अध्याय ११ वा - श्लोक ५१ ते ५५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रुत्वा तद्विस्मिता गोपा गोप्यश्चातिप्रियादृताः । प्रेत्यागतमिवौत्सुक्यादैक्षन्त तृषितेक्षणाः ॥५१॥

तें ऐकोनि व्रजनिवासी । गोपी गोपाळ विस्मयासी । पावोनि सप्रेम मानसीं । श्रीकृष्णासी लक्षिती ॥२८०॥
कोणी मरोनि स्वर्गा गेला । तेथूनि पुढती भेटों आला । जेंवी तो अलभ्य लाभ झाला । तेंवी मानिला उत्साह ॥८१॥
तेणें उत्साहें नरनारी । कृष्ण प्राशूनि नेत्रद्वारीम । नेऊनियां अभ्य़ंतरीं । मूर्ति गोजिरी कवळिती ॥८२॥
ऐसें अंतरीं भोगूनि सुख । नेत्र उघडूनि पाहती सन्मुख । देखोनि श्रीकृष्णाचें मुख । सबाह्य हरिख कोंदाटे ॥८३॥

अहो बतास्य बालस्य बहवो मृत्यवोऽभवन् । अप्यासीद्विप्रियं तेषां कृतं पूर्वं यतो भयम् ॥५२॥

परमाश्चर्य मानिती गौळीं । केवढी भाग्याची नव्हाळी । जैंहूनि कृष्ण जन्मला कुळीं । दशा गोकुळीं तैंहूनि ॥८४॥
अखिलब्रह्मांडगर्भीचें भाग्य । तें वैभव गोकुळा योग्य । होती दुर्घट विघ्नयोग । तें अभाग्य आमुचें ॥२८५॥
कृष्णप्राप्तिपरमानंद । विघ्नप्रसंगें वाटे खेद । हृदयीं कवळूनि मुकुंद । करिती अनुवाद बल्लव ॥८६॥
केवढें आश्चर्य पहा हो नयनीं । अपमृत्यूच्या अनेकश्रेणि । याचि बालकृष्णाचे हननीं । गेल्या होऊनि अघटित ॥८७॥
परी ते विघ्नासीच विघ्न आलें । मृत्यु मरण पावोनि गेले । त्यांचें त्यांसचि कपट फळलें । केलें पावले पूर्वील ॥८८॥
तिहीं पूर्वीं पीडिले प्राणी । तें फळ पावले परतोनी । ज्यांची त्यांस दुष्टकरणी । लागे फिरोनि भोगावी ॥८९॥
निजमुखाची अळंकरणें । पुढें प्रकटीजती दर्पणें । तैसें परासि करितां पुरें उणें । उसणें देणें तें लागे ॥२९०॥
तैसें पूतनादि बकपर्यंत । कृष्णासि करूं आले घात । ते ते पावले फिरोनि अंत । कृष्ण निवांत हरि रक्षी ॥९१॥

अथाप्यभिभवन्त्येनं नैव ते घोरदर्शनाः । जिघांसयैनमासाद्य नश्यंत्यग्नौ पतंगवत् ॥५३॥

पूर्वीं झालें तें असो परतें । अद्यापिही जे कृष्णातें । अनिष्ट करूं म्हणती चित्तें । तें तें यातें न बाधी ॥९२॥
प्रवर्तोनि कृष्णघाता । नाना उपायें आकळूं जातां । दीपीं पतंगाचिया चळथा । तेंवी ते आतां पावती ॥९३॥

अहो ब्रह्मविदां वाचो नाऽसत्याः सन्ति कर्हिचित् । गर्गो यदाह भगवानन्वभावि तथैव तत् ॥५४॥

नंदप्रमुख आश्चर्यें म्हणती । ब्रह्मवेत्ते जे ब्रह्ममूर्ति । त्यांच्या वाणी मिथ्या होती । हें कल्पांतीं घडेना ॥९४॥
वेदवेत्ता गर्गमुनि । त्याची ऐशी भविष्यवाणी । म्हणे नारायणसमो गुणी । चक्रपाणि तव सुत हा ॥२९५॥
पुढें पुढें कळेल तुज । ऐसें रहस्य वदला बीज । त्याचा प्रत्यय येतो मज । अघटित चोज देखोनि ॥९६॥
जैसा जैसा वदला मुनि । तैसें देखोनि नयनीं । तस्मात् सत्पुरुषाची वाणी । मिथ्या कोणी न म्हणावी ॥९७॥

इति नंदावयोगोपाः कृष्णरामकथां मुदा । कुर्वन्तो रममाणाश्च नाविंदन् । भववेदनाम् ॥५५॥

ऐसें नंदादि बल्लवगण । रामकृष्णाचें गुणकीर्तन । परमानंदें सुखावोन । करितां भवभान विसरले ॥९८॥
अज्ञानें पशूंचीं लेंकुरें । ठकितां दंभें वत्सासुरें । झुगारिला तो जगदीश्वरें । विवेकनिकरें भवंडोनी ॥९९॥
असो अज्ञानियां माजील दंभ । त्याचा कृष्णें छेदिला कोंभ । परी ज्ञानियांमाजी जो स्वयंभ । बकसन्निभ मावकर ॥३००॥
मौननिष्ठा मुनिवृत्ति । भस्मोद्धूलनें श्वेतकांति । आमिष लक्षी चित्तवृत्ति । ध्यानस्थिति बहिरंग ॥१॥
तेणें ग्रासितां गोपाळ । कंठीं प्रज्वळला वडवानळ । मग उगळोनियां तत्काळ । चंचुविशाळ टोंचीत ॥२॥
तंव अधोर्ध चंचु दोहीं करीं । धरूनि बकातें कृष्ण चिरी । शकलें पडतां क्षितिवरी । केली निर्जरीं पुण्यवृष्टि ॥३॥
जो मुनिवेषधारी दंभबक । ज्ञानियांमाजी कपटी ठक । तों न्रिदळितां मायिक । पारमार्थिक हरिखले ॥४॥
इतुकेनि संपला एकादश । ऐकोनि परीक्षिति पावला तोष । हें जाणोनि व्यसऔरस । हर्षें द्वादश आरंभी ॥३०५॥
द्वादशामाजी निरूपण । कोहोअघासुराचें मर्दन । करूनि आरी जनार्दन । जो विरोधभजनें फळदाता ॥६॥
बकाचे कंठीं प्रवेशोन । स्वयें निघालों बक मर्दून । हें आश्चर्य मानूनि गौण । श्रीभगवान विचारी ॥७॥
गडियांसहित अघाउदरीं । प्रवेशोनि अघासुर मारी । गडि घेऊनि ये बाहेरीं । द्वादशामाझारीं हे कथा ॥८॥
तें हें श्रीमद्भागवत । महापुराण श्रीकृष्णचरित्र । दशमस्कंधींचा वृत्तांत । शुक सांगत नृपातें ॥९॥
एकनाथवंशमाळे । रत्नापरीस रत्न आगळें । भानुप्रभेचीं सोज्वळें । अतिनिर्मळें प्रकाशती ॥३१०॥
तत्पदपदकमंडित ग्रीवा । भूषण मिरवे दयार्णवा । गोविंदकुप्रेचा सांठोबा । ग्रंथ आघवा रसरत्न ॥११॥
नवरसरसरत्नाचें सार । भक्तिप्रेम मनोहर । श्रवणें पडणें सालंकार । वरदोद्गार जग करी ॥१२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां द्शमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां वृंदावनक्रीडायां वत्सासुरबकासुरवधो नामैकादशोऽध्यायः ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५६॥ टीका ओंव्या ॥३१२॥ एवं संख्या ॥३६८॥ अकरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ॥६३०६॥

अकरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP