गोठी । तुझ्या पोटीं भयजनक ॥५१॥
तरी तूं देवकीसि न मारीं । गर्भ होतांच इच्या उदरीं । मी ओपीन तुझ्या करीं । मग तूं करीं यथोचित ॥५२॥
ज्यापासूनि भय उत्पन्न । तो तंव अष्टमगर्भचि जाण । जरी शंकेल तुझे मन । तरी अर्पीन आठही ॥५३॥
मेघापोटीं विद्युत्पात । म्हणूनि न दूषिती जीमूत । प्रसूतिकाळीं स्त्रियांस घात । म्हणूनि सुरत न त्यजिती ॥५४॥
अन्नाशनीं रोगोत्पत्ति । म्हणोनि भोजना कोणी त्यजिती । एवं विषमाचिये खंती । सुखविश्रांति न टाकावी ॥८५५॥
अन्न न टाकिजे उष्णत्वगुणें । फणस न टाकिजे कंटकाभेणें । पाटीच्या विषमयरावें रावणें । कोणी शहाणे न टाकिती ॥५६॥
मूळावरी जन्मला सुत । म्हणूनि त्याचा करूनि घात । ऐसा कोण या लोकांत । चिरंजीवित दाखवीं ॥५७॥
सकंटक दुःखद चरण । म्हणोनि न करावें छेदन । नानाशिरोरोगभयें लवन । निज मौलाचें न करावें ॥५८॥
तेथ करावी रोगनिवृत्ति । भेषजोपाय नेणो किती । स्वमौलाची अलंकृति । निजविश्रांतिदायक ॥५९॥
गर्भभयें देवकीवध । हा प्रत्यक्ष महाप्रमाद । देवकी रक्षूनि गर्भें खेद । तोचि विशद निवारीं ॥८६०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP