अध्याय ११ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - गोपा नंदादयः श्रुत्वा द्रुमयोः पततो रवम् ।
तत्राऽऽजग्मुः कुरुश्रेष्ठ निर्घातभयशंकिताः ॥१॥
शुक म्हणे गा कुरुनायका । गोकुळवासियां नंदप्रमुखां । द्रुमपतनाचा ऐकोनि खडका । झाली शंका मानसीं ॥४७॥
विद्युत्पात मानूनि सर व। बल्लवबल्लवीसमुदाव । मिळाले धरूनि म्हणती भेव । महा अभिनव वर्तलें ॥४८॥
भूम्यां निपतितौ तत्र ददृशुर्यमलार्जुनौ । बभ्रमस्तदविज्ञाय लक्ष्यं पतनकारणम् ॥२॥
भूमीं पडले उन्मळून । देखती ते यमलार्जुन । त्यांच्या पतनाचें कारण । प्रत्यक्ष असोन नेणती ॥४९॥
बद्ध उलूखल - दामोदर । येणें उन्मळले तरुवर । प्रकट लक्षूनि ते समग्र । करिती विचार पतनाचा ॥५०॥
नेणोनि त्याची अचिंत्य शक्ति । तेथ बल्लव भ्रम पावती । उखळेंसहित कृष्णमूर्ति । देखोनि करिती वितर्क ॥५१॥
उलूखलं विकर्षंतं दाम्ना बद्धं च बालकम् । कस्येदं कुत आश्चर्यमुत्पात इति कातराः ॥३॥
भ्रांतिवितर्कप्रकारु । म्हणती राक्षसें उपटिले तरु । हें राक्षसी कर्म घोरु । इतर करूं न शकता ॥५२॥
उखळ दांवें बांधिलें पोटीं । मृणालकोमळ अंगयष्टि । बाळक खेळतां तळवटीं । वृक्ष उत्पाटी हे कवण ॥५३॥
उखळ ओढितां वासुदेव । अर्जुनातळवटीं हें अभिनव । झालें कोण्या कारणास्तव । उत्पातभेव मानिती ॥५४॥
बाला ऊचुरनेनेति तिर्यग्गतमुलूखलम् । विकर्षता मध्यगेन पुरुषावप्यचक्ष्महि ॥४॥
तंव तीं बाळें धाकुटीं । बोबड्या बोलीं सांगती गोष्टी । म्हणती आम्हीं देखिलें दृष्टीं । यथार्थ पोटीं मानावें ॥५५॥
उखळ ओढीत जनार्दन । गेला तरुवरांमधून । आडवें उखळ पडतां कृष्ण । बळें कर्षण करितां तें ॥५६॥
उभय कोटी दोहींकडे । यमलार्जुनीं तें उखळ अडे । बळें ओढितां कडाडें । दोन्ही झाडें उपटलीं ॥५७॥
झाडें पडतांचि भूमीशीं । सूर्या ऐसे तेजोराशि । द्रुमार्जुनीं निघाल्या पुरुषीं । श्रीकृष्णासी वंदिले ॥५८॥
हात जोडूनि उभे ठेले । कांहींबांहीं बहु बोलिले । फिरोनि कृष्णाभोंवताले । नमूनि गेले नभःपथें ॥५९॥
आम्हीं प्रत्यक्ष हें देखिलें । म्हणोनि बाळकीं सांगितलें । तार्किकीं सत्यत्वें न मानिलें । इतरीं मानिलें संशयें ॥६०॥
न ते तदुक्तं जगृहुर्न घटेतेति तस्य तत् । बालस्योत्पाटनं तर्वोः केचित्संदिग्धचेतसः ॥५॥
केवळ बाळक रिंगमाण । याचेनि द्रुमांचें उन्मूलन । हें तो केवळ अघटमान । बालभाषण अलीक ॥६१॥
एक म्हणती पूर्वीं येणें । गाडा मोडिला पदचालनें बाळें कथितां यथार्थ नमनें । परी हें करणें याचेंची ॥६२॥
यशोदा धर्षितां मृद्भक्षणीं । विश्व दाविलें मुख पसरूनि । ऐशी याची अतर्क्य करणी । मिथ्या कैसेनि म्हणावी ॥६३॥
होय न होय हा अनुवाद । अवघेचि संशयें संदिग्ध । भ्रांत झाले विबुधाबुध । करिती विविध वितर्क ॥६४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 28, 2017
TOP